भूमिपुत्र

करा नियोजन खरीप ज्वारीचे

backup backup

खरीप हंगामात ज्वारीचे महत्त्व फार मोठे आहे. ज्वारी हे महाराष्ट्राचे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. याशिवाय वैरण म्हणूनही ज्वारीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कमी ओलाव्यावर धान्य आणि कडबा देणारे ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. शिफारस केलेल्या संकरित आणि सुधारित वाणांच्या जोडीला सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खरीप ज्वारीच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊ शकते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज आणि जनावरांना लागणारा चारा पुरवण्यासाठी गरज यातून भागविली जाऊ शकते.

ज्वारी पिकास मध्यम ते भारी, उत्तम निचर्‍यांची जमीन चांगली असते. जमिनीचा सामू 6.5 ते 8 पर्यंत असावा. उन्हाळ्यामध्ये एकदा नांगरणी करून दोन ते तीन उभ्या-आडव्या वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी 10 ते 12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ज्वारी हे सरासरी 500 ते 900 मि. मी. पावसाच्या भागात घेतले जाणारे आणि पावसाचा ताण सहन करणारे पीक आहे.

नैऋत्य मौसमी पाऊस झाल्याबरोबर वाफसा येताच पेरणी करावी. जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा हा खरीप ज्वारीच्या लागवडीसाठी योग्य कालावधी आहे. पेरणीचा कालावधी लांबल्यामुळे खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन ताटांची संख्या घटते. उशिरा पेरणी करताना खोडमाशी नियंत्रणासाठी थायोमेथोक्झम (70 टक्के) या कीटकनाशकाची 3 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पोटरी अवस्था ते पोटरीतून कणीस बाहेर पडेपर्यंतचा काळ पावसाच्या द़ृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. याउलट दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत पावसाचे प्रमाण कमी असायला हवे; अन्यथा दाणे पावसात सापडून बुरशी रोगाने काळे पडतात. यासाठी ज्वारीची वेळेवर काढणी आणि बुरशी रोगास प्रतिबंधक असणार्‍या जातींची निवड करावी.

पेरणी तिफणीने दोन चाड्याच्या पाभरीने करावी. हेक्टरी 7.5 किलो संकरित आणि 10 किलो सुधारित वाणाचे बियाणे पुरेेसे होते. पेरणीसाठी मोहोरबंद आणि प्रमाणितबियाणे वापरावे. शेतकरी स्वत:चे बियाणे वापरणार असतील तर त्यांनी पेरणीपूर्वी बियाणे निवडून घ्यावे आणि बियाण्यास थायरमची बीजप्रक्रिया 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी. दोन ओळीतील अंतर 45 से.मी. तर दोन रोपातील अंतर 15 से. मी. ठेवावे.

SCROLL FOR NEXT