गहू हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये भारत जगात दुसर्या स्थानावर आहे. मात्र, आपण राज्याचा विचार केल्यास महाराष्ट्राचे सरासरी प्रति हेक्टरी गहू उत्पादन फारच कमी आहे. आपल्याकडील भौगोलिक परिस्थिती, हलक्या जमिनीत लागवड, उत्पादनक्षम जातींची मर्यादित उपलब्धता, हवामानातील प्रतिकूलता, संवेदनशील अवस्थेत पाण्याची अनुउपलब्धता, खतांचा असंतुलित वापर ही याची कारणे आहेत. गव्हाचे पीक चांगले येण्यासाठी पेरणी आणि पाणी व्यवस्थापनाविषयी योग्य माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते.
जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसर्या पंधरवड्यात करावी. बागायत वेळेवर गव्हाची पेरणी शक्य तितक्या लवकर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस करावी. पश्चिम महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रातील काळ्या जमिनीत सोयाबीन -गहू या पीक पद्धतीमध्ये गव्हाची पेरणी 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायत उशिरा गव्हाची पेरणी उशिरात उशिरा म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत करावी. तथापि उशिरा पेरणी केलेल्या गव्हास थंड हवामानाचा कालावधी कमी मिळत असल्यामुळे उत्पादनात बरीच घट येते. जिरायत गव्हाची पेरणी पाऊस बंद झाल्यावर परंतु वापसा आल्यानंतर करावी. गहू पिकासाठी भारी खोल काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या ते मध्यम जमिनीत लागवड करायची असेल तर अशा जमिनीत भरखते, रासायनिक खते आणि पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्या लागतात.
पेरणीसाठी प्रति हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे वापरावे. बी फेकू न देता पाभरीने पेरावे. बागायत वेळेवर पेरण्यासाठी जमिनीत ओलावा नसल्यास जमीन ओलवून घ्यावी. वापसा आल्यानंतर जमीन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि गहू बियाणे दोन चाड्यांच्या पाभरीने पेरावे. पेरणी एकेरी करावी. त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ होते.
जिरायत गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावरच होत असते. बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी जास्त होऊ शकतात. गहू पिकास देण्यासाठी एकच पाणी उपलब्ध असेल तर ते पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे. दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. तीन पाणी उपलब्ध असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
विठ्ठल जरांडे