भूमिपुत्र

मळणी यंत्र वापरताना… | पुढारी

Pudhari News

सत्यजित दुर्वेकर

प्रगत शेतीमध्ये मळणी यंत्रांचा वापर होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर  आणि बदलत्या काळानुरुन तो होणे स्वाभाविकही आहे; पण त्याचा वापर करताना वापरकर्त्यांच्या चुकांमुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळू शकते. हे टाळण्यासाठी मळणी यंत्रांना कशा पद्धतीने सामोरे जावे हे समजून घेणे आवश्यक आहे. 

आपल्याकडे आता शेतीमध्ये मळणी यंत्रांचा वापर सर्रास केला जातो. अनेक शेतकरी त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत; पण त्याचा वापर करत असताना काही दुर्घटनाही घडू शकतात. आजमितीस देशामध्ये 25 लाख मळणी यंत्र शेतकर्‍यांच्या वापरामध्ये आहेत. मध्यप्रदेश, पंजाब या उत्तर भारतातील राज्यांमध्ये मळणी यंत्राचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, त्याबरोबर ग्रामीण भागामध्ये होणार्‍या दुर्घटनांमध्ये जवळपास 15 टक्के दुर्घटना या मळणी यंत्र चालवताना झाल्याचा अहवाल आहे. मानवी शरीराचा कुठलाही भाग मळणी यंत्राच्या अत्यंत वेगाने फिरणार्‍या पात्यांच्या संपर्कात आल्यास या दुर्घटना झालेल्या आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या धोकादायक मशिन कायदा 1983 नुसार मळणी यंत्राच्या आत पीक ढकलण्याच्या भागाची लांबी 10 सें.मी. आणि उंची 45 सें.मी. पर्यंत झाकलेली असावी ज्यामुळे यंत्रावर काम करणार्‍या व्यक्‍तीचा हात कटर पात्यापर्यंत पोहचू शकणार नाही, अशी व्यवस्था केलेली आहे. तथापि, आजही बाजारामध्ये असलेल्या अनेक मळणी यंत्रामध्ये अशा प्रकारचे झाकण नसल्यामुळे मशिनमध्ये पीक आत ढकलताना अचानकपणे मजुराचा हातसुद्धा खेचला जाऊन मोठ्या प्रमाणात जखमी होऊ शकतो; म्हणून मळणी यंत्रामध्ये धान्य आत ढकलताना सावकाशपणे टाकावे. तसेच मशिनमध्ये धान्य ढकलण्याची जागा 5-10 अंश तिरक्या कोनात असल्यास धान्य सहजपणे मळणी यंत्राच्या आतमध्ये जाऊ शकते. 

मळणी यंत्रावर काम करताना एकाऐवजी दोन मजूर असणे जास्त सुरक्षित आहे. मळणी यंत्रावर काम करताना दोन मजूर असल्यास एक मजूर जमिनीवरील धान्य उचलून देणे आणि दुसरा मजूर मशिनवर आलेले धान्य आतमध्ये ढकलण्याचे काम स्वतंत्रपणे करू शकतो. काही वेळेस ट्रॅक्टर ट्रॉलीमधून मळणी यंत्रामध्ये धान्य ढकलले जाते. अशावेळी मशिनमध्ये धान्य खेचले जात असताना मजुराचा पायसुद्धा तुटू शकतो. सोयबीन, हरभरा, मसूर, वाटाणा या पिकांची मळणी करतेवेळी फार सावधगिरी बाळगावी लागते. धान्य मशिमध्ये अडकले तर बळजबरीने ते आत ढकलण्याऐवजी पहिल्यांदा ते बाहेर ओढावे आणि मग थोडे थोडे करून आत टाकण्यास सुरुवात करावी. या स्थितीमध्ये प्रथम मशिन बंद करून मगच थ्रेशिंग सिलेंडर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा.

शेतकरी बर्‍याच वेळा जुना कपडा किंवा पोत्याचा तुकडा हाताला गुंडाळून मग हाताला टोचणार्‍या धान्याची मळणी करताना दिसतात. मात्र, यामध्ये काही वेळा कपडा किंवा गोणीचा धागा मळणी यंत्रात अडकल्याने पूर्ण हातसुद्धा मशिनमध्ये खेचला जाऊ शकतो. या प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी हातामध्ये रबर किंवा चामड्याचे मोजे घालणे सर्वात सुरक्षित आहे.

मळणी यंत्रावर काम करताना धान्य आणि भुस्सा वेगवेगळे करण्याचे काम करणार्‍या व्यक्‍तींना अशा प्रकारच्या दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकते. अशा व्यक्‍तींचे कपडे किंवा केस मशिनच्या पात्यांमध्ये अडकून फार मोठी दुर्घटना होऊ शकते. यासाठी या भागावर जाळीदार झाकण लावणे आवश्यक आहे. या ठिकाणी लहान मुलांना कोणतेही काम करू देऊ नये. विशेषतः स्त्रियांनी मळणी यंत्रावर काम करतेवेळी साडी किंवा केस व्यवस्थित बांधणे आवश्यक आहे.

मळणी यंत्राच्या जागी दुर्घटनांमध्ये वीज कनेक्शन लावताना किंवा काढताना काही अपघात झाल्याचे दिसून आले आहे. कधी-कधी चुकीची तार आणि स्टार्टर अशा प्रकारच्या दुर्घटना झालेल्या आहेत. ज्या ठिकाणी मशिन जोडायची आहे, त्याठिकाणी फ्युज किंवा स्टार्टर असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा करणार्‍या उपकरणाजवळ किंवा मीटरला कधीही बेधडकपणे वायर जोडू नये. विजेचे प्रवाह चालू किंवा खंडित करणारे मुख्य बटण यंत्र चालकाच्या जवळ असावे; जेणेकरून गरज पडल्यास तत्काळ मशिन बंद करता येईल. मळणी यंत्राच्या आतील ड्रम किंवा पाती यांच्या आपापसातील घर्षणामुळे काही वेळा आगही लागू शकते. त्याचप्रमाणे विजेच्या तारा जमिनीपर्यंत खाली आल्या असतील तर त्यामुळेही विद्युत प्रवाह मशिनमध्ये शिरून शेतामध्ये आग लागू शकते. काही वेळा मशिन ट्रान्स्फॉर्मरच्या जवळ किंवा खाली ठेवले असल्यास आग लागण्याची शक्यता असते. यामुळे मळणी यंत्र आणि ट्रॅक्टर इंजिन अशा प्रकारे ठेवावे जेणेकरून हवेच्या प्रवाहामुळे ठिणगी उडून आग लागणार नाही. शेतामध्ये कोठेही धूम्रपान करू नये. शेतामध्ये एखाद्या ठिकाणी ढीगभर वाळू आणि एखादी बादली कायमस्वरूपी असावी.

मळणी यंत्रावरचे काम हे अत्यंत कष्टदायक आहे. मशिनमध्ये धान्य टाकण्याचे काम हे जास्त कष्टदायी आहे. मळणी यंत्रावर 7 ते 8 तासांपेक्षा जास्त सातत्याने काम कधीही करू नये. प्रथमोपचार औषधांची पेटी बरोबर ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची नशा करून मळणी यंत्रावर काम करू नये. मळणी यंत्रातून निघणार्‍या भुश्श्याची दिशा हवेच्या दिशेने ठेवावी. चेहर्‍यावर विशेषतः नाक आणि तोंड मास्क किंवा रुमालाने झाकावे. भुश्श्याची बारीक धूळ श्‍वासाबरोबर फुफ्फुसात गेल्यामुळे फुफ्फुसाचा सोरासीस किंवा (फार्मर्स लंग्ज) हा रोग होऊ शकतो.

सर्व प्रकारच्या दुर्घटनांवर उत्तम उपाय म्हणजे मशिन उत्तम स्थितीत असणे आणि मशिन चालविणारा जागरूक असणे आवश्यक आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT