भूमिपुत्र

तुरीवरील शेंगा पोखरणार्‍या अळ्यांचे व्यवस्थापन

Shambhuraj Pachindre

राज्यात यावर्षी चांगले पाऊसमान असल्यामुळे तुरीचे पीक चांगले आहे व येत्या पंधरवड्यात सदर पीक फुलोर्‍यावर येईल. शेतकरी बंधूंना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मागील आठवड्यात असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणार्‍या अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणार्‍या अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तूर पिकावर शेंगा पोखरणार्‍या अळ्यांमधे खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो.

शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा) : या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि.मी. लांब, पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या अशा विविध रंगछटेत दिसून येत असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे खातात.

पिसारी पतंग : या पतंगाची अळी 12.5 मि.मी.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगांवरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून शेंगेतील दाणे पोखरते.

शेंगे माशी : या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढर्‍या रंगाची असून तिला पाय नसतात. अळीच्या तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगेच्या आत राहून शेंगांतील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाणे खराब होतात. शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करून सदर किडींच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगे माशी या तीनही किडी कळ्या, फुले व शेंगांवर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरिता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.

1. प्रतिहेक्टर 20 पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडीच्या अळ्या खाऊन फस्त करतात.

2. पहिली फवारणी (50 टक्के फुलोरावर असताना) : निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडिरेक्टिन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.ए.एन.पि.व्ही. (1109 पिओबी/मिली) 500 एल.ई./ हे. किंवा बॉसिलस थुरिंनजिएंसिस 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी., 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी) : इमामेक्टिन बेझोएट 5 टक्के एस. जी. 3 ग्रॅम किंवा लँब्डा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. प्रवाही 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

4. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात.

-विकास पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT