भूमिपुत्र

Land management : भू व्यवस्थापन करताना खत आणि पाण्याचे नियोजन असे करावे

backup backup

पाण्याचा मनमानी वापर आणि रासायनिक खतांचा बेसुमार मारा यामुळे शेतजमिनीची उत्पादकता घटत आहे. जमिनी क्षारपड होऊन त्या निकामी होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता शेती, पिकांसाठी पाणी आणि खतांचा गरजेइतकाच वापर करण्याची गरज आहे.(Land management)

गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे शेतजमिनीचे प्रमाण कमीच होऊ लागले आहे. देशात जवळपास 24 दशलक्ष हेक्टर जमीन सिंचनाच्या पाण्यामुळे क्षारपड होऊन नापीक झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच पाण्याच्या बेसुमार वापरामुळे सुमारे 5 ते 7 लाख हेक्टर जमीन क्षारपड झाली आहे.

सांगली जिल्ह्यात हेच प्रमाण सव्वालाख हेक्टरच्या घरात गेले आहे. या क्षारपड जमिनीत साधे गवताचे पातेदेखील उगवत नाही, अशी स्थिती आहे. या वाया गेलेल्या जमिनी वापरात आणण्यासाठी पिकांची निवड व पीक पध्दती अतिशय महत्त्वाची आहे. पिकांची क्षार सहन करण्याची कुवत कमी – जादा असू शकते.

क्षारपड जमिनीसाठी सच्छिद्र पाईपची कृत्रिम निचरा प्रणाली यावरील चांगला उपाय ठरत आहे. त्यामुळे जमीन सुधारण्यासाठी मदत होते. क्षारांचा निचराही योग्यप्रकारे होतो. (Land management)

जमिनीचे सपाटीकरण आणि उतार हे क्षारपड जमिनीच्या सुधारणेच्या द़ृष्टीने महत्त्वाची बाब ठरते.

अशा पद्धतीचा विचार केल्यास क्षारयुक्त जमिनीमध्ये चांगले पीक उभे करणे शेतकर्‍यांच्या द़ृष्टीने आव्हान बनू लागले आहे.

क्षारपड जमिनीमध्ये गहू, बार्ली, मोहरी, कापूस, बाजरी इत्यादी पिके घेताना 25 टक्के जादा बियाणे वाढवून वापरावे लागते.

या जमिनीमध्ये पेरणी आणि लागणीच्या पद्धतीच्या नियोजनाबाबत विचार केल्यास अशा पद्धतीत वारंवार बदल करून मिठाचे क्षेत्र वगळून बियाण्याची टोकण करणे गरजेचे ठरते. तणाचा योग्यवेळी बंदोबस्त करून कीड रोगनियंत्रण करणे गरजेचे आहे.

सेंद्रिय खते क्षारयुक्त जमिनींना उपयुक्त

सेंद्रिय खताचे प्रमाण वाढवावे, पीकांसाठी पाण्याच्या पाळ्या, खते देणे, बियाणे दर, पेरणीपूर्वीची पाण्याची पाळी, पिकांच्या सुधारित जातींचा वापर केल्यास पाणथळ व क्षारयुक्त जमिनीमध्येही चांगले पीक येऊ शकते.

जमिनीची घटती उत्पादकता आणि वाढता खर्च याचा ताळमेळ घालणे गरजेचे आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो; पण बर्‍याचवेळा जमिनीची गरज लक्षात न घेताच टाकलेल्या या खतांमुळे अपेक्षित उत्पादन निघत नाही, तसेच पर्यायाने केलेल्या खर्चाचा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो.

शिवाय शेतजमिनीचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी शेतजमिनीचे वेळोवेळी माती परीक्षण करून खतांचे व्यवस्थापन केले, तर ते फायद्याचे ठरते.

खरे तर, शेतीत टाकलेल्या खतांपैकी फक्त तीस ते चाळीस टक्केच खते पिकांना मिळू शकतात.

यासाठी टाकलेल्या खतांच्या पुरेपूर फायद्यासाठी खते द्रवरूपाने दिली, तर त्याचा पुरेपूर फायदा होतो.

पिकांना प्रामुख्याने हवेतून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन मिळतो. नत्र, पालाश, स्फुरद मिळते. याखेरीज लोह, मॅग्नेशिअम, बोरॉन, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम आदींबरोबरच क्लोरीनचा वापरदेखील पिकांसाठी महत्त्वाचा ठरतो.

केवळ रासायनिक खतांवरच न थांबता जमिनीचा कस वाढविण्यासाठी अन्य खते यात प्रामुख्याने मासळी खत, कंपोस्ट, विविध पेंडींचे खत, हाडांचा चुरा, हिरवळीचे खत, जीवाणू खत महत्त्वाची ठरू शकतात. यामुळे जमिनीचा कस वाढण्यास मदत होते.

रासायनीक खंतांऐवजी सेंद्रिय खते महत्वाची

पालापाचोळा, गवत कुजून जमिनीत जीवाणूंची संख्यादेखील वाढते. या घन पदार्थाचे विघटन हे केवळ शेतीतूनच होते, हे ध्यानात घ्यायला हवे. (Land management)

आता रासायनिक खतांचे दर सामान्य शेतकर्‍याला परवडत नाहीत. यासाठी उपलब्ध होणार्‍या खतांचा योग्य वापर करण्याची गरज आहे. बीज प्रक्रियेसाठी जीवाणू खतांचा वापर फायद्याचा ठरतो.

जीवाणू खतांमुळे पिकांची उगवण लवकर आणि चांगली होते. हिरवळीची खतेदेखील पिकांना फायद्याचे ठरते.

यात प्रामुख्याने शेवरी, धैंचा, ताग, चवळी, सोयाबीन आदी फुलोर्‍यापूर्वी जमिनीत गाडले असता त्याचा पिकांसाठी चांगला फायदा होतो.

शेणखत, मासळी खतांबरोबरच हाडांचा चुरादेखील जमिनीसाठी पोषक ठरतो.

या सार्‍याच बाबींतून निसर्ग स्वच्छ करण्यासाठी, राहण्यासाठी शेतीतून होत असलेल्या स्वयंचलित प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येईल.

जमिनीत बर्‍याचवेळा स्फुरद मोठ्या प्रमाणात वापरले जाते; मात्र ते पूर्णपणे पिकांसाठी उपलब्ध होतेच असे नाही. शेतीत टाकलेल्या स्फुरदाचा मोठा अंश हा जमिनीत तसाच स्थिर होऊन राहतो.

या स्थिर स्फुरदाचे पिकांसाठीच्या उपयुक्त स्फुरदांमध्ये रूपांतर करण्याचे काम हे जीवाणू करतात. ते केवळ शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात.

जमिनीत शेतकरी एक धान्याचे बी पेरतो, त्यापासून अक्षरश: हजारो बी मिळतात.

यापेक्षा शेतीचे महत्त्व कोणते? शेती शाबूत ठेवून वातावरण आणि निसर्गदेखील स्वच्छ राखण्याचे काम हे शेतीतूनच होते, हे लक्षात घ्यायलाच हवे.
(समाप्त)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT