groundwater levels 
भूमिपुत्र

groundwater : चिंता भूजल पातळीची

मोनिका क्षीरसागर

यंदाच्या जागतिक जल दिवसानिमित्त भूजल पुनर्भरणाचा संकल्प करण्यात आला. अद‍ृश्य स्वरूपातील भूजलाचा शोध घेणे, सकारात्मक परिस्थिती निर्माण करणे, भूजलास द‍ृश्य स्वरूपात आणण्यासाठी भूजल पुनर्भरण करून पाण्याची पातळी वर आणणे हे यंदाच्या 'जल दिवस'चे लक्ष्य ठेवण्यात आले आणि त्याद‍ृष्टीने वाटचाल होईल, अशी अपेक्षा आहे. भूजलाची पातळी घसरत आणखी खोलवर जाऊ लागली तर कालांतराने संपूर्ण जग हे एक ओसाड होईल.

आज जगभरात अनेक ठिकाणी पाणीटंचाईमुळे लोक एका देशातून दुसर्‍या देशांत स्थलांतर करत आहेत. काही ठिकाणी स्थानिक लोक त्यांना 'हवामान बदल पीडित' असे म्हणतात. या स्थितीमुळे तणाव वाढत असून तो आपसूकच तिसर्‍या जागतिक महायुद्धाला निमंत्रण देत आहे. जागतिक जल दिवसाच्या निमित्ताने शांतता कायम करण्याचा संकल्प करण्यात आला. आटलेल्या पाण्याचे झरे पुन्हा खळखळून वाहण्यासाठी भूजल पातळी वाढवण्याचे ध्येय ठरवण्यात आले.

भारताचा विचार केल्यास पाण्याची पातळी चिंताजनक स्थितीत पोचली आहे. देशातील 72 टक्के भागात पाण्याचा प्रचंड उपसा होत असून त्या तुलनेत कमी पाणी जमिनीत मुरत आहे. एकप्रकारे ही ओव्हरड्राफ्टचीच स्थिती आहे. म्हणजेच पृथ्वीचे उत्खनन होत असून त्यात पुनर्भरण होताना दिसून येत नाही. अशी स्थिती बहुतांश भागात आहे. भारतातील दोन तृतीयांशपेक्षा अधिक जमीन कोरडवाहू झाली तर स्थिती आणखीच ढासळू शकते. आमचा देश हवामान बदलाच्या निर्वासितांच्या श्रेणीत येऊ शकतो. ही खरोखरच धोकादायक बाब राहू शकते. या लेखातून घाबरवण्याचा उद्देश नाही. परंतु वेळीच सावध होण्याचा इशारा केला जात आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण स्वत:ला सावरले पाहिजे आणि देशाला पाणीदार करायला हवे.

भारताला सुजलाम् सुफलाम् करायचे असेल तर पाणी व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करायला हवे. पूर्वीच्या काळी भारतात पारंपरिकरीत्या पाण्याचे पुनर्भरण केले जात होते आणि त्याचेच अनुकरण करावे लागेल. तलाव, विहीर, ओढा या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. अशा स्थितीत हिरवळ कशी वाढेल, जमिनीचा शुष्कपणा कसा थांबवता येईल, पृथ्वीचे आरोग्य चांगले कसे राहील, याचा विचार करायला हवा. म्हणजेच वृक्ष लागवड करून जंगलांचे संवर्धन करून पृथ्वीला नैसर्गिक संकटापासून वाचवू शकतो. या आधारावर पाऊस कमी झाला तरी फारशी अडचण राहणार नाही. या कृतीने आपला देश हवामान बदलामुळे निर्वासित होण्याच्या संकटापासून वाचेल आणि जगाला शांततेचा संदेश देऊ शकेल. निसर्गप्रेम आणि जलसंरक्षणाचा पुढाकार या माध्यमातून भारत संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देऊ शकतो. भारताची परंपरा ही निसर्गावर प्रेम करायला लावणारी आहे. त्यामुळेच भारतात दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत नद्या फारशा प्रदूषित झालेल्या नव्हत्या. युरोपातील नद्या या गेल्या शतकातच दूषित झाल्या होत्या. परंतु युरोपीय देशांनी आपल्या देशातील नद्यांची स्थिती सुधारली. पण आज भारतातील नद्या या नाल्याचे रूप धारण करत आहेत. पाण्याच्या स्रोतांवर होणारे आक्रमण थांबवायला हवे.

गेल्या काही वर्षांत जमिनीचे भाव वाढत चालल्याने नद्यांचा आकार लहान होत आहे. नदीकाठावर भराव टाकून इमारती उभारल्या जात आहेत. आपल्याकडे जमिनींच्या नोंदी योग्य प्रकारे झालेल्या नाहती. पोडिंग एरिया आणि कॅचमेंट एरियाला योग्यरीरतीने चिन्हांकित केलेले नाही. त्यामुळे या क्षेत्रात अतिक्रमण वाढत आहे. जेव्हा पाण्यावर आक्रमण होते, तेव्हा पाणीसंकट, भूजल संकट वाढणे साहजिकच आहे. दुसरीकडे प्रदूषणात भर पडत चालली आहे. जोपर्यंत आपण पाण्याचे प्रदूषण थांबवत नाही, भूजल संरक्षण करत नाही, तोपर्यंत आपण देशाला पाणीदार, सुफलाम् सुजलाम् करू शकणार नाही. नैसर्गिक स्रोतात प्रदूषित पाणी जाण्यापासून रोखायला हवे. उद्योगातील रसायनमिश्रित पाणी थेट नद्यांत सोडले जात आहेत. ही कृती गंभीर गुन्हा म्हणून गृहित धरली पाहिजे. अशा प्रकारचा घोर अपराध करणार्‍या लोकांना मृत्युदंडाची शिक्षाच द्यायला हवी. कारण पाण्याच्या स्रोतात थेटपणे सांडपाणी सोडले जाते आणि तेच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते.

प्रदूषित पाणी पिल्याने एखाद्या वेळी मृत्यू देखील होतो. त्यामुळे पाण्यात भेसळ करणारा व्यक्‍ती हा मारेकरीच म्हणून गृहीत धरला पाहिजे. अशा गुन्हेगारांना कदापि पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये. पाणी स्वच्छ राहण्यासाठी जनजागृती करायला हवी आणि त्यावर घाला घालणार्‍या व्यक्‍तीला काय शिक्षा होऊ शकते, याचाही प्रसार व्हायला हवा. संपूर्ण पृथ्वी पाणीदार करण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. धरतीमातेचे पोट भरले तर सर्वांना पाणी मिळेल. पाणी हे आपले जीवन आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. पाणी वाचवले तर आपले जीवन वाचेल. पाण्याचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन करण्याची वेळ आली आहे. पाण्याने जीवन समृद्ध होते. हेच पाणी कमी झाले तर आपले आयुष्य खडकाळ झाल्याशिवाय राहणार नाही.

वाढत्या शहरीकरणामुळे आणि मानवाच्या बेशिस्तीमुळे पाणी पातळी खालावत चालली आहे. हवामान बदलाचा फटका सहन करावा लागत आहे. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे भयंकर दुष्काळ पाहावयास मिळत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत असताना मानव मात्र याकडे एक घटना म्हणूनच पाहत आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत. आतापासूनच सुरुवात करायला हवी; अन्यथा पुढच्या पिढीला उजाड माळरान पाहण्याशिवाय हाती काहीच लागणार नाही.

– डॉ. राजेंद्र सिंह,(आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT