बहार

स्‍मरण : ‘चले जाव’ आंदोलन आणि भारतीय स्वातंत्र्य

Arun Patil

पोपट नाईकनवरे

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारत मुक्त झाला असला, तरी त्याची खरी सुरुवात 1942 च्या 'चले जाव' आंदोलनानंतर झाली. या आंदोलनाची कहाणी भारतीयांसाठी आजही अत्यंत प्रेरणादायी आहे.

सन 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिश साम्राज्याला सर्वात मोठा हादरा जर कोणत्या आंदोलनाने दिला असेल? तर तो 1942 च्या 'चले जाव' किंवा 'भारत छोडो' आंदोलनाने. या आंदोलनाला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज आपण भारताच्या स्वातंंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. गांधीजींबरोबरच अनेक क्रांतिकारकांचे बलिदान, दादाभाई नौरोजींपासून ते लोकमान्य टिळकापर्यंत अनेक राष्ट्रीय नेत्यांनी केलेला त्याग, समाजसुधारकांचे समाज घडविण्यासाठीचे अमूल्य योगदान, संघर्ष आपणास विसरता येणार नाही.

गांधीजींनी केलेल्या अनेक आंदोलनांपैकी विशेष नोंद घ्यावी लागेल, असे आंदोलन म्हणजे 1942 चे 'चले जाव' आंदोलन. या आंदोलनाची कहाणी तमाम भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. 1939 मध्ये युरोपात दुसर्‍या महायुद्धाला तोंड फुटले आणि या युद्धात जपानने प्रचंड मुसंडी मारत म्यानमारपर्यंत आपले वर्चस्व मिळवले. त्यामुळे ब्रिटिशांना भारतीयांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक वाटत होते. त्यासाठी त्यांनी क्रिप्स मिशन भारतात पाठवले. क्रिप्स मिशनच्या तरतुदी राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांना मान्य झाल्या नाहीत. दुसर्‍या बाजूला, जर जपानने आपल्यावर वर्चस्व मिळवले तर त्यांचा प्रतिकार करणे अवघड जाईल, हे लक्षात घेऊन गांधीजींनी 'क्विट इंडिया'चा नारा दिला.

या आंदोलनाबाबत वर्धा याठिकाणी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता; मात्र त्या निर्णयाला संमती देण्यासाठी 6 ते 9 ऑगस्टच्या दरम्यान मुंबई येथे गवालिया टँक (आजचे क्रांती मैदान) मैदानावर राष्ट्रीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानावर संपूर्ण भारतातून लाखो प्रतिनिधी आले होते. याच मैदानावर गांधीजींनी सामान्य जनतेला 'करेंगे या मरेंगे' असा संदेश दिला. हा संदेश देताना गांधीजी सामान्य जनतेला उद्देशून म्हणाले, 'आम्ही एक तर भारत स्वतंत्र करू किंवा त्या प्रयत्नात आमच्या प्राणांंची आहुती देऊ.

आमच्या गुलामगिरीची अवस्था कायम राहिलेली पाहण्यास आम्ही जिवंत राहणार नाही!' या ठिकाणी 'करा किंवा मरा' या गांधीजींच्या घोषणेमध्ये खूप अर्थ दडलेला आहे. ज्या व्यक्तीने संपूर्ण जीवन अहिंसेची पूजा करण्यात व्यतीत केले, तीच व्यक्ती 'करेंगे या मरेंगे'चा नारा जनसामान्यांना देते, ही खूप क्रांतिकारी घटना मानली पाहिजे. कदाचित म्हणूनच या लढ्याने भारतीयांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणला.

क्रांती मैदानावरील राष्ट्रीय नेत्यांच्या कार्याचा सुगावा ब्रिटिशांना लागल्यामुळे 9 ऑगस्टच्या पहाटे 'ऑपरेशन झिरो अवर'च्या माध्यमातून गांधीजींबरोबरच राष्ट्रीय सभेतील अनेक नेत्यांना पकडून अटक करण्यात आली. गांधीजींना मुंबईवरून पॅसेजर रेल्वेने पुण्याला आणले जाणार होते; मात्र पुणे स्टेशनवर जनसामान्यांचा सागर लोटल्याने त्यांना चिंचवड स्टेशनवर उतरवले आणि मोटारीने त्यांना आगाखान पॅलेस या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले.

आंदोलन सुरू होण्याअगोदरच आंदोलनातील नेत्यांना नजरकैदेत ठेवल्यामुळे किंवा त्यांना अटक केल्यामुळे आंदोलनाची धार बोथट होईल, अशी ब्रिटिशांची धारणा होती. मात्र या अटकेनंतर प्रचंड मोठ्या संख्येने लोकसमूह मैदानावर एकत्र आला. या जमावाने आंदोलनाचा प्रसार गावखेड्यापर्यंत पोहोचवला आणि याच सामान्य जनतेने आपले असामान्य कार्य करत जवळजवळ 250 पेक्षा जास्त रेल्वेस्थानके उद्ध्वस्त केली. 1600 पेक्षा जास्त दूरसंचार केेंद्रे, 500 पेक्षा जास्त टपाल कार्यालये आणि 150 पेक्षा जास्त पोलिस स्टेशन उद्ध्वस्त केले.

या आंदोलनात शाळकरी मुलांनी शाळा सोडून केवळ सहभागच नोंदवला नाही, तर आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. त्यामध्ये नंदूरबार येथे शिरीषकुमार हा शाळकरी मुलगा आपल्या चार शाळकरी मित्रांना बरोबर घेेऊन घोषणा देत असताना, त्याला पोलिसांच्या गोळ्या छाताडावर झेलाव्या लागल्या आणि तो शहीद झाला.

आसाममध्ये 16 वर्षीय वयाच्या कनकलता बरूआ या मुलीने आपल्या सवंगड्यांना एकत्र बोलावून पोलिस स्टेशनसमोर तिरंगा ध्वज फडकवला. दुर्दैवाने तिलाही हौतात्म्य पत्करावे लागले. त्याचप्रमाणे सामान्यांमधून तयार झालेल्या युवा नेतृत्वांनीही भूमिगत राहून या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. यामध्ये साने गुरुजी यांनी कधी धोती कुडता घालून, कधी पगडी घालून, तर एक वेळ डॉक्टरांचा वेश परिधान करून चळवळीतील नेते जयप्रकाश नारायण यांना जेवण दिले. उषा मेहता यांनी रेडिओ केंद्र चालवून या लढ्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवली.

अरुणा असफअली यांनी याच क्रांती मैदानावर तिरंगा ध्वज फडकावून सामान्यांना संघटित केले आणि आपल्या प्रकृतीकडे लक्ष न देता भूमिगत कार्य चालू ठेवले. वास्तविक, त्यांना गांधीजींनी या आंदोलनात सहभाग न नोंदविण्याचा सल्ला दिला होता. मात्र तो न ऐकता त्यांनी या स्वातंत्र्यसमरात आपली भूमिका पार पाडली. पुढे त्यांना अटक झाली असतानाही त्यांनी जेलमध्ये 'भगतसिंग झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.

जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, साने गुरुजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांचे नेतृत्व याच काळात तयार झाले. त्यामध्ये सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे 'प्रतिसरकार' तमाम महाराष्ट्राला माहीत आहे. यशवंतराव चव्हाण हे तर लग्नाला फक्त दोनच महिने झालेले असताना या आंदोलनात सहभागी झाले. त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अशा पद्धतीने सामान्यांमध्ये असामान्यत्व निर्माण केल्यास समाजाला आणि पर्यायाने देेशाला पुढे घेऊन जाता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण गांधीजींनी या लढ्यातून घालून दिले.

सामान्यांच्या कर्तबगार, असामान्य कामगिरीमुळे आणि हुंकारामुळे आपल्याला यापुढे भारतात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, याची जाणीव ब्रिटिशांना झाली आणि त्यांनी आपला कारभार आटोपता घेतला. पुढे अवघ्या पाच वर्षांमध्येच भारताला स्वातंत्र बहाल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT