बहार

समाज माध्यमे : नक्‍की हिरो कोण ?

अमृता चौगुले

इन्स्टाग्राम, फेसबुकच्या व्हर्च्युअल जगात राहणारा एक तद्दन प्रसिद्धीलोलुप माणूस काहीतरी आवाहन करतो आणि हजारो तरुण त्याच्या प्रभावाखाली येऊन रस्त्यावर उतरतात, ही गोष्ट आपल्यासाठी समाज म्हणून अत्यंत घातक आणि चिंताजनक आहे. माध्यमे हाताळण्याची, सारासार विवेक वापरून त्यातील चांगल्या-वाईट गोष्टींचा निर्णय करण्याची कुवत नसलेली, अशी आपली तरुण पिढी आहे का?

आपल्या देशात साधारण 2020 सालच्या सुरुवातीला कोरोना विषाणूचे रुग्ण आढळू लागले. त्यावर उपाय म्हणून सर्वप्रथम शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर तर कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा मार्ग आपण स्वीकारला. तेव्हापासून गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंदच होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर, म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शालेय शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला. मर्यादित विद्यार्थिसंख्या ठेवून, मुलांना शाळेत येण्याची कुठलीही सक्‍ती न करता शाळा सुरू झाल्या. त्यानंतर ओमायक्रॉन विषाणूची कमी तीव्रता असलेली लाट आली. तिला थोपवण्यासाठीही सरकारने पुन्हा शाळांना विद्यार्थिसंख्या मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले. शाळा आणि महाविद्यालयांचे कामकाज पूर्ण क्षमतेने चालवण्याविषयीची ही अनिश्चितता गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने दिसून येते. ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा आणि ते पूर्ण कार्यक्षमतेने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. अर्थात, या महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागला. गेली दोन वर्षे तर दहावी आणि बारावीच्या परीक्षाही ऑनलाईन घेण्यात आल्या.

आता ओमायक्रॉनची साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत असताना, राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करत होता. हा निर्णय अयोग्य असून, तसे केल्यास त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे 'हिंदुस्थानी भाऊ' नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सांगण्यात येऊ लागले. या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकने सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत दहावी-बारावीचे लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कोरोनाचा धोका आता हळूहळू कमी होत असताना येत्या महिन्यात होऊ घातलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा अजूनही ऑनलाईनच घेण्यात याव्यात अशी विचित्र आणि अतर्क्य मागणी घेऊन एका इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सरच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुलांची झुंड रस्त्यावर उतरली. त्यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर गर्दी करत गदारोळ माजवला. शिवराळ भाषा, लोकांना धमक्या आणि धार्मिक ध्रुवीकरण एवढेच करू शकणार्‍या या हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनाला हे विद्यार्थी का भुलले? आणि हा तथाकथित भाऊ नेमका आहे तरी कोण, की ज्याच्यामुळे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो?

हा 'हिंदुस्थानी भाऊ' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येते. विकास पाठक असं त्याचं खरं नाव आहे. परंतु टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्रामवर 'हिंदुस्थानी भाऊ' या नावाने तो प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 1.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर 'हिंदुस्थानी भाऊ' या पेजवर 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. हिंदू असल्याचा अभिमान असल्याचे सांगणारा हा कथित भाऊ गेल्या काही वर्षांत इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून प्रकाशझोतात आला. त्याला बिग बॉससारख्या टीव्ही शोजनी आणखी प्रसिद्धी दिली. गेल्या काही वर्षांपासून एक सोशल मीडिया कंपनी हिंदुस्थानी भाऊला प्रमोट करत होती. गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानी भाऊला सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मूळ मुद्दा दुर्लक्षित राहता कामा नये. इन्स्टाग्राम, फेसबुकच्या व्हर्च्युअल जगात राहणारा एक तद्दन प्रसिद्धीलोलुप माणूस काहीतरी आवाहन करतो आणि हजारो तरुण त्याच्या प्रभावाखाली येऊन रस्त्यावर उतरतात, ही गोष्ट आपल्यासाठी समाज म्हणून अत्यंत घातक आणि चिंताजनक आहे. माध्यमे हाताळण्याची, आपला सारासार विवेक वापरून त्यातील चांगल्या-वाईट गोष्टींचा निर्णय करण्याची कुवत नसलेली, अशी आपली तरुण पिढी आहे. इन्स्टाग्राम असो वा फेसबुक. ही सगळी माध्यमे सशाच्या गुहेसारखी आहेत. त्यावर एखादा मुलगा किंवा मुलगी काय पाहतेय हे कळायला कुठलाही मार्ग नसतो. त्यात दाखवल्या जाणार्‍या गोष्टींचा त्या मुलावर कसा परिणाम होतोय हेही कळणं अवघड असतं. त्याने असंख्य प्रश्‍न तयार झालेत. फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त चालणारा प्रकार म्हणजे रिल्स! त्याची लांबी जास्तीत जास्त तीस सेकंद असते. ते बघण्याची सवय आपल्या तरुण पिढीला लागली आहे. त्यामुळे तीस सेकंदाच्या किंवा एक मिनिटाच्या वर काही बघण्याचा संयम त्यांच्यात उरलेला नाही. ऑफलाईन पेपर लिहिताना तासभर लिखाण केल्यानंतर मुलांचे हात थरथरू लागले, अशी एक बातमी परवा तुम्ही ऐकली असेल. हे कशामुळे होतं? कारण काहीतरी दीर्घ, बैठकीचं काम करण्याची, दूरद‍ृष्टीचा विचार करण्याची शक्‍ती आपलं मानवी मन हरवून बसलं आहे. जे काही सांगायचंय ते 30 सेकंदात सांगा, अशी दबक्या आवाजातली मागणी होऊ लागली ती यामुळेच! जगातील गुंतागुंतीचे कित्येक प्रश्‍न तीस सेकंदात कसे सांगणार, असाही प्रश्‍न यातून उभा राहिला. एखाद्या स्टेटस व्हिडीओतून कळावं इतकं हे जग सोपं असलं पाहिजे, असं आजच्या जगाला वाटू लागलं आहे. या अटेंशन मिळवण्याच्या धडपडीत 30 सेकंदात लोकांनी माझंच स्टेटस बघावं, माझेच रिल्स बघावेत असा अट्टाहास आकाराला येऊ लागला आणि त्यातून अर्थातच शिवराळ भाषा, बीभत्सपणा, चिथावणीखोर वक्‍तव्य, धमक्या इत्यादींचा बाजार सुरू झाला. अशा गोष्टी केल्या तरच त्या 30 सेकंदात आजचा तरुण आपल्याला बघेल, ऐकेल असं या लोकांच्या लक्षात येऊ लागलं. याचा परिणाम असा झाला, की देशात मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होऊ लागलं. वेगवेगळ्या जातीच्या, उपजातींच्या, धर्माच्या, प्रदेशाच्या असंख्य अस्मिता आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत, त्या व्यक्‍त करण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म या सोशल मीडिया साईट्सनी उपलब्ध करून दिला. यातून ध्रुवीकरणाला इंधन मिळालं. हे ध्रुवीकरण राजकीय पक्षच घडवून आणतात, हे अर्धसत्य आहे. तंत्रज्ञानाचं अल्गोरिदम हे ध्रुवीकरण वाढवण्यात मोठा हातभार लावतंय. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जिथे ध्रुवीकरण करावंच लागतं, अशा तंत्रज्ञानाचा वापर करणारी तरुण पिढीही याला तितकीच जबाबदार आहे.

एक महत्त्वाचा प्रश्‍न असा समोर येतो, की यातून आपण कुणाला हिरो बनवतोय? 'सुमारांची सद्दी' असा एक वाक्प्रचार वापरला गेला होता, आता तेच होतंय का? शिवराळ बोलणारा हिंदुस्थानी भाई हे आपल्या तरुणाईचे आदर्श असणार आहेत का? किंवा इन्स्टाग्राम रिल्समधून गोळ्या घालण्याची धमकी देणार्‍या पिंपरी-चिंचवडच्या तरुणीची भाषा, ही आपल्या तरुणाईची भाषा असणार आहे का? फक्‍त छान मेकअप केला आणि थोडं शरीरप्रदर्शन केलं की त्याला पाच-सहा मिलियन व्ह्यूज देणारी आपली तरुणाई कुठल्या दिशेला चाललीय? भौतिक सुखाच्या बरबटलेल्या जगात वावरणारे हिरो-हिरॉईन्स, हे आपल्या तरुणाईचे रोल मॉडेल्स असणार आहेत का? नक्‍की हिरो कोण आणि भविष्यातली पिढी कुणाला बघून मोठं होणार? हासुद्धा प्रश्‍न या सोशल मीडियाच्या डिझाईनने आपल्यापुढे उभा करून ठेवला आहे. दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून अरब क्रांती घडली, पण ती निदान अन्यायाविरुद्ध होती. काही वर्षांनी तिचाही बीमोड झाला. सोशल मीडियाची ताकद किती असू शकते हे या क्रांतीने दाखवून दिले. हेच माध्यम वापरून एका विचित्र मागणीसाठी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुण मुलांना रस्त्यावर आणू शकत असेल, तर आपण कुणीकडे चाललो आहोत, आपली वाटचाल एका अराजकतेकडे तर चालू नाहीये ना, असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. ऑनलाईन लर्निंगमुळे गेल्या दोन वर्षात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला खरा, पण तो वापरावा कसा, याचं फॉर्मल ट्रेनिंग देणारा कुठलाही कोर्स नाही. आता तिशीत असलेली पिढी शाळेत असताना मूल्यशिक्षण नावाचा एक वेगळा तास असायचा. त्याच्यासारखाच, शाळेत आता डिजिटल लिटरसी, डिजिटल एटिकेट्स याचा अभ्यासक्रम घेऊन यावा लागेल. यासाठी जे वेगवेगळे गट काम करतात त्यांना बळ देणे आणि अल्गोरिदम, सोशल मीडिया यांच्या बाबतीत समाजाला अधिकाधिक सजग बनवणं हाच यावरचा उपाय आहे. तीस सेकंदाच्या भाषेमध्ये, तीस सेकंदाच्या नव्या फॉर्ममध्ये नवे हिरो घडवणं आणि त्यासाठीचा कंटेंट बनवणं हीसुद्धा काळाची गरज आहे. या दोन गोष्टी केल्या नाहीत, तर सुमारांची सद्दी अशीच वाढत जाईल. असे कित्येक हिंदुस्थानी भाऊ तयार होत राहतील आणि लोकांची डोकी भडकवत राहतील. त्यातून पुढे काय होईल, हे आपल्यापैकी कुणाच्याच हातात राहणार नाही. हे धोकादायक असलं, तरी याच सोशल मीडियाच्या डिझाईनमध्ये याचं उत्तर सापडण्याची शक्यताही लपून बसली आहे. ती शक्यता तपासून पाहिली पाहिजे आणि त्यानुसार बदलत राहिलं पाहिजे. तरच येणार्‍या 5जी, मेटाव्हर्स आणि वेब थ्रीच्या जगात आपण हवा तसा समाज घडवू शकतो.

  • डॉ. योगेश प्र. जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT