बहार

शार्क टँक इंडिया : क्रिएटिव्ह उद्योजकांच्या शोधात…

Arun Patil

शहरी व ग्रामीण भागातली होतकरू तरुणाई संधीची वाट पाहते आहे. त्यांच्याकडे कल्पना आहे. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे.पण पैसा नाही. 'शार्क टँक इंडिया' देशभरातल्या अशा होतकरूंसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

कमलेश घुमरे मालेगावच्या एका शेतकर्‍याचा मुलगा. शेतीच्या जाडजूड अवजारांमुळे वडिलांना त्रास व्हायचा. त्या त्रासानं मुलगा प्रचंड अस्वस्थ व्हायचा. याच अस्वस्थतेतून कमलेशनं एका जुगाडू कल्पनेला जन्म दिला. भंगारातून रोज काहीना काही उचलून तो घरी आणायचा. त्यामुळे आजूबाजूची मंडळी त्याची रोज चेष्टा करायची. पण पठ्ठ्यानं हार मानली नाही. आपल्या नरू नावाच्या मित्राला सोबत घेत त्यानं थेट भंगारातून अवजारं बनवली.

काळ बदलतोय. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळतेय. हेच हेरत कमलेशनं शेतीसाठी वापरायला सोपी अशी अवजारं बनवायचा संकल्प केला होता. इथंच तो थांबला नाही. आपल्या वडिलांना झालेला त्रास इतर शेतकर्‍यांना होऊ नये म्हणून तो कामालाही लागला. त्याला माफक दरात ही अवजारं शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवायचीत. त्याची दखल थेट महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी घेतली. ते थेट त्याच्या शेताच्या बांधावर आले.

सोनी टीव्हीवरच्या 'शार्क टँक इंडिया' या बिझनेस रिअ‍ॅलिटी शोमुळे त्याचं टॅलेंट आता देशभर पोहोचलंय. त्याची जुगाडू कल्पना सगळीकडे व्हायरल होते आहे. आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर आणि भन्नाट कल्पनेच्या जोरावर कमलेशनं सगळ्यांना भुरळ घातली. त्यामुळे 'शो'चे जज पीयूष बन्सल यांनी त्याला व्यवसायासाठी थेट 30 लाखांचा चेक दिला. नवख्या उद्योजकांना संधी देणारा हा 'शार्क टँक' जगभर हवा करून आता भारतात पोहोचला आहे.

एखाद्या स्पर्धात्मक रिअ‍ॅलिटी शोची साधारण रचना काय असते? स्पर्धक, भव्यदिव्य सेटअप, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे ट्विस्ट, दोन-चार जज असं बरंच काही. 'शो' असंख्य लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून हरेक प्रकारचे प्रयत्न केले जातात. त्यासाठी तितकीच जबरदस्त टीम काम करते. 'शार्क टँक इंडिया'ची रचना अशीच आहे, पण थोडी हटके.

स्टुडियो नेक्स्टनं बनवलेला हा रिअ‍ॅलिटी शो सोनी टीव्हीवर मागच्या वर्षी 20 डिसेंबरला सुरू झाला. यातल्या जज मंडळींना 'शार्क' म्हटलं जातं. त्यांचा उद्देश हा नवख्या उद्योजकांना, ज्यांची आता सुरुवात झालीय त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन आणि कल्पक आयडिया देणं आहे. जजना वाटलंच तर ते त्यांच्या व्यवसायात गुंतवणूकही करतात.

2001 ला जपानमध्ये 'टायगर ऑफ मनी' या नावाने हा शो सुरू झाला होता. त्यानंतर 2005 ला इंग्लंडमध्ये 'ड्रॅगन डेन', तर 2009 ला अमेरिकेत 'शार्क टँक' नावाने तो लाँच झाला. अनेक पुरस्कारही मिळालेत. अमेरिकेत तर शार्क टँकचा तेरावा सिझन असून, हा जगातला आघाडीचा बिझनेस रिअ‍ॅलिटी शो म्हणून नाव कमावतो आहे. भारतात हा शो पहिल्यांदा लाँच झाला असला तरी जगभरातल्या 40 पेक्षा अधिक देशांमध्ये तो याआधीच पोहोचलाय.

आपण बघत असलेल्या नेहमीच्या रिअ‍ॅलिटी शोपेक्षा 'शार्क टँक इंडिया' हटके आहे. इथं येणार्‍या स्पर्धकांची ना एकमेकांशी स्पर्धा असते, ना त्यांना वारंवार इथं काही सादर करायचं असतं. आता उद्योजक म्हटलं तर केवळ कल्पना असून चालत नाही. त्यासाठी पैसाही लागतो. पण त्याआधी तुमची कल्पना इतरांना पटवून द्यायला हवी. ती कल्पना मांडण्याचं 'शार्क टँक इंडिया' महत्त्वाचं माध्यम आहे.

इथं वेगवेगळे उद्योजक येतात. आपली कल्पना मांडतात. त्यासाठी त्यांना एकदाच संधी मिळते. आपल्या व्यवसायासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक जमा करणं स्पर्धकांचा महत्त्वाचा उद्देश असतो. स्पर्धक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाबद्दल अडचणीचे प्रश्नही विचारले जातात. त्यांनी बनवलेला ब्रँड बाजारात टिकायला खरंच तितका सक्षम आहे का, याची चाचपणी केली जाते. काही सूचना केल्या जातात. एक प्रकारे आपलं उत्पादन योग्य कसं आहे, हे पटवून देण्याचा स्पर्धकांपुढे मोठा टास्क असतो.

स्पर्धक उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात नेमकी किती रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, हे जजना सांगावं लागतं. जजमध्येही डिलवरून चुरस पाहायला मिळते. गुंतवणूक केल्यावर जजना त्याचा फायदा म्हणून नेमकी किती टक्केवारी मिळणार हेही सांगावं लागतं. यादरम्यान स्पर्धक आणि जजमध्ये प्रश्नोत्तरंही होतात. व्यवसाय किती जुना आहे? मार्केटिंग प्लॅन? उत्पन्न? असं बरंच काही विचारलं जातं. तसंच शोदरम्यान इक्विटी, रॉयल्टी, नेट सेल असे बरेचसे शब्दही कानावर पडत राहतात. त्यासाठी 'शार्क टँक इंडिया'नं शब्दकोशाची एक वेबसाईटच बनवलीय.

'शार्क टँक इंडिया'तली जज मंडळी युवा उद्योजक म्हणून त्यांच्या क्षेत्रात नावाजलेली आहेत. शोमध्ये येणार्‍या उद्योजकांशी हे जज डिल करत असतात. या जजमधलं पहिलं नाव अशनीर ग्रोवर. आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण झालेले अशनीर भारतपे या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीची उलाढाल 700 कोटींची आहे.

दुसरे जज पीयूष बन्सल हे लेन्सकार्ट या चष्मा बनवणार्‍या कंपनीचे सीईओ आहेत. भारतभरातल्या 70 पेक्षा अधिक शहरांमध्ये त्यांची दुकानं आहेत. 2010 ला त्यांनी आपल्या मित्रांच्या सोबतीने लेन्सकार्टची स्थापना केली होती. यातल्या अजून एक जज असलेल्या नमिता थापर एमक्योर फार्मास्युटिकल कंपनीच्या कार्यकारी संचालक आहेत. शोमध्ये येणार्‍या मराठमोळ्या उद्योजकांशी त्यांचं मराठीतून संवाद साधणं विशेष भावतं.

आयआयटी, आयआयएममधून शिकलेल्या विनिता सिंग या शुगर कॉस्मेटिक या कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. तर अनुपम मित्तल हे पीपल ग्रुप-शादी डॉट कॉमचे संस्थापक आहेत. ऑनलाईन व्यापारातलं हे एक महत्त्वाचं नाव आहे. गझल अलग या ममाअर्थ नावाच्या फिटनेस आणि आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कंपनीच्या सहसंस्थापिका आहेत. तर बोट या इअरवेअर ऑडिओ ब्रँडचे सहसंस्थापक अमन गुप्ता हे जज म्हणून 'शार्क टँक इंडिया'चा भाग आहेत.

भारतातले बरेचसे 'रिअ‍ॅलिटी शो' ही बाहेरच्या देशांची कॉपी समजली जाते. शार्क टँक इंडियाही अशीच एक कॉपी आहे. फायद्याचं गणित असलं तरी त्याचा उद्देश फार महत्त्वाचा आहे. सांगलीच्या दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली जुगाडू जिप्सी प्रचंड व्हायरल झाल्याचं आपण बघितलंय. उद्योजक आनंद महिंद्रांनाही त्याची दखल घ्यावी लागली. दत्तात्रय लोहार यांनी जिप्सी स्वतःसाठी बनवली असली तरी अशा भन्नाट कल्पना जगापर्यंत पोहोचायला हव्यात.

शहरी व ग्रामीण भागातली होतकरू तरुणाई संधीची वाट पाहते आहे. त्यांच्याकडे कल्पना आहे. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. पण पैसा नाही. 'शार्क टँक इंडिया' देशभरातल्या अशा होतकरूंसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. याच शोमध्ये बारामतीचे पांडुरंग आणि वैशाली टावरेही सामील झाले होते. बारामतीमध्ये त्यांनी कृषी पर्यटन सुरू केलंय. त्यातून रोजगारही निर्माण करत आहेत.

शाश्वत पर्यटनातून कोकणची जीवनशैली लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रसाद गावडेसारखे तरुण झटतायेत. रोजगाराचे पर्यायी मार्ग उभे करतायेत. अशा तरुणांना वेगवेगळ्या भन्नाट कल्पना घेऊन लोकांपर्यंत पोहोचायचंय. असंच व्हिजन असलेल्या व्यावसायिकांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांची क्रिएटिव्हीटी जगापर्यंत पोहोचावी, व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं 'शार्क टँक इंडिया' भारतात पोहोचला आहे.

अक्षय शारदा शरद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT