बहार

शांताबाई शेळके : ‘जन्मजान्हवी’चा अखंड प्रवाह

Arun Patil

जीवनाचा थांग शोधत असताना शांताबाई शेळके अखंडपणे प्रवाही राहिल्या. त्यांच्या व्यक्त होण्यामध्ये साचलेपणा कधी आला नाही. जणू जन्मरूपी जान्हवी-गंगाच! अविरतपणे वाहणारी लोकमाता, ज्ञानमाऊली. 12 ऑक्टोबरपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त…

सारे काही इथे आणि आताच काल नाही, उद्या नाही आहे केवळ या क्षणाचा श्वास आणि चिरडलेल्या अवस्थेतही जगण्याचा हव्यास.
माझ्या आत आहेत प्रचंड डोंगर, खोल दर्‍या, दुरातून सूर भरणार्‍या गूढ, अगम्य बासर्‍या, मी ते सारे स्वीकारले आहे, सुरांचे अटळ आवाहन, दर्‍याडोंगरांचे भय, दोन्ही एकत्र सांभाळते मी जीवापाड, नि:संशय.

मागचे पुढचे सारे संदर्भहीन त्यांना जोडणारे धागे किती भंगुर, क्षीण? म्हणून सारे काही इथे आणि आताच हातांत वार्‍याची झुळूक, तळव्यात घुसलेली काच…

खरंच! हातात वार्‍याची झुळूक घेऊन वावरणार्‍या, सदैव वर्तमानात जगू पाहणार्‍या, विदग्ध मराठी भावकवितेचं दालन समृद्ध करणार्‍या शांताबाई शेळके मराठी माणसाला ठाऊक आहेत; पण त्यांच्या तळव्यात घुसलेली काच सहसा दिसत नाही. ती काच आहे अस्वस्थतेची, निर्मितीच्या तगमगीची, जगण्याच्या विषण्ण कोलाहलात संवेदनशीलता जपताना आलेल्या कासाविशीची. ही काच आहे जीवनातील विसंगती आणि दांभिकतेला भेदून जाताना झालेल्या व्रणांची. शिवाय, अस्वस्थता हा सर्जनशील व्यक्तीला ऊर्मीसाठी इंधन देणारा स्थायीभाव असतोच.

मराठी भावगीतांच्या विश्वात शांताबाईंचं एक खास, निर्विवाद असं स्थान आहे. कविता, वृत्तबद्ध कविता, सुमारे 300 हून चित्रपटगीतं, भक्तिगीतं, भावगीतं, बालगीतं, लावण्या, लोकगीतं, कोळीगीतं, नाट्यगीतं, मोजकी कोंकणी गीतं, संस्कृत श्लोकांवर आधारित गीतं, हायकू, रुबाया, सुनीते, अनुवादित कविता (उदा., मेघदूत) अशा विविध काव्य प्रकारांत शांताबाईंनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. ललित लेखन, वैचारिक लेखन, सदर लेखन, अनुवाद, समीक्षात्मक लेखन, संपादन, अनेक पुस्तकांना अभ्यासपूर्ण व हृद्य प्रस्तावना… अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी लीलया संचार करत आपली नाममुद्रा उमटवली.

इंदापूर, मंचरसारख्या खेडेगावांतून आलेली ही डोक्यावर पदर आणि कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी मराठमोळी मुलगी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेते. नंतर थेट मुंबईत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्याकडे 'नवयुग'मध्ये पत्रकारितेचे धडे गिरवत असतानाच 'प्रांजळ आणि सोपे लिहिण्याचा' आचार्यांचा मंत्र लेखणीत भिनवते.

त्या काळात विवादास्पद वाटणारा अविवाहित राहण्याचा ठाम निर्णय घेऊन मुंबईतच महाविद्यालयात मराठीची प्राध्यापक होते. अगणित विद्यार्थी घडवत असतानाच समांतरपणे गीतलेखनादी निर्मितीतून रसिकांना जोरकसपणे आणि आत्मविश्वासाने आशावादी सूर देत राहते. साहित्यविषयक अनेक उपक्रमांतून निर्मितीच्या नवनव्या शक्यतांना लख्ख अवकाश देते. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक होते आणि आळंदी इथं 1996 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षही होते..! हा सगळा प्रवास अचंबित करणारा आहे.

शांताबाईंच्या काव्यात संदिग्धता सहसा दिसत नाही. स्पष्टता दिसते. स्पष्टता असली तरी तिच्यात रुक्षपणा नसतो, नजाकत असते. आत्मविश्वास तर दिसतोच दिसतो. पारंपरिकतेला नवीनतेचा स्पर्श जाणवतो. खेडेगावातले बालपण आणि गावगाड्याशी असलेले नाते यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीला खूपदा मातीचा गंध लगडून येतो. त्याचवेळी उच्चशिक्षण, इंग्लिश, संस्कृत इत्यादी भाषांचा व्यासंग आणि पत्रकारितेतली अनुभवसमृद्धी यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीत आधुनिक विचारांचा शहरी चेहरा आणि भाषेचा रेखीवपणाही झळकतो.

आशय-विषय-अभिव्यक्तींच्या अनेक परिमिती त्यांच्या लेखणीतून उमटल्या आणि सातत्य, दर्जा, शिस्त यांच्या मुशीतून जातानाही त्यांच्या साहित्यनिर्मितीचा आलेख कालपरत्वे उंचावणाराच राहिला. सर्जनशीलतेमध्ये जगण्याविषयीची आसोशी, जीवनसम्मुखता आणि समकालीन होत राहण्याची वृत्ती, यामुळे त्यांच्या सहजसुंदर लेखनाची मोहिनी पडते. त्यांच्या कविता-गीतांचा पट पाहताना त्यांतील वैविध्याने रसिक थक्क होतो.

'मराठी पाऊल पडते पुढे' हे अभिमान गीत, 'रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी' यासारख्या अस्सल लावण्या त्यांनी लिहिल्या. लावण्या, शाहिरी वाङ्मय ही खरं तर पुरुषांची मक्तेदारी; पण शांताबाईंनी ती सहज मोडून काढली. त्यांच्या गीत-लेखनाची 'रेंज' किती विस्तृत आहे, हे पाहण्यासारखं आहे.

'शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती' यासारखे स्फुरणदायी गीत, 'मी डोलकर डोलकर दर्याचा राजा' वगैरे कोळीगीते, 'आला पाऊस मातीच्या वासात ग', 'शालू हिरवा पाचू नि मरवा'सारखे लोकगीत, 'का धरिला परदेश सजणा', 'काटा रुते कुणाला' यासारखी नाट्यपदे, 'किलबिल किलबिल पक्षी बोलती', 'खोडी माझी काढाल तर' यासारखी धमाल बालगीते, 'गणराज रंगी नाचतो', 'गजानना श्री गणराया', 'मागे उभा मंगेश' यासारखी भक्तिगीते, 'हे श्यामसुंदर राजसा मनमोहना', 'जाईन विचारीत रानफुला', 'ही वाट दूर जाते', 'जीवलगा राहिले रे दूर घर माझे'सारखी भावमधुर गीते, तर 'मनाच्या धुंदीत लहरीत ये ना', 'ही चाल तुरू तुरू उडते केस भुरू भुरू', 'शारदसुंदर चंदेरी राती' यासारखी धुंद करणारी अवखळ गाणी, 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा', 'जय शारदे वागीश्वरी'सारखी अभिरूची उंचावणारी गीते..!! शांताबाईंच्या उत्फुल्ल व बहुआयामी सर्जनशीलतेची ही काही मोजकी उदाहरणे.

रसिकांना किती सांगू आणि कसे सांगू, असे त्यांना होत असे. संदर्भबहुलता, बहुशुश्रूता आणि पाठांतर हे त्यांचे सद्गुण त्यांच्या लेखनात आणि व्याख्यानांतही अनुभवास येतात. त्याचवेळी जमिनीवर पाय ठेवून दिनचक्राचा तोलही त्या सावरतात, हे मला माहीत होते. त्यातूनच त्यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारण्याचे भाग्य मला दोन-तीनदा लाभले. मी तेव्हा कॉलेजकुमारी होते. कविता मला साद घालू लागली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक उत्तेजन (न.ले.उ.) प्रकल्पात माझ्या कवितांची संहिता निवडली गेली होती. 1994 मध्ये 'शब्दपल्लवी' या नावाने माझा कवितासंग्रह येऊ घातला होता. त्याला शांताबाईंचे शब्द लाभावेत, अशी तीव्र इच्छा होती. शांताबाईंशी आपले कुठलेसे नाते आहे, असे जाणवत होते.

त्यांचे आजोळ मंचरजवळचे, तर माझा जन्म आणि शालेय शिक्षण नारायणगावचे. मंचर-नारायणगाव या पंचक्रोशीतील मातीचे हे नाते असावे बहुदा. मला आठवले, बालपणी मंचरजवळच्या अवसरी घाटातून एस.टी.ने प्रवास करताना माझ्या कवयित्री व भाषा-शिक्षिका असलेल्या आईने (सुखदा नागेश ऋषी) एकदा सांगितले होते- गीतकार डॉ. वसंत अवसरे म्हणजे आपल्या शांताबाईच बरं का! तेव्हा माझे डोळे आश्चर्याने चमकले होते. अवसरी घाटातून जाताना दिसणारा दरी-खोर्‍यातला निसर्ग मला शांताबाईंसारखाच मायाळू वाटत असे.

त्याच मातीच्या ओढीने मी त्यांच्या घरी गेले. पुण्यात आदर्शनगरमधल्या त्यांच्या बंगल्याच्या फाटकावर, हिरव्यागच्च बागेत, घरात-सोफ्यावर सर्वत्र गुबगुबीत मांजरे फिरताना दिसत. शांताबाईंच्या मांडीवर वा शेजारी हाताशी एखादे मांजर असे. मांजरांशी त्यांचा भारी स्नेह होता. त्या मांजरांशी गप्पा मारत, लटके रागवत. जगण्याविषयीचे कुतूहल शांताबाईंच्या डोळ्यांत सतत चमकत असल्याचे मला जाणवले. एकदा त्या मला म्हणाल्या, आश्लेषा, मी एखाद्या बाळाच्या बारशाला जेवढ्या उत्सुकतेने जाते ना, तेवढ्याच उत्सुकतेने एखाद्या साहित्यिक कार्यक्रमाला जाते. जगण्यातले सगळे रंग मला साद घालतात.

मला त्यांची ही मोकळीढाकळी जीवनधारणा फार मोलाची वाटते. आयुष्याचे कप्पे त्यांनी केले नाहीत. अनुभवांना कुंपणे घातली नाहीत. हेलन केलरच्या आयुष्यावरील 'आंधळी' या कादंबरीचा अनुवाद जेवढ्या आत्मीयतेनं त्या करतात, तेवढ्याच आत्मीयनेने त्या मांजरांविषयी अनेक बालकविता लिहितात. 'सुवर्णमुद्रा'सारखे मौलिक विचारधन त्या ज्या उत्साहाने संकलित/संपादित करतात, तेवढ्याच उत्साहाने त्या माझ्यासारख्या त्यावेळी नवोदित असलेल्या कवयित्रीच्या संग्रहासाठी स्वागतशील, रसग्रहणात्मक छोटेखानी प्रस्तावना लिहून देतात! या आठवणीसुद्धा आज मला दंतकथेसारख्या वाटत आहेत. आठवणींच्या कॅमेर्‍यात ती स्मृतिचित्रे मी टिपून ठेवली आहेत.

त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीच्या गाभ्याशी प्रचंड वाचन, चिंतन, परिशीलन असायचे, हे त्यांचे साहित्य वाचताना जाणवतेच. 'रानजाई' हा दूरदर्शनवरचा त्यांचा आणि डॉ. सरोजिनी बाबर यांचा गाजलेला कार्यक्रम हेही त्यांच्या संदर्भबहुलतेचे सुंदर उदाहरण आहे. लोकसंस्कृतीचा त्यांचा व्यासंगही फार मोठा होता. 'धूळपाटी' या त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनात त्यांच्या जडणघडणीचे तपशीलवार दर्शन घडते. जीवनाविषयी उद्वेगातून आलेली तक्रार कुठेच दिसत नाही. 'एक पानी', 'मदरंगी', 'सांगावेसे वाटले म्हणून', 'रंगरेषा' ही स्तंभलेखनाची पुस्तकेसुद्धा त्यांच्या उत्कट जीवनानुभवांची प्रांजळ खूणगाठ आहेत. एकूणच शिस्तबद्ध लेखन करणार्‍या शांताबाई शेळके सदरलेखनाने लेखणीला शिस्त लागते, असे मत नेहमी त्या आपल्या भाषणांतून व्यक्त करत.

'आनंदाचे झाड', 'पावसाआधीचा पाऊस' या ललित लेखनात शांताबाई शेळके रसिकांशी गूजगोष्टी करतात, असे वाटते. त्या लेखनात एक 'गोष्टीवेल्हाळ कथेकरी' आहे. तो अकृत्रिम, प्रासादिक आहे. म्हणून वाचकांना तो आपलासा वाटतो. 'अनुबंध', 'चित्रकथा', 'काचकमळ', 'गुलमोहोर' हे त्यांचे कथासंग्रह. त्यांनी कादंबरी-लेखनातसुद्धा मुशाफिरी केली आहे. 'वर्षा', 'रूपसी', 'अनोळख', 'इत्यर्थ', 'जन्मजान्हवी', 'तोच चंद्रमा नभात' हे काव्यसंग्रह विक्रीचे विक्रम करत असतात.

शांताबाई म्हणजे चित्रपटगीतं, भावगीतं आणि छंदोबद्ध कविता असा खूपदा समज होतो. कारण, ती गाणी विविध माध्यमांतून आपल्या कानांवर येतात; पण शांताबाईंची मुक्तछंद कवितासुद्धा खूप विलक्षण आहे. 'जन्मजान्हवी', 'अनोळख,' 'इत्यर्थ'मधले त्यांचे मुक्तछंद काव्यानंद देतानाच वाचकांना विचारप्रवण करतात. त्यांची लेखणी जीवनानुभव स्पष्टपणे, परखडपणे मांडते. त्यांची कविता चौकटी तोडण्याची व नवे रचण्याची भाषा करत असली, तरी आपला संयम आणि घरंदाजपणा ती कधीच सोडत नाही. उद्रेक, आकांत, आक्रस्ताळेपणा त्यात नसतो.

शांताबाईंनी कविकुलगुरू कालिदासविरचित मंदाक्रांता वृत्तातील 'मेघदूत' या अभिजात काव्याचा पादाकुलक वृत्तात केलेला रसाळ अनुवाद अतिशय गाजला. लुईसा मे अलकॉट या अमेरिकन लेखिकेची 'लिटल वुईमेन' या कादंबरीचा 'चारचौघी' हा शांताबाईंनी केलेला अनुवाद वाचणे हा एक अस्सल अनुभव आहे. नाट्यलेखन वगळता शांताबाईंनी इतर बहुतेक सर्व साहित्यप्रकार समर्थपणे हाताळले. एक व्यक्ती किती विपुल आणि वैविध्यपूर्ण परिमितींमधून अभिव्यक्त होते, याचे शांताबाई हे उत्तम उदाहरण आहे.

जीवनाचा थांग शोधत असताना  शांताबाई शेळके अखंडपणे प्रवाही राहिल्या. त्यांच्या व्यक्त होण्यामध्ये साचलेपणा कधी आला नाही. जणू जन्मरूपी जान्हवी-गंगाच! अविरतपणे वाहणारी लोकमाता, ज्ञानमाऊली. या जन्मजान्हवीच्या प्रवाहाला मृत्यूमुळे अंतर पडू शकत नाही. कारण, मृत्यूमुळे आलेल्या विदेही अवस्थेतही ती सर्जनशीलता वाहतच राहील, फुलाफुलांतून हसत राहील… कारण-

तुला मला न ठाउके, पुन्हा कधी कुठे असू
निळ्या नभांत रेखली, नकोस भावना पुसू
उरी भरून राहिले, तुला दिसेल गीत हे!
असेन मी, नसेन मी तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या, उद्या हसेल गीत हे..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT