बहार

भारतीय मातीतील कोरियन कुलमाता

Arun Patil

साधारणपणे 1997 मध्ये दक्षिण कोरियातून एक शिष्टमंडळ अयोध्येला आले. त्यांनी अयोध्येच्या राजघराण्याचे वर्तमान वंशज बिमलेंद्र मिश्रा यांची भेट घेतली. कोरियन शिष्टमंडळ कोरियाच्या कुलमातेचे मूळ शोधण्यासाठी अयोध्येला आले होते. इ.स. 1280 मध्ये लिहिण्यात आलेला 'सामगुक युसा' हा ग्रंथ कोरियाचा पहिला लिखित ऐतिहासिक दस्तऐवज मानण्यात येतो. 'सामगुक युसा'तील कथेनुसार इ.स. 48 च्या दरम्यान एक 16 वर्षांची राजकुमारी आपल्या 2,200 लोकांच्या लव्याजम्यासह समुद्र प्रवास करत होती. 'आयुता' या दूरच्या राज्यातील या राजकुमारीचे जहाज कोरियाच्या समुद्रकिनार्‍याजवळ खडकाला धडकले. बेशुद्ध अवस्थेतील राजकुमारीला तिच्या सेवकवर्गाने किनार्‍यावर आणले.

या घटनेच्या आदल्या रात्री कोरियाचा म्हणजे तत्कालीन 'ग्युमग्वान गया'चा राजा 'सुरो' याला झोपेत एक स्वप्न पडले. त्यानुसार उद्या सकाळी समुद्रकिनार्‍यावर एक राजकुमारी बेशुद्ध अवस्थेत सापडेल. तिच्यासोबत विवाह केल्यास तुझ्या वंशाचा व राज्याचा भाग्योदय होईल. राजा सुरोने सकाळी उठल्यावर स्वप्नाची सत्यता पडताळण्यासाठी आपल्या सैनिकांना समुद्रकिनारी पाठवले. खरोखरच तेथे एक राजकुमारी बेशुद्धावस्थेत सापडली. राजकुमारीचे नाव 'सुरीरत्ना' होते आणि ती भारत देशातून आली होती. सुरीरत्ना भारतातील महाकौशल जनपदाचा राजा पद्मसेन आणि राणी इंदुमती यांची पुत्री होती.

राजा पद्मसेनलादेखील आपल्या पुत्रीसाठी योग्य वर समुद्र पर्यटन करत असताना प्राप्त होईल, असे स्वप्न पडले होते. म्हणून त्याने सुरीरत्नाला समुद्र प्रवासाला पाठवले होते. दोन्ही स्वप्नांचे फलित म्हणजे राजा सुरो आणि सुरीरत्नाचा विवाह झाला. तिचे नामकरण 'हिओ व्हांग ओ' असे करण्यात आले. या दोघांना 12 अपत्ये झाली. आज उत्तर आणि दक्षिण कोरिया मिळून असलेले सहा कोटी कोरियन लोक म्हणजे राजा सुरो आणि राणी सुरीरत्ना म्हणजेच हिओ व्हांग ओ यांचाच वंशविस्तार आहे, अशी मान्यता कोरियात आहे. त्यामुळे कोरियाचा कुलपिताराजा सुरो आणि कुलमाता राणी हिओ व्हांग ओ असे मानले जाते.

दक्षिण कोरियातील 'गिम्हे' या ठिकाणी असलेले थडगे हिओ व्हांग ओ म्हणजे सुरीरत्नाचे आहे, अशी मान्यता आहे. या कथेतील 'आयुता' नावाच्या उल्लेखावरून कोरियन शिष्टमंडळ भारतातील अयोद्धेला पोहोचले होते. आयुता म्हणजे अयोध्या असा शिष्टमंडळाचा दावा होता. त्यानंतर 2001 साली अयोध्या राजघराण्याचे वंशज बिमलेंद्र मिश्रा यांना दक्षिण कोरिया सरकारकडून हिओ व्हांग ओ म्हणजे सुरीरत्नासंदर्भात माहिती कोरलेली कोनशिला पाठवण्यात आली. उत्तर प्रदेशच्या तत्कालीन राज्य सरकारने एक बगिचा तयार करून ही कोनशिला तेथे स्थापित केली. कथेवर विश्वास ठेवल्यास आपल्याला हा इतिहास सरळ वाटू शकतो. संशोधन द़ृष्टीने खोलवर गेल्यास या इतिहासाला अनेक पैलू व कंगोरे असलेले दिसतात.

कोरियन आणि भारतीय इतिहासकारांमध्ये भारत-कोरिया यांच्यातील ऐतिहासिक अनुबंधासंदर्भात मतमतांतरे दिसतात. यातील प्रत्येक पक्ष आपल्या मांडणीच्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे सादर करताना दिसतो. त्यामुळे प्रत्येक पैलूतून इतिहासाचा धांडोळा घेणे उचित ठरते; अन्यथा आपला द़ृष्टिकोन एकांगी होऊ शकतो. हिओची आख्यायिका असलेली ग्युमग्वान गया अथवा गारकगुकगी राज्याची प्रमाण ऐतिहासिक नोंद आज उपलब्ध नाही किंवा हरवलेली आहे. भारताच्या कोणत्याही ग्रंथामध्ये किंवा दंतकथांमध्ये ही आख्यायिका आढळत नाही. तसेच कोरियन इतिहासकारांमध्ये आयुता म्हणजे अयोध्या याविषयी पाच प्रमुख पक्ष आहेत. पहिला म्हणजे उपरोक्त कथेला प्रमाण मानून ध्वनी साधर्म्याच्या आधारावर आयुता म्हणजे अयोध्या असे मानणारा.

दुसर्‍या पक्षाच्या म्हणण्यानुसार, आयुता म्हणजे थायलंडमधील 'आयुथया' शहर किंवा राज्य. तिसरा पक्ष म्हणतो, थायलंडमधील आयुथया शहर किंवा राज्य इ.स. 1350 नंतर म्हणजे सामगुक युसा ग्रंथाच्या निर्मितीनंतर अस्तित्वात आले. चौथा पक्ष अयुता राज्य हे 'अय' किंवा 'लन्याकुमारी' राज्य याचे चुकीचे भाषांतर आहे. प्राचीन तमिलकमच्या (तामिळनाडू)पांड्य साम्राज्याचे शासक हे मूळचे अय राज्यातील किंवा लन्याकुमारीचे (कन्याकुमारी) होते. राणी हिओ व्हांग ओ आपल्यासोबत पांड्यची राज्य चिन्हं म्हणजे 'जुळे मासे' आणि 'त्रिशूल' घेऊन कोरियाला आली होती.

पाचवा पक्ष तर या आख्यायिकेला केवळ मोहकपरिकथा अथवा दंतकथा मानतो. भारतीय इतिहासकारांचा विचार केला, तर अयोध्येविषयीच त्यांच्यात मतमतांतरे दिसून येतात. इतिहासाच्या कसोटीवर उतरणारे प्राचीन भारतीय साहित्य म्हणजे बौद्ध आणि जैन वाङ्मय. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकापर्यंत अयोध्या असा उल्लेख न आढळता 'साकेत' असा या नगरीचा उल्लेख या वाङ्मयात आढळतो. तसेच काही इतिहासकारांच्या मते, अयोध्या हे साकेतनगरीच्या एका भागाचे नाव होते. इसवी सनाच्या पाचव्या शतकानंतर म्हणजे गुप्त काळात साकेतनगरीचा उल्लेख अयोध्या असा केला जाऊ लागला. दक्षिण भारताच्या द्राविडियन इतिहासकार कोरियातील अय किंवा लन्याकुमारी राज्याशी हिओचा संबंध जोडणार्‍या इतिहासकारांच्या मांडणीच्या समर्थनार्थ अत्यंत सबळ पुरावे सादर करताना दिसतात. भाषेतील साधर्म्यापासून याची सुरुवात होते.

तमिळ आणि कोरियन भाषेतील 500 पेक्षा अधिक शब्द उच्चारण आणि अर्थद़ृष्ट्या समान आहेत. तमिळप्रमाणे कोरियात वडिलांना 'अप्पा' संबोधले जाते. आईला कोरियनमध्ये 'ओमा', तर तमिळमध्ये 'अम्मा' म्हणतात. असे अनेक समान नातेवाचक शब्द सांगता येतात.'पूल' हा शब्द तमिळ व कोरियन दोन्ही भाषेत गवतासाठी वापरला जातो. 'नल' म्हणजे दिवस कोरियन व तमिळमध्ये एकच आहे. दोन्ही भाषेत 'नान' म्हणजे मी. तमिळमध्ये लढाई म्हणजे 'संदाई', तर कोरियनमध्ये 'सांडा'. 'आत ये!'साठी तमिळ 'उल्ले', तर कोरियन 'इलिवा.' तुलनात्मक भाषाशास्त्रज्ञ कांग गिल उन यांनी तर तमिळ-कोरियनमधील अशी 1,300 शाब्दिक साम्यस्थळं शोधली आहेत.

भाषाशास्त्रज्ञांच्या मते, सीमावर्ती मंचुरियातील 'निव्ख' भाषेशी संबंधित कोरियन भाषेवर तमिळ भाषेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. सध्या भारतात कोरियन गीत-संगीताने तरुणांना वेड लावले आहे. या गाण्यांमध्येदेखील तमिळ शब्दांची जाणीव होते. समुद्री व्यापारामुळे तामिळनाडू व कोरिया यांचा प्राचीनकाळापासून संबंध आल्यानेदेखील हा भाषासंबंध निर्माण झाला असावा. अशा पुराव्यांमुळे दाक्षिणात्य इतिहासकार आयुता म्हणजे अयोध्या नसून, कन्याकुमारी आहे.

कोरियाच्या कुलमातेशी तामिळनाडूचा संबंध जाणीवपूर्वक तोडला जात आहे, असा आरोपदेखील केला जातो. धार्मिक इतिहासाचा विचार केल्यास बौद्ध धर्माच्या प्रसाराशी हिओचा संबंध काही इतिहासकार सिद्ध करून दाखवतात. सुरीरत्ना किंवा हिओ व्हांग ओ इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेली. हा काळ मौर्य साम्राज्याचा आणि त्याचा राजधर्म बौद्ध धर्माच्या प्रभावाचा होता. कौशल किंवा महाकौशल हे जनपद मौर्य साम्राज्याचा भाग होते. त्याची राजधानी साकेत होती. इसवी सन 372 मध्ये बौद्ध धर्म कोरियात पोहोचला. हिओच्या ग्युमग्वान गया राजघराण्याने त्याचा राजधर्म म्हणून स्वीकार केला.

भविष्यात या राज्याची तीन शकले झाली. तरी ग्युमग्वान गया राज्याचा राजधर्म बौद्धच राहिला. आज दक्षिण आणि उत्तर कोरियातील जवळपास 50 टक्के लोक निधर्मी आहेत. उरलेल्या 50 टक्के लोकसंख्येत 30 टक्के बौद्ध आणि उर्वरित कॅथोलिक ख्रिश्चन आहेत. म्हणजेच हिओचा संबंध बौद्ध धर्माशी जोडता येतो, असे मत मांडले जाते. इतिहासाला असे अनेक कंगोर असतात. प्रत्येकजण इतिहास आपल्या द़ृष्टिकोनातून आणि आपल्याकडील पुराव्यांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे इतिहास कायम घडत असतो. मोडत असतो.

इतिहासाच्या अन्वयार्थावर त्या-त्या काळातील राजकीय परिस्थिती प्रभाव टाकत असते. आज तरी कोरियाच्या कुलमातेच्या भारतीय मुळाबाबत अयोध्येचे पारडे जड आहे. सध्या दरवर्षी दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ अयोध्येला येऊन आपल्या कुलमातेला आदरांजली अर्पण करते. 2016 ला भारत-दक्षिण कोरिया यांच्यादरम्यान झालेल्या सांस्कृतिक देवाण-घेवाण करारानुसार अयोध्येत असलेले राणी हिओ व्हांग ओचे स्मारक अधिक भव्यदिव्य करण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या दीपोत्सवाला दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणजेच कोरियाच्या प्रथम महिला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी कोरियाची कुलमाता अयोध्येची की कन्याकुमारीची, हा ऐतिहासिक वाद चालूच राहणार आहे. कारण, राजकारण इतिहास घडवते तसेच बदलवतदेखील असते. असे असले तरी या सगळ्या घडामोडींमध्ये कोरियाच्या कुलमातेचा भारतीय मातीशी असलेल्या अनुबंधाचा शोध अनेक वाटा-वळणांनी पुढे जात राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT