बहार

बुडतां हे जन न देखवे डोळां

Shambhuraj Pachindre

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी 'पुढारी'ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

बुडतां हे जन न देखवे डोळां ।
येतो कळवळा म्हणउनि ॥

संत तुकारामांच्या अभंगातील या ओळींची प्रचिती मी आयुष्यात अनेकवेळा घेतली आहे. लोकांप्रती असणारा कळवळाच मला कार्याची प्रेरणा देत असतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये कोसळणारं संकट हे दुःखाचे पर्वतही भेदून टाकणारं असतं. त्याची तुलना दुसर्‍या कुठल्याच दुःखाशी होऊ शकत नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी महापूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींनी करून दिलाच आहे. 2019 च्या महापुरानं तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात हाहाकार माजवला होता! 'न भूतो न भविष्यती' अशी ही नैसर्गिक आपत्ती होती. यापूर्वीही राज्यात महापुराची अशी संकटं अनेकदा कोसळलेली आहेत. मग तो 2005 चा महापूर असो, वा 1989 सालचा जलप्रलय असो किंवा 1961 ला पुण्यातील पानशेतचं धरण फुटल्यामुळे आलेला अतिप्रचंड महापूर असो!

जी गोष्ट महापुरांची तीच भूकंपाची! भूकंपाची आपत्ती म्हणजे तर महापुरापेक्षाही भयंकर संकट! महापुरामध्ये लोकांची मालमत्ता वाहून गेली. तिची विल्हेवाट लागली. तर भूकंप नावाच्या अतिभयंकर आपत्तीनं वित्तहानीबरोबरच प्रचंड प्रमाणात जीवितहानीही झाली होती. मग तो कोयनेचा भूकंप असो, वा लातूर-किल्लारीचा भूकंप असो किंवा गुजरातचा भूकंप असो. मात्र, अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्यावेळी, संकटात सापडलेल्या जनतेच्या मदतीसाठी धावून जात 'पुढारी'नं आपलं योगदान दिलेलं आहे. गुजरातमधील भूकंपग्रस्त भूज येथे तर 'पुढारी'च्या मदतनिधी फंडातून कायमस्वरूपी हॉस्पिटल उभारण्यात आलेलं आहे.

या सर्व नैसर्गिक संकटांचा क्रमवार आढावा घ्यायचा झाला, तर त्याची सुरुवात पंचावन्न वर्षांपूर्वी झालेल्या कोयना भूकंपासून करावी लागेल. कोयना परिसर. 11 डिसेंबर, 1967 ची पहाट. लोक साखरझोपेत असतानाच ती भयंकर घटना घडली. घरावरून ट्रॅक्टर जावा, तसा प्रचंड आवाज आणि लहान बाळाला पाळण्यात घालून गदागदा जागीच हलवावं तसे धक्के. घराघरांचे जणू पाळणेच झाले होते. त्या हादर्‍यानं आणि भीषण कानठिळ्या बसवणार्‍या आवाजानं लोक जागे झाले खरे; पण काय होतंय हे कळायलाच काही क्षण गेले. तो भूकंप आहे, हे कुणाच्याच प्रथम ध्यानी आलं नाही. ज्यांच्या ध्यानी आलं ते पहिल्यांदा वार्‍यासारखे घराबाहेर पळाले आणि त्यांनी आरडाओरडा चालू केला.

'भूकंप झाला! बाहेर पडाऽऽ'

मग क्षणार्धात सारेच लोक रस्त्यावर आले. झोपेत असलेल्या तान्हुल्यांना कडेवर मारून स्त्रियांनीही धावतच बाहेरचा रस्ता धरला. आजारी, विकलांग लोकांचे अतोनात हाल झाले. त्रेधातिरपीट उडाली! त्यातच वीज गेली. अंधाराचं साम्राज्य पसरलं. पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी कोयनानगर, कराड, पाटण, सातारा, सांगली आणि कोल्हापूरला या भूकंपानं अक्षरशः खिळखिळं करून टाकलं. हा भूकंप 6.7 रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा होता. साधारणपणे तीन रिश्टर स्केल क्षमतेच्या पुढचा धक्का हा धोक्याचा समजला जातो. याचाच अर्थ, हा भूकंपाचा धक्का अतिभीषण होता. विध्वंसकारक होता! त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या उत्तरेला 13 किलोमीटरवर, तर पश्चिमेला तो अवघ्या दोन किलोमीटरवर होता. तसेच त्याची आंतरखंडीय खोली सुमारे 12 किलोमीटर इतकी होती.

महापुरापेक्षाही कितीतरी पटीनं भयंकर असलेल्या या संकटाला राज्याला सामोरं जावं लागलं. कोयना परिसर केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामध्ये एक हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला, तर स्थावर मालमत्तांचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं. अनेक कुटुंबांचं नामोनिशाण मिटलं. जे वाचले ते आयुष्यभराच्या वेदना भोगण्यासाठीच! केवळ कोयनानगरमध्येच अकराशेपैकी हजार घरं उद्ध्वस्त झाली. तिथेच दोनशेहून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. शेकडो जखमी झाले. ढिगार्‍याखाली कित्येक जण गाडले गेले. त्यावेळी मी पुण्यामध्ये एल.एल.बी. आणि पत्रकारितेच्या शिक्षणात व्यग्र होतो. कधी पुणे तर कधी कोल्हापूर, असा माझा शैक्षणिक प्रवास चालू होता. परंतु, योगायोगानं त्यावेळी मी नेमका कोल्हापुरातच होतो. त्यामुळे या भीषण घटनेचा मी केवळ साक्षीदारच नव्हतो, तर मीही त्यातला एक 'व्हिक्टिम' होतो.

कोल्हापूरकरांनी तर या भूकंपाचा इतका जबरदस्त धसका घेतला की, मोठमोठे चौसोपी वाडे सोडून भलेभले इनामदार नि जहागीरदारही रात्री रस्त्यावर झोपणं पसंत करू लागले. मग सर्वसामान्यांचा तर प्रश्नच नव्हता. तेव्हा कोल्हापुरात लोक चौकाचौकात, गल्ली, मैदानात जिथं जागा मिळेल तिथं पथारी पसरायचे; पण घरात रात्री झोपायला जायचं कुणी नाव काढायचं नाही. घबराटीमुळे केवळ शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातही लोक घराबाहेर, माळरानावर उघड्या आकाशाखाली झोपत होते. अनेकांनी रात्री झोपण्यासाठी घराजवळच्या मोकळ्या जागेत मांडव घातले होते. भूकंप झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं लष्कराच्या मदतीनं, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केलं. परंतु, विस्कटलेली घडी पुन्हा लगेच बसणं अवघडच होतं. भूकंपानंतर सलग अठरा तास वीजपुरवठाच बंद पडला होता. नंतरही वीजपुरवठा खंडित होतच असे. त्यामुळे लोकांचे अतोनात हाल झाले.

अशा संकटसमयी हातावर हात बांधून गप्प बसण्याचा 'पुढारी'चा पिंडच नव्हता. यावेळीही 'पुढारी' मदतीसाठी धावला आणि आपलं जनसेवेचं व्रत अखंडितपणे चालू ठेवलं. भूकंपात लोकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यानं आबांनी 'पुढारी'तून मदतीचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत व्यापारी, औद्योगिक संस्था तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सर्वांनी मदतीचा मोठा हात दिला. तसेच या आपत्तीवर सातत्यानं सविस्तर वृत्तांकन करून 'पुढारी'नं त्याचं गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून दिलं. 11 डिसेंबरच्या मोठ्या धक्क्यानंतरही भूकंपाचे सौम्य धक्के बसतच होते. त्यामुळे, जरा कुठे खुट्ट वाजलं तरी लोकांना धडकी भरत असे. त्यांना विश्वास देऊन, धैर्य टिकवण्याचा प्रयत्न 'पुढारी'नं सातत्यानं केला होता. 1989 मध्येही पुन्हा एकदा महाराष्ट्रावर निसर्गराजा कोपला! पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रावर वादळी पावसाची आणि महापुराची महाआपत्ती कोसळली. सार्‍या राज्यात या निसर्गाच्या तांडवानं नऊशे बळी घेतले. हजारो एकरातील पिकांची वाताहात झाली. खरं तर, त्यावर्षी मान्सूननं प्रारंभीच्या काळात दडीच मारली होती. आता दुष्काळ पडतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. 21 जुलै, 1989 पासून मेघ दाटून आले. मान्सूनचं वारं वाहू लागलं. पाठोपाठ आधी रिमझिम सुरू झाली. मग संततधार पाऊस सुरू झाला. ते पाहून लोक सुखावले. पावसात भिजून आनंदोत्सव साजरा करू लागले. परंतु, लोकांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. बघता बघता संततधार पावसाचं रूपांतर मुसळधार पावसात झालं. वरुणराजानं रौद्ररूपच धारण केलं. वादळी वार्‍यासह पर्जन्यानं थैमान मांडलं. जणू आकाशच फाटलं होतं! अवघ्या 7-8 दिवसांतच सर्व नदीनाले पात्राबाहेर पडले. पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली. कोल्हापुरात पुराच्या पाण्यानं मुसंडी मारली.

'महापुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहाती॥'

असं संत तुकारामांनी अनुभवाचे बोल सांगितलेले आहेत. परंतु, निसर्गाचं रौद्ररूप एवढं भीषण होतं की, या महापुरात लव्हाळेही वाचले नाहीत. कारण चिखली, नागदेववाडी, पाडळी खुर्द, हणमंतवाडी, शिंगणापूर तसेच हळदी यासारखी गावं अक्षरशः पाण्यात बुडाली. पूर्व भागातील नदीकाठच्या गावांची पुरानं दाणादाण उडाली. महापुराच्या आपत्तीनं सर्वत्र हाहाकार माजला! कोल्हापूर जिल्ह्यावरची ही अस्मानी आपत्ती लक्षात घेऊन मी तातडीनं पूरग्रस्त मदतनिधी उभारण्याचा निर्णय घेतला आणि तसे जनतेला 'पुढारी'तून आवाहन केलं. सगळ्यात आधी 'आधी करावे मग सांगावे' या उक्तीप्रमाणे मी 'पुढारी'चा स्वतःचा भरघोस निधी जमा केला आणि मग 'पुढारी'कडे मदतीचा ओघच लागला. अवघ्या पंधरा दिवसांतच पंधरा लाखांचा निधी जमा झाला. 1989 साली म्हणजे सुमारे बत्तीस वर्षांपूर्वी हा आकडा तसा मोठा होता. 'पुढारी'च्या सामाजिक बांधिलकीचं तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वासराव धुमाळ यांनी तोंडभरून कौतुक केलं. 'पुढारी'वर प्रांजळ शब्दांचा वर्षाव करताना त्यांनी उद्गार काढले की, "दै.'पुढारी'चे संपादक प्रतापसिंह जाधव हे पंतप्रधानांसमवेत नुकताच परदेश दौरा करून परतले आहेत. परंतु, कोणत्याही सत्कार समारंभात गुंतून न पडता, त्यांनी स्वतःला या मदतनिधीच्या कामाला बांधून घेतलं. 'पुढारी'कार ग. गो. जाधव यांनी पहिल्यापासूनच जी सामाजिक बांधिलकी जपली, तेच व्रत प्रतापसिंहांनीही पुढे चालवलेलं आहे. शासकीय यंत्रणेलाही 'पुढारी'चं अनमोल सहकार्य लाभलं; पण केवळ सूचना करून किंवा विचार मांडून न थांबता प्रतापसिंह जाधव यांनी विचाराला कृतीचीही जोड दिली. 'पुढारी'नं पुढाकार घेऊन आपलं 'पुढारी' हे नाव सार्थ केलं आहे."

पूरग्रस्तांसाठी जमा केलेल्या मदतनिधीचा संपूर्ण वापर या जिल्ह्यातील कामासाठीच व्हावा, अशी आग्रही भूमिका मांडतानाच मी म्हणालो, "केवळ एका जिल्ह्यातून एवढा निधी जमला, हा एक विक्रमच आहे. पुण्या-मुंबईच्या धनिकांना जे जमलं नाही, तो चमत्कार कोल्हापूरच्या श्रमिक जनतेनं करून दाखवला." मदतनिधीसाठी सढळ हस्ते मदत करणार्‍या जनता जनार्दनांचेही मनःपूर्वक आभार मानतानाच मी म्हणालो, "मदतनिधीला सर्व थरातून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातून 'पुढारी'विषयी लोकांच्या मनात असणारा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला." विशेष म्हणजे 'पुढारी'कडे रोख निधीबरोबरच वस्तूंच्या रूपानंही मदत जमा झाली होती. धान्य, कपडे, भांडी; इतकंच काय, तर चादरी आणि टॉवेलपर्यंतही विविध जीवनोपयोगी वस्तू संकलित झाल्या होत्या. खासकरून गगनबावडा आणि इचलकरंजी अशा भागांतून अशा प्रकारचं साहित्य अधिक प्रमाणात जमा झालं होतं. व्यापारी आणि उद्योग संस्थांशिवाय वैयक्तिक स्वरूपातही अनेकांकडून मदत साहित्य आलं होतं. त्या साहित्याचंही वाटप आम्ही जिल्हाधिकारी कचेरी आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत गरजूंना केलं. महापुराच्या या अस्मानी संकटात 'पुढारी'नं बजावलेल्या कामगिरीबद्दल सर्वसामान्य पीडित जनतेनं कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे 'पुढारी'ची प्रतिमा अधिकच उजळली गेली.

मी पुण्याला शिक्षण घेत असताना कोयनेचा भूकंप अनुभवला होता. सर्वसामान्य जनतेची घरंदारं उजाड होताना डोळ्यांनी पाहिली होती. लोकांच्या मनामध्ये ठसली गेलेली भूकंपाची दहशत तेव्हाच माझ्याही मनावर बिंबली होती. आणखी एका अशाच रौद्र, भीषण घटनेनं धरती मातेचा ऊर फुटून छिन्नविछिन्न झाला! तारीख होती 30 सप्टेंबर, 1993. आदल्याच दिवशी गणपती विसर्जनात सारा महाराष्ट्र मश्गूल होता. श्रीगणरायाला निरोप देऊन माणसं शांतपणे झोपली होती आणि पहाटेच्या साखरझोपेतच नियतीनं त्यांच्यावर घाला घातला. पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला! इतकेच नव्हे; तर सोलापूर, सातारा, कराड आणि सांगली या भागातही या धक्क्याची तीव्रता जाणवली!

त्यातल्या त्यात सर्वात भीषण फटका लातूर जिल्ह्यातील किल्लारी या भागाला बसला. हे सारं गावच भूकंपानं मुळातून उखडून फेकलं! 3.56 ते 6.2 रिश्टर स्केल क्षमता असलेल्या या भूकंपात सुमारे दहा हजार लोकांना जिवंतपणीच मातीत गाडलं. गुदमरूनच त्यांनी दम तोडला, तर 30 हजारांवर लोक जखमी झाले. कोट्यवधीची वित्तहानी आणि कधीही भरून न येणारी जीवितहानी झाली. मराठवाड्यातील या दु:खितांचे आणि पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी मी पुढाकार घेतला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी 'पुढारी'मधून भूकंपग्रस्तांना मदतीसाठी आवाहन केलं. याहीवेळी मी आधी आपली मदत जाहीर केली. 'चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम' या तत्त्वानुसार कर्तव्य भावनेनं मी या निधीसाठी पुढाकार घेतला.

मदतनिधीच्या आवाहनाबरोबरच भूकंपग्रस्तांसाठी तातडीनं अन्नधान्य, कपडालत्ता जमा करून ते साहित्य पाठवण्याचीही व्यवस्था केली. शिवाय कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिक संघटनेची मी बैठक बोलावली आणि भूकंपग्रस्त भागात त्यांना अन्नछत्र सुरू करण्याची व्यवस्था केली. यावेळी 'पुढारी'च्या भूकंपग्रस्त मदतनिधीच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी जवळजवळ चार लाखांचा निधी जमला. विविध क्षेत्रांतून मदतीचा ओघ सुरू झाला. मराठवाड्यातील श्री अंबाजोगाई मातेच्या भक्तांच्या साहाय्याला जणू कोल्हापूरची अंबाबाईच धावली! तीन आठवड्यांत एकतीस लाखांचा निधी जमला.

6 नोव्हेंबर, 1993 रोजी तत्कालीन महसूलमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. निधी प्रदान करण्याचा हा कार्यक्रम 'पुढारी'भवनातच घेतला होता. मुळात विलासराव लातूरचेच. त्यांच्या जिल्ह्यालाच भूकंपाचा सर्वाधिक तडाखा बसला होता. त्यामुळेच हा निधी स्वीकारताना ते भावुक झाले. आम्हा दोघांची पुण्यापासूनची गेल्या 25 वर्षांची मैत्री. आपल्या मित्रानं भूकंपग्रस्तांना मदतीचा दिलेला हात पाहून ते भारावले.

निधी स्वीकारताना विलासराव म्हणाले, "वृत्तपत्र क्षेत्रात 'पुढारी'नं आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. 'पुढारी'नं आपला वाचकवर्ग लाखोंच्या घरात नेला. लोकांचा विश्वास संपादन केला. जिथं लोकांचा विश्वास असतो, तिथंच पैसा जमा होतो. आपलेपणाची, जिव्हाळ्याची आणि ममतेची भावना निर्माण करण्याचं आणि माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम 'पुढारी'नं नेहमीच केलेलं आहे." 'पुढारी'च्या सामाजिक बांधिलकीशी इतर वृत्तपत्रांची तुलना करताना विलासराव म्हणाले, "सार्‍या देशभरातून जी मदत आली, त्यात 'पुढारी'चा सिंहाचा वाटा आहे. काही काही वृत्तपत्रांचे ट्रस्ट असतात. त्यांच्या मदतीतून त्यांच्या वास्तू उभ्या राहतात. त्या त्यांच्याच नावावर राहतात. परंतु, हे आपलं काम नाही, तर ते जनतेचं योगदान आहे, असं प्रतापसिंहांनी स्पष्ट केलं, यातच त्यांचं मोठेपण आहे."

"कोल्हापूरनं माणूसपण जपलं," अशा भावना मी व्यक्त केल्या आणि भूकंपानं उद्ध्वस्त झालेल्या मराठी माणसाच्या आम्ही पाठीशी आहोत. संपूर्ण कोल्हापूर त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही मी कोल्हापूरकरांच्या वतीनं दिला. या निमित्तानं आणखी एक मिशन पुरं केल्याचं समाधान माझ्या मनाला मिळालं. हे समाधान काही वेगळंच असतं. त्याच्या पुन:प्रत्ययाचा अनुभव मी घेत होतो. 2005 चा महापूर ही 2019 च्या प्रलयाची नांदी होती, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. 2005 चा महापूर हे तोपर्यंत राज्यावर कोसळलेल्या अस्मानी आपत्तीपेक्षा अधिक गंभीर, अधिक व्यापक आणि अधिक भीषण असं महासंकट होतं. 25 जुलै, 2005 ला वरुणराजानं अख्ख्या महाराष्ट्रावर डोळे वटारले! सलग दोन आठवडे महाराष्ट्रभर पर्जन्याचं महातांडव सुरू होतं. या अस्मानी आपत्तीनं सारा महाराष्ट्र कोलमडून पडला.

या तडाख्यातून मुंबईसुद्धा सुटली नाही. 26 जुलैला दुपारीच मुंबईत ढगफुटी झाली आणि 24 तासांत अर्धी मुंबई पाण्याखाली गेली. 24 तासांत एकूण 944 मि.मी. पावसाची नोंद झाली. मागच्या शंभर वर्षांतील हा सर्वात मोठा पाऊस होता. या भयंकर मुसळधार पावसानं एकट्या मुंबईत सुमारे एक हजार लोकांचे बळी घेतले, तर चौदा हजार घरं उद्ध्वस्त झाली. पाण्यावर बोटी तरंगाव्यात तशा श्रीमंतांच्या आलिशान चारचाकी गाड्या मुंबईच्या रस्तोरस्ती पाण्यावर तरंगू लागल्या. देशाच्या आर्थिक राजधानीला पर्जन्यराजानं चांगलाच हिसका दाखवला. निसर्गापुढे कुणीही श्रेष्ठ नाही, हे दाखवून दिलं. त्यावेळी मी कोल्हापुरातच होतो. पंचगंगेला आलेले अनेक पूर आणि महापूरही मी लहानपणापासूनच पाहत आलेलो होतो. लहानपणी आमच्या शुक्रवार पेठेतील घराच्या तोंडाशी आलेलं पाणीही एक-दोनदा मी अनुभवलेलं आहे. तरुणपणी तर पंचगंगेच्या पुरात मी उडी घेऊन पोहलोही होतो. परंतु, यावेळचं पंचगंगेचं रौद्र स्वरूप कल्पनातीत होतं. खरं तर, पंचगंगा आणि जिल्ह्यातील 19 अन्य नद्या या आमच्या खर्‍या जीवनदायिनी, तर महाबळेश्वरातून उगम पावणार्‍या कृष्णा आणि कोयना या सार्‍या महाराष्ट्राच्याच भाग्यविधात्या. माताच जणू! परंतु, ढगफुटीसारख्या पावसानं या नद्यांनी अक्राळविक्राळ रूप धारण केलं. काठावरल्या अनेक गावांवर अक्षरशः जगबुडीसारखाच प्रसंग ओढवला. अनेक शहरांतील नागरी जीवनही पार लयाला गेलं!

या सर्वनाशी महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरांसह कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नद्यांकाठच्या गावांचं, घराचं, बाजारपेठांचं, उद्योग व्यवसायाचं आणि शेतीवाडीचं जवळपास दहा हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं! यावेळीही 'पुढारी' जनतेच्या मदतीसाठी पुढे सरसावला होता. पुढारीने जमा केलेला 30 लाखांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन केंद्र व नियंत्रण कक्षासाठी सुपूर्द केला. सन 2019 हे वर्ष हे पश्चिम महाराष्ट्रासाठी संकटाची खाईच ठरलं! यावर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुरानं अक्षरशः थैमान घातलं. गेल्या शंभर वर्षांत आला नसेल, असा महाभयानक पूर पंचगंगा आणि कृष्णा नदीला आला. बघताबघता लोकांच्या डोळ्यांदेखत त्यांचे नांदते संसार उद्ध्वस्त झाले. पूर काय किंवा महापूर काय; एक-दोन दिवस पाणी राहतं आणि मग ओहोटीला लागतं, असा आजपर्यंतचा अनुभव होता. पण, 2019 च्या महापुरानं सगळंच मोडीत काढलं. पंचगंगेनं 2005 मध्ये तयार केलेली पूरपातळी या पुरानं झुगारून दिली आणि पाच ते सहा फुटानं जादा पाणी वाढलं. म्हणजे पुराची उंची तेवढ्या प्रमाणात वाढली. भरीत भर म्हणून महापुराचं पाणी एक-दोन दिवसांतच ओसरण्याऐवजी तब्बल नऊ दिवस मुक्काम ठोकून बसलं! त्यामुळे ज्या ज्या घरात पाणी शिरलं होतं, त्यांच्या घरांचा अक्षरशः चिखल झाला. त्यात संसारही भिजून, सडून गेले! त्या कुटुंबांनी अंगावरच्या कपड्यांशिवाय सारं काही गमावलं.

आजपर्यंत अशा संकटकाळात मी 'पुढारी'तर्फे एकांड्या शिलेदारासारखा धडपडत होतो; पण आता चि. योगेशही माझ्या मदतीला धावले होते. या महाप्रलयंकारी महापुरात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी योगेश यांनी बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि 'पुढारी'च्या परंपरेला साजेशी होती. किंबहुना त्याहून काकणभर सरसच होती, असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही! ज्याप्रमाणं महापुराचा विळखा शहराला पडतो, त्याचप्रमाणं तो चिखली आणि आंबेवाडी या गावांनाही पडतो. अशा निर्वाणीच्या प्रसंगी, ऐन महापुरात नावेतून चिखली आणि आंबेवाडीला जाऊन 'पुढारी'चे समूह संपादक योगेश यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. योगेश यांनी सर्वत्र फिरून मदतकार्याला हातभार लावला. नैसर्गिक संकटात जनतेच्या मदतीसाठी धावण्याची 'पुढारी'ची परंपरा या निमित्तानं योगेश यांनीही पुढे कायम ठेवली.'पुढारी'नं प्रथम स्वत:चे पन्नास लाख रुपये देऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'रिलीफ फंड' सुरू केला. इथेच न थांबता, महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाला दहा बोटीही दिल्या.

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. त्यांच्याशी चर्चा करून, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे अध्यक्ष या नात्यानं, मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला उपस्थित राहून योगेश यांनी सगळी वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौराही केला.महापुरानंतर खरं आव्हान होतं ते पुनर्वसनाचं आणि मदतीचं. कारण पूरग्रस्त भागातील सर्वांचेच संसार उद्ध्वस्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अनेक तालीम मंडळं आणि सामाजिक संस्थांनीही मदतीचा हात पुढे केलेला. त्यांच्यातील समन्वयासाठी आणि योग्य त्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात हातभार लागावा, यासाठी योगेश यांनी मदतकार्यात असलेल्या सर्व संस्था प्रतिनिधींची एक बैठक घेतली आणि मदतकार्याला योग्य दिशा यावी, यासाठी प्रयत्न केले. तसेच छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटललाही भेट देऊन त्यांनी तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला आणि रुग्णांची विचारपूस करून आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी प्रयत्न केले.

महापुरातील बाधितांचं पुनर्वसन असेल, रुग्णांची विचारपूस असेल किंवा ऐन पुरातून जाऊन पूरग्रस्तांना केलेली मदत असेल. या प्रत्येक ठिकाणी योगेश आघाडीवर होते. कर्तव्यालाच देव समजून सामाजिक बांधिलकी मानणारे योगेश हे माझे पुत्र आहेत, याचा मला मनापासून अभिमान वाटतो. महापुरानंतर पंधरा दिवसांतच गणेशोत्सवाला सुरुवात होत होती. पण महाप्रलयंकारी महापुराच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव नेहमीच्या थाटात साजरा न करता, त्याऐवजी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन योगेशनी केलं. त्यासाठी कोल्हापुरातील सर्व सार्वजनिक मंडळांची एक बैठक बोलावली. या बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अगदी महापौर, जिल्हाधिकारी यांच्यापासून जिल्हा पोलिसप्रमुख, महापालिका आयुक्त, तसेच खासदार, अन्य लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारीही उपस्थित होते. यावेळी मंडळांनी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्धार केला आणि मग या बैठकीत ठरल्याप्रमाणे खरोखरीच गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला. सार्वजनिक कार्यक्रमात असा पुढाकार घेऊन सण-समारंभ साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन करणं, हे फार धाडसाचं असतं; पण योगेशनी हे धाडसी पाऊल उचलून ते यशस्वीही करून दाखवलं.

तसेच योगेशनी पूरग्रस्तांसाठी आणखी एक चांगलं काम केलं. त्यावेळी ज्या मंडळाचे ते अध्यक्ष होते, त्या उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या बैठकीतही त्यांनी अन्य सर्व सदस्यांच्या सहकार्यानं मंडळाला विकास कामांसाठी मिळालेला निधी हा पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्याचा ठराव करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. त्याशिवाय 'पुढारी'च्या वतीनं पूरग्रस्त अनाथ मुला-मुलींच्या बारावीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची जबाबदारी दै. 'पुढारी'नं घेतल्याचं योगेशनी जाहीर केलं. त्यांचा हा निर्णय भावी पिढीच्या शिक्षणाविषयी तळमळ असणाराच आहे. तसाच निराधारांना आधार देण्याची सहृदयताही त्यांच्या ठायी दिसून येते. 2019 मधील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन 'पुढारी रिलीफ फौंडेशन'च्यावतीने 2020च्या जूनमध्ये कोल्हापूर, सांगली आणि कर्‍हाड येथे जीवरक्षक साधनांसह मोटारबोटी पुरवण्यात आल्या. 13 जून, 2020 रोजी योगेश यांच्या हस्ते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे ही सामग्री समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आली. पूरग्रस्तांच्या बचावासाठी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दीडशे जीवरक्षक जॅकेटस्, पाच मोटारबोटी, शंभर बिओरिंग देण्यात आल्या. नंतर समारंभपूर्वक कोल्हापूर व सांगली महापालिकेला प्रत्येकी दोन आणि कराड नगरपालिकेला एक बोट प्रदान करण्यात आली. पुन्हा 2021 च्या ऑगस्ट महिन्यात कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तडाखा बसला. यावेळीही रिलीफ फौंडेशनच्या माध्यमातून योगेश सक्रियपणे कार्यरत राहिले. योगेश यांच्या स्वभावातील नेतृत्वाचे गुण दिवसेंदिवस विकसित होत असल्याची प्रचिती यावरून आल्याशिवाय राहात नाही.

कोल्हापूर आणि सांगली भागात 2005 आणि 2019 साली आलेले महापूर हे 'न भूतो न भविष्यती' अशा स्वरूपाचे महाविध्वंसकारी होते. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची 524.25 मीटरपर्यंत वाढल्यानंतरच हे महापूर आले, हे उघड सत्य आहे. 2005 सालच्या महापुराचा आणि त्याच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी 'धुमाळ समिती' नियुक्त करण्यात आली होती. या समितीनं स्पष्टच निष्कर्ष काढलेला आहे की, 2005 सालच्या महापुराला अलमट्टी धरणाचं बॅकवॉटरच कारणीभूत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 509 मीटरपेक्षा जादा ठेवता कामा नये. 2019 च्या महापुरानंतरही 'साऊथ एरिया नेटवर्क ऑफ डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल्स' या ऑर्गनायझेशननं या भागातील महापुराची पाहणी करून अहवाल दिला आहे. याही अहवालात अलमट्टी धरणातील पाणीपातळी आणि नियमानुसार न होणार्‍या विसर्गावर बोट ठेवून या महापुराला अलमट्टी धरणच कसं कारणीभूत आहे, हे अधोरेखित केलेे आहे. अलमट्टी धरणात 509 मीटरऐवजी 519 मीटरपर्यंत साठा केला की, धरणाच्या बॅकवॉटरमध्येही 10 मीटरनं म्हणजेच जवळपास 33 फुटांनी वाढ होते. त्यामुळेच सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये महापूर येतात, हे 2005 आणि 2019 साली सिद्ध झालेलं आहे. महापुरातील विध्वंसाचा आकडा 2019 साली 20 ते 25 हजार कोटींच्या घरात गेला आहे. त्याशिवाय जीवितहानी वेगळीच. भविष्यातही अलमट्टीचा हा धोका कायम असल्यानं या भागातील बाजारपेठा आणि उद्योग-व्यवसाय अन्य भागात आणि प्रामुख्यानं कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा धोका नाकारता येत नाही.

कृष्णा खोर्‍याचं महाराष्ट्रात येणारं एकूण क्षेत्रफळ आणि त्या भूभागातील लोकसंख्येचं प्रमाण यानुसार पाण्याचं वाटप झालेलं नाही. ते तसं झालं, तर महाराष्ट्राच्या वाट्याला कृष्णा खोर्‍यातील आणखी 150 ते 200 टीएमसी पाणी येण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त तर होईलच, पण पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे राज्याच्या औद्योगिक विकासालासुद्धा चालना मिळण्यास मदत होईल. त्यामुळे कृष्णा खोर्‍यातील पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी आणि मुळात म्हणजे महाराष्ट्राला धोकादायक ठरलेल्या अलमट्टी धरणातील पाणीपातळी निश्चित करण्यासाठी एखादा स्वतंत्र लवादच नेमण्याची आवश्यकता आहे. तसं झाल्याशिवाय या भागातील दुष्काळाचा आणि महापुराचाही धोका दूर होणार नाही. कोल्हापुरात जवळजवळ दरवर्षीच पंचगंगा नदीला पूर येतो. पण पुराचे पाणी जामदार क्लब, गायकवाड वाड्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त पंचगंगा तालमीपर्यंत येत असे. अनेक वर्षांचा माझा हा अनुभव. शिवाय हे पुराचे पाणी तीन-चार दिवसात ओसरत असे. रस्ते मोकळे होत असत.

शहराच्या अन्य भागात म्हणजे न्यू पॅलेस परिसर किंवा जिल्हाधिकारी कचेरी परिसर इथे कधी महापुराचे पाणी आल्याचा गेल्या शंभर-दीडशे वर्षांचा दाखला नाही. कोल्हापुरात 1929 साली ब्रिटिश राजवटीत जिल्हाधिकारी कचेरीचे बांधकाम उभे राहिले, तर संस्थान काळात नवा राजवाडा-न्यू पॅलेसचे बांधकाम झाले. न्यू पॅलेसचे बांधकाम 1877 ते 1884 या काळात झाले. मेजर मॅट या ब्रिटिश वास्तुशास्त्रज्ञाने या वाड्याचा नकाशा तयार केला आणि ब्रिटिश रेसिडेंटच्या देखरेखीखाली त्याचे बांधकाम पूर्ण झाले. पंचगंगा नदीपासून न्यू पॅलेस जवळच आहे. पण गेल्या दीडशे वर्षांत न्यू पॅलेसजवळ कधी महापुराचे पाणी आले नव्हते. त्याही पुढे जिल्हाधिकारी कचेरी भागात पुराचे पाणी येण्याची कधी वेळ आली नव्हती. महापुराचे असे पाणी येत असते तर तत्कालीन जाणत्या ब्रिटिश प्रशासनाने वाड्यासाठी आणि जिल्हाधिकारी कचेरीसाठी जागेची निवड केलीच नसती. शंभर-दीडशे वर्षांत ज्या भागात कधी पुराचे पाणी आले नाही, तिथे आता महापुराचे पाणी येत असेल तर नेमक्या कारणाचा शोध घेण्याची गरज आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येण्यापूर्वी कधी एवढी भयभीषण महापुराची आपत्ती आलेली नव्हती. या अस्मानी आपत्तीला आणखी काही मानवी कारणे असली पाहिजेत. पुणे-कोल्हापूर चौपदरी महामार्ग झाला. महामार्गावरील उड्डाणपूल पिलरऐवजी भिंती बांधून, भराव टाकून उभारण्यात आले. पुराच्या पाण्याचा निचरा व्हायला या भिंती आणि भराव अडथळा ठरले. आता हे उड्डाणपूल पिलरवर आधारित उभारण्याचा निर्णय झाला आहे. आधीच ही बाब कोणा रस्ता बांधणीतज्ज्ञाच्या लक्षात आली नाही, हे लोकांचे दुर्दैव! सांगली संस्थानात कृष्णा नदीकाठी 1811 साली संस्थान काळात श्री गणपती मंदिर उभारण्यात आले. या मंदिराशेजारी गणपती पेठ उभारण्यात आली. 1811 ते 2005 या सुमारे 195 वर्षांच्या काळात गणपती मंदिरात कधी पुराचे पाणी आले नाही. गणपती पेठेतही कधी पुराचे पाणी आले नाही. मात्र 2005, 2019 आणि 2021 मध्ये या भागात महापुराने थैमान घातले. एवढेच नव्हे, तर जवळजवळ निम्मी सांगली पुराच्या पाण्याने वेढली गेली. कोल्हापूर आणि सांगलीत 100-150 ते 195 वर्षांच्या कालावधीत जी आपत्ती कधी ओढवली नाही ती अलीकडील काळात ओढवली गेली. अलमट्टी धरणाच्या उंचीसारख्या घोडचुका आणि त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष हे त्याला प्रामुख्याने कारणीभूत आहे. या आपत्तीची नेमकी कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आणि या आपत्तीतून लोकांची कायमची सुटका करणे हे शासनापुढील आव्हान आहे आणि शासनाने प्राधान्याने या आव्हानाचा पाठपुरावा केला पाहिजे. मलमपट्टीऐवजी आता ठोस, कायमस्वरूपी उपाययोजना झालीच पाहिजे.

SCROLL FOR NEXT