प्रासंगिक : भारतीय कला आणि भगवान श्रीकृष्ण 
बहार

प्रासंगिक : भारतीय कला आणि भगवान श्रीकृष्ण

रणजित गायकवाड

पंडित बिरजू महाराज, (प्रसिद्ध नृत्यगुरू)

भारत आणि भारतीय कलांशी भगवान श्रीकृष्णाचे घनिष्ट नाते आहे. हे पवित्र कलात्मक संबंध आध्यात्मिकही आहेत आणि व्यावहारिकही! वाद्यांचा विचार केल्यास श्रीकृष्ण हाच त्यांचा आधार आहे. बासरीचा उपयोग एक वाद्य म्हणून सुरू झाला तो श्रीकृष्णापासूनच. 64 कलांची देवता मानल्या जाणार्‍या श्रीकृष्णाच्या बासरीच्या माध्यमातून संगीताचा प्रसार झाला. संगीताबरोबरच भगवान श्रीकृष्णाचा नृत्याशी घनिष्ट संबंध आहे. प्रेम आणि भक्तीने परिपूर्ण अशा श्रीकृष्णाच्या महारासक्रीडेत संगीत आणि नृत्य या दोहोंचा मिलाफ होता. शास्त्रामध्ये म्हटले आहे की, संपूर्ण गोकुळात श्रीकृष्णाच्या सौजन्यानेच संगीत-नृत्याचा सोहळा सुरू झाला आणि आजही होतो.

गोकुळातील कन्हैयाचा संबंध भारतीय कलांशी दीर्घकाळापासून चालत आला आहे आणि ऋषिमुनींनीही भक्तिभावाने तो पुढे नेला. ऋषिमुनी जेव्हा श्रीकृष्णाचे ध्यान करीत असत, तेव्हा स्वतःहून नाचण्या-गाण्यास प्रवृत्त होत असत. श्रीकृष्णाच्या प्रेमळ छायेतच संगीत, नृत्याची अनेक पदे आणि ग्रंथांचे लेखन झाले. नंतरच्या काळात सूरदासांसारखे कवी झाले आणि त्यांनी श्रीकृष्णाचा महिमा सांगणारी एकाहून एक श्रेष्ठ पदे लिहिली. त्यांच्या पदांमध्ये श्रीकृष्णाचे मोहक बालरूप आणि वृंदावनातील कुंजवनाची चर्चा अत्यंत सुंदररीतीने साकारलेली दिसते. सूरदास त्यांच्या पदांमध्ये श्रीकृष्णाचे प्रेरक स्वरूप साकार करतात. आपल्या परंपरेत नृत्य करणार्‍या देवतांमध्ये श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांचाच समावेश आहे. पुराणांमध्ये या दोन्ही देवतांचे वर्णन 'नर्तक' म्हणून केलेले दिसते. श्रीकृष्णाला भगवान शिवाकडूनच नृत्याचे ज्ञान मिळाले असावे, हेही शक्य आहे. श्रीकृष्णाने जनमानसाला आकर्षित करण्यासाठी अत्यंत सहजतेने आपल्या कलेच्या ज्ञानाचा वापर केला.

कलाविश्व श्रीकृष्णाविना अधुरे आहे आणि त्यातल्या त्यात कथकचा श्रीकृष्णाशी अत्यंत द़ृढ संबंध आहे. आमचे इष्टदेव श्रीकृष्णच होत. आम्ही कलावंत प्राचीन काळापासून त्याची पूजा करीत आहोत. पूजेचे विधी आजही जसेच्या तसे आहेत. आम्ही आजही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णाची पूजा करतो. आता काळ बदलला आहे.

मला आठवते, पूर्वी लखनौमध्ये माझ्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आयोजन धूमधडाक्यात केले जात असे. सध्या एकच दिवस कृष्णजन्मोत्सव साजरा केला जात असला, तरी लखनौमध्ये पूर्वी श्रीकृष्ण जन्मोत्सव सहा दिवस निरंतर चालत असे. पंडितजींसमवेत आम्ही रोज मनोभावे श्रीकृष्णाची पूजा करीत होतो. या सोहळ्यात मोठमोठे कलाकार, संगीतकार, नर्तक येत असत आणि आपली कला सादर करीत असत. श्रीकृष्णाप्रति प्रेमाचे दर्शन घडविण्यासाठी तो कार्यक्रम होत असे. माझे वडील, आजोबा यांची या सोहळ्यात खूप धावपळ चाले. सहा दिवस केवळ श्रीकृष्ण जन्मोत्सवाचीच धामधूम चालत असे. जो या सोहळ्याला येत असे तो रिकाम्या हाताने कधीच जात नसे. जाताना तांदूळ, आटा, डाळ, तूप आदी घेऊन जात असे. बाहेरून जे कलाकार तिथे येत असत, त्यांनाही त्यांची गायन-वादन कला सादर करावी लागत असे. मला आठवते, खूप मोठमोठे कलाकार येत असत. परंतु, आता तो सोहळा राहिला नाही. त्याकाळी श्रीकृष्णच आम्हा कलाकारांना एकत्र आणत असे. बाबा त्या सोहळ्यात स्वतः सर्वांची सेवा करीत असत. भांडी घासत असत. त्यांच्या चेहर्‍यावर असे भाव असत की, देवाने बालरूपात अवतार घेतल्याचा भास होई. लखनौमधून बाहेर पडलो. दिल्लीत स्थायिक झालो. परंतु, पुन्हा लखनौमध्ये जाऊन काही तरी करण्याची माझी इच्छा आहे.

केवळ कथक नृत्यच नव्हे, तर भारतात ज्या अन्य नृत्यशैली आहेत, त्या सर्व शैलींमध्ये श्रीकृष्णाचे महत्त्व मानले आहे. आम्ही कलाकार उत्तरेकडील असू, वा पूर्वेकडील वा दक्षिणेकडील असो, श्रीकृष्णाच्या गाथांचे प्रदर्शन आणि गायन प्रत्येकाने केले आहे. आपापल्या भाषेत सर्वजण गात राहिले. परंतु, कृष्णाला कोणीही विसरू शकले नाही. कृष्णाची चर्चा आणि त्याच्याशी संबंधित प्रसंग कलाजगतात सर्वत्र अस्तित्वात आहेत. त्यागराजजींनीही कृष्ण पाहिला, मीराबाईंनी पाहिला, सूरदासांनी पाहिला. प्रत्येकाने आपापल्या द़ृष्टिकोनातून कृष्ण प्रेम व्यक्त केले. एवढेच नव्हे, तर मुस्लिम भक्त कवींनीही कृष्णाच्या प्रेमापायी सुंदर पदे तयार केली. आपल्या देशात गंगा-जमुनी संस्कृती आहे आणि ती निर्माण करण्यात सर्वांचा समान वाटा आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याच्या पूर्वीच्या पद्धतीत आता बदल झाला आहे. सध्या कार्यक्रम लहान असतो; परंतु पूजाविधी मात्र शतकांपूर्वी होते त्याप्रमाणेच असतात. षष्ठीच्या दिवशी मुख्य कार्यक्रम असतो. गोडधोड पक्वान्ने केली जातात. सुंठवड्याचे लाडू केले जातात. पूर्वी असे लाडू खूप प्रमाणात बनविले आणि वाटले जात असत. परंत, आता शास्त्रापुरतेच थोडेसे लाडू बनवतात. जुन्या लखनौमध्ये श्रीकृष्णाला मानणार्‍यांची संख्या आजही प्रचंड मोठी आहे. पूर्वीच्या काळी मथुरा आणि वृंदावन येथे खूप कार्यक्रम होत असत आणि आजही होतात. तिथे कृष्णाची भक्ती करणारी कलावंत मंडळी मोठ्या संख्येने आहेत. भारतीय विद्यांना आणि भारताला श्रीकृष्णापासून वेगळे काढताच येत नाही. श्रीकृष्ण सर्वत्र आहे.

श्रीकृष्णाला न्याहाळून, त्याच्याकडून शिकून, त्याला आपल्या अभिनय आणि नृत्यात उतरविण्याचा प्रयत्न मी अनेक वर्षांपासून करीत आहे. प्रत्येकवेळी जेव्हा मी तयार होऊन उभा राहतो, तेव्हा म्हणतो, "हे भगवान, आता माझ्याकडून नृत्य करवून घे." श्रीकृष्णाकडून किती तरी शिकायला मिळते. आज लोकांना विशेषतः तरुण मंडळींना माझे सांगणे आहे की, श्रीकृष्णाचे जे जीवनचरित्र आहे, त्याची माहिती नक्की करून घ्या. श्रीकृष्णाने आपल्या जीवनात खूप छोट्या वयात मोठमोठी कामे केली होती. जीवनात सातत्याने संघर्ष केला, झुंज दिली. परंतु, सतत हसतमुख राहिले. आपल्या माता-पित्याला कैदेतून सहिसलामत सोडविले. कालिया नागासह अगणित असुरांना मार्गातून दूर केले. गोकुळातील लोकांना सुरक्षित केले. श्रीकृष्णाचे ध्यान जरूर करायला हवे. श्रीकृष्णाची आपल्यासमोर अशी मनमोहक मूर्ती आहे, जी केवळ पाहूनच सर्वांना सुख प्राप्त होते. श्रीकृष्णाच्या दर्शनाचा आनंद घ्यायचा असेल तर शांत चित्ताने मुरलीधर कृष्णमूर्तीसमोर जाऊन बसावे आणि श्रीकृष्णाचे चरित्र आणि महिमा आठवावा. श्रीकृष्णाच्या जीवनासंबंधी वाचन करावे. ते समजून घ्यावे. त्यातूनच शक्ती आणि सुख मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT