बहार

निकोल ऑलिविरा : सगळ्यात लहान वयाची खगोलशास्त्रज्ञ

Arun Patil

ब्राझीलमधील आठ वर्षांची निकोल ऑलिविरा ही जगातली सगळ्यात लहान खगोलशास्त्रज्ञ. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिला अवकाशातल्या ग्रह-तार्‍यांविषयी ओढ निर्माण झाली. 18 लघुग्रहांचा शोध लावत तिने एक वेगळा विश्वविक्रम केला आहे. त्यामुळेच 'नासा'लाही तिची दखल घ्यावी लागली.

खेळण्या-बागडण्याच्या वयात ब्राझीलमधली निकोल ऑलिविरा एका वेगळ्याच जगात दंग झाली आहे. हे वेगळं जग आहे अवकाश संशोधनाचं, ग्रह-तार्‍यांचं. वयाच्या चौथ्या वर्षी तिला एका वेगळ्या जगाविषयी कुतूहल निर्माण झालं. वयाच्या 8 व्या वर्षी थेट 'नासा' या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्थेसोबत तिने काम करणं हे तिच्याबद्दलचं कुतूहल वाढवणारं आहे.

अवकाशातल्या अद्भुत जगाबद्दल आपल्याला ओढ लागलेली असते. ते जग नेमकं कसं आहे. तिथले तारे, ग्रह, धूमकेतू हे केवळ आपण पुस्तकात पाहिलेलं, वाचलेलं असतं. त्या त्या इयत्तेपुरतं ते मर्यादित राहतं. त्यापलीकडे या जगाविषयीची माहिती आपल्याकडे नसते. ना फार जास्त ती शाळेत दिली जाते. काही मुलं मात्र त्यापलीकडे जात हे अनोखं, अद्भुत जग समजून घेतात. त्या जगापर्यंत पोहोचतात. निकोल ऑलिविरा ही अशा मोजक्या मुलांमध्ये मोडते. निकोलचे वडील जीन कार्लो हे संगणक शास्त्रज्ञ, तर आई झिल्मा या एका हस्तकला उद्योगात काम करतात.

चार वर्षांची असताना निकोलनं बर्थडेला दुर्बीण भेट म्हणून मागितली होती. दुर्बीण म्हणजे काय? हे आपल्याला त्यावेळी माहीतही नसल्याचं तिच्या आईने म्हटलंय. दुर्बीण खूप महाग असल्यामुळे घेणं परवडणारं नव्हतं. पुढे 3 वर्षांनी थोडे थोडे पैसे जमा करून तिच्या आई-वडिलांनी तिला ते गिफ्ट घेऊन दिलं.

लहानपणी निकोल आकाशाकडे बघून आपल्या आईला एक तारा मला हवाय, असं सारखी म्हणायची. या तिच्यातल्या अवकाश संशोधनातल्या शोधक वृत्तीने तिला एका प्रतिष्ठित शाळेची शिष्यवृत्ती मिळवून दिली. तिचं मूळ गाव ब्राझीलमधलं मासेयो; पण शिष्यवृत्तीमुळे या वर्षाच्या सुरुवातीला हे कुटुंब मूळ गावापासून 1 हजार किलोमीटरवर असलेल्या ईशान्येकडच्या फोर्टालेझा शहरात स्थायिक झालं. निकोलसाठी तिच्या वडिलांनी घरून काम करणं पसंद केलं.

एका खगोलशास्त्र अभ्यासक्रमाला निकोलला प्रवेश घेता यावा म्हणून त्या कोर्सची वयोमर्यादाही कमी करण्यात आली. तिची रूम पूर्णपणे रॉकेटची छोटी-छोटी मॉडेल, सौरमंडलाचे फोटो, कॅमेरा, अवकाश संशोधनासंदर्भातले फोटो यांनी गच्च भरून गेली आहे. ती संशोधनाचं सगळं काम तिच्या कॉम्प्युटरवरून करते.

निकोलचं एरोस्पेस इंजिनिअर बनायचं स्वप्न आहे. आपल्याला फ्लोरिडा इथल्या 'नासा'तल्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये जायचं आहे. एक रॉकेट बनवायचंय.' असं ती म्हणते. तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनेलही आहे.

कॉम्प्युटरवरून अवकाशातल्या प्रतिमांचा ती अभ्यास करते. 'एस्टेरॉईड हंटर' असं तिच्या संशोधनविषयक प्रोजेक्टचं नाव आहे. लहान मुलं आणि तरुणांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी, त्यांना विज्ञानाशी जोडून घेता यावं, अवकाश संशोधनाची संधी मिळावी, हाच उद्देश या प्रोजेक्टमागे आहे.

'इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिक सर्च कोलॅबरेशन' हा 'नासा'चा एक वैज्ञानिक कार्यक्रम आहे. लघुग्रहांचा शोध, हा या कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे. त्याच अंतर्गत 'एस्टेरॉईड हंटर' या प्रोजेक्टची रचना करण्यात आली आहे. ब्राझील सरकारचं विज्ञान खातंही या प्रोजेक्टशी जोडलं गेलं आहे.

निकोलनं 18 लघुग्रहांचा शोध लावला आहे. हे रेकॉर्ड आतापर्यंत इटलीच्या 18 वर्षीय लुईगी सॅनिनोच्या नावावर होतं. निकोलने लावलेल्या लघुग्रहांच्या शोधावर अद्याप बरंच काम होणं बाकी आहे. हा शोध सिद्ध होण्यासाठी बरीच वर्षे जातील; पण या ग्रहांना मात्र तिला आपले आई-वडील आणि ब्राझीलमधल्या शास्त्रज्ञांची नावं द्यायची आहेत.

निकोल 'अलागावोस एस्ट्रोनॉमिकल स्टडीज् सेंटर, सेंट्रो डी एस्टुडोस एस्ट्रोनॉमिको डी अलागावोस' अर्थात 'सीईएएएल' या ब्राझीलमधल्या खगोलशास्त्रज्ञांच्या संस्थेची सगळ्यात तरुण सदस्य आहे. त्यामुळेच तिला जून 2021 ला ब्राझीलच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच्या खगोलशास्त्र आणि वैमानिक विषयावरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये बोलण्याची संधी मिळाली.

इतक्या लहान वयात निकोल खगोलशास्त्रातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांशी संवाद साधते आहे. तिने गेल्यावर्षी ब्राझीलमधले पहिले अंतराळवीर मार्कोस पोटेंस यांची भेट घेतली होती. आपल्या यूट्यूब चॅनेलवरून तिने ब्राझीलमधले सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ ड्युलिया डी मेलो यांचीही मुलाखत घेतली होती.

खगोलशास्त्रातल्या तज्ज्ञांशी संवाद साधणं, आपल्या मित्रांना लघुग्रह, अंतराळाविषयी माहिती देणं हा तिच्या यूट्यूब चॅनेलचा महत्त्वाचा उद्देश आहे. निकोलची स्वप्नं खूप मोठी आहेत आणि त्यामागचे तिचे प्रयत्नही. ती केवळ स्वतःचा विचार करत नाही, तर आपल्या इतर मित्र-मैत्रिणींनाही यात गोडी निर्माण व्हावी म्हणून ती प्रयत्नशील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT