बहार

तलत यांचे मराठी गाणे

Arun Patil

हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील ज्येष्ठ पार्श्वगायक तलत मेहमूद यांचा 24 फेब—ुवारी 1924 हा जन्मदिवस. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. तलत मेहमूद यांनी अगदी मोजकीच गाणी गाऊन चित्रपटसृष्टीत आपले नाव अजरामर केले. त्यांनी काही मराठी गाणीदेखील गायिली होती. काय होते त्यांचे मराठीशी नाते…

हिंदी सिनेमात आपल्या मखमली स्वराने रसिकांच्या मनात मधाळ गीतांचा खजिना ज्या गायकाने रिता केला, त्या तलत मेहमूद यांनी मराठीतदेखील काही गाणी गायली होती. त्यांच्या मराठीतील पहिल्या गाण्याचा किस्सा खूप मजेशीर आहे. 1961 साली मराठीत एक चित्रपट आला होता, 'पुत्र व्हावा ऐसा.' याचे निर्माते होते दिनकर जोशी आणि दिग्दर्शक होते राजा ठाकूर. दिनकर जोशी प्रदीर्घ काळ दादामुनी अशोककुमार यांचे सचिव असल्याने हिंदी सिनेसृष्टीसोबत त्यांचे अनेकांशी संबंध होते. या चित्रपटाची गाणी पी. सावळाराम, बा. भ. बोरकर आणि डॉ. वसंत अवसरे (शांता शेळके) यांनी लिहिली होती.

या चित्रपटात विवेक-जीवनकला ही जोडी होती. कथा, पटकथा आणि संवाद पी. सावळाराम यांचे होते. भावगीतांच्या दुनियेत पी. सावळाराम आणि वसंत प्रभू यांची युती लोकप्रियतेचे नवे मापदंड उभारत होतीच. त्याचाच फायदा होईल, हा निर्मात्यांचा होरा होता. या चित्रपटातील पहिली चार गाणी ध्वनिमुद्रित झाली होती. नायकावर चित्रित होणारी दोन गाणी अद्याप व्हायची होती. सिनेमाचा नायक मराठीच्या त्या काळातल्या साचेबद्ध चौकटीच्या बाहेरचा असा हा शहरी, मध्यमवर्गीय होता. त्यामुळे त्याच्यावर चित्रित होणार्‍या गाण्यासाठी एक वेगळा प्रयोग करावयाचे निर्मात्यांनी ठरवले. यासाठी त्यांनी तलत मेहमूदला विचारायचे नक्की केले.

पण, दिग्दर्शक राजा ठाकूर यांना मात्र ही कल्पना फार काही रुचली नाही. त्यांच्या मनात मात्र या गाण्यासाठी सुधीर फडके यांचा आवाज घ्यावा, असे वाटत होते; पण निर्मात्यांच्या हट्टापुढे राजाभाऊंचे काही चालले नाही. तलत पहिल्यांदा मराठीत आपल्या संगीतात गाणार म्हणून वसंत प्रभू खूश झाले. तलतला विचारले, तेदेखील आनंदले. फक्त माझ्या शब्दोच्चारासाठी अधिक मेहनत घ्या, अशी विनंती त्यांनी निर्मात्याकडे केली. मग प्रभू रोज तलतला घेऊन फोर्टच्या एच.एम.व्ही. कार्यालयात जात. जिथे तलतची मराठी शब्द उच्चाराची शिकवणी घेणार्‍यांत आपले श्रीनिवास खळेदेखील असायचे. भरपूर रिहर्सल झाल्यावर ते समोरच्या 'बि—स्टाल' हॉटेलमध्ये जेवायला जायचे. तलत मेहमूद त्या काळात मुद्दाम सर्वांशी मराठीत बोलत असत. तलतला मराठी शाकाहारी जेवण आवडत असे. 'यश हे अमृत झाले' हे गाणे आधी रेकॉर्ड झाले. त्या पाठोपाठ 'स्वप्ने मनातली का वार्‍यावरी उडावी' हे युगलगीत (सुमन कल्याणपूर सोबत)देखील तयार झाले.

जोशींनी तलतला गाण्याच्या मानधनाबाबत विचारल्यावर, मोठ्या दिलाच्या तलतने नम—पणे नकार देत 'आपने मेरे लिए मराठी गीतोंका द्वार खोला है, यही मेरे लिए बहोत है!' असे म्हणत त्यांच्याप्रती कृतज्ञताच व्यक्त केली. हा सिनेमा 1961 साली प्रदर्शित झाला. यातले 'जिथे सागरा धरणी मिळते, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' हे सुमनचे गाणेदेखील खूप लोकप्रिय ठरले. 1961 सालचे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचे पारितोषिक तलतला या सिनेमाकरिता मिळाले. तलतने पुढे काही वर्षांनी वसंत देसाई यांच्याकडे 'मोलकरीण' चित्रपटासाठी 'हसले आधी कुणी? तू का मी?' हे आशासोबत गाणे गायले. तलतने मराठीत फार काही गाणी गायली नाहीत; पण तितकी म्हणून गायली ती आजही लोकप्रिय आहेत.

धनंजय कुलकर्णी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT