बहार

क्रिकेटमधल्या ‘मिस वर्ल्ड’

Arun Patil

निमिष पाटगावकर

विश्वचषक विजयाने भारतीय महिला क्रिकेटमधील गणिते बदलतील. या 19 वर्षांखालील मुलींच्या संघातील खेळाडूंकडे नजर टाकली, तर लक्षात येणारी बाब म्हणजे, यातल्या बहुतांशी खेळाडू छोट्या गावांतून आलेल्या आहेत. त्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच; क्रिकेटच्या संस्कराचाही स्पर्श झालेला नाही.

दक्षिण आफ्रिकेत 2007 साली पुरुषांच्या पहिल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने नवोदित कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात जिंकले. याच इतिहासाची पुनरावृत्ती दक्षिण आफ्रिकेच्याच भूमीवर शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारताच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने गेल्या रविवारी मुलींचा पहिलावहिला विश्वचषक जिंकून केली. टी-20 क्रिकेट 2007 साली रोपटे होते; पण आज 16 वर्षांत या क्रिकेटच्या प्रकाराचे अनेक पारंब्या असलेल्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. पुरुष, महिला, देशोदेशीच्या अनेक लीग यामध्ये यावर्षी भर पडली ती 19 वर्षार्ंखालील मुलींच्या विश्वचषकाची. या पहिल्याच आवृत्तीचे विश्वविजेतेपद पटकावताना भारतीय मुलींनी एक ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव सोडला; तर बहारदार खेळ करत विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.

भारताच्या या विजयाला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. कर्णधार शेफाली वर्मा ही आता भारतीय महिला संघाचीही एक प्रमुख खेळाडू असल्याने तिच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा भारताला झालाच; पण ती जो संघ घेऊन या स्पर्धेत खेळली ते बघता भारतातील क्रिकेट प्रसाराची व्याप्ती लक्षात येईल. देशात क्रिकेटची मक्तेदारी एकेकाळी फक्त मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूर, हैदराबादसारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती. बाकीच्या छोट्या शहरांतच काय गावातल्या गल्ली-गल्लींत क्रिकेट तेव्हाही खेळले जायचे; पण त्याची नोंद घ्यायची तसदी कुणी घेतली नव्हती. साहजिकच, अशी ठिकाणे उत्तम क्रिकेट सुविधा, सामग्री, प्रशिक्षण केंद्रे यापासून वंचित होती. देशासाठी क्रिकेट खेळायचे स्वप्न बघायचे असेल; तर या मोठ्या 5-6 शहरांचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. गेल्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पालटले. संघ निवडीची प्रक्रिया, निकष बदलले आणि रांचीसारख्या ठिकाणाहून आलेला महेंद्रसिंग धोनी भारताचा एक उत्तम कर्णधार बनू शकला आणि काश्मीर ते कन्याकुमारी तसेच गुजरात ते आसामपर्यंत सर्व भागांतून उत्तमोत्तम खेळाडू भारतीय संघात दिसायला लागले. पुरुषांच्या क्रिकेटच्या बाबतीत हे चित्र सुधारले, तरी महिला क्रिकेट हे गेल्या सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत मर्यादित होते. मिथाली राज, अंजुम चोप्रा युगापासून हे चित्रही पालटायला लागले आणि भारतीय महिला संघही सशक्त बनला. या 19 वर्षांखालील मुलींच्या संघातील खेळाडूंकडे नजर टाकली, तर प्रामुख्याने लक्षात येणारी बाब आहे ती म्हणजे यातल्या बहुतांशी खेळाडू या छोट्या गावांतून आलेल्या आहेत आणि त्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा तर सोडाच; क्रिकेटच्या संस्कराचाही स्पर्श नव्हता.

शेफाली वर्मा, रिचा घोषसारख्या या संघातील खेळाडू भारतीय महिला संघाच्या भाग आहेत तेव्हा त्यांचा अनुभव, मोठ्या सामन्यात, परदेशी वातावरणात खेळायचा अनुभव नक्कीच फायद्याचा ठरला; पण बाकीचा संघ बघता यातील बहुतांशी खेळाडूंसाठी विश्वचषक खेळणे ही फार मोठी गोष्ट होती. यातल्या प्रत्येक खेळाडूची कहाणी एका चित्रपटाचा विषय होऊ शकेल. फिरकीपटू सोनम यादवचे वडील फिरोझाबादच्या एका काच कारखान्यात कामगार आहेत; तर फलक नाजचे वडील उत्तर प्रदेशात एका छोट्या शाळेत शिक्षक आहेत. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, क्रिकेट खेळायची संधी मर्यादित, अशा अवस्थेतून या मुलींचा प्रवास चालू झाला. उपकर्णधार सौम्या तिवारीने तर घरच्या कपडे धुण्याच्या धुपाटण्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सलामीवीर त्रिशा रेड्डीच्या वडिलांना आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी आपली चार एकर जमीन विकावी लागली.

या सर्व खेळाडूंत अर्चना देवीचा प्रवास नुसता थक्क करून सोडणारा नाही, तर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो. कानपूरपासून 100 किलोमीटर दूर असलेल्या उन्नावमधले रतईपूर्व हे तिचे गाव गुगलवर नकाशात शोधायला गेले तरी दोनदा झूम केल्याशिवाय दिसत नाही. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले तरी तिच्या आईने, सावित्री देवी यांनी स्वतः शेतीकाम करून मुलीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निग्रह केला आणि तिला साडेतीनशे किलोमीटर दूरच्या मुराबादच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात दाखल केले. तिथे अभ्यासाबरोबरच खेळात तिचे प्रावीण्य दिसून यायला लागले. एकदा धावण्याच्या शर्यतीत दुसरा क्रमांक आल्यावर तिच्या शिक्षिका पूनम गुप्ता यांनी तिला खेळात करिअर घडवायचे मार्गदर्शन केले. तिच्यातील कौशल्य ओळखून याच पूनम गुप्ता यांनी तिला कानपूरला जायचा सल्ला दिला, जेणेकरून तिच्या गुणांना योग्य पैलू पडतील. अर्चनाच्या आई सुरुवातीला तयार नव्हत्या; कारण मोठ्या शहरात पाठवायचे म्हणजे पैशांचा प्रश्न होता. शिक्षिका आणि अर्चनाने आईला समजावले आणि शिक्षिकहा पूनम गुप्तांनी तिच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी उचलली. तेव्हा अर्चना कानपूरला पोहोचली. या सर्व प्रवासात सावित्री देवींना गावातून काय मिळाले असेल तर फक्त अवहेलना. प्रवाहाच्या उलटे जात स्वतः राबून मुलीला शिक्षणासाठी गावाबाहेर पाठवणे हे गावकर्‍यांच्या द़ृष्टीने क्रांतिकारी न ठरता सावित्री देवींना जवळपास वाळीत टाकण्याचे ठरले. तिकडे कानपूरला अर्चना देवीने रोव्हर्स क्रिकेट क्लबमध्ये आपले नाव नोंदवले. क्लबचे प्रशिक्षक कपिल पांडे आहेत (जे कुलदीप यादवचेही प्रशिक्षक होते). सुरुवातीला अर्चना मध्यमगती गोलंदाज होती; पण कपिल पांडेंनी तिला फिरकी टाकायचा सल्ला दिला. कुलदीप यादवबाबतही त्यांनी असाच बदल घडवून आणला होता आणि कुलदीपप्रमाणेच अर्चनालाही त्यांनी यशस्वी फिरकीपटू बनवले. या बदलामुळे अर्चनासाठी अनेक दालने उघडली गेली.

अर्चनाने 2018 मध्ये उत्तर प्रदेशच्या अंडर-16 संघात पदार्पण केले. पदार्पणाच्या आसामविरुद्धच्या सामन्यातच 3 बळी मिळवले. 9 सामन्यांत 15 बळी घेत तिने आपली छाप पाडली. 19 वर्षांखालील मुलींच्या भारताच्या 'अ' संघात, चॅलेंजर ट्रॉफी संघातून खेळताना चमक दाखवत तिने भारताच्या या विश्वचषक संघात प्रवेश मिळवला. कपिल पांडेंच्या या जलदगती गोलंदाजातून फिरकीपटू बनवलेल्या अर्चना देवीने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या कर्णधार स्क्रिवेन्स आणि प्रमुख फलंदाज हॉलंड यांना बाद करून इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले आणि मॅक्डोनाल्डचा अफलातून झेल घेत अंतिम सामना जिंकण्यात मोठा वाटा उचलला. याच अर्चना देवीचा पराक्रम तिथे दक्षिण आफ्रिकेत घडत असताना तिचे गाव रतईपूर्वमध्ये तिच्या घरच्यांना चिंता वेगळीच होती. आजही या गावात चोवीस तास वीज नाही आणि लोडशेडिंगच्या अंधारात गाव बुडालेले असते. जेव्हा तिथल्या पोलिस अधिकार्‍याला हे समजले तेव्हा त्याने अर्चना देवीच्या घरी इन्व्हर्टर आणून दिला; जेणेकरून त्यांना अंतिम सामना बघता येईल. ज्या गावाने सावित्री देवींची अवहेलना केली ते सर्व गाव त्या सावित्री देवींच्या घराबाहेर लावलेल्या टी.व्ही.वर एकत्र सामना बघून अर्चना देवीच्या नावाचा गाव की बेटी म्हणून जल्लोष करत नाचत मिठाई एकमेकांना भरवत होते. लहानपणी अर्चना आपल्या भावाबरोबर क्रिकेट खेळताना चेंडू लांब झाडीत गेला म्हणून तो आणयला म्हणून तिचा भाऊ गेला. त्यावेळी त्याला सर्पदंश झाला. दुर्दैवाने उपचार मिळण्यापूर्वीच त्याचे निधन झाले; पण त्याने त्या परिस्थितीत आईला सांगितले, अर्चनाचे क्रिकेट बंद करू नकोस. आज या विजयाने आपल्या भावाची भविष्यवाणी खरी करून दाखवली.

या विश्वचषक विजयाने भारतीय महिला क्रिकेटमधील गणिते बदलतील. आयपीएलच्या धर्तीवर वूमेन्स प्रीमिअर लीग आता चालू होत आहे. ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग, इंग्लंडमधील 100 स्पर्धा यासाठी या संघातील खेळाडूंची दारे उघडी होतील. क्रिकेट हा खेळ आहेच; पण आज एक मोठा उद्योग झालेला आहे. यात गैर काही नाही. 19 वर्षांखालील विश्वचषकात या सावित्रीच्या लेकी मिस वर्ल्ड बनल्या. थोड्याच अवधीत म्हणजे 10 फेब—ुवारीला आता याच दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषक चालू होत आहे. महिला विश्वचषकाने आपल्याला आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. गेल्या 2020 च्या महिला विश्वचषकाच्या संघातही शेफाली वर्मा होती. तो मेलबर्नचा अंतिम सामना हरल्यावर शेफाली खूप रडली होती. या विश्वचषकाच्या विजेतेपदाचा चषक स्वीकारताना तिला भावनावेग आवरता आला नाही; पण हे आनंदाश्रू होते. हाच विजयाचा अध्याय पुढे चालू ठेवत महिला विश्वचषकासह दोन चषक घेऊन भारतात परतायला तिचे मनोबल उंचावले असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT