बहार

कार्लोस अल्कारेझ : टेनिसमधला उगवता तारा

Arun Patil

'ग्रँड स्लॅम स्पर्धा' या टेनिसपटूंसाठी नेहमीच प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. या स्पर्धांमध्ये तिशीनंतरही निर्विवाद वर्चस्व गाजविणार्‍या राफेल नदाल व नोवाक जोकोविच यांना पराभूत करणे ही काही सोपी गोष्ट नसते. तथापि स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ या युवा खेळाडूने एकाच स्पर्धेत या दोन्ही बलाढ्य खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला आहे. साहजिकच, हा खेळाडू टेनिस चाहत्यांसाठी 'किमयागार युवा खेळाडू' बनला आहे.

राफेल नदाल, जोकोविच व रॉजर फेडरर हे टेनिस जगतातील सध्याचे सर्वश्रेष्ठ खेळाडू मानले जातात. या खेळाडूंच्या प्रत्येक विजयास दाद देणारे असंख्य चाहते आहेत. या खेळाडूंनी सतत जिंकत राहावे आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत राहावे, ही अपेक्षा त्यांची असतेच; पण त्याचबरोबर युवा खेळाडूंकडूनही जागतिक स्तरावर चमकदार यश मिळवावे, यासाठीही ते उत्सुक असतात. अल्कारेझ या 19 वर्षीय खेळाडूने गेल्या तीन-चार वर्षांमध्ये व्यावसायिक टेनिस क्षेत्रातील महत्त्वाच्या चार-पाच स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावीत मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. अल्पावधीतच त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकामध्ये झेप घेतली आहे.

घरातच टेनिसचे बाळकडू

अल्कारेझ याला टेनिसचे बाळकडू घरातच मिळाले. त्याचे वडील कार्लोस हे स्वतः अव्वल दर्जाचे टेनिसपटू आहेत, त्यामुळे अल्कारेझ यानेदेखील टेनिस या खेळातच करिअर करण्याचे निश्चित केले नाहीतर नवलच! त्याची कारकीर्द चांगली घडावी याद़ृष्टीने कार्लोस यांनी स्वतः जातीने लक्ष घातले. त्यांची स्वतःची आंतरराष्ट्रीय दर्जाची टेनिस प्रशिक्षण अकादमी असल्यामुळे दररोज अल्कारेझ याला सुरुवातीपासूनच स्पर्धात्मक सराव करण्याची संधी मिळाली. या अकादमीमध्ये फिजिओ, मसाजिस्ट, विशेष क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञ, मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञ, क्रीडा संशोधन तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ इत्यादी सर्व सुविधा असल्यामुळे अल्कारेझ याची उत्तम दर्जाचा टेनिसपटू घडवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी बालपणापासूनच झाली आहे.

या अकादमीमधून अनेक नामवंत खेळाडू तयार झाले आहेत. लहानपणीच जर अनेक ज्येष्ठ खेळाडूंबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली तर आपोआपच युवा व लहान खेळाडूंवर क्रीडा विकासासाठी आवश्यक असणारे चांगले संस्कार घडतात. अल्कारेझ याच्याबाबतही असेच घडत आहे. वडिलांच्या अकादमीमध्ये येणार्‍या ज्येष्ठ खेळाडूंकडून त्याला भरपूर मौलिक मार्गदर्शन मिळते आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडून मौलिक सूचना मिळण्यासाठीही त्याची मानसिक तयारी असते. त्याखेरीज या अकादमीमध्ये येणार्‍या अन्य खेळाडूंना समवेत तो भरपूर स्पर्धात्मक सराव करीत असतो.

फेडरर याचाच आदर्श

कार्लोस यांच्या अकादमीत खेळाडूंबरोबरच अनेक वेळा स्पर्धांच्या निमित्ताने प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी येत असतात. अल्कारेझ याने शालेय स्तरापासूनच अनेक स्पर्धा गाजविण्यास सुरुवात केली. त्याचे हे यश प्रसार माध्यमांच्या नजरेतून सुटले नाही. तो बारा वर्षांचा असताना दोन-तीन पत्रकारांनी 'तुझा आदर्श खेळाडू कोण?' असे विचारले असता, अल्कारेझ याने 'रॉजर फेडरर याचा आदर्श माझ्यापुढे आहे,' असे उत्तर दिले. खरं तर पत्रकारांना 'स्पेनचा टेनिससम्राट नदाल' असे उत्तर अपेक्षित होते. तेव्हा त्यांनी पुन्हा अल्कारेझ याला, 'फेडरर हा का आवडतो?' असे विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले, 'नदाल व जोकोविच यांचाही खेळ मला आदर्श वाटतो; मात्र फेडरर याचा संयमी व शांत स्वभाव मला जास्त प्रिय आहे. फेडरर याच्या खेळामध्ये अधिक जास्त नजाकतता आहे.'

टेनिसचे प्राथमिक शिक्षण तसेच स्पर्धात्मक शैलीबाबत आवश्यक ते प्रशिक्षण घेतल्यानंतर अल्कारेझ याने वडिलांच्या सल्ल्यानुसार जुआन कार्लोस फेरेरो यांच्या अकादमीत अव्वल दर्जाच्या टेनिस प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. टेनिसमध्ये काही खेळाडू असे आहेत की, ज्यांना 'ग्रँड स्लॅम स्पर्धां'मध्ये नेत्रदीपक यश मिळवता आलेले नाही; परंतु एक चांगल्या दर्जाचा प्रशिक्षक होण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम गुणवत्ता असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारे खेळाडू कालांतराने 'ग्रँड स्लॅम स्पर्धा' गाजवतात.

फेरेरो यांना ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यशाने पाठ फिरवलेली आहे; मात्र जागतिक किर्तीचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी नाव कमावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अल्कारेझ याची पुढील वाटचाल सुरू झाली आहे. अर्थात, त्याला या वाटचालीकरिता आई-वडिलांकडून सर्वतोपरी पाठबळ मिळत आहे.
दिमाखदार सुरुवात अल्कारेझ याने दोन वर्षांपूर्वी व्यावसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पण केले. अवघ्या दोन वर्षांतच त्याने मास्टर्स 1000 ही स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे.

त्याशिवाय त्याने 'मियामी खुली', 'रिओ डी जानेरो' येथील 'मास्टर्स' व 'बार्सिलोना चषक' या स्पर्धा जिंकल्या आहेत. अलीकडेच त्याने 'माद्रिद खुल्या स्पर्धे'तील उपांत्यपूर्व फेरीत नदाल, उपांत्य फेरीत जोकोविच यांच्यावर सनसनाटी विजय मिळवले. त्याची ही घोडदौड एवढ्यावरच थांबली नाही. अंतिम फेरीत त्याने जर्मनीचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू अलेक्झांडर जेव्हेरेव्ह यालाही पराभूत करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. खरं तर घरच्या मैदानावर खेळताना स्थानिक वातावरणाच्या फायद्यापेक्षाही मानसिक दडपण जास्त असते.

कारण आपण जर हरलो तर घरच्या प्रेक्षकांसमोर आपली शान धुळीस मिळणार आहे, याचे दडपण असते. अल्कारेझ याने याबाबत कोणतेही दडपण घेतले नाही. नदाल, जोकोविच आणि जेव्हेरेव्ह यांच्याविरुद्ध खेळताना त्याने अतिशय आत्मविश्वासाने खेळ केला. पराभवाची चिंता माझ्यापेक्षा त्यांना अधिक जास्त आहे, असा विचार करीत अतिशय निश्चिंत मनाने तो या सामन्यांमध्ये खेळला आणि त्याने आश्चर्यजनक विजय नोंदविले. आतापर्यंतच्या व्यावसायिक क्षेत्रात त्याने अनेक श्रेष्ठ खेळाडूंवर मात केली आहे आणि ऐतिहासिक पराक्रम केले आहेत.

अल्कारेझ हा सहा फूट उंचीचा खेळाडू आहे. त्याचा फायदा त्याला मिळतो. व्हॉलीज, फोरहँड व क्रॉस कोर्ट फटके, जमिनीलगत परतीचे फटके, नेटजवळून प्लेसिंग इत्यादी विविधता त्याच्या खेळात आहे. सर्व प्रकारच्या मैदानांवर परतीचे खणखणीत फटके तसेच वेगवान व अचूक सर्व्हिस करण्याबाबत त्याच्या खेळात कमालीची सुधारणा झाली आहे. अलीकडेच माद्रिद येथील स्पर्धेत लाल मातीच्या कोर्टवर त्याने लाल मातीचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नदाल याच्यावर केलेली मात, ही आगामी फ्रेंच खुल्या स्पर्धेपूर्वीची अप्रतिम झलकच आहे. 'ग्रँड स्लॅम स्पर्धां'मध्ये त्याची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नसली, तरीही अजूनही या स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करण्यासाठी आवश्यक असणारी परिपक्वता त्याच्या खेळात यायची आहे.

अर्थात, तो जेमतेम एकोणीस वर्षांचा आहे आणि त्याला त्याद़ृष्टीने अजूनही भरपूर संधी उपलब्ध आहेत. 'ग्रँड स्लॅम स्पर्धां'मध्ये श्रेष्ठ खेळाडूंकडून चाहत्यांना विजेतेपदाची अपेक्षा असतेच; पण एखाद्या युवा खेळाडूने या स्पर्धांच्या अजिंक्यपदावर नाव कोरले तरी त्याचेही ते भरभरून कौतुक करीत असतात. हे लक्षात घेतले, तर अल्कारेझ हा भावी काळात नदाल, जोकोविच व फेडरर यांच्यासारखी विजेतेपदाची मालिका निर्माण करेल, अशीच टेनिस चाहत्यांना व टेनिसतज्ज्ञांना खात्री वाटत आहे. तो दिवस लवकरच येईल, अशी आशा आहे.

मिलिंद ढमढेरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT