पुरुषवर्चस्वी धर्मांधांच्या हातात देश गेला तर काय घडू शकते, याचे उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट. आता पुन्हा तालिबानने देशाचा कब्जा केला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील एकूणच समाजवास्तवाचे दर्शन घडविणार्या अफगाणी महिलांनीच बनविलेल्या माहितीपटांचा आढावा घेणे औचित्यपूर्ण ठरेल.
जर मी चालण्याचे थांबवले,
तर मी दगड आहे!
जर मी पाणी आणि मुक्तीचा शोध थांबवला,
तर मी दगड आहे!
– 'मोशागत सादत'
ही अफगाणी कवयित्री, 'अनव्हेल्ड व्ह्यूज : मुस्लिम आर्टिस्टस् स्पिक आऊट'मध्ये (अल्बा सटोरा/ स्पेन/ 2009/ 52 मिनिटे) भेटते. यात पुरुषवर्चस्वी धर्मांधतेचा पगडा असणार्या पाच देशांतील, पाच महिलांचा कला व जीवनविषयक मुक्तिदायी द़ृष्टिकोन कळतो. वेगवेगळ्या देशांतील, थरांतील प्रातिनिधिक मुलींची कथा सांगणार्या 'आय एम अ गर्ल'मध्ये (रेबेका बॅरी/ ऑस्ट्रेलिया/ 2013/ 88 मिनिटे) अफगाणिस्तानच्या अझिजास शाळेत जाणे, हे देखील एक क्रांतीसारखे आव्हानच आहे आणि ती ते पेलत आहे.
'आय एम द रिव्हॉल्युशन'मध्ये (बेनेडित्ता अर्जेंटिरी/ अफगाणिस्तान, सीरिया, इराक/ 2019/ 72 मिनिटे) तीन देशांतील, परिवर्तनाच्या लढाईत जीवावर उदार होऊन लढणार्या तीन स्त्रिया भेटतात. तालिबान्यांकडून मोस्ट वाँटेड असूनही देशभर प्रवास करत स्त्रियांना हक्कांची जाणीव करून देणारी सेलाय गफर राजकीय कृतीतून क्रांतीची घोषणाच देत असते.
'एनिमीज ऑफ हॅपिनेस'मध्ये (इव्हा मुलवद, अंजा अलएरहम/ डेन्मार्क/2006/59 मिनिटे) 'लोया-जिरगा' या अफगाणी टोळ्यांच्या महापंचायतीत धमाकेदार धीट भूमिका घेणार्या मलालाई जोया या तरुणीच्या राजकीय कारकिर्दीचा एक टप्पा टिपला आहे. तालिबानोत्तर पहिल्या संसद निवडणुकीपूर्वीच्या 10 दिवसांचे चित्रण येते.
अशा अस्थिर आणि निरक्षर देशात सनदशीर निवडणूक प्रक्रिया रुजविणे किती अवघड आहे, याचीही प्रचिती येते. लोकशाही, स्त्रिया आणि आनंद या सार्यांचे शत्रू हे पुरुषवर्चस्वी धर्मांध आहेत, असे मलालाईचे म्हणणे आहे. 'लोया-जिरगा' घटनेनंतर येणार्या धमक्यांमुळे तिला घर सोडावे लागते, इतरांनाही बुरखा घालू नका, असे सांगणार्या तिला बाहेर पडताना बुरखा घालून कमांडोंच्या संरक्षणात वावरावे लागते. प्रचारकाळात तिला समर्थन देण्यासाठी वेगवेगळ्या थरातील लोक भेटायला आलेले दिसतात, तसेच अगदी घरगुती भांडणेही ती सोडवताना दिसते.
'सर्च फॉर फ्रीडम'मध्ये (मुनीझ जहांगीर / पाकिस्तान/ 2003 / 54 मिनिटे) चार वेगवेगळ्या थरांतील अफगाणी स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्ष कथा साकारताना अफगाणिस्तानचा 1920 ते 2003 असा प्रदीर्घ इतिहासपटच उभा राहतो. या चौघींनाही पुढे पाकिस्तानात आश्रय घ्यावा लागतो.
पहिला प्रागतिक राजा अमानुल्लाची बहीण शफीका सरोज हिने 'सर्वांसाठी मोफत शिक्षण', 'बुरखा सक्ती नाही' धोरणांशी सुसंगत राहून महत्त्वाचे काम केले. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग प्रथमच सुरू झाला. मात्र मूलतत्त्ववाद्यांना प्रागतिकता न रुचल्याने सुरू झालेल्या बंडात देश पुढे यादवीग्रस्त झाला.
मेरमां परवीन ही अफगाण रेडिओवरील पहिली गायिकादेखील भेटते, मात्र तिची गाणी तालिबान्यांनी नष्ट केलीयेत, त्या आठवणी आळवताना मन कातरते. मोशीना या युद्धविधवेच्या व्यथांना तर अंतच नाही. कशीबशी कत्तलीतून बचावलेली ती छावणीत आपल्या मुलांचा सांभाळ करीत आहे.
सोहिलाने तर अगदी तालिबान काळातही 'रावा' या अफगाण स्त्रियांच्या क्रांतिकारी संघटनेसाठी भूमिगत राहून मुलींसाठी शिक्षण देण्याचे काम जारी ठेवले होते. आपल्याच देशात, आपल्याच लोकांकडून पारतंत्र्यात राहावे लागण्याचे दुःख ती अगदी टोकदारपणे व्यक्त करते. तिचाही बुरख्यास विरोधच; पण केवळ बुरखाकेंद्री पाश्चात्त्य प्रचाराचाही ती खरपूस समाचार घेते. भूक, गरिबी या अस्तित्वाच्या संकटांसाठी नव-वसाहतिक धोरणांकडेही कटाक्ष टाकते.
'अफगाणिस्तान अनव्हेल्ड' (ब्रिजेट ब्रॉल्ट/ अफगाणिस्तान / 2003/ 52 मिनिटे) मध्ये कधीही काबूलबाहेर पडू न शकलेल्या आणि आयना वुमेन फिल्मिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या स्त्री पत्रकारांच्या कॅमेरा – नजरेतून बेचिराख प्रदेश आणि उद्ध्वस्त मनांचे दर्शन घडविले आहे. तालिबानोत्तर काळात काबूल शहराने स्त्रियांच्या बाबतीत काही प्रागतिक पावले स्वीकारली तरी या आजूबाजूच्या टोळ्यांच्या प्रभावक्षेत्रांमध्ये स्त्रियांची परिस्थिती जैसे थे असल्याचे लक्षात येते.
कॅमेरा हातात आल्यामुळे, जगण्यात आणि द़ृष्टिकोनात पडत चाललेल्या सकारात्मक बदलांचेही दर्शन घडते. जिथे स्त्रियांना रस्त्यांवर फिरण्याचीही मोकळीक नव्हती, तिथे रस्त्यावरील गर्दीत बुरखा न घेणारी एक महिला जेव्हा पुरुषांना बुरख्याविषयीचे प्रश्न विचारते, तेव्हा तंतरलेल्या पोपटी उत्तरांचा ती ठामपणे प्रतिवादही करते.
'प्लेईंग विथ फायर – वुमेन अॅक्टर्स ऑफ अफगाणिस्तान' (ग्रीस / 2014/ 58 मिनिटे) या विषयसूचक शीर्षकातूनच आशयाची जळजळीत धार स्पष्ट होते. अनेता पॅपाथॅनासियो या ग्रीसच्या रंगकर्मीस काबूल विद्यापीठात कार्यशाळा घेण्यासाठी पाचारण करण्यात आले, तेव्हा तिच्या निरीक्षणांतून आणि मुलाखतींमधून माहितीपट साकारतो.
तालिबान्यांची राजवट कोसळली तरी बुरसटलेल्या धर्मांध पुरुषवर्चस्वी मानसिकतेचे काय करायचे? महिला अभिनय करण्यासाठी सरसावल्या की त्यांना घरातून, समाजातून विरोध सुरू होतो. एखादाच बाप आपल्या मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्याचेही दिसते. वेश्या संबोधून अपमान, धमक्या, फतवे, मारहाण, हल्ले आणि प्रसंगी खूनसुद्धा! पण हा जीवघेणा प्रतिरोध सहन करूनसुद्धा अभिनेत्री होण्यासाठी सरसावलेल्या जिगरबाज महिलांची ही कथा आहे.
अर्थात काही जणींना यासाठी मायदेश सोडून परदेशाचा आसरा घ्यावा लागतो. विद्यापीठातील धार्मिक विभागप्रमुखास छेडले असता 'स्त्रियांच्या शरीराचेे दर्शनच नव्हे, तर त्यांचा आवाजही पुरुषांना कामोत्तेजक ठरतो, म्हणून स्त्रियांवरच बंधने', अशा युक्तिवादाची कीव करावीशी वाटते. प्रशिक्षणादरम्यान स्त्री-पुरुष कलाकारांचा अगदी निसटसा स्पर्शही होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. टीव्हीवरील अभिनेत्रीचे मोकळे केस पाहून संसदेतून आलेल्या फोनवर, त्या अभिनेत्रीची प्रतिक्रिया – 'मूलभूत प्रश्न सोडून हे प्रतिनिधी संसदेत बसून अभिनेत्रीची केसं मोकळी सोडलीत का, हेच पाहात बसतात का?' अभिनयामुळे या महिलांच्यात येणार्या धैर्याचे देखील दर्शन घडते.
'अ थाऊजंड गर्ल्स लाइक मी'मध्ये (सहारा मणी/ फ्रान्स, अफगाणिस्तान / 2018/ 80 मिनिटे) सतत 13 वर्षे वडिलांकडूनच लैंगिक शोषणास बळी पडलेल्या तरुणीचा न्यायासाठीचा संघर्ष टिपला आहे. असहाय आई, भावंडेही तिला वाचवू शकत नाहीत. अनेक मौलवीही मदत करण्याचे नाकारतात. पोलिस आणि न्यायव्यवस्थाही न्याय द्यायला तयार नाहीत. तिला वडिलांकडूनच दोन अपत्ये झाली आहेत.
शेवटी टीव्ही शोचा आसरा घ्यावा लागतो, तेव्हा कुठे तिच्या बापास अटक होऊन खटला सुरू होतो. तिच्या या धैर्याचे काहीजण कौतुक करतात; पण बहुतेकांच्या मते तीच दोषी आहे. तिच्या चुलत्यांकडून तर धमक्या सुरू आहेत. भाऊ मदत करतायेत, पण तिने टीव्हीमधून या प्रकरणास सार्वजनिक केले म्हणून त्यांचाही रोष आहेच. मात्र त्याचवेळी काही स्त्रियांचा तिला फोनही येतोय आणि त्यांचीही अवस्था तिच्यासारखीच आहे. याची तिला होणारी जाणीव म्हणजे हे अस्वस्थकारी शीर्षक.
'सोनिता' (रुखसार घेम मेघामी/ इराण/ 2015/ 91 मिनिटे) ही शीर्षकी अफगाणी तरुणी इराणमध्ये कागदपत्रांशिवाय निर्वासित म्हणून राहताना रॅपर होऊ पाहतेय. मात्र तिच्या कुटुंबीयांसाठी ती पैसे मिळवून देणारी लग्न बाजारातील एक वस्तू मात्र आहे. अफगाणी प्रथेप्रमाणे तिच्या भावाला बायको विकत घ्यायची आहे, आणि त्यासाठी बहिणीस लग्नासाठी विकणे क्रमप्राप्त आहे.
रूढ परंपराच असल्याने त्यात कुणालाच, अगदी आईलासुद्धा काहीही गैर वाटत नाही. इथं दिग्दर्शिका निव्वळ निरीक्षक न राहता घटनाक्रमात हस्तक्षेप करते. हा लग्न व्यवहार लांबवण्यासाठी आर्थिक मदत करते, लग्नाच्या बाजाराविरोधातील तिचा रॅप व्हिडीओ शूट करत स्पर्धेस पाठविते. बक्षीस तर मिळतेच; शिवाय अमेरिकेतून शिष्यवृत्तीसह आमंत्रण येते.
पण त्यासाठी तिला कागदपत्रे आणण्यासाठी मायदेशी जाण्याचा धोका पत्करावाही लागतो. अमेरिकेत पोचल्यावर आईशी फोनवर बोलताना ती आनंदाने म्हणते – 'येथे तालिबानी नाहीयेत!' व्हॉइसेस ऑफ अफगाण वुमेन हा 'वुमेन मेक मुव्हीज'चा ऑनलाईन महोत्सव 12 सप्टेंबरपर्यंत पाहता येणार आहे.