कावेरी गिरी
तिचे बालपणातून तारुण्यात प्रवेश करण्याच्या टप्प्यात मासिक ऋतुधर्म हे अत्यंत महत्त्वाचे आणि अपरिहार्य असे परिवर्तन असते, तसेच हा ऋतुधर्म थांबणं हेही एक महत्त्वाचं आणि अनिवार्य असं वळण असतं.
स्त्रीचं आयुष्य हे मोठं रहस्यरंजक असतं. ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ असं एका कवीने म्हटलेलंच आहे. तिच्या आयुष्यात अनेक टप्पे येऊन जातात. प्रत्येक टप्प्यावर स्त्री एक वेगळे वळण घेते. मुलगी, युवती, तरुणी, महिला, प्रौढा, वृद्धा असे विविध टप्पे तिच्या जीवनात येतात. नात्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मुलगी, पत्नी, कुणाची सून, कुणाची पत्नी, आई, आत्या, मावशी, आजी अशा विविध गुंफणीतून तिचं आयुष्य पुढे पुढे जात असते. मेनोपॉज हा आजार नाही, तर जीवनातील नैसर्गिक टप्पा आहे. महिलांना या काळात योग्य समज, सामाजिक आधार आणि वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक मेनोपॉज दिन कालच होऊन गेला त्यानिमित्त ही संधी आहे, या विषयावर खुलेपणाने बोलण्यासाठी.
जागतिक मेनोपॉज दिन (World Menopause Day) दरवर्षी साजरा केला जातो. याचा उद्देश म्हणजे मेनोपॉज (रजोनिवृत्ती) या महिलांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबाबत जागरूकता वाढवणे, योग्य माहिती देणे आणि या काळात महिलांना मानसिक, शारीरिक व सामाजिक आधार देणे.
थांबणं नाही, नव्यानं उमलणं
तिचं वय चाळिशीच्या उत्तरार्धात आलं होतं. केसांच्या मुळाशी थोडंसं पांढरं दिसू लागलं होतं. आरशात पाहिलं की, चेहर्यावर वेळेची काहीशी शाई उमटू लागली होती; पण हे सगळं तिने हसत स्वीकारलं होतं. तिला माहिती होतं, आयुष्याच्या एका नव्या वळणावर पोहोचायचंय.
तिचं नाव सुनीता. घर, ऑफिस, मुलं, सासू-सासरे, सगळं नेटकेपणाने सांभाळणारी. तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं; पण हल्ली काहीतरी वेगळं जाणवत होतं. तिचं मन सारखं अस्वस्थ व्हायचं, कधी राग अनावर व्हायचा, कधी अगदीच निराशा जाण्याची. शरीरातही काही बदल जाणवायला लागले होते. उष्णतेच्या लाटा अचानक अंगावर यायच्या, घाम यायचा, झोप उडायची. पाळी अनियमित होत चालली होती. सुरुवातीला वाटलं, हे सगळं फक्त थकव्याचं असेल; पण जसजसं दिवस गेले, ती जाणून गेली, ही वेळ आहे... रजोनिवृत्तीची! तिचं शरीरही बोलत होतं. फारसं थकल्यासारखं वाटायचं, सांधेदुखी वाढली होती. रात्री झोप लागत नसे आणि सकाळी अंथरुणात थोडा वेळ जास्त वाटायचा. कधी चेहरा फुगलेला वाटायचा, कधी डोळे सुजलेले. गरम व्हायला लागणं म्हणजे काय, तर अंगावर उसळणार्या लाटा, घामाच्या धारा. तिला ऑफिसमध्ये अचानक टोचणार्या गरम झळा सहन कराव्या लागत होत्या. कोणी बोललं तरी चिडचिड व्हायची आणि पुन्हा स्वतःलाच अपराधी वाटायचं. कधी अगदी सहज रडायला यायचं. कुठलाही साधा मुद्दा मनावर घ्यावा असं वाटायचं. तिचं मन सैरभैर व्हायचं आणि तरीही सकाळी उठून स्वयंपाक, ऑफिस, सर्व जबाबदार्या ती पार पाडत होती.
कसोटी मनाची...
मेनोपॉज म्हणजे महिलांमध्ये मासिक पाळी (menstruation) पूर्णपणे थांबणे आणि त्यामुळे संप्रेरकांमध्ये (hormonal) बदल होणे. हे साधारणतः 45 ते 55 वयाच्या दरम्यान होते. पाळी एक वर्ष किंवा अधिक काळासाठी बंद झाल्यास ‘मेनोपॉज झाले’ असे मानले जाते. गरम व्हायला लागणे, अनियमित पाळी, झोपेची अडचण, मूड स्विंग्ज, थकवा, त्वचेचा कोरडेपणा, लैंगिक इच्छा कमी होणे, हाडांचा ठिसूळपणा अशी लक्षणे दिसून यायला लागतात.
मेनोपॉज म्हणजे फक्त मासिक पाळी थांबणं नाही, तर भावभावनांची एक लाट असते ती. कोणालाही न सांगता, कुणालाही न दुखावता एक स्त्री तिच्यातल्या स्त्रीत्वाचा एक भाग गमावत असते. सुनीता जाणत होती, आता ती आई होऊ शकणार नाही. शरीरातले संप्रेरक बदलले आहेत; पण हे फक्त वैद्यकीय सत्य नव्हतं... ती एक भावनिक उकल होती.
सुनीताच्या मनात प्रश्न होते...
मी अजूनही तीच आहे का?
माझं सौंदर्य, माझं आकर्षण संपलं आहे का?
नवर्याच्या नजरेत मी तीच आहे का?
हे फक्त तिचे प्रश्न नव्हते. ही हजारो महिलांची मनोवेदना आहे. समाजानेही या टप्प्याला फारसे महत्त्व दिलेले नाही. ती आता मेनोपॉजमध्ये आहे, हे फक्त वैद्यकीय स्वरूपात पाहिलं जातं; पण ते एक नवं जीवनच असतं, असे म्हणायला हरकत नाही. एका रविवारी सकाळी ती बागेत गेली. उन्हात बसून ती एकटक झाडांकडे बघत राहिली. मनात एक शांत लहर आली. हे सगळं मीच अनुभवते आहे... पण मी अजूनही जिवंत आहे, जागरूक आहे आणि सर्वात महत्त्वाचं, मी अजूनही मीच आहे.
ती एकटी नव्हती. तिच्यासारख्या अनेक महिला याच टप्प्यावर होत्या. सोशल मीडियावर तिने एक मेनोपॉज ग्रुप जॉईन केला. तिथं सगळ्या स्त्रिया मोकळेपणाने बोलत होत्या. हसत होत्या, अनुभव शेअर करत होत्या. शरम न करता, भीती न ठेवता.
स्त्री म्हणून तिची ओळख फक्त शरीराशी जोडलेली नव्हती; पण मेनोपॉजच्या या वळणावर शरीर तिची वाटचाल थांबवत होतं. पाळी बंद झाली म्हणून स्त्रीत्व संपतं का? नव्हे; पण ते एक संक्रमण होतं. मेनोपॉज म्हणजे शरीरात शांतता येणं; पण ती मरणाची शांतता नाही, ती स्वतःशी संवादाची शांतता आहे. ही वेळ आहे स्वतःला अधिक समजून घेण्याची, अंगीकारण्याची आणि जिथं हवं तिथं ‘हो’ म्हणण्याची... ‘नको’ म्हणण्याची!
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात स्त्री स्वतःला नव्यानं घडवत असते. कधी मुलगी म्हणून, कधी आई म्हणून, कधी कुटुंबाची आधारवड म्हणून; पण तिच्या आयुष्यात एक असा क्षण येतो, जेव्हा ती अचानक थांबते... तिचं शरीर, तिचं मन काहीसं बदलते. त्या क्षणाचं नाव आहे मेनोपॉज. हा शब्द अनेकांसाठी अजूनही गूढ आहे, तर काहींसाठी तो लाजेचा विषय; पण खर्याअर्थाने पाहिलं, तर मेनोपॉज म्हणजे शेवट नव्हे, तर नव्या सुरुवातीचा आशीर्वाद. 45 ते 55 वयोगटात येणारा हा काळ स्त्रीच्या शरीरात बदल घडवतो. पाळी थांबते, हार्मोन्स बदलतात, मन अस्थिर होतं, थकवा जाणवतो; पण याच क्षणी तिच्या अंतरात एक नवा प्रवास सुरू होतो, स्वतःकडे परत जाण्याचा प्रवास.
पाळी अचानक थांबत नाही. शरीर आधीच संकेत देत असतं की, पाळी थांबणार आहे. तो जो दीर्घकाळ आहे, थोडा काही वर्षांचा म्हणू शकतो. त्या काळात मानसिक आणि शारीरिक पातळीवरील ज्या अनाकलनीय हालचाली होत असतात, त्यास प्रत्येक स्त्रीला सामोरं जावं लागत असतंच! मेनोपॉज हा शेवट नसून सुरुवात आहे. ते दुःखद, त्रासदायक असू शकतं; पण त्यातही एक नवं तेज, एक नवी ओळख असते.
कसे करावे या काळाचे स्वागत?
मेनोपॉजनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल घडतात. कॅल्शियमची कमतरता, हाडांचा ठिसूळपणा (osteoporosis), हृदयविकाराचा धोका, त्वचा आणि केसांवरील परिणाम या सर्व गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, योग, ध्यान आणि पुरेशी झोप यांचा मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतर प्रचंड फायदा होतो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन Hormone Replacement Therapy (HRT) किंवा पर्यायी उपचारसुद्धा काही वेळा उपयोगी ठरतात; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःकडे लक्ष देणं. अनेक स्त्रिया आयुष्यभर कुटुंब, नातेसंबंध आणि जबाबदार्यांमध्ये स्वतःला विसरतात. मेनोपॉज हा टप्पा त्यांना पुन्हा स्वतःशी भेट घडवतो. सुनीताने स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या. रोज 30 मिनिटं फक्त स्वतःसाठी, योगा आणि ध्यान मनाला शांत ठेवण्यासाठी, पौष्टिक आहार कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी, थोडा व्यायाम हाडं आणि हार्मोन्ससाठी आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम. सुनीता आता जास्त मोकळी होती. ती तिच्या मुलांबरोबर हसत-खेळत होती. नवर्याशी मनमोकळं बोलत होती. पूर्वी जिचं आयुष्य इतरांसाठीच चालायचं, ती आता स्वतःसाठी जगायला लागली होती. सुजाता आता आरशात बघते, ती काहीशी बदललेली असते; पण तिच्या चेहर्यावर आत्मविश्वास असतो. ती म्हणते, मी अजूनही तीच आहे; पण आता थोडी अधिक समजूतदार, अधिक स्वतंत्र आणि स्वतःशी प्रामाणिक.
महिलांमध्ये रजोनिवृत्तीबद्दल योग्य माहिती पसरवणे, आरोग्य सेवा प्रणालीकडून योग्य निदान व उपचार मिळवण्यावर लक्ष केंद्रित करणे, महिलांच्या मानसिक व भावनिक आरोग्याचा विचार करणे, संप्रेरक बदलांमुळे होणार्या आजारांविषयी जागरूकता वाढवणे (जसे की हृदयरोग, मधुमेह, अस्थिमज्जा क्षीणता) अशा गोष्टींनी मन आणि शरीर दोन्हीही हलके व्हायला मदत होते.
महिलांनी या काळात काय करायला हवे?
आरोग्याच्या द़ृष्टीने हा काळ काळजी घेण्याचा असतो. नियमित वैद्यकीय तपासणी, संतुलित आहार, व्यायाम, स्ट्रेस मॅनेजमेंट, अॅक्टिव्ह राहणं आणि आरामदेखील. शरीराला थोडी विश्रांतीची गरज आहे, हे यातून जाणून घ्यायला हवं. समाजाने या टप्प्याकडे करुणेने, समजुतीने आणि सन्मानाने पाहायला हवं. कारण, ही अवस्था कमकुवतपणा नाही. ही परिवर्तनाची आहे. घरातल्या पुरुषांनी, मुलांनी आणि सहकार्यांनी तिच्या बदलत्या मनःस्थितीला समजून घ्यायला हवं. एक शब्दाचा आधार, एक हलकी मिठी किंवा एक शांत ऐकणं एवढंच कधी पुरेसं ठरतं.
मेनोपॉज ही केवळ जैविक प्रक्रिया नाही, ती संवेदनशीलतेची आणि बदलाची कथा आहे. या काळात स्त्रियांना आधार हवा असतो. वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक. हे एकटं नाही, हे असामान्य नाही आणि हे लपवायचंही नाही. कारण, ही वेळ आहे स्त्रीत्वाचा नव्याने शोध घेण्याची. या दिवशी प्रत्येक स्त्रीने स्वतःला एकच वचन द्यावं, मी आता थांबणार नाही, मी पुन्हा उमलणार! कारण, मेनोपॉज म्हणजे थकवा नव्हे, तो म्हणजे स्वतःकडे परतण्याचा, स्वतःला नव्यानं जगण्याचा काळ. आरोग्य, मनःशांती आणि आत्मविश्वास जपणं हेच या दिवसाचं खर्याअर्थाने महत्त्व आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःकडे प्रेमाने पाहावं. कारण, मेनोपॉज म्हणजे थांबणं नाही, तर नव्यानं उमलणं आहे.