डॉ. मंगेश कश्यप
प्रत्येक गावाने आपला जलहिशेब तयार करण्याची गरज आहे. वर्षभरात किती पाऊस पडतो? त्यातील किती पाणी वाहून जाते? किती पाणी जमिनीत मुरते? जमिनीखाली पाणी साठवणारे थर कुठे आहेत? किती पाणी विहिरी आणि बोअरवेलमधून बाहेर काढले जाते? आणि वर्षाच्या शेवटी भूजलसाठ्यात प्रत्यक्ष किती वाढ किंवा घट होते? हे प्रश्न विचारल्याशिवाय केवळ पाऊस किंवा जलसंधारणाची कामे पाहून त्या गावाची जलसुरक्षा ठरवता येणार नाही.
आपण नेहमी म्हणतो की, खूप पाऊस झाला. यंदा पाणी भरपूर झाले. नद्या- नाल्यांना पूर आले.. बळीराजा सुखावला... मग, हा दुष्काळ कसा? पण, खरा प्रश्न वेगळा आहे. या पावसाचे किती पाणी जमिनीखाली गेले आणि त्यातील किती पाणी पुढच्या उन्हाळ्यापर्यंत टिकणार आहे?
अलीकडे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. भामरागड परिसरात शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणही सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण भरून वाहू लागले. या धरणाच्या पाण्याचा उपयोग गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील शेतीसाठी होतो.
ही चित्रे एक महत्त्वाचा प्रश्न समोर आणतात. एखाद्या प्रदेशात पूर येण्याइतका पाऊस पडला, तर तेथील भूजलसाठा नक्कीच वाढला असे समजायचे का? उत्तर आहे, 'नेहमीच नाही'.
धाराशिवच्या अनुभवातूनही हेच स्पष्ट होते. एखाद्या भागात मुसळधार पाऊस झाला, नद्या-नाले भरून वाहिले किंवा एखादा बंधारा ओसंडून वाहिला, तरी त्याचा अर्थ त्या भागातील विहिरी आणि बोअरवेलमध्ये तितक्याच प्रमाणात पाणी वाढेल, असा होत नाही. पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरण्यासाठी त्या जमिनीची रचना, दगड-मातीचे थर, जमिनीतील भेगा, पाण्याचा वेग आणि त्या भागातील भूगर्भाची रचना महत्त्वाची असते. पावसाचे पाणी आणि भूजल यात फरक आहे
आपण अनेकदा 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हे सूत्र ऐकतो. ते योग्य आहे; पण त्याचा पुढचा प्रश्न विचारणे अधिक महत्त्वाचे आहे. अडवलेले पाणी नेमके कुठे जिरले?
शेततळे, बंधारे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, पाझर तलाव किंवा इतर जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी काही काळ अडवता येते; परंतु अडवलेले प्रत्येक थेंब जमिनीखाली खोलवर जाईलच असे नाही.
जमिनीखाली काही ठिकाणी असे थर असतात ज्यातून पाणी सहज खाली झिरपू शकते. काही ठिकाणी मात्र दगड किंवा मातीचे असे थर असतात की, पाण्याचा प्रवास मर्यादित होतो. काही भागांत जमिनीखाली दगडांमध्ये भेगा असतात आणि त्या भेगांमधून पाणी पुढे जाते; पण या भेगा सर्वत्र एकसारख्या नसतात. विशेषतः बेसाल्टच्या प्रदेशात जमिनीखाली पाणी साठवणारे आणि पाणी वाहून नेणारे थर सलग नसू शकतात. त्यामुळे शेजारच्या दोन गावांमध्ये समान पाऊस पडला, तरी भूजलवाढ वेगळी असू शकते.
म्हणूनच 'किती पाऊस पडला?' या प्रश्नाइतकाच 'किती पाणी जमिनीत गेले' हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
पूर म्हणजे भूजलाची हमी नाही
गडचिरोलीतील अलीकडील पूरस्थिती हा याचा जिवंत संदर्भ आहे. काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, नद्या-नाले भरले आणि जनजीवन विस्कळीत झाले; पण त्या पाण्याचा मोठा भाग वेगाने वाहून गेला असेल, तर त्यातील किती पाणी जमिनीखाली साठले, हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.
गोंदियातील इटियाडोह धरण पूर्ण भरून वाहू लागले, हे निश्चितच मोठे जलसाठ्याचे चित्र आहे; मात्र धरण भरले म्हणजे परिसरातील प्रत्येक विहीर आणि भूजलसाठा त्याच प्रमाणात भरला, असे म्हणता येत नाही. धरणातील पाणी, जमिनीतील ओलावा आणि भूजलसाठा हे परस्पर संबंधित असले, तरी ते एकच गोष्ट नाहीत.
यामुळेच जलसंधारणाच्या कामांचे मूल्यमापन करताना केवळ 'किती बंधारे बांधले?' किंवा 'किती कोटी रुपये खर्च झाले?' यापेक्षा 'भूजल पातळी किती वाढली आणि किती काळ टिकली' हा प्रश्न विचारायला हवा. जलसंधारणाच्या परिणामांचे मोजमाप आणि नियमित निरीक्षण गरजेचे आहे.
गावाचा ‘जलहिशेब’ हवा. प्रत्येक गावाने आपला एक साधा जलहिशेब तयार करण्याची गरज आहे. वर्षभरात किती पाऊस पडतो? त्यातील किती पाणी वाहून जाते? किती पाणी जमिनीत मुरते? जमिनीखाली पाणी साठवणारे थर कुठे आहेत? किती पाणी विहिरी आणि बोअरवेलमधून बाहेर काढले जाते आणि वर्षाच्या शेवटी भूजलसाठ्यात प्रत्यक्ष किती वाढ किंवा घट होते?
हे प्रश्न विचारल्याशिवाय केवळ पाऊस किंवा जलसंधारणाची कामे पाहून त्या गावाची जलसुरक्षा ठरवता येणार नाही. यासाठी गावनिहाय भूजल नोंदी, विहिरींचे नियमित मोजमाप, पावसाचे स्थानिक मोजमाप आणि जमिनीखालील पाण्याच्या हालचालींचा अभ्यास आवश्यक आहे. म्हणजेच जलसंधारणातून ‘दिसणारे पाणी’ किती मिळाले यापेक्षा ‘टिकणारे पाणी’ किती मिळाले, हे महत्त्वाचे!
आज हवामानातील बदलामुळे काही वेळा कमी दिवसांत अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे 'पाऊस झाला म्हणजे पाण्याची समस्या सुटली' हा जुना समज अधिक धोकादायक ठरू शकतो.
आपल्याला आता पावसाकडे फक्त पाऊस म्हणून नाही, तर जमिनीखाली पोहोचणाऱ्या पाण्याच्या संधी म्हणून पाहावे लागेल. कारण, शेवटी जलसाक्षरतेचा खरा प्रश्न हा नसावा की,
'आपल्या गावात यंदा किती पाऊस पडला', तर तो असा असावा, 'आपल्या गावात पडलेल्या पावसापैकी किती पाणी जमिनीखाली गेले आणि पुढच्या उन्हाळ्यापर्यंत त्यातील किती पाणी आपल्या सोबत राहणार आहे?'
हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.