Tumbadchi Manjula | वाट दिसू दे… 
बहार

Tumbadchi Manjula | वाट दिसू दे…

पुढारी वृत्तसेवा

प्रथमेश हळंदे

‘तुंबाडची मंजुळा’ हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. ‘सु फ्रॉम सो’ या कन्नड सिनेमाचा हा ऑफिशियल रिमेक; पण या रिमेकच्या निमित्ताने एक मोठा प्रश्न पुन्हा समोर येतोय. कोकणच्या मातीसोबतच महाराष्ट्रातल्या गावखेड्यांमध्येही अशा असंख्य कथा आहेत. त्यांना ग्लोबल स्टेजची वाट कधी दिसणार?

'तुंबाडची मंजुळा' हा मराठी सिनेमा

नुकताच प्रदर्शित झाला आणि त्याची चर्चा रसिकांमध्ये सुरू झाली. हा चित्रपट मूळ कन्नड सिनेमा ‘सु फ्रॉम सो’चा ऑफिशियल रिमेक असला, तरी त्याचं मराठीकरण इतकं अप्रतिम झालंय की, तो थेट आपल्या काळजाला भिडतो. मूळ सिनेमा कर्नाटकाच्या किनारी प्रदेशातल्या म्हणजेच तुळूनाडूतल्या लोकजीवनात रमतो. मराठी रिमेकसाठी याच कथेला कोकणाच्या मातीत रुजवण्याचा निर्णय घेण्यात आला.

तुळूनाडूची कथा कोकणात घडवण्याचा हा निर्णय एका रात्रीत झालेला नाही. सिनेमा पाहताना ही निवड केवळ दृश्यात्मकच नाही, तर सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत समर्पक असल्याचं जाणवतं. तुळूनाडू आणि कोकण या दोन किनारी प्रदेशांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं नैसर्गिक साम्य आहे. हे साम्य तिथल्या निसर्गाची रचना, लोकजीवनाचं समुद्राशी असलेलं नातं, लोकपरंपरा, देवदेवतांच्या कथा, सण-उत्सव आणि एकूणच लोकरहाटीतून ठळकपणे दिसत राहतं.

‘कांतारा’नंतरचा प्रश्न

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘कांतारा’ या कन्नड सिनेमाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला होता. त्या सिनेमात दिसणारी तुळूनाडूची दैव परंपरा, तिथल्या लोकांचं आपल्या मातीशी असलेलं अतूट नातं, भूत कोलाचं अंगावर शहारे आणणारं चित्रण आणि तिथल्या लोकजीवनाची रंजक भव्यता या सगळ्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.

तेव्हापासून असा सिनेमा मराठीत का बनत नाही, ही खंत मराठी सिनेरसिकांनी व्यक्त केली होतीच. कारण, ‘कांतारा’मध्ये जे दिसलं, ते कोकणाची आठवण करून देणारं होतं. कोकणातल्या जत्रा, देव, भुतं-खेतं, समुद्र, आंबा-काजू-सुपारीच्या बागा, चिरेबंदी वाड्यांमध्ये दडलेल्या कथा हे सगळं ‘कांतारा’च्या जगापेक्षा फार वेगळं नाही. त्यामुळे मराठी सिनेमा असं काही का दाखवत नाही, हा सूर समाजमाध्यमांवर वाढत गेला.

या प्रश्नाला एक खोल कारण होतं. तुळूनाडूचं लोकजीवन मराठी प्रेक्षकाला परकं वाटत नाही. उलट ओळखीचं वाटतं. दोन्ही प्रांतांची लोकसंस्कृती, राहणीमान हे एकमेकांशी खूप जुळणारं आहे. त्यामुळेच ‘कांतारा’ पाहताना मराठी माणसाला ती गोष्ट आपलीच वाटली आणि आपल्याकडे हे का घडत नाही, या प्रश्नाने तेव्हापासून मनात घर केलं.

मल्याळम सिनेमांचं आकर्षण

‘कांतारा’च्याही आधीपासूनच मल्याळम सिनेसृष्टीने भारतभरातल्या प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं. मल्याळम सिनेसृष्टीचं साधेपण हे तिचं मोठं बलस्थान आहे. तिथं अकारण अवाढव्य सेटस्‌ उभारून भव्यता आणली जात नाही. तिथला सिनेमा स्टार पॉवरवरही अवलंबून नसल्याने तिथं अनावश्यक ग्लॅमर नसतं; पण त्या सिनेसृष्टीत कमी बजेटमध्येही स्थानिक माणसाची साधी गोष्ट जगासमोर मांडण्याची हिंमत आहे.

तिथल्या गावांचं चित्रण, रोजच्या जगण्याचा पोत, माणसांमधले संबंध आणि निसर्गाशी असलेलं नातं हे सगळं पडद्यावर जसंच्या तसं येतं. ते पाहताना कोकणातल्या किंवा महाराष्ट्रातल्या छोट्या गावातल्या माणसाला आपलं जगणं दिसतं. तुळूनाडूप्रमाणेच केरळम आणि कोकणच्या भौगोलिक व सांस्कृतिक रचनेतही अनेक साम्यस्थळं आहेत. केरळमचं ते गाव पाहताना कोकणातलं गाव आठवतं, तिथल्या माणसांच्या चेहऱ्यात आपले लोक दिसतात.

बॉलीवूडचा सापळा

एकीकडे इतर प्रादेशिक सिनेसृष्टींच्या सुपर हिट, आशयघन सिनेमांमुळे मराठी सिनेरसिकांच्या मनात न्यूनगंड उफाळून येत राहिला, तर दुसरीकडे मराठी मातीतल्या कथा हिंदीत सांगण्याची एक नवी परंपराच बॉलीवूडमध्ये तयार होत होती. लोकल कथांना आपल्या मातीतूनच ग्लोबल स्टेज मिळवून देण्याचं आश्वासक स्वप्न पेरू पाहणाऱ्या प्रादेशिक सिनेसृष्टी एकीकडे, तर लोकल कथांचं रोपटंच उपटून नेणारं बॉलीवूड एकीकडे.

उदाहरणादाखल, राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘तुंबाड’ची कथा, पात्रं, वातावरण हे सगळं मराठमोळं होतं. दिग्दर्शकही मूळचा मराठीच; पण सिनेमा मात्र हिंदीत बनवला गेला. अर्थात, त्यामागे बजेट, वितरण, हिंदी सिनेमाचं ग्लॅमर या व्यावहारिक कारणांसोबतच मराठी प्रेक्षकांवरचा विश्वास कमी असल्याचंही दिसून आलं.

नागराज मंजुळे, चैतन्य ताम्हाणेसारख्या नवख्या, प्रयोगशील दिग्दर्शकांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दलची खंत राहीने स्पष्टपणे बोलूनही दाखवली होती. असाच काहीसा प्रकार मॅडॉक स्टुडिओजने बनवलेल्या आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’च्या बाबतीतही घडला. ‘मुंज्या’ची मूळ कथा कोकणातल्या लोककथांवर आणि तिथल्या अंधश्रद्धांवर आधारित होती; पण निर्मिती आणि सादरीकरणासाठी हिंदी भाषेचा वापर केला गेला. गोष्ट मराठी माणसाच्या मातीतली; पण तिची निर्मिती मात्र बॉलीवूडच्या ग्लॅमरखाली झाली.

‘मराठी कथांना खऱ्याअर्थाने यश मिळवायचं असेल तर त्या हिंदीतच सांगायला हव्यात’ असाच एक संदेश यातून जात होता आणि हाच संदेश मराठी सिनेसृष्टीसाठी घातक होता. जणू मराठी सिनेमा अशा दर्जाच्या कलाकृतींना लायक नाही, असं ठसवण्याचाच हा प्रयत्न होता. बॉलीवूडसारख्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यासमोर मराठी सिनेसृष्टीचं मनोबलच खच्ची केलं जात होतं.

अशा मोठ्या बजेटच्या कलाकृती जेव्हा मराठी वातावरणावर असूनही हिंदीत बनतात, तेव्हा मराठी प्रेक्षकांच्या सिनेप्रेमावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मराठी प्रेक्षक अशा सिनेमांना थिएटरमध्ये जाऊन प्रतिसाद देतील की नाही, याबद्दल निर्मात्यांच्या मनात शंका असायची. बजेटचा मोठा प्रश्न आणि हिंदी भाषेला असणारं जागतिक मार्केट यामुळे चांगल्या कथा मराठीतून हिरावून घेतल्या जात होत्या.

बदलाचं नवं वारं

गेल्या वर्षी रीलिज झालेल्या ‘दशावतार’ या मराठी सिनेमाने या नकारात्मक चित्राला पूर्णपणे बदलून टाकलं. कोकणच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलंच, त्यासोबतच मराठी सिनेमांमध्येही ‘कांतारा’सारखी जादू निर्माण करण्याची ताकद आहे, याचा विश्वास दिला. ‘दशावतार’ने मराठी सिनेसृष्टीला एक नवा मार्ग दाखवला आणि प्रेक्षकांना पुन्हा थिएटरकडे वळवलं.

आता ‘तुंबाडची मंजुळा’ या सिनेमाने हाच विश्वास अधिक दृढ केलाय. हा रिमेक असला, तरी त्याचं मराठी रूपांतर इतकं अप्रतिम आणि जबाबदारपणे केलं गेलंय की, तो एक स्वतंत्र, ओरिजनल सिनेमा वाटतो. त्याची पोचपावती तिकीटबारीवरही ठळकपणे दिसून येतेय. या सिनेमाच्या यशाने हे सिद्ध केलंय की, जर आपण आपल्या मातीतल्या गोष्टी प्रामाणिकपणे मांडल्या, तर मराठी प्रेक्षक त्याला डोक्यावर घ्यायला कधीच मागेपुढे पाहत नाहीत.

‘लोकल’ कथांचं ‘ग्लोबल’ अपील

कोकणातल्या लोकरहाटीत आणि स्थानिक संस्कृतीत जागतिक दर्जाचं अपील दडलेलं आहे, हे ‘तुंबाडची मंजुळा’ने दाखवून दिलंय. जी गोष्ट तुळूनाडूत यशस्वी झाली, तीच गोष्ट कोकणातही तितक्याच ताकदीने उभी राहते. कोकणच्या मातीत अशा अनेक अद्भु‌त‌, रहस्यमय आणि सामाजिक कथा आहेत, ज्या मराठी सिनेमाला एक नवा गौरव मिळवून देऊ शकतात. आपल्याला फक्त गरज आहे ती योग्य दृष्टिकोन, चांगल्या निर्मिती मूल्यांची.

कोकणातल्या जत्रांवर एखादा सिनेमा होऊ शकतो. तिथल्या मालवण, वेंगुर्ला, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणांच्या वेगळेपणावर गोष्टी लिहिल्या जाऊ शकतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘किल्ला’चा दिग्दर्शक अविनाश अरुण हा जेव्हा ‘थ्री ऑफ अस’सारख्या हिंदी सिनेमातून वेंगुर्ल्याचं लोभस रूप दाखवतो, तेव्हा हे अपील आणखी खुणावू लागतं.

केवळ कोकणच नाही, तर विदर्भातल्या घनदाट जंगलांमध्ये, मराठवाड्याच्या उजाड माळरानात, खानदेशातल्या डोंगरी जमातींमध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांमध्ये असंख्य कथा आहेत. महाराष्ट्राच्या कित्येक गावखेड्यांमध्ये अशा लोकल कथा आजही जिवंत आहेत. या कथा आपल्या समृद्ध लोकपरंपरेचा भाग आहेत आणि त्या रूपेरी पडद्यावरून जगासमोर येण्याची वाट पाहताहेत.

सिनेमातून प्रादेशिक पर्यटनाला चालना

जेव्हा एखादा सिनेमा तिथल्या संस्कृतीचं आणि निसर्गाचं सुंदर चित्रण करतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत असतो. ‘कांतारा’ सुपरहिट झाल्यानंतर कर्नाटकच्या आणि विशेषतः तुळूनाडूच्या पर्यटन व्यवहारावर खूप मोठा आणि सकारात्मक प्रभाव पडला. तिथली देवस्थानं, तिथली संस्कृती जवळून पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथं गर्दी करू लागलेत. या एका सिनेमाने अख्ख्या प्रदेशाची ओळखच बदलून टाकलीय.

मल्याळम सिनेमांनीही केरळच्या पर्यटनाला असाच हातभार लावलाय. त्या सिनेमांमध्ये दिसणारी ठिकाणं, घरं, बॅकवॉटर्स, बागा हे सगळं पाहायला देशीविदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सिनेमा हा फक्त एक मनोरंजनाचं साधन न राहता तो संपूर्ण प्रदेशाचा राजदूत बनू शकतो, हे मल्याळम सिनेसृष्टीने प्रभावीपणे दाखवून दिलंय. नेमकी हीच जादू सिनेमासारख्या प्रभावी माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातही सहज घडू शकते. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन सिनेमा हा स्थानिक पातळीवर आर्थिक बदलाचं एक मोठं माध्यम बनू शकतो, हे आता तरी आपण ओळखायला हवं.

मराठी सिनेसृष्टीचं आत्मभान

‘दशावतार’ असेल अथवा ‘तुंबाडची मंजुळा’यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीला हळूहळू आत्मभान येतंय. आपल्या मातीत उत्तम कथा आहेत, आपल्याकडे निसर्गाची समृद्धी आहे, आपल्या संस्कृतीतही अद्भुत कथाविश्व आहे हे ओळखण्याची सुरुवात होतेय. मराठी प्रेक्षकही आता अधिक जागरूक झालाय. चांगला सिनेमा पाहायला तो थिएटरमध्ये येतो. सोशल मीडियावर त्याच्या मागण्या स्पष्ट आहेत. त्याला आपल्या मातीतल्या गोष्टी आपल्या भाषेत हव्या आहेत. या मागणीला आता निर्माते आणि दिग्दर्शकही प्रतिसाद देऊ लागलेत.

या रिमेकने एक नवी दिशा दाखवलीय. रिमेकमधून मिळालेला आत्मविश्वास ओरिजिनल गोष्टींसाठी वापरायला हवा. आता मराठी दिग्दर्शकांनी, लेखकांनी पुढे येऊन मूळ मराठी कथा तयार कराव्यात. रिजनल हेच ओरिजनल आहे, असं ठणकावून सांगावं. आपल्या मातीचा सुगंध, इथल्या माणसांचे संघर्ष, इथल्या लोककथा आणि परंपरांमध्ये जे अथांग सामर्थ्य आहे, ते आता जगासमोर यायलाच हवं. आपल्या या अनोख्या आणि समृद्ध वारशाला, आपल्या मातीतल्या या अस्सल मराठी लोकल गोष्टींना आता खऱ्या अर्थाने ग्लोबल स्टेजची वाट दिसायलाच हवी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT