बहार

भारतीय वाघांचे भवितव्य काय?

Arun Patil

पर्यावरण साखळीमध्ये वाघ हा सर्वात वरच्या स्थानी आहे. वाघ वाचवले तरच माणूस वाचेल; मात्र याचाच माणसाला विसर पडत गेला आणि वाघांपुढे अस्तित्वाचे आव्हान उभे राहिले. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत दोनशे वाघ वाढल्याचा आनंद साजरा करून थांबता येणार नाही; तर जंगलसंपत्ती वाढवण्याचे अथक व शास्त्रशुद्ध प्रयत्न सातत्याने करावे लागतील, तरच भारत हे वाघांचे नंदनवन ठरेल. त्यासाठी केवळ सरकारी प्रयत्नांवर अवलंबून न राहता सर्व देशवासीयांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे.

'प्रोजेक्ट टायगर' म्हणजेच व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेस पन्नास वर्षे पूर्ण होत असताना गेल्या चार वर्षांतील देशातील वाघांची संख्या दोनशेने वाढून ती 3,167 पर्यंत पोहोचल्याची घोषणा झाली खरी आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला खरा; पण व्याघ्र संवर्धनाच्या आगामी काळातील आव्हानांकडे आणि ठोस उपाययोजनांच्या शिस्तबद्ध आखणी-अंमलबजावणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आपण पुन्हा काही दशके मागे फेकले जाण्याचा धोकाही विचारात घ्यायला हवा.

मुळात वाघाचे आपल्या पर्यावरण साखळीतले स्थान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी जंगलातली त्याची अत्यावश्यक असलेली पुरेशी उपस्थिती यांचे भान आधुनिक माणसाला नसल्यानेच माणूस वाघांच्या मुळावर उठल्याचे दिसून येते. आपल्या पूर्वजांनी मात्र वाघांचे पर्यावरणातील स्थान अचूक ओळखले होते. सिंधू संस्कृतीमध्ये पशुपतीच्या मुद्रेत वाघ होता, त्यानंतर चोल साम्राज्याच्या मुद्रेतही त्याला स्थान होते. दुर्गामातेच्या वाहनाचा मान गेली काही हजार वर्षे वाघाला दिले जाते आहे.

निर्वनो वध्यते व्याघ्राे निर्व्याघ्रं छिद्यते वनम् ।
तस्माद्व्याघ्राे वनं रक्षेद्वनं व्याघ्रंच पालयेत् ॥

वाघ असलेले जंगल तोडू नका, वाघांशिवाय वनांची कल्पनाच केली जाऊ शकणार नाही. जंगल वाघांचे रक्षण करते आणि वाघ जंगलाला टिकवून ठेवतो, अशा अर्थाच्या या संस्कृत वचनामध्ये तर पर्यावरण साखळीचे जतन करण्याचा विचार स्पष्टपणाने मांडलेला आहे. पर्यावरण साखळीमध्ये वाघ हा सर्वात वरच्या स्थानी आहे. म्हणजे तो कुणाचे भक्ष्य नाही.

चितळ-सांबर-चौसिंगा-बारासिंगा-भेकर-नीलगाय आदी तृणभक्ष्यी जंगलातील गवत आणि इतर वनस्पती खातात. हे तृणभक्ष्यी प्राणी हे वाघांचे खाद्य. त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम वाघ करतात. जंगलात वाघच नसतील, तर तृणभक्ष्यींची संख्या बेसुमार वाढेल. त्यामुळे जंगलांतील गवत नाहीसे होईल. गवताचे महत्त्वाचे काम म्हणजे माती धरून ठेवणे. गवताअभावी पावसाने माती वाहून जाईल आणि जमीन रेताड, नापीक होऊन जंगलाचे रूपांतर वाळवंटात होईल. वनसंपदा नाहीशी होणे हे माणसापुढे खाद्यटंचाईचे संकट उभे करणारे ठरेल. म्हणजेच वाघ वाचवले तरच माणूस वाचेल; मात्र याचा माणसाला विसर पडत गेला आणि वाघापुढे अस्तित्वाचे आव्हान उभे राहिले.

सैबेरिया या थंड प्रदेशात मूळ स्थान असलेला वाघ बारा हजार वर्षांपूर्वी भारतात आला आणि क्रमाक्रमाने सरकत दक्षिणेच्या टोकापर्यंत गेला. देशातल्या जंगलाचे राजेपद त्याने लवकरच मिळवले आणि भारतीय संस्कृतीनेही त्याला मानाचे स्थान दिले. जगातल्या वाघांच्या आठपैकी तीन जाती नामशेष झाल्या आणि उरलेल्या पाचपैकी एक म्हणजे आपल्याकडे आढळणारा रॉयल बेंगॉल टायगर म्हणजेच पट्टेरी वाघ.

वाघांची शास्त्रीय गणना गेल्या काही दशकांत सुरू झाली असली, तरी 1900 च्या सुमारास म्हणजे गेल्या शतकाच्या सुरुवातीस देशातील पट्टेरी वाघांची संख्या एक लाख होती. मात्र, त्यानंतर मानवी हस्तक्षेपामुळे त्यांची संख्या कमी कमी होत गेली. 1930 च्या सुमारास पन्नास हजारांपर्यंत, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या 1947 च्या सुमारास ती चाळीस हजारांपर्यंत कमी झाली. इंग्रजांकडून-संस्थानिकांकडून बेधुंद शिकार होऊ लागली. अगदी पगारी नोकरांकडूनही शिकारी करण्याचे प्रकार सर्रास होत होते. लोकसंख्यावाढीने जंगले आक्रसू लागली. हरणांच्या शिकारींमुळे वाघांचे खाद्य संकटात आले. त्यामुळे पाळीव प्राण्यांकडे वाघाला नाइलाजाने वळावे लागले. परिणामी, माणूस-वाघ संघर्ष सुरू झाला आणि वाघांची संख्या झपाट्याने कमी झाली. हीच स्थिती आणखी काही दशके राहिली असती, तर आतापर्यंत हा पट्टेरी वाघही पूर्णपणाने नामशेष झाला असता; मात्र आज देशात वाघ टिकून आहेत त्याचे श्रेय नि:संशयरीत्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना द्यावे लागेल.

वाघांच्या दु:स्थितीकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी सुरू केला व्याघ्र प्रकल्प म्हणजेच 'प्रोजेक्ट टायगर.' त्या प्रकल्पाच्या प्रमुखपदी इंदिरा गांधींनी कैलास सांखला या तरुण वनाधिकार्‍याची नेमणूक केली. सांखला यांनी सर्वप्रथम काय केले असेल, तर पहिली अधिकृत व्याघ्रगणना केली. 1973 मध्ये केलेल्या या गणनेत देशात केवळ 1,827 वाघच उरले असल्याचे समोर आले. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड-विश्व प्रकृती निधी म्हणजेच डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.च्या गाय माऊंटफोर्ड यांच्या सहकार्याने प्रथम नऊ अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. त्यातला पहिला प्रकल्प होता जीम कॉर्बेट उद्यानामध्ये. या प्रकल्पातील शस्त्रे, बिनतारी संदेश यंत्रणा, संरक्षण, वाहने, वन्यजीव व्यवस्थापनाने कुरणांचा विकास, पाणीसाठा, वणव्यांपासून संरक्षण आदी उपायांचा फायदा होत गेला. वाघांची संख्या वाढू लागली. अवघ्या पाच-सहा वर्षांत म्हणजे 1979 मध्ये ती बाराशेने वाढून 3,017 झाली.

1984 मध्ये ती जवळपास चार हजार म्हणजे 3,959 झाली. 1989 मध्ये ती 3,854, सन 1993 मध्ये 3,750, सन 1997 मध्ये 3,455, सन 2001 मध्ये 3,642 अशी झाली. म्हणजेच व्याघ्र प्रकल्प सुरू झाल्यानंतरच्या साधारण तीस वर्षांत वाघांची संख्या साडेतीन ते चार हजार झाली. याचाच अर्थ तीस वर्षांत संख्या दुप्पट झाली. त्यानंतर मात्र वाघांना ग्रहण लागले आणि पुढच्या चार वर्षांत देशात केवळ 1,411 च वाघ उरले… म्हणजे चार वर्षांत तब्बल 2,231 वाघ मारले गेले… इंदिरा गांधींनी व्याघ्र प्रकल्प उभारला त्या सन 1973 पेक्षाही कमी वाघ 2006 मध्ये उरले आणि तेही व्याघ्र प्रकल्पांची संख्या 38 पर्यंत वाढवूनही…

या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेत आढळलेल्या 3,167 वाघांच्या संख्येकडे पाहावे लागले. व्याघ्र प्रकल्पाच्या वाटचालीत चार हजार वाघांपर्यंत आपण पोहोचलो होतो; पण ती वाढ आपल्याला टिकवता आली नाही आणि आपण 1,411 पर्यंत कोसळलो. व्याघ्र प्रकल्पांची संख्या आता 51 करूनही आपण त्या उच्चांकापेक्षा आठशेने मागे आहोत.

वाघांची संख्या 2,000 नंतर झपाट्याने कमी का झाली, याचे कारण केवळ जंगल कमी होणे, त्यातील वाघांचे भक्ष्य कमी होणे एवढेच नव्हते. त्या घसरगुंडीचे आणखी एक महत्त्वाचे कारण होते आणि ते म्हणजे वाघाला आलेली आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रचंड किंमत. विशेषत:, आशियाई देशांतील पारंपरिक औषधांच्या खुळचट कल्पनांमुळे वाघांची शिकार होत राहिली. वाघाच्या शेपटीचे सूप कर्करोगावर, हाडांपासून तैवानी टॉनिक, कातडे भूतबाधेवर, मेंदू तेलात मिसळून अंगाला लावला तर चपळपणात वाढ, त्याच्या इंद्रियाचे सूप कामोत्तेजनासाठी वगैरे वगैरे हास्यास्पद कल्पनांनी वाघांच्या अवयवांची त्यावेळची किंमत पंचवीस लाखांपर्यंत गेली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टोळ्या शिकारीत उतरल्या. संसारचंदसारखे गुन्हेगार तर पाचशे वाघ एकट्याने मारल्याचे सांगतात. परिणामी, मध्यंतरी सारिस्का अभयारण्यातले वाघ संपलेही होते आणि तेथे पुन्हा नव्याने वाघ सोडावे लागल्याची वेळ आली.

या सार्‍या कहाणीची रूपेरी किनार सांगायची, तर 2006 मध्ये 1,411 असलेली वाघांची संख्या, 2010 मध्ये 1,706, सन 2014 मध्ये 2,226, सन 2018 मध्ये 2,967 अशी वाढत आता 3,167 पर्यंत पोहोचली आहे. हा आलेख गेल्या दशकाप्रमाणे पुन्हा कोसळू नये, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मध्यंतरीच्या काळात काही चांगली पावले उचलली गेली असल्याने यापुढील काळाकडून आपल्याला निश्चितच आशा करता येईल. नॅशनल टायगर प्रोटेक्शन अ‍ॅथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची डिसेंबर 2005 मध्ये स्थापना झाल्याने व्याघ्र प्रकल्पांना संजीवनी मिळू लागली. व्याघ्रगणनेसाठी पूर्वांपार वापरण्यात येणारी ठसे मोजणीची पद्धत जाऊन कॅमेर्‍यांत वाघ बंदिस्त करण्याची पद्धत आल्याने वाघांची अचूक संख्या कळू लागली. नवनव्या अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्पांचा दर्जा दिल्याने त्यांची संख्या 51 पर्यंत पोहोचली आहे. तसेच वाघ वाचवा मोहिमेने जनजागृती होत असल्याचेही जाणवते आहे. असे असले तरी या ताज्या व्याघ्रगणनेने काही आव्हानेही उभी केली आहेत.

2014 ते 2018 या काळात वाघांची संख्या 33 टक्क्यांनी वाढली, तर 2018 ते 2023 या चार वर्षांत ती वाढ 6.7 टक्क्यांपर्यंत घसरली. त्याची कारणे शोधावी लागतील. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शिवालिक टेकड्या तसेच गंगेचे पठार हा भाग वाघांच्या अधिवासासाठी पोषक असल्याने या भागातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रासह मध्य भारत, पूर्वेकडील टेकड्या आणि सुंदरबनमध्ये वाढ नोंदवण्यात आली; मात्र या वाढीमुळे काही भागांची वाघ सामावून घेण्याची क्षमता आता संपत चालली आहे. त्यामुळे वनांचा विस्तार करणे, दुसर्‍या अभयारण्याशी जोडणारे रस्ते (कॉरिडोर) सुस्थितीत आणणे, वाघांची संख्या कमी असलेल्या निवडक ठिकाणी दाट घनतेच्या भागातील काही वाघ स्थलांतरित करणे आदी उपाय योजावे लागतील. ठराविक जंगलांतील वाघांची घनता मर्यादेपेक्षा वाढल्याने तेथे नरांमध्ये हद्दीसाठी भांडणे होऊन मृत्यू, अपंगत्व येण्याची तसेच वाघ हद्द सोडून मानवी वस्तीकडे सरकण्याचीही शक्यता असते. त्याकडे लक्ष पुरवावे लागेल.

महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश असणार्‍या पश्चिम घाटातील वाघांची संख्या जंगलतोड, अधिवास क्षेत्र कमी होणे, पर्यावरणाचा समतोल ढासळणे यामुळे घटली आहे. सह्याद्रीमध्ये मुक्कामाला असणारा आता एकही वाघ राहिलेला नाही. विकासाच्या अनेक प्रकल्पांमुळे वाघांचा अधिवास धोक्यात आल्याचेही काही ठिकाणी जाणवू लागले आहे. व्याघ्र प्रकल्प असलेल्या वीस राज्यांमधील चार लाख चौरस किलोमीटर जंगलांपैकी केवळ एक तृतीयांश भाग वाघांसाठी सुयोग्य अधिवासाचा राहिला असला, तरी बेकायदा शिकारींपासून असे भाग वाचवण्याची आवश्यकता आहे. ज्या व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी असते, तिथले वाघ सुरक्षित असतात; कारण बेकायदा गोष्टींवर त्यांचेही लक्ष असते. तसेच पर्यटकांमुळे स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने वाघ वाचवण्याचे प्रयत्न स्थानिकांकडूनही होतात. त्यामुळे पर्यटक कमी असलेल्या जंगलातील पर्यटन वाढवणे हाही उपाय करावा लागेल. जंगलातील हरणांसारख्या वाघांच्या खाद्याचे संवर्धन केल्यासच पाळीव प्राणी आणि प्रसंगी माणसावर नाइलाजाने होणारे हल्ले थांबतील.

…म्हणूनच दोनशे वाघ वाढल्याने आनंद व्यक्त करून आता थांबता येणार नाही, तर जंगलसंपत्ती वाढवण्याचे अथक, शास्त्रशुद्ध प्रयत्न सातत्याने करत राहणे आवश्यक ठरणार आहे. तरच भारत हे वाघांचे नंदनवन ठरेल. त्यासाठी केवळ सरकारी प्रयत्नांवर अवलंबून न राहता सर्व देशवासीयांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे.

-सुनील माळी

SCROLL FOR NEXT