पाणी एक अत्यावश्यक गोष्ट, जिच्या असल्यामुळे आणि नसल्यामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. सार्वजनिक तसेच दैनंदिन वापरासाठी जसे पिणे, स्वयंपाक करणे, वैयक्तिक तथा परिसराची स्वच्छता, मनोरंजन, मत्स्यपालन,पशुपालन, शेती व शेतीपूरक उपक्रम, ऊर्जानिर्मिती इत्यादी अनेक कारणांसाठी पाण्याचा उपयोग करावाच लागतो.
या लेखात आपण पाणी आणि जीवन यातल्या काही प्रबोधनात्मक आणि रंजनात्मक अशा बाबी पाहूयात. मला खात्री आहे की, आपण सर्वजण या बाबी वाचल्यानंतर थोडेसे अंतर्मुख व्हाल. कारण, पाणी आहे म्हणून आपण आहोत. ‘जल है तो कल है’ असं म्हटलं, तर वावगे ठरणार नाही. कारण, आपल्या सर्वांचे भविष्य हे पाण्याच्या उपलब्धतेवर आणि जबाबदारीने त्याच्या पूर्ण वापरावर अवलंबून आहे. चला तर मग पाहूयात, काय आहे त्या गोष्टी?
1) सरासरी मानवी शरीर 55 ते 65 टक्के पाण्याने बनलेले असते.
2) पाणी मानवी मेंदूचा 70 टक्के भाग बनवते. तुमच्या डोक्यात खूप द्रव आहे, हे तुमच्या लक्षात आले का?
3) नवजात मुलांच्या जैविक प्रणालीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. ते 78 टक्के इतके आहे.
4) अविकसित देशांमध्ये 80 टक्के आजारांसाठी पाणी जबाबदार आहे. आपल्या पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता गृहित धरू नका!
5) जास्त प्रमाणात पाणी पिणे जीवघेणे असू शकते (अतिदुर्गम अशा आफ्रिकन देशांत पाणी नशिले द्रव म्हणून ओळखले जाते).
6) मुले त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यांत सरासरी अमेरिकन प्रौढांपेक्षा प्रतिपौंड सात पटीने जास्त पाणी वापरतात.
7) जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपण दररोज अर्धा कप पाणी वातावरणात परत सोडतो.
पाण्याचे असामान्य गुणधर्म
1) पाण्याचे वजन 8.34 पौंड प्रतिगॅलन आणि 62.4 पौंड प्रतिघनफूट आहे.
2) एक लिटर पाण्याचे वजन एक किलो असते, तर क्यूबिक मीटरचे वजन एक टन असते.
3) सल्फ्यूरिक ॲसिडसह इतर कोणत्याही द्रव पदार्थापेक्षा पाण्यात वस्तू विरघळण्याची क्षमता जास्त असते.
4) पाण्यात विरघळलेल्या मिठाचे प्रमाण वाढत असताना पाण्याचा गोठण्याचा बिंदू कमी होतो.
5) काही प्रकरणांमध्ये गरम पाणी थंड पाण्यापेक्षा जलद गोठेल.
6) समुद्राचे पाणी -2 डिग्री सेल्सिअस (28.4 डिग्री फॅरेनहाईट) सरासरी मीठ पातळीसह गोठते. पाणी घट्ट झाल्यावर सुमारे 9 टक्के विस्तारते.
7) पाणी हा पृथ्वीवरील एकमेव पदार्थ आहे, जो तिन्ही स्थितींमध्ये आढळतो, द्रव, वायू आणि घन!
जागतिक पाण्याच्या बचत अभियानात आपला सहभाग कसा देता येईल?
1) सरासरी नळ प्रत्येक मिनिटाला 2 गॅलन पाणी सोडतो. दात घासताना नळ बंद केल्यास दररोज सकाळी चार गॅलन पाणी वाचू शकते.
2) बाष्पीभवनामुळे जलतरण तलावामधून दरमहा सुमारे 1,000 गॅलन (3,785 लिटर) पाण्याचे नुकसान होते.
3) रोज वापरात असलेले शौचालय 200 गॅलन पाण्याचा अपव्यय करू शकते.
4) आंघोळीसाठी 70 गॅलन पाणी वापरता येते, तर पाच मिनिटांचे शॉवर 10 ते 25 गॅलन पर्यंत कुठेही वापरू शकते.
5) दर सेकंदाला नळ एकदा टपकल्यास एक नळ दरवर्षी 3,000 गॅलन गळती करू शकतो.
6) युनायटेड स्टेटस्मधील व्यक्ती सरासरी सुमारे 100 गॅलन पाणी पिण्यासाठी आणि बाह्य स्वच्छतेसाठी वापरते.
7) एक युरोपियन व्यक्ती सरासरी रोज सुमारे 50 गॅलन पाणी वापरते.
8) न्यूयॉर्क शहरातील पाणी वितरण प्रणाली गळतीमुळे दररोज 33 ते 37 दशलक्ष गॅलन पाणी वाया घालवते, जे अमेरिकेतील सर्वात जास्त पाणी गळतीचे शहर म्हणून ओळखले जाते. आपल्याकडेसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते; पण त्याकडे गांभीर्याने पाहिले जाते का?
9) अमेरिकेने वार्षिक पाण्याची गरज 3000 अब्ज घन मीटर असताना 13,000 अब्ज घन मीटर पाणी साठा करून जल स्वयंपूर्णता मिळवली आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रात उन्हाळा सुरू झाला आहे. येत्या महिन्याभरात काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा पडून टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल. आपण कधी जलस्वयंपूर्णता मिळवणार, या प्रश्नाने अस्वस्थ होतो.
पाण्याविषयी अशा अनेक गोष्टींमुळे पाणी हा संशोधनाचा, मनोरंजनाचा आणि आपल्या जीवाभावाचा विषय ठरला आहे. तसं तर पाणी हा एक गुंतागुंतीचा आणि कुतूहलाचाही विषय आहे. आजपर्यंत आपण पाण्याशी संबंधित थोडीशी रंजनात्मक अशी माहिती वाचली. पुढच्या लेखांमध्ये आपण जल पदचिन्ह म्हणजेच वॉटर फूट प्रिंट याविषयी जाणून घेऊया!