पाण्या तुझा रंग कसा? File photo
बहार

पाण्या तुझा रंग कसा?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मंगेश कश्यप

पाणी हा विषय सर्वस्पर्शी असल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये त्याचे स्थान तर अनन्यसाधारण आहे, तरीही आपण त्याच्याकडे किती डोळसपणे पाहतो, हा विचार प्रत्येकाने आपल्या मनाशीच करून पाहायला हवा.

पंचमहाभूतांमध्ये ऑक्सिजन या तत्त्वाला प्राण असे संबोधले आहे. समग्र वायुमंडळात ऑक्सिजनचे स्वतंत्र स्थान असून त्याचे प्रमाण 20.95 टक्के इतके आहे. हायड्रोजनच्या दोन परमाणूंबरोबर ऑक्सिजनचा संयोग झाला की, पाणी या जलतत्त्वाचं प्रकटीकरण होते. द्रव ऑक्सिजन हा साधारण फिकट निळ्या रंगात शास्त्रज्ञांना आढळला. संपूर्ण ब्रह्मांडातील जीवसृष्टीचा मूळ घटक हा ऑक्सिजन आहे. किंबहुना समस्त जीवसृष्टीचा कारक हा ऑक्सिजन आहे. म्हणूनच याला वेदात, शास्त्रात, पुराणांमध्ये देवत्व दिले आहे. ऑक्सिजन हा पाण्याचा प्राण आणि पाणी हा समस्त सृष्टीचा प्राण आहे. म्हणूनच समर्पणात सर्वप्रथम ‘प्राणाय स्वाहा’ असे म्हटले आहे. अशा या पंचमहाभूतांतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या पाण्याची आपण ओळख, जाणीव आणि आपल्या समग्र जीवनावर परिणाम करणारे घटक यांची सखोल, विचार प्रवर्तक आणि रंजक अशी चर्चा या लेखमालेच्या निमित्ताने करणार आहोत.

पाणी हा विषय सर्वस्पर्शी असल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये त्याचे स्थान तर अनन्यसाधारण आहे, तरीही आपण त्याच्याकडे किती डोळसपणे पाहतो, हा विचार प्रत्येकाने आपल्या मनाशीच करून पाहायला हवा. पाण्याच्या क्षेत्रामध्ये गेले तीन-चार दशके काम केल्यानंतर मला जाणवले की, सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणावणार्‍या लोकांमध्येपण पाण्याशी निगडित प्रश्नांबाबत बरेचसे अज्ञान आहे व काहीशी अनास्थाही आहे. पाण्याच्या वापरावर वापरकर्त्यांची मानसिकता प्रभाव टाकते. त्यामुळेच पाणी म्हणजे जलसंपत्ती आणि सुरक्षित जलसंपत्ती म्हणजेच राष्ट्राचा विकास. कारण, पाण्यावरच आपला आर्थिक, भौतिक विकास अवलंबून आहे आणि जलसंपत्तीचा विकास हा फार महत्त्वाचा भाग आहे. जलसंपत्तीचा वापर आणि व्यवस्थापन अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. सर्वसामान्य सुशिक्षित माणसाला असे वाटत असते की, पाणी आपण कसेही वापरले तरी चालेल; पण मित्रांनो हा आपला गोड गैरसमज आहे. पाणी ही जबाबदारीने वापरण्याची गोष्ट आहे, ज्याला युनायटेड नेशनच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये ‘रिस्पॉन्सिबल कंझमशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस’ अशी संज्ञा दिलेली आहे. या लेखमालेचा उद्देशच मुळामध्ये सर्वसामान्य वाचकाला, अभ्यासकांना, शासकीय, अर्धशासकीय यंत्रणांना, स्वयंसेवी संस्थांना आणि पाण्याच्या संदर्भामध्ये विविध प्रश्न हाताळणार्‍या जिज्ञासूंना काही गोष्टींकडे निर्देश करत आपलंही जलज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा आहे. कधी कधी आपण सहज बोलतो, ‘पाण्या तुझा रंग कसा?’ चला तर मग आपण पाण्यालाच विचारूया ‘पाण्या तुझा रंग कसा?’

आपला देशाने आता पंच्याहत्तरी ओलांडली आहे. देशाला स्वतंत्र मिळाले तेव्हा सर्व नद्या, जालाशयं, तसेच इतर जलस्रोत निर्मळ आणि नितळ होते. शेतातून मोती पिकत होते. पावसाळ्यात पाणी थोडेफार गढूळ होत होते; पण पाऊस थांबल्यावर त्यातील चिखल-माती तळाशी जाऊन पाणी पुन्हा स्वच्छ होत असे. आतासारखे ऋतूंनी आपले कालचक्र बदलले नव्हते. पाऊस सात जूनलाच यायचा आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या- दुसर्‍या आठवड्यात तो परतलेला असायचा. सणासुदीच्या दिवसांत त्याचा अवेळी धिंगाणा चालत नसे; पण मग नंतर औद्योगिक क्रांती नावाची एक मोठी प्रक्रिया सुरू झाली. बहुतांश नद्यांच्या खोर्‍यात औद्योगीकरण होत गेले आणि सहाजिकच जिथे उद्योग निर्माण झाले, त्या शहरांची वाढ होऊ लागली. पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर संभाजीनगर अशा काही महत्त्वाच्या शहरांत स्थलांतरित नागरिकांची संख्या वाढू लागली. आता या औद्योगीकरण आणि वाढती शहरे यांचा ताण सर्वप्रथम पडला तो निर्मळ, नितळ आणि नैसर्गिक प्रवाही असलेल्या नद्यांवर. या दोन्ही मधून निर्माण झालेल्या दूषित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीत सोडून देण्यात आले. त्यामुळे मूळ नदीचा चेहरा बदलून गेला. पाण्याचा नितळ निळा रंग नाहीसा होऊन त्याची जागा पिवळट, मळकट, गढूळ रंगाने घेतली.

नद्यांच्या पाण्यात झालेला हा रंग बदल आपल्याला धोक्याची सूचना देत होता; पण आपल्याला विकासाची भूक लागली होती. विकास प्रथम. नद्या काय, नंतरसुद्धा शुद्ध होतील अशी बेपर्वाई आपण दाखवली आणि आज करोडो रुपये खर्च करूनसुद्धा आपल्या महत्त्वाच्या जीवनवाहिनी असलेल्या नद्या, जलाशयं गंभीररीत्या प्रदूषित, अशुद्ध आहेत. गेल्या तीन-चार दशकांत पाण्यावर वाढलेल्या जलपर्णीमुळे तर मोठाच प्रश्न उपस्थित केला आहे. प्रदूषित पाण्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहेच; पण हे सर्व कळत असूनही शांत बसून पाहणारे आपण सर्व यात शासन, प्रशासन, तुम्ही-आम्ही आपण सर्वच जबाबदार आहोत. पाण्याचा आक्रोश आपण आज समजून घेतला नाही, तर भविष्यात आपल्याला औषधाच्या दुकानातून वॉटर कॅप्सूल विकत घ्याव्या लागतील आणि तो दिवस फार लांब नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT