Water, Drought and Coincidence | पाणी, दुष्काळ आणि योगायोग 
बहार

Water, Drought and Coincidence | पाणी, दुष्काळ आणि योगायोग

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मंगेश कश्यप

एखाद्या प्रदेशात सरासरी वार्षिक पर्जन्यमान पुरेसे असू शकते; पण तो पाऊस काही मोजक्या दिवसांत अत्यंत मोठ्या प्रमाणावर पडला, तर पूर निर्माण होऊ शकतो आणि उर्वरित काळात पाणीटंचाई भासू शकते. त्यामुळे केवळ ‘किती पाऊस पडतो?’ हा प्रश्न पुरेसा नाही. ‘तो कधी पडतो’, ‘कुठे पडतो’, ‘किती तीव्रतेने पडतो’, ‘त्यातील किती पाणी जमिनीत मुरते’ आणि ‘किती पाणी वाहून जाते’ हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

मानवी जीवनाकडे पाहताना एक प्रश्न वारंवार आपल्या समोर उभा राहतो. आपल्या आयुष्यात जे काही घडते ते किती प्रमाणात अपरिहार्य असते आणि किती प्रमाणात आपल्या निवडींचे फलित असते? काही घटना आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, तर काही घटना आपल्या कृतींमधून निर्माण होतात. काही वेळा परिस्थिती योगायोगाने घडल्यासारखी वाटते, तर काही वेळा तिच्यामागे स्पष्ट कारणपरंपरा दिसते. पाऊस कधी पडेल, किती पडेल, कोणत्या प्रदेशात पडेल, त्याचे वितरण कसे होईल, एखाद्या वर्षी दुष्काळ पडेल की अतिवृष्टी होईल, नदीला पूर येईल की प्रवाह कमी होईल, भूजलाची पातळी किती खाली जाईल, अशा अनेक गोष्टींमध्ये निसर्गाची अनिश्चितता असते; परंतु या अनिश्चिततेसमोर मानवी समाजाचे वर्तन कसे असावे, उपलब्ध पाण्याचा वापर कसा करावा, पाण्याचे संवर्धन कसे करावे, भविष्यातील संकटांची तयारी कशी करावी आणि पाण्याशी असलेले आपले नाते कसे असावे, हे प्रश्न मात्र मानवी विवेक आणि पुरुषार्थाशी संबंधित आहेत.

निसर्गाच्या अपरिहार्यतेचा स्वीकार आणि मानवी पुरुषार्थाचा जागर यांचा समतोल म्हणजे जलविवेक. या संकल्पनेचा तात्विक संदर्भ पाहिला, तर इमॅन्युएल कांटच्या ज्ञानमीमांसेची आठवण येते. कांटच्या मते, जे ज्ञान सार्वत्रिक (Universal) आणि आवश्यक (Necessary) असते, तेच वस्तुनिष्ठ ज्ञान (Objective Knowledge) मानले जाते. निसर्गाच्या व्यवस्थेत काही प्रक्रिया आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. सूर्य उगवणे, ऋतूंचे चक्र, बाष्पीभवन, ढगांची निर्मिती, पर्जन्य, नदीचा प्रवाह, जमिनीत पाण्याचे झिरपणे आणि भूजलाची पुनर्भरण प्रक्रिया या सर्व प्रक्रिया विशिष्ट नैसर्गिक नियमांनी चालतात. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या प्रक्रियांचे ज्ञान मिळवले आहे; परंतु त्यांना पूर्णपणे आपल्या इच्छेप्रमाणे चालविण्याची क्षमता त्याच्याकडे नाही. पाऊस पाडण्याची इच्छा असणे आणि पाऊस पाडता येणे यात मोठा फरक आहे.

ही मर्यादा स्वीकारणे म्हणजे पराभव नव्हे. उलट, शाश्वत जलव्यवस्थापनाची ती पहिली अट आहे. जलव्यवस्थापनाचे मूलभूत शहाणपण याच जाणिवेत आहे की, आपण निसर्गावर संपूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही. आपण निसर्गाच्या प्रक्रियांना समजून घेऊ शकतो, त्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो आणि उपलब्ध संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करू शकतो. नदीला आपण आदेश देऊ शकत नाही; परंतु तिच्या प्रवाहाचा अभ्यास करू शकतो. पावसाला आपण 'ये रे ये रे पावसा' असे म्हणून बोलावू शकत नाही किंवा त्याला आदेश देऊ शकत नाही; परंतु पाऊस आला की, त्याचे पाणी जमिनीत मुरवू शकतो. दुष्काळ टाळण्याची पूर्ण हमी देऊ शकत नाही; परंतु दुष्काळाची तीव्रता आणि त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता कमी करू शकतो. यातून एक महत्त्वाचा फरक स्पष्ट होतो. निसर्गाची मर्यादा आणि मानवी असहाय्यता या एकच गोष्टी नाहीत.

जलव्यवस्थापनात ‘Chance’ या संकल्पनेचा अर्थ अधिक काळजीपूर्वक समजून घ्यावा लागतो. पाऊस कमी पडणे म्हणजे केवळ योगायोग नाही. पर्जन्याच्या मागे हवामानशास्त्रीय, भौगोलिक आणि वातावरणीय प्रक्रिया असतात; परंतु एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट दिवशी किती पाऊस पडेल, त्याचे अचूक भाकीत करणे अनेकदा शक्य नसते. म्हणून आधुनिक विज्ञान ‘अनिश्चितता’ या संकल्पनेचा वापर करते. एखाद्या प्रदेशात सरासरी वार्षिक पर्जन्यमान पुरेसे असू शकते; पण तो पाऊस काही मोजक्या दिवसांत अत्यंत मोठ्या प्रमाणावर पडला, तर पूर निर्माण होऊ शकतो आणि उर्वरित काळात पाणीटंचाई भासू शकते. त्यामुळे केवळ ‘किती पाऊस पडतो’ हा प्रश्न पुरेसा नाही. ‘तो कधी पडतो’, ‘कुठे पडतो’, ‘किती तीव्रतेने पडतो’, ‘त्यातील किती पाणी जमिनीत मुरते’ आणि ‘किती पाणी वाहून जाते’ हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत.

यातून जलव्यवस्थापनाचे एक नवे तत्त्व पुढे येते. ते म्हणजे, अनिश्चितता संपवणे शक्य नसते; परंतु अनिश्चिततेपासून निर्माण होणारा धोका कमी करणे शक्य असते. आधुनिक जलव्यवस्थापनाच्या संदर्भात विचार केला, तर त्याचे एक महत्त्वाचे रूप दिसते. प्रत्येक परिणामामागे काही कारणपरंपरा असते. मानवी कृती आणि त्यांचे परिणाम यांचा संबंध समजून घेणे आवश्यक आहे.

आज एखाद्या शहरात पाणीटंचाई निर्माण झाली, तर ती केवळ ‘नियती’ म्हणून स्वीकारणे योग्य ठरेल का?

भूजलाचा वर्षानुवर्षे अतिउपसा झाला असेल, जलस्रोतांवर अतिक्रमण झाले असेल, पाण्याची गळती वाढली असेल, जलप्रदूषण झाले असेल, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले गेले नसेल किंवा उपलब्ध पाण्यापेक्षा मागणी सातत्याने वाढत गेली असेल, तर त्या संकटाला केवळ दैव म्हणता येणार नाही. तिथे मानवी कृतींची स्पष्ट भूमिका आहे.

यामुळेच ‘नियती’ ही संकल्पना चुकीच्या अर्थाने वापरण्याचा धोका निर्माण होतो. मानवी चुकीच्या निर्णयांचे परिणाम निसर्गावर ढकलणे म्हणजे जबाबदारीपासून पळणे होय. पाण्याची कमतरता काही वेळा नैसर्गिक असू शकते; पण पाणीटंचाईची तीव्रता अनेकदा सामाजिक आणि व्यवस्थापनात्मक निर्णयांवर अवलंबून असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT