Vijay thalapathy | तामिळनाडूचा थलैवा 
बहार

Vijay thalapathy | तामिळनाडूचा थलैवा

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

देशातील इतर राज्यांपेक्षा तामिळनाडूतील जनतेचा निकाल वेगळाच असतो. आताची विधानसभा निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. तामिळनाडूने विजय या पडद्यावरच्या नायकाला आपला नेता म्हणून निवडले आहे. आता प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट होते की प्रतिमा हेच प्रत्यक्ष आहे, हे यथावकाश कळेल.

टाईम टू लीड... जोसेफ विजय चंद्रशेखर या नायकाने खरे तर हा नारा 2013मध्येच दिला होता. तो तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांना अचूक कळला होता. जयललिता कमालीच्या लोकप्रिय होत्या. रजतपटावरून प्रत्यक्षात नायक होता येते, राज्याला नेतृत्व बहाल करता येते, हे त्यांना स्वतःच्या, त्यांचे गुरू एम. जी. रामचंद्रन यांच्या उदाहरणावरून अचूक माहीत असल्याने त्या विजय यांच्याबाबत कमालीच्या सावध झाल्या असाव्यात. ‘थलैवा’ विजय याने काढलेला सिनेमा होता. तो रीलिज झाला, तर राज्यात बॉम्बस्फोट होतील, दंगली होतील, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी अनेक कारणे देत या चित्रपटाचे प्रदर्शनच तामिळनाडूत जयललिता यांनी थांबवले होते. भारतभर आणि परदेशातही चित्रपट रीलिज झाला होता; पण तामिळनाडूत मात्र परवानगीच मिळत नव्हती. जयललिता यांना भेटण्याशिवाय आता पर्याय नाही, हे लक्षात येताच विजय यांनी तशा हालचाली सुरू केल्या; पण त्यांना वेळच मिळेना! अखेर कुठल्यातरी मध्यस्थामार्फत तोडगा निघाला आणि थलैवा म्हणजेच ‘नायक’ या चित्रपटाला असलेली टॅगलाईन ‘टाईम टू लीड’ काढून टाका, अशी अट जयललिता यांनी घातली. ती मान्य झाली अन् मग चित्रपट झळकला.

तामिळनाडूत चित्रपट प्रदर्शित होताना ‘टाईम टू लीड’ काढून टाकले गेले. विजयचे सत्तेत शिरून नेतृत्व करण्याचे मनसुबे तेव्हा जगजाहीर झाले होते. हे सत्य करुणानिधी यांचा पुत्र असलेल्या स्टॅलिनला त्याचा पुत्र उदयनिधीला कळले का माहीत नाही; मात्र जयललिता राजकारणातल्या अत्यंत मुरब्बी व्यक्ती असल्यामुळे त्यांनी ते ओळखले होते. अर्थात, विजय केवळ ‘टाईम टू लीड’ असे ललकारून थांबला नव्हता, तर त्याने तशी व्यूहरचना अत्यंत उत्तमरीत्या प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली होती. पडद्यावरच्या लोकप्रियतेचा फायदा घेत तामिळनाडूत मोठमोठे सुपरस्टार्स फॅन क्लब काढतात. विजय कांत, कमल हसन, रजनीकांत अशा सगळ्या बड्या अभिनेत्यांचे तिथे क्लब आहेत. हे क्लब या अभिनेत्यांची मंदिरे बांधणे, कधी या नेत्यांच्या प्रतिमांना दुधामधाचे अभिषेक करणे अशी फुटकळ आणि फालतू कामे करण्यात धन्यता मानतात. विजय आणि त्याचे पटकथाकार, फिल्म निर्माते असलेले वडील चंद्रशेखर असल्या प्रकारात समाधान मानणारे नव्हते. त्यांना त्यात अजिबात रमायचे नव्हते. या फॅन क्लबच्या ‘मॅडनेस’मध्ये त्यांनी ’मेथड’ शोधून काढली आणि ‘ऑल इंडिया थलपती विजय मक्कल इयक्कम’ या भारदस्त नावाने सुरू केलेल्या क्लब पातळीवरच्या कामांना सामाजिक मोहिमेचे स्वरूप दिले. खूप महत्त्वाचा निर्णय होता हा.

खरे तर, ते एक स्टेटमेंट होते, पुढे काय करायचे आहे ते सांगणारे. मक्कल इयक्कम म्हणजे लोकचळवळ. थलपती म्हणजे सेनापती. विजय या अभिनेत्याच्या नावाने सुरू झालेली अखिल भारतीय पातळीवरची लोकचळवळ. आता नावात काय आहे, अशा प्रश्नात न पडता या क्लबने काय केले, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. तमीळ जनतेला स्वस्त दरात वैद्यकीय उपचार, शाळा प्रवेशासाठी वरचे पैसे मागितले जात असतील, तर मांडवली करून देणे, मोफत वह्या-पुस्तके वाटप, गरजू असेल तर त्याला रुग्णालयात पोहोचवणे अशी कित्येक कामे करणे सुरू झाले. लोक काम घेऊन येऊ लागले. ते सोडवायला संघटना काम करू लागली. या बळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विजय शिरले आणि त्यांनी लक्षणीय यश मिळवले. राजकारण प्रवेशाची घोषणा झाली. हळूहळू जाळे विस्तारले होते; पण 2020 मध्ये वडिलांनी ही घोषणा केली सांगत ती विजय यांनीच नाकारली. वडील-मुलाचे हे नाते अजब आहे. आई शोभा या गायिका, निर्माते वडील चंद्रशेखर मुलाच्या सिनेक्षेत्रातील प्रवेशाबाबत एकेकाळी कमालीचे प्रयत्नशील असत. मुलाचे सिनेमे फ्लॉप गेले, तरी ते खचत नसत. तसेच ते नंतर राजकारण प्रवेशाबाबत आग्रही झाले. अर्थात, राजकारणात प्रवेश सुपरहिट झाला. पदार्पणातच विक्रम.

ख्रिश्चन असलेले वडील चर्चच्या सल्ल्याने वागतात, असा हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप; पण मुलगा वडिलांच्या ओंजळीने पाणी प्यायला तयार नव्हता. त्याने 2020 मध्ये पक्ष काढत नाही, हे ठणकावून सांगितले आणि आई-बापाला माझे निर्णय हे का घेतात म्हणून कोर्टात खेचले. ही राळ उडाली तशी शांतही झाली; पण इयक्कमची सामाजिक कामे मात्र वाढत गेली. पडद्यावर गल्ला गोळा करणारे विजयचे चार ब्लॉकबस्टर दरवर्षी रसिकांच्या सेवेत दाखल होत होतेच. विजय लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाले होते. सुरुवातीच्या सिनेमात चॉकलेट हिरो असलेले विजय नायिकेच्या मागे प्रियाराधन करत हिंडत. तेव्हाही ते खलनायकांना मारामारी करताना प्रेयसीच्या घरी तिच्या आईशी, बहिणीशी, वडिलांशी मैत्री करताना दाखवले जात. एक इमोशनल कोशन्टचा अध्याय पडद्यावर घडवून आणला जाई. सिनेमा हे आपले माध्यम आहे अन् तेच प्रचारसाधन हे विजयना समजले होते. या यशस्वी चित्रपट मालिकेत 2015 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतभर वाढत असताना सिनेमातून विजय यांनी त्यांच्या निर्णयांना लक्ष्य करणे सुरू केले.

2017 मध्ये जे. जयललिता निवर्तल्या. डी मॉनिटायझेशनमुळे जनता बेहाल झाल्याच्या तक्रारी सुरू होत्या. ‘अटली’ नावाचा एक विजयचा चित्रपट आला. त्यात त्यांनी जीएसटी, डिजिटल इंडिया, महागडी वैद्यकीय देयके यावर आसूड ओढले. जनतेच्या अडचणींना पडद्यावर दाखवणे ही भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या राष्ट्रीय विचारसरणीला विरोध करण्याची मोहीम होती. विरोध करणार्‍या गोष्टी त्या सहजगत्या पडद्यावर नायक म्हणून मांडत होते. याच वेळेला द्रमुक आणि अण्णाद्रमुक या द्रविडी परंपरांची नाते सांगणार्‍या खास तमिळी पक्षांनाही पडद्यावरून विरोध केला जात होता. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय राजकारण हे माझा शत्रू आहे आणि प्रादेशिक द्रविडी पक्ष हे माझे मित्र नाहीत, असा संदेश विजय सिनेमाच्या माध्यमातूनच देत होते. ते राजकारणात येणार नाहीत, असा समज करुणानिधी कुटुंबाने करून घेतला असावा. जयललितांनी ‘थलैवा’वर घातलेली बंदी कल्पना कदाचित विस्मृतीत गेली होती. विजय नेमके काय करणार, याकडे लक्ष असतानाच अचानक 2020 मध्ये त्यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली. ही घोषणाही सनसनाटी होती; मात्र त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन 42 जणांचे झालेले मृत्यू विजय यांचे राजकीय भवितव्य खरे तर संपवणारे होते. प्रत्यक्षात झाले भलतेच. दोन वर्षांत घराघरात पोहोचलेले विजय आपण कसे जनतच्या आकांक्षाचे प्रतीक आहोत आणि जनतेला नवा पर्याय कसे देऊ शकतो आहोत, हे दाखवण्यात यशस्वी झाले. हे यश मतयंत्रात दिसले. विजय तामिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकून विजयी झाले.

दुसरीकडे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये काहीशी बेदीली माजली. कोणताही नेता पक्षाचे नेतृत्व करण्याइतका सक्षम नव्हता. त्यामुळेच करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन यांची विजयी घोडदौड सुरू झाली. त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. आता आपल्याला कोणीच प्रतिस्पर्धी नाही अशा समजुतीत अडकलेल्या स्टॅलिन यांनी केंद्र सरकारचा अत्यंत कडवा विरोध सुरू केला. त्यातूनच राज्यपालांशी भांडणे सुरू झाली. त्यांनी सनातन हिंदू धर्माविरोधी विधाने केली. स्टॅलिन स्वतःच्या मुलाला राजकारणात तर घेऊन आलेच शिवाय त्यांनी त्याला उपमुख्यमंत्रीही करून टाकले. करुणानिधी यांचा प्रभाव कुठेतरी ओसरत चालला होता. त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी कणीमोळी ही कन्या राज्यसभेत यशस्वीरीत्या पाठवली. मारन या बहिणीच्या राजकारणी कुटुंबाचा सांभाळ केला; मात्र करुणानिधी कुटुंबाच्या सर्व सत्ता हातात ठेवण्याच्या वृत्तीचा तमिळी जनतेला कंटाळा आला होता. तो कंटाळा वाढत गेला आणि विजय यांनी अचूक त्या पोकळीत स्वतःचा पक्ष लोकप्रिय करण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला. त्यांच्या पक्षाचे नावच ‘तमिल वेट्री कजगम’ म्हणजे तामिळी विजयी संघ असे आहे.

अत्यंत नव्या उमेदवारांना संधी देत निवडणुकीच्या राजकारणात हा पक्ष यशस्वी झाला. कारण, तमिळ जनतेला वेगळे काहीतरी हवे होते. इथे थोडेसे द्रविडी राजकारणाबाबत काही नोंदवायला हवे. इंदिरा गांधी यांना सत्तेच्या पदावर बसवून आपण केंद्र सरकार आणि भारताचे राजकारण चालवू अशा समजात कामराज एकेकाळी होते. इंदिरा गांधी यांनी कामराज यांचे महत्त्व कमी केले, पंख छाटले आणि त्या सर्व सत्ताधीश झाल्या. तेव्हापासून तमिळी जनता स्वओळख दाखवू लागली. हिंदीची सक्ती या विषयावर अण्णादुराई सत्तेत आले आणि त्यांच्यातून बाहेर पडलेल्यांनी ही सत्ता आजवर राखली. द्रविडी राजकारणाची पायाभरणी झाली. तमीळ प्रजा शिक्षणाने हुशार, सामाजिक आशय महत्त्वाचा मानणारी. महिलांना समाजात उत्तम स्थान; पण भारताच्या मुख्य भूमीपासून वेगळे राजकारण करण्याची या प्रदेशाला सवय झाली. प्रादेशिक वेगळेपणाच्या लाटेवर स्वार होत पुढे राजकारणाचे अध्याय रचले गेले. करुणानिधी हे पटकथा लेखक, तर एमजी रामचंद्रन हे अभिनेते. दोघे एकेकाळचे मुख्यमंत्री. दोघांनीही सिनेमा हे माध्यम सामाजिक परिवर्तनासाठी अचूक पद्धतीने वापरले.(आता उजवा परिवाराही त्यात शिरला असून ‘धुरंधर’, ‘केरळ स्टोरी’सारख्या सिनेमांची उदाहरणे आहेत.) करुणानिधी आपल्याला पक्षात योग्य स्थान म्हणजे प्रमुखपद देत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर एम. जी. रामचंद्रन 1972 मध्ये भ्रष्टाचार होतोय असा आरोप करत बाजूला झाले अन् 1977 मध्ये मुख्यमंत्री झाले. मधली 5 वर्षे ते झुंजत होते. ते पटकथाकार करुणानिधी यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय होते. कारण, ते पडद्यावर नायक म्हणून दिसत. त्यांच्या निधनानंतर लोकप्रियतेचे भांडवल करीत अभिनेत्री जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी यशस्वी राजकारण करून दाखवले. आता जोसेफ विजय यांची वेळ आहे. खेळ सुरू झाला आहे.

सध्या या प्रदेशातील 40 टक्के मतदार 40 वयोगटाखालचे आहेत. या वयोगटाला ना रामचंद्रन माहिती आहेत ना करुणानिधी. त्यामुळे कोर्‍या पाटीवर आपली अक्षरे कोरण्यासाठी विजय अत्यंत ताकदीने पुढे आले आणि घराघरात पडद्यावर पोहोचणार्‍या त्यांच्या प्रतिमेला प्रचाराचे साधन करत ते यशस्वी देखील ठरले. अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या प्रदीप गुप्ता या निवडणूक अंदाजकर्त्याचा आणि प्रशांत किशोर या निवडणूक व्यूहरचनाकाराचा अपवाद वगळता कोणालाही विजय हे तामिळनाडूतल्या जनतेने निवडलेला पर्याय आहेत, हे लक्षातच आले नाही. आता 108 जागांवर विजयी होऊन विजय यांनी स्वतः आपणच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहोत, हे जाहीर केले होते. अर्थात, निकाल लागल्यानंतर तामिळनाडूमध्ये वेगळेच काही घडण्याची शक्यताही निर्माण झाल्या होत्या. मात्र विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT