बहार

Vijaya Mehta | समृद्ध कलात्मक नाट्य कारकिर्दीचा अस्त

पुढारी वृत्तसेवा

पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, लेखक

विजयाबाई मेहता यांनी मराठी रंगभूमीला, नाट्यसृष्टीला दिलेलं योगदान अमूल्य आहे. कसलेले कलाकार घडवणारं समृद्ध विद्यापीठ म्हणजे विजयाबाई. अभिनयाचे आणि रंगमंचीय सादरीकरणाचे नवे मापदंड त्यांनी प्रस्थापित केले. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. कलाकारांकडून उत्तम काम करून घेणार्‍या दिग्दर्शिका म्हणून त्यांची ओळख होती. अभिनयातील अतिरेक टाळून संयत भावभावना व्यक्त करण्याची कला त्यांनी कलाकारांना शिकवली. बाईंना दीर्घायुष्य मिळालं. त्या समृद्ध आयुष्य जगल्या. या संपूर्ण आयुष्याचा उपयोग त्यांनी रंगभूमीची सेवा करण्यासाठी समर्पित केला. नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांसारखे अनेक कसदार अभिनेते त्यांच्या मुशीतून घडले.

मराठी रंगभूमीला आधुनिक विचारांची दिशा देणार्‍या, प्रायोगिक नाट्यचळवळीच्या प्रमुख शिल्पकार, ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि रंगकर्मी विजया मेहता यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे. जे. जे. महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीवर काही तरी नवीन प्रयोग करण्यासाठी आम्ही ‘या मंडळी सादर करू या’ या नाट्य संस्थेची स्थापना केली. त्यापूर्वी विजयाबाईंनी ‘रंगायन’ आणि पुढे अनेक संस्थांच्या माध्यमातून मराठी प्रायोगिक रंगभूमीची भक्कम पायाभरणी केली होती. १९७८ मध्ये ‘अलवरा डाकू’ हे प्रायोगिक नाटक आम्ही रंगभूमीवर आणले, तेव्हा विजयाबाईंसारख्या प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ मंडळींचे लक्ष आमच्यासारख्या नव्या दमाच्या दिग्दर्शकांकडे वळले. विजयाबाईंनी नेहमीच अशा नव्या आणि ऊर्जावान प्रयोगांचे कौतुक केले आणि तरुणांना प्रोत्साहन दिले. जयवंत दळवींसारख्या लेखकांनी लिहिलेल्या आणि विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांचे प्रचंड गारूड माझ्या मनावर होतं. विजयाबाई या मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचं एक खंबीर आणि शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जात. आम्ही कॉलेजमध्ये असताना दामू केंकरे मार्गदर्शन करायचे.

मी विजयाबाईंच्या नाटकांच्या कार्यशाळांमध्ये कधी भाग घेतला नव्हता; पण लक्ष्मीकांत बेर्डे विजयाबाईंच्या नाटकांमध्ये असल्यामुळं मला त्यांच्या रिहर्सल्स अतिशय जवळून पाहण्याची संधी मिळाली. ‘अजब न्याय वर्तुळाचा’सारख्या नाटकांमधून विजयाबाईंचं दिगदर्शन, कलावंतांचा अभिनय, त्यातील बारकावे समजून घेता आले. हे नाटक मूळ जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘द कॉकेशियन चॉक सर्कल’ या जगप्रसिद्ध नाटकाचे मराठी भाषांतर आणि रूपांतर होते. मूळ कलाकृतीला मराठी मातीचा सुगंध देऊन विजयाबाईंनी ते रंगभूमीवर आणले होते. नटांचा अभिनय, संवादांमधील अचूकता आणि सादरीकरण याबातीत त्या कमालीच्या चोखंदळ होत्या.

एकदा 'मी दुपारी ४ वाजता रवींद्र नाट्यमंदिरला येतेय', असा विजयाबाईंचा निरोप आला. आम्हाला वाटले ‘टुरटुर’ चा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी त्या येणार आहेत. त्यामुळं मी संपूर्ण टीमला ‘आज परफॉर्मन्स एकदम दमदार झाला पाहिजे, विजयाबाई स्वतः नाटक पाहायला येणार आहेत’ अशा सूचना दिल्या होत्या; पण आल्यानंतर त्या म्हणाल्या की, अरे मी गडबडीत आहे. मी तुला विनंती करायला आले आहे. तुझ्या नाटकामध्ये विजय कदम आणि विजय चव्हाण दोघेही काम करताहेत. मी ‘हयवदन’ नाटक बसवते आहे. जर्मनीच्या प्रयोगासाठी त्या दोघांना माझ्या नाटकासाठी तू देशील का? वास्तविक, त्यावेळी ‘टुरटुर’ हे नाटक नुकतंच फॉर्ममध्ये येऊ लागलं होतं. त्यामुळं मी प्रांजळपणानं सांगितलं की, बाई हे दोघेही नाटकात मुख्य भूमिकेत आहेत आणि नाटक आत्ता कुठं चालायला सुरुवात झालीय. अशा वेळी दोघांनाही तुम्ही रिप्लेस केलंत, तर मला अडचणीचं ठरेल, तरीही आपली आज्ञा म्हणून एका विजयला तुम्ही घेऊन जा.’ त्यांनाही ते म्हणणं पटलं आणि मला विजय चव्हाणला दे, विजय कदम तुझ्याकडेच राहूदे, असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार जर्मनी दौर्‍यावरून आल्यानंतर विजय चव्हाण पुन्हा ‘टुरटुर’मध्ये सामील झाला. त्या काळात लक्ष्मीकांत आणि विजय कदमची जोडी गाजत असल्यामुळं मी त्याला पाठवण्यास नकार दिला. त्यावेळच्या चर्चांमध्ये ‘तुझं नाटक बघायचं आहे; पण आज नाही जमत, क्षमा कर मला; पण मी नक्की पाहायला येईन’ असं विजयाबाई आवर्जून म्हणाल्या. नाटकाला येणं त्यांना शक्य झालं नाही; पण मी त्यांचा तो संवाद जाहिरातीमध्ये वापरला. ‘मी आवर्जून हे नाटक पाहणार आहे- विजया मेहता’ असा ठळक उल्लेख नाटकाच्या जाहिरातीत केला. ते पाहून त्यांचा मला फोनही आला; पण अतिशय खिलाडूवृत्तीने त्यांनी माझ्या व्यावसायिकपणाचं कौतुक केलं. नाना पाटेकर, मंगेश कुलकर्णी ही सगळी माझी मित्रमंडळी असल्यामुळं पुढील काळात विजयाबाईंच्या नाटकांच्या तालमी आवर्जून पाहायला जायचो.

नंतरच्या काळात 'पर्यावरण' या विषयावर त्यांचा एक सेमिनार एनसीपीएमध्ये होता. मी या विषयावर रिसर्च केल्याचं त्यांच्या कानावर पडताच त्यांचा ‘मला जरा येऊन भेट’ असा निरोप आला. भेटल्यानंतर त्यांनी ‘तू या विषयावर संशोधन केल्याचं मला समजलंय. तेव्हा तू तुझे दोन असिस्टंट घेऊन मला असिस्ट करशील कां' अशी विनंती केली. ती आज्ञा समजून मी ती संधी सोडली नाही. बाईंबरोबर काम करण्याचा सुवर्णयोग यानिमित्तानं मला मिळाला. विजयाबाईंचे काम प्रामुख्याने वास्तववादी, पारंपरिक भारतीय व पाश्चात्त्य नाट्यशास्त्राचा प्रभाव असलेले आणि संवादांच्या व अभिनयाच्या गहिरेपणावर भर देणारे होते.

‘पर्याय’ या माझ्या जयवंत दळवी लिखित नाटकामध्ये उषा नाडकर्णी, चंद्रकांत गोखले यांनी अभिनय केला होता. या सर्वांनी विजयाबाईंसोबत काम केलं होतं. त्यांच्या बोलण्यातूनही बाईंच्या प्रायोगशीलतेविषयी, वैचारिकतेविषयी खूप काही ऐकायला मिळायचं. ‘झिम्मा : आठवणींचा गोफ’ हे विजयाबाईंचे ४०० पानांचं आत्मचरित्र त्यांच्या प्रतिभासंपन्नतेवर प्रकाश टाकणारं आहे. प्रख्यात नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अल्काझी यांच्याकडून सुरू झालेले त्यांचे नाट्य शिक्षण पुढे पीटर ब्रूक यांच्यापर्यंत कसे चालत राहिले, याचा प्रवास त्यांनी यात सविस्तर लिहिला आहे. नाटककार विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू, अरविंद देशपांडे यांच्यासोबतचे त्यांचे काम, सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि त्यातून घडलेली मराठी प्रायोगिक रंगभूमी याचे दस्तावेजीकरण ‘झिम्मा’मध्ये वाचायला मिळते. बाईंना दीर्घायुष्य मिळालं. त्या समृद्ध आयुष्य जगल्या. या संपूर्ण आयुष्याचा उपयोग त्यांनी रंगभूमीची सेवा करण्यासाठी समर्पित केला.

कोणताही नाट्यप्रयोग रंगमंचावर सादर केला जातो तेव्हा तालमीमध्ये काय झालं असेल, याची सामान्य प्रेक्षकांना कल्पना नसते. मी सुरुवातीला त्यांची नाटकं सामान्य प्रेक्षक म्हणूनच पाहिली होती, तरीही त्यांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव होता. संगीत नाटकांचा काळ मागे सरून गद्य रंगभूमीचा काळ सुरू झाला, त्यावेळी एकीकडे वसंत कानिटकर, बाळ कोल्हटकर, मधुसुदन कालेलकर यांची नाटके रंगभूमीवर येत होती, तर दुसर्‍या बाजूला दामू केंकरे, नंदकुमार रावते, पुरुषोत्तम दारव्हेकर, कमलाकार सारंग यांसारख्या प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवर आलेल्यांचा एक ट्रॅक होता. या दोन्ही प्रवाहांनंतर विजयाबाई मेहता, सत्यजित दुबे, अमोल पालेकर यांच्या नाटकांनी काळ गाजवला. त्यामध्ये विजयाबाई अग्रेसर होत्या. अभिनयाचे आणि रंगमंचीय सादरीकरणाचे नवे मापदंड त्यांनी प्रस्थापित केले. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. कलाकारांकडून उत्तम काम करून घेणाऱ्या दिग्दर्शिका म्हणून त्यांची ओळख होती. अभिनयातील अतिरेक टाळून संयत भावभावना व्यक्त करण्याची कला त्यांनी कलाकारांना शिकवली. जर्मन कलाकारांना सोबत घेऊन महाकवी भास लिखित ‘मुद्राराक्षस’ हे संस्कृत नाटक पारंपरिक भारतीय शैलीत बसवण्याचा धाडसी प्रयोग त्यांनी केला.‘वाडा चिरेबंदी’ या त्यांच्या नाटकातील रिअलॅझिम पाहून मन सुन्न होऊन जायचं.

१९६० च्या दशकात व्यावसायिक नाटकांच्या साच्याबाहेर पडून काहीतरी नवे करू पाहणार्‍या तरुण पिढीचे विजयाबाईंनी नेतृत्व केले. विजय तेंडुलकर, दामू केंकरे, माधव वाटवे आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली. ही नाट्यसंस्था मराठीतील प्रायोगिक रंगभूमीची एक मोठी प्रयोगशाळा ठरली. या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेले कितीतरी रंगकर्मी व नंतर नाना पाटेकर, दिलीप कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, त्यांच्याबरोबर ‘हमीदाबाईची कोठी ’ ‘महासागर’ सारखी नाटकं करणारी नीना कुलकर्णी यांच्याकडून विजयाबाईंविषयी नेहमी ऐकायला मिळायचं. कलावंतांना व्यक्तिरेखेमध्ये कसं शिरायचं, याचं त्यांनी दिलेलं शिक्षण या कलाकार मंडळींच्या अंगी अक्षरशः मुरलं. त्या शिदोरीवरच या कलाकारांनी अजरामर कलाकृती सादर केल्या.

जाहिरातींच्या क्षेत्रात पूर्वी एमसीएम नावाची एक संस्था होती. या संस्थेतून बाहेर पडलेल्या प्रत्येक कलादिग्दर्शकाने पुढे स्वतःची संस्था काढली. तशा प्रकारे 'रंगायन'मधून आलेले प्रत्येक जण हे स्वतः एक वैयक्तिक संस्था बनले होते. अरविंद देशपांडे, रेखा सबनीस, दिलीप कोल्हटकर यांसारखे दिग्दर्शक किंवा भास्कर चंदावरकरांसारखे संगीतकार, नेपथ्यकार द. ग. गोडसे या सर्वांवर विजयाबाईंच्या मार्गदर्शनाची, विचारमूल्यांची छाप जाणवते. एखादा मातीचा घट जसा घडवला जातो, तशा प्रकारे विजयाबाईंच्या शाळेतून अनेक कलाकार सकस अभिनयाचं बाळकडू घेऊन बाहेर पडले. हे गुरुकार्य खरोखरीच विलक्षण होतं. विजयाबाईंचं योगदान आजन्म राहणार आहे. त्यांची देदीप्यमान कारकीर्द ही आमच्या पिढीला नेहमीच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरली व ठरत राहील.

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT