Anant Nag | सहजतेचा ‘अनंत’ रंग  
बहार

Anant Nag | सहजतेचा ‘अनंत’ रंग

पुढारी वृत्तसेवा

सोनम परब

ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांच्या प्रदीर्घ अभिनय प्रवासाचा अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रंगभूमीच्या तालमीतून घडलेला, समांतर सिनेमाच्या वाटेने हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आणि कन्नड चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ स्वतःची जागा टिकवून ठेवलेला कलावंत म्हणून त्यांची सिनेरसिकांना ओळख आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिताना सुपरस्टार, गाजलेले चित्रपट आणि विक्रम यांची नोंद अपरिहार्यपणे होते; मात्र या इतिहासाला आकार देणारे काही कलाकार वेगळे असतात. पडद्यावर आपण दिसावे, यापेक्षा आपण साकारलेली व्यक्तिरेखा खरी वाटावी, याला ते अधिक महत्त्व देतात. अनंत नाग हे याच जातकुळीतील अभिनेते. कन्नड चित्रपटसृष्टी हा त्यांच्या कारकिर्दीचा मुख्य प्रदेश असला, तरी हिंदीसह इतर भारतीय भाषांतील चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमांत त्यांनी आपला ठसा उमटवला. अनंत नाग यांच्या अभिनयाचे वर्णन करायचे झाल्यास ‘सहज’ हा शब्द प्रथम आठवतो. पडद्यावर सहज दिसणे हीच अभिनयातील सर्वांत कठीण गोष्ट असते. व्यक्तिरेखा जगताना अभिनेत्याने स्वतःचे अस्तित्व जाणवू द्यायचे; पण त्या व्यक्तिरेखेवर स्वतःचे व्यक्तिमत्त्व लादायचे नाही, हा तोल सांभाळणे सोपे नसते. अनंत नाग यांनी तो पाच दशकांहून अधिक काळ सांभाळला. त्यांच्या अभिनयात संवादाइतकेच दोन संवादांमधील मौन महत्त्वाचे असते. चेहर्‍यावर भावनांची गर्दी करण्याऐवजी एखादी नजर, हलकेसे स्मित, अस्वस्थता दाखवणारा छोटासा विराम यातून ते प्रसंग उभा करतात. त्यामुळे त्यांच्या भूमिका आठवताना अनेकदा अनंत नाग यांच्या आधी त्यांनी साकारलेली माणसे आठवतात. ‘स्टार’ आणि ‘अभिनेता’ यांच्यातील सूक्ष्म फरक समजून घ्यायचा असेल, तर अनंत नाग यांची कारकीर्द त्याचे उत्तम उदाहरण ठरते. त्यांना लोकप्रियता मिळाली; पण लोकप्रिय होण्याच्या अटीवर त्यांनी भूमिका निवडल्या नाहीत.

रंगभूमीची पक्की तालीम

अनंत नाग यांच्या अभिनयाची मुळे रंगभूमीत आहेत. वयाच्या १८व्या वर्षी चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनावर आधारित नाटकात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली. पुढे भगवान बुद्धांच्या जीवनावरील नाटकासह अनेक नाट्यप्रयोग त्यांनी केले. अवघ्या पाच वर्षांत ५०हून अधिक नाटकांमधून त्यांनी रंगभूमीचा अनुभव घेतला. ही तालीम पुढे त्यांच्या चित्रपटातील अभिनयातही दिसत राहिली. रंगभूमी अभिनेत्याला संवाद म्हणायला शिकवण्याबरोबरच शब्दामागचा अर्थ, देहबोली, आवाजाची पट्टी, प्रसंगाची लय आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मौनाचा उपयोग शिकवते. अनंत नाग यांच्या अभिनयातील संयमाचा धागा या रंगभूमीपर्यंत जातो. एखादी भूमिका लोकप्रिय झाली की, त्याच धाटणीच्या भूमिका स्वीकारणे हा चित्रपटसृष्टीतील नेहमीचा मार्ग; पण या मोहापासून दूर राहत अनंत नाग यांनी व्यक्तिरेखांमधील वैविध्य जपले.

कन्नड सिनेमातील स्वतःची वाट

‘संकल्प’ या कन्नड चित्रपटातून अनंत नाग यांनी फिचर फिल्ममध्ये प्रवेश केला. वाय. एन. कृष्णमूर्ती, गिरीश कर्नाड आणि जी. व्ही. अय्यर यांच्यासारख्या रंगकर्मी आणि चित्रपटकर्मींचा सहवास त्यांना लाभला. भारतीय चित्रपटांवर साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक वास्तवाचा प्रभाव ठळक होत असलेला तो काळ होता. या वातावरणात नायक म्हणजे पडद्याच्या मध्यभागी असलेली व्यक्ती, एवढी मर्यादित व्याख्या अनंत नाग यांच्या अभिनयाला लागू होत नव्हती. व्यक्तिरेखेचे कथेतले स्थान त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. संवेदनशील तरुण, सामान्य कुटुंबवत्सल माणूस, गंभीर सामाजिक व्यक्तिरेखा किंवा अनेक कमकुवतपणा घेऊन जगणारा सर्वसामान्य माणूस या सार्‍यांना त्यांनी पडद्यावर जागा दिली.

कन्नड चित्रपटसृष्टीने त्यांना मुख्य ओळख दिली; पण भाषा त्यांच्या अभिनयाच्या आड आली नाही. हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. त्यांच्या नावावर ३००हून अधिक चित्रपट आहेत. बदलत्या पिढ्यांबरोबर प्रेक्षकांची अभिरुची बदलत असताना पाच दशकांपेक्षा अधिक काळ टिकून राहणे, हे पुरस्कारांच्या आकड्यांपेक्षाही अधिक बोलके आहे.

‘अंकुर’ आणि समांतर वाट

श्याम बेनेगल यांचा ‘अंकुर’ हा अनंत नाग यांच्या हिंदी चित्रपट प्रवासातील महत्त्वाचा टप्पा. हिंदी सिनेमात त्या काळात समांतर चित्रपटांची नवी वाट आकार घेत होती. नायकाची प्रतिमा, गाणी आणि चकाकी यांच्याऐवजी कथा, सामाजिक वास्तव आणि व्यक्तिरेखा यांना केंद्रस्थानी आणणारा हा प्रवाह होता. अनंत नाग यांची अभिनयशैली या सिनेमाशी सहज जुळणारी होती. मोठ्या आवाजातील संवाद, नाटकी देहबोली किंवा ‘नायक’ असल्याची सतत जाणीव करून देण्याची त्यांना गरज भासली नाही. ते कथेचा भाग झाले आणि त्यातूनच व्यक्तिरेखा उभी राहिली. ‘अंकुर’मुळे त्यांच्या अभिनयातील हा वेगळेपणा हिंदी प्रेक्षकांसमोर आला. दुसर्‍या भाषेतील चित्रपटांतून आलेला अभिनेता अशी त्यांची ओळख फार काळ राहिली नाही. व्यक्तिरेखेच्या स्वभावाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे भाषेची सीमारेषा सहज पुसली गेली.

‘मालगुडी डेज’मधून घराघरांत

चित्रपटांबरोबर दूरचित्रवाणीने अनंत नाग यांना आणखी मोठा प्रेक्षकवर्ग दिला. आर. के. नारायण यांच्या साहित्यावर आधारित ‘मालगुडी डेज’मुळे त्यांच्या चित्रपटांशी परिचित नसलेल्या घरांमध्येही त्यांचा चेहरा पोहोचला. येथेही त्यांनी आपल्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष खेचून घेण्यापेक्षा ती भूमिका कथेच्या पोताशी मिसळून जावी, यावर भर दिला. तसे पाहता हा त्यांच्या अभिनयाचा स्वभावच राहिला. अभिनेता मागे सरकतो आणि व्यक्तिरेखा पुढे येते, तेव्हा अभिनय अधिक परिणामकारक होतो, हे त्यांच्या अनेक भूमिकांनी दाखवून दिले. अनंत नाग यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पाच वेळा मिळाला. फिल्मफेअर पुरस्कारानेही त्यांचा पाच वेळा गौरव झाला. कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार यांसह अनेक सन्मान त्यांच्या नावावर जमा झाले. २०२५मध्ये त्यांना पद्मभूषणने गौरविण्यात आले. पुरस्कार मात्र एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीचे संपूर्ण मोजमाप नसतात. ते एखाद्या वर्षाची, चित्रपटाची किंवा कामगिरीची नोंद घेतात. कलाकाराचे खरे मूल्यमापन काळ करतो.

अनंत नाग यांनी २०२३ मध्ये चित्रपटसृष्टीतील ५० वर्षे पूर्ण केली. या पाच दशकांत केवळ त्यांचे वय वाढले नाही, सिनेमा अनेकदा बदलला. चित्रपटांची भाषा बदलली, तंत्रज्ञान बदलले, निर्मितीचे अर्थकारण बदलले आणि प्रेक्षकही बदलले. सिंगल स्क्रीनची सद्दी ओसरून मल्टिप्लेक्स आले आणि त्यानंतर चित्रपट मोबाईलच्या पडद्यापर्यंत पोहोचला. या प्रत्येक बदलात अनंत नाग यांच्यासाठी भूमिका उरल्या आणि त्या भूमिकांमध्ये अनंत नाग यांच्यातील अभिनेता टिकून राहिला. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आयुष्यभर केलेल्या योगदानाची राष्ट्रीय नोंद आहे. त्यामुळे अनंत नाग यांचा रंगभूमीपासून सुरू झालेला प्रवास कन्नड चित्रपटसृष्टीत स्थिरावला. हिंदीतील समांतर सिनेमाने त्याला वेगळे वळण दिले. लोकप्रिय चित्रपटांनी मोठा प्रेक्षकवर्ग दिला आणि दूरचित्रवाणीने तो घराघरांत नेला. या प्रत्येक माध्यमात त्यांनी माध्यमाच्या गरजेनुसार स्वतःला बदलले; मात्र अभिनयातील सहजता सोडली नाही. रंगभूमीची शिस्त, साहित्याची जाण, वास्तववादी सिनेमाची संवेदनशीलता आणि सामान्य माणसाच्या वागण्या-बोलण्यातला सहजपणा यांचा संगम त्यांच्या अभिनयात कायम दिसून आला. पाच दशकांच्या या वाटचालीत त्यांनी पडद्यावर अनेक माणसे उभी केली; पण प्रत्येक वेळी त्या माणसाच्या मागे स्वतःला थोडेसे लपवले. कदाचित म्हणूनच अनंत नाग लक्षात राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT