Varditalya Manasanchya Nondi Book: महाराष्ट्राच्या पोलीस दलाचे नवे पोलिस महासंचालक (DGP) म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती झाली आहे. १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते पुढील दोन वर्षे राज्याच्या पोलीस दलाची धुरा सांभाळणार आहेत. शौर्य, अनुभव आणि कणखर प्रशासन यासाठी ओळखले जाणारे दाते केवळ अधिकारी म्हणूनच नव्हे, तर संवेदनशील लेखक म्हणूनही वेगळे ठरतात. याच संवेदनशीलतेचं प्रतिबिंब त्यांच्या पुस्तकात 'वर्दीतल्या माणसाच्या नोंदी' ठळकपणे उमटतं.
पोलीसातली नोकरी म्हणजे फक्त वर्दी, अधिकार किंवा कायद्याची अंमलबजावणी एवढ्यापुरती मर्यादित नसते. ती माणसाला आतून ढवळून काढणारी प्रक्रिया असते. कायदा राबवत असताना अनेकदा मनात प्रश्न निर्माण होतात, अस्वस्थ वाटतं. कायद्यातल्या पळवाटांमुळे चुकीच्या माणसाला फायदा होतो आणि 'नाही रे वर्गावर' अन्याय होतो, हे डोळ्यांनी पाहावं लागतं. मनातली ही घुसमट व्यक्त करता येत नाही, ना कुणाशी बोलता येते. तरीही या सगळ्यातून मार्ग काढत कर्तव्य बजावत राहावं लागतं. 'वर्दीतल्या माणसाच्या नोंदी' हे पुस्तक नेमकं याच अंतर्गत संघर्षाची, न बोलल्या जाणाऱ्या भावनांची नोंद आहे.
तीस वर्षांच्या पोलिसी सेवेत आलेले अनुभव, व्यवस्थेबद्दलचं चिंतन, समाजातील भल्या-बुऱ्या प्रवृत्तींचं निरीक्षण आणि स्वतःलाच विचारलेले प्रश्न, हे सगळं सदानंद दाते यांनी अतिशय साध्या आणि प्रामाणिक भाषेत मांडलं आहे. सदानंद दाते यांनी वर्दीतल्या माणसाला रोज येणाऱ्या अडचणी आणि मानसिक द्वंद्व वाचकांसमोर मांडलं आहे. त्यामुळे हे पुस्तक पोलीस अधिकाऱ्याचं चरित्र न वाटता एका व्यक्तीचं आत्मचिंतन वाटतं.
पुस्तकात वेगवेगळे अनुभव सांगितले आहेत. नक्षलग्रस्त भागात काम करतानाचे अनुभव, भरती प्रक्रियेत येणारा दबाव, दंगल आणि उत्सव काळातला बंदोबस्त, मुंबईसारख्या शहरात कायदा-सुव्यवस्था सांभाळताना येणाऱ्या अडचणी. प्रत्येक अनुभवातून लेखक काहीतरी शिकतो आणि वाचकालाही विचार करायला भाग पाडतो.
या पुस्तकात लेखकाने पोलीस सेवेत प्रवेश केल्यानंतरचे सुरुवातीचे दिवस, वरिष्ठांकडून मिळालेलं मार्गदर्शन, अपमानास्पद वागणूक, राजकीय दबाव, बदलीची भीती, योग्य ते करण्याची तडजोड, हे सगळं अगदी सोप्या भाषेत मांडलं आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कामा रुग्णालयात दाखवलेल्या शौर्यासाठी सदानंद दाते ओळखले जातात. त्या घटनेमुळे त्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक मिळालं. मात्र या पुस्तकात ते 'नायक' म्हणून नाही, तर त्या क्षणी मनात काय चाललं होतं, कोणती जबाबदारी डोक्यावर होती, निर्णय घेताना कोणती भीती होती, हे सगळं त्यांनी पुस्तकात मांडलं आहे.
आज ते राज्याचे पोलिस महासंचालक झाले असताना हे पुस्तक अधिक महत्त्वाचं ठरतं. कारण राज्याच्या सर्वोच्च पोलिस पदावर असलेला अधिकारी व्यवस्था फक्त चालवत नाही, तर तिच्याकडे आत्मपरीक्षणाच्या नजरेने पाहतो, हे या पुस्तकातून दिसून येतं. कायदा, सत्ता आणि माणुसकी यांच्यातील समतोल किती अवघड आहे, याची जाणीव हे पुस्तक करून देतं.
समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं 'वर्दीतल्या माणसाच्या नोंदी 'हे पुस्तक केवळ पोलीस किंवा प्रशासकीय सेवेत असलेल्यांसाठी नाही, तर समाज, व्यवस्था आणि माणूस यांचं नातं समजून घ्यायचं आहे अशा प्रत्येकासाठी आहे. वर्दीमागचा माणूस समजून घ्यायचा असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ - सदानंद दाते
समकालीन प्रकाशन, पुणे
पाने -१४४
मूल्य - २०० रुपये.