पुण्यातील हगवणे कुटुंबातील एका सुनेने वैष्णवीने सासरचा छळ असह्य झाल्यामुळे अखेर आत्महत्या केली. आत्महत्या की हत्या, हाही प्रश्नच आहे. या लग्नात 51 तोळे सोने, सात किलो चांदी, आलिशान कार, महागडे कपडेलत्ते अशी सुमारे दीड-दोन कोटी रुपयांची उधळण सासरच्या मंडळींवर होऊनही त्यांची पैशाची भूक शमली नाही. त्यांच्या मागण्यांना अंत नव्हता. त्यातून होणार्या कोंडीमुळे या तरुणीचा जीव गुदमरला आणि तिने मृत्यूला जवळ केले.
फुकटचा पैसा गिळंकृत करण्याची हाव एखाद्या कुटुंबाला किती नीचतम पातळीवर घेऊन जाते, याचे हे तिरस्करणीय उदाहरण. हगवणे परिवाराला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांची आर्थिक स्थिती आधीपासूनच भक्कम आहे. या ना त्या कारणाने जवळ आलेला पैसा... त्यानंतर राजकीय नेत्यांशी निर्माण झालेले लागेबांधे आणि त्यासाठी लागणारा पैसा असे हे चक्र आहे अन् हा पैसा मिळवायचा, तर घरी आलेल्या सुनेकडे पैशाचे एक साधन म्हणून पाहणे ही संस्कृती पुण्याच्या आसपास चांगलीच बाळसे धरू लागली आहे. हगवणे यांच्या या सुनेने तर शब्दशः लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश केला होता. तिच्यावरील प्रेमापोटी माहेरच्यांनी जावयासाठी खर्चात कोठेही काटकसर केली नाही. हा प्रेमविवाह होता. त्यामुळे नवदाम्पत्याची मने आधीपासूनच जुळली होती, तरीही हे नातेसंबंध क्षणभंगूर ठरावेत, ही मोठी शोकांतिका आहे.
पोलिसांचा थंड प्रतिसाद : वैष्णवी हिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय अचानक घेतला, असे घडलेले नाही. सासरी होणार्या जाचाची कल्पना तिने वेळोवेळी माहेरी दिली होती. आपल्या मुलीचा छळ थांबावा, यासाठी तिचे वडील वेळोवेळी आर्थिक झळ सोसून हगवणे कुटुंबाला पैसे पुरवीत होते. तिला चांगली वागणूक मिळावी, म्हणून त्यांची याचना करीत होतेय; पण त्याचा उपयोग झाला नाही. अशा गोष्टी शक्यतो घरगुती पातळीवर मिटविण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न असतो. तसा तो येथेही झाला. तथापि, संबंधितांच्या हटवादी वागण्यामुळे समस्या अधिक चिघळत गेली. त्यामुळे वैष्णवीने मध्यंतरी पोलिसांकडे फिर्यादही नोंदविली; पण अधिकार्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कारवाई करण्याऐवजी फिर्यादीची बोळवण केली. या सगळ्याची परिणती एका जिवाचा अंत होण्यात झाली.
अंतिम आधार माहेरचा : पीडित विवाहितेने एखाद्या तत्कालिक घटनेमुळे अचानक भावनेच्या उद्रेकात आत्महत्या केली, असे आजवरच्या घटनांत सहसा आढळत नाही. हे शेवटचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने तिच्या परीने या परिस्थितीशी झगडण्याचा प्रयत्न केलेला असतो. अशा संकटात तिला मुख्य आधार असतो माहेरचा; परंतु अनेकदा तेथूनही निराशा पदरी पडते. तिला आपल्याकडे बोलवावे किंवा नाही, याविषयी खुद्द आई-वडील साशंक असतात. मुलगी कायमची माहेरी आली, तर आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. मोठ्या मुलीचा संसार विस्कटल्याचे बाहेर कळाल्यावर तिच्या धाकट्या बहीण, भावंडांचे लग्न जुळवण्यात अडचण येईल. आपल्या सुनेचे आणि माहेरी परतलेल्या परित्यक्ता मुलीचे कसे जुळणार? मुलीच्या निर्वाहाचा कायमस्वरूपी भार कसा उचलणार, अशा अनेकविध चिंता पालकांना सतावत असतात. त्यामुळे तिने तडजोड करून सासरीच राहावे, हे तिच्या गळी उतरविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सासरी नांदणे अशक्य झाले आहे. माहेरचा आसरा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. पोलिस आपल्याला न्याय देण्याऐवजी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सासरच्या कुटुंबाला पाठीशी घालत आहेत. अशा स्थितीत ती महिला पूर्ण हतबल होऊन जाते. आता जगण्यासाठी कसलाच पर्याय उरलेला नाही, अशी तिची धारणा होते. या वैफल्यग्रस्त अवस्थेत अनेक असहाय महिला मरणाला कवटाळतात; मात्र ज्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहतात किंवा ज्यांना माहेरची, आप्तांची साथ मिळते, त्या या संकटात तरून जातात.
दोन्ही सुनांना जाच : वैष्णवीच्या प्रकरणाबाबत प्रशासनाने अक्षम्य ढिलाई केल्याचे दिसते. तिची मोठी जाऊ मयुरी हिलाही हगवणे कुटुंबात त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्याबद्दल तिने पोलिसांत तक्रार केली होती. (वैष्णवीची फिर्याद त्यानंतरची) पण, मयुरीला त्यांच्याकडून कसलेही साह्य मिळाले नाही. दोन्ही जावांना पोलिसांच्या वाईट कार्यपद्धतीचाच अनुभव आला. नंतर मयुरीने ते घर सोडले. (मयुरीच्या म्हणण्यानुसार तिचा पती तिच्या बाजूने आहे. तिला अधिक जाच सहन करावा लागू नये, म्हणून त्यानेच तिला माहेरी आणून सोडले.) ती गेल्या काही महिन्यांपासून माहेरी राहत आहे.
मयुरीने केलेल्या पहिल्या तक्रारीच्या वेळी पोलिसांनी हगवणे कुटुंबाला कायद्याचा धडा शिकवला असता, तर त्यांनी पुढे दुसर्या सुनेशी-वैष्णवीशी कदाचित दुर्वर्तन केले नसते आणि तिच्यावरचे संकट टळले असते; पण आता या सर्व जर-तरच्या गोष्टी झाल्या आहेत. या प्रकाराचा शेवट असा जीवघेणा होईल, याचा विचारही कधी कोणी केला नसेल. त्यात वैष्णवीचे जेमतेम काही महिन्यांचे बाळ आपल्या आईच्या मायेला कायमचे पारखे झाले आहे. त्याला जबाबदार कोण? कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना बहुधा कायदा व सुव्यवस्थेच्या पातळीवरील अनास्था, असंवेदनशीलता कारणीभूत असते. तीत नजीकच्या काळात सुधारणा होईल, अशी सद्यस्थिती नाही. तो विषय सर्वसामान्य नागरिकांच्या हातातील नाही; पण अशा प्रसंगांत किमान कुटुंबाच्या स्तरावर पीडित मुलीला माहेरचा आधार मिळाला, तर तिला मानसिकद़ृष्ट्या सावरायला बळ मिळू शकते. यात तिच्या आई-वडिलांची, भावंडांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.
विवाहित मुलगी कायमची घरी आली, तर समाज काय म्हणेल, याची चिंता तिच्या पालकांना प्रामुख्याने असते. सामाजिक पत या संकल्पनेचा एवढा पगडा त्यांच्यावर असतो की, त्यापुढे काही वेळा मुलीच्या सुखाचा विचार मागे पडतो. कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता मुलीने आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाह करणे, आर्थिकद़ृष्ट्या कनिष्ठ स्तरातील मुलाला जोडीदार म्हणून निवडणे, हा घरच्यांच्या द़ृष्टीने घोर अपराध असतो. त्यातून पोटच्या मुलीचा, जावयाचा खून करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. सामाजिक प्रतिष्ठेसंदर्भातील भ्रामक कल्पना, हे त्यामागील एक मुख्य कारण आहे. त्याला अवाजवी महत्त्व न देता आपल्या कन्येच्या जीवापेक्षा, हितापेक्षा अन्य कोणतीही गोष्ट मोठी नाही, हे नीट उमजून घेतल्यास संकटग्रस्त महिलांचे आयुष्य सावरू शकते.
हुंडा की सप्रेम भेट? : लग्नात हुंडा देऊ नये आणि घेऊ नये, असे कायदा सांगतो; पण आता काळानुसार हुंड्याचेही स्वरूप बदलले आहे. वधुपित्याने लग्नात नवदाम्पत्याला सोने-चांदी, महागडी कार, बंगला वा फ्लॅट दिला, तर तो हुंडा मानायचा की सप्रेम भेट? परस्पर सहमतीने, स्वेच्छेने अशी देवाण -घेवाण झाली, तर कोणी तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही; परंतु आपल्या ऐपतीनुसार किंवा कुवतीबाहेर जाऊन मानपान करूनही मुलीला सासरी सुख मिळत नसेल, तिचा छळ होत असेल, तर तिने किती काळ हे सहन करायचे?
खूप प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारत नसेल, तर माहेरच्यांनी खंबीरपणे मुलीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असते. आपण लग्नानंतरही आई-वडिलांना परके झालेलो नाही, हा विश्वास तिला कायम वाटत राहिला पाहिजे. अशी खात्री असलेली कोणतीही महिला प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना विमनस्क होऊन वेडावाकडा निर्णय घेणार नाही. उलट जन्मदात्यांच्या पाठबळावर आयुष्यात एक नवे पर्व सुरू करण्याची उमेद तिला मिळू शकेल. वडील आणि मुलगी यांचे परस्पर विश्वासाचे नाते किती घट्ट असू शकते, यासंदर्भातील एक व्हिडीओ क्लिप काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर प्रसृत झाली होती. संबंधित मुलीचा सासरी छळ होत असल्यामुळे तिचा संसार मोडतो आणि तिला ते घर सोडावे लागते. त्यावर तिच्या वडिलांनी काय करावे? त्यांनी तिला चक्क बँडबाजासह वाजत-गाजत, फुलांची उधळण करीत आपल्या घरी आणले. बाप असा असावा! संकटात मुलीच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा!