Vaibhav Suryavanshi | षटकारांच्या वादळाने इतिहास घडवणारा ध्रुवतारा! file photo
बहार

Vaibhav Suryavanshi | षटकारांच्या वादळाने इतिहास घडवणारा ध्रुवतारा!

सिक्सर किंग वैभव सूर्यवंशी!

पुढारी वृत्तसेवा

विवेक कुलकर्णी

मैदानावर दुपारचं ऊन तापलेलं असो किंवा सायंकाळच्या फ्लडलाईटस्चा प्रकाशझोत. वैभव सूर्यवंशी नावाचा युवा तारा क्रीझवर उतरतो, त्यावेळी एक ठरलेलं असतं, ते म्हणजे टोलेजंग षटकारांची मनमुराद आतषबाजी! वय अवघे 14 वर्षे; पण एकदा बॅट हाती घेतली की, ती अगदी कसलेल्या फलंदाजांना लाजवेल इतकी तळपते! टीन एजमध्ये असतानाही तो एखाद्या अनुभवी योद्ध्यासारखा वाटतो. गोलंदाज आपला रनअप घेऊन चेंडू टाकतो आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच वैभवच्या भात्यातून निघतो तो थेट सीमारेषेबाहेर षटकार!

भारतीय क्रिकेटला अलीकडेच गवसलेला हा एक असामान्य हिरा, म्हणजेच वैभव सूर्यवंशी. वयाने लहान असला तरी, त्याच्या फलंदाजीत प्रगल्भता अगदी ठासून भरलेली आहे. त्याचा फलंदाजीतील धडाका आणि आत्मविश्वास अवघ्या क्रिकेट वर्तुळासाठी लक्षवधी ठरतोय. आयपीएलमध्ये साधारणपणे साठ-एक हजार प्रेक्षकांच्या साक्षीने पदार्पणातील आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचणे भल्याभल्यांनाही जमणार नाही. पण, ती मदुर्मकी ताज्या दमाच्या वैभव सूर्यवंशीने गाजवली. त्याचे सळसळते रक्त, जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्याची दुर्दम्य महत्वाकांक्षा अशीच कायम राहिली तर भविष्यातील सुपरस्टार जणू घडलेलाच असेल, हे आजचे संकेत!

वैभवने नुकत्याच झालेल्या यू-19 मालिकेत 41 षटकार ठोकून सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला. याआधी अनमुक्त चंदच्या नावावर 38 षटकारांचा विक्रम होता. दहा डावांतच हा पराक्रम करून वैभवने जगभरात चर्चेचं केंद्रस्थान मिळवलं. अर्थात, केवळ हाच नव्हे, तर त्याचे इतर विक्रमदेखील तितकेच थक्क करणारे आहेत. इंग्लंड दौर्‍यात 350+ धावा, त्यात 143 धावांची झंझावाती शतकी खेळी. भारतीय यू-19 इतिहासातील अवघ्या 58 चेंडूंत शतक. रणजी पदार्पण 12 वर्षे 284 दिवसांवर - सर्वात तरुणांपैकी एक. 13 व्या वर्षी टी-20 पदार्पण, तर 14 व्या वर्षी आयपीएल पदार्पण. त्यातही पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्याचा पराक्रम. विक्रमांची ही मांदियाळी त्याचे मोठेपण अर्थातच अधोरेखित करणारी.

आयपीएलमध्ये 35 चेंडूंत शतक झळकावताना त्याने तब्बल 11 षटकार खेचले आणि आपण नवज्योत सिंग सिद्धूच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचाच जणू निर्वाळा दिला. वैभवच्या फलंदाजीत कमालीचं सातत्य. त्यामुळे तो फलंदाजीला आला की, वातावरणच बदलतं. प्रेक्षकामधून ‘सिक्स सिक्स सिक्स’चा गजर सुरू होतो. गोलंदाजावर दडपण वाढत राहते आणि तिकडे वैभवच्या भात्यातून एकापेक्षा एक उत्तुंग षटकारांची आतषबाजी सुरू होते. वैभव सूर्यवंशीच्या खेळाचे वर्णन करताना अलीकडेच एका समालोचकाने म्हटले होते, हा मुलगा फक्त क्रिकेट खेळत नाही, तो नवं युग लिहितोय!

एका प्रेक्षकाने सामना संपल्यानंतर सांगितलं, आम्ही विराट, धोनी पाहिले; पण या वयात अशी निर्भय खेळी कधी पाहिली नव्हती. वैभव म्हणजे पुढच्या पिढीचा सचिन. गावोगावी क्रिकेटच्या गल्ल्यांमध्ये आता त्याचं नाव घेतलं जातं. मुलं बॅट हातात घेऊन म्हणतात, ‘आज मी वैभवसारखा खेळणार!’ वैभव अजून लहान आहे; पण त्याची स्वप्नं विराट आहेत. शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास यांचा मिलाफ त्याच्यात दिसतो. तज्ज्ञांचं मत आहे की, पुढील काही वर्षांत तो भारतीय संघाचा मुख्य आधारस्तंभ ठरू शकतो. त्याची फलंदाजी पाहताना असं वाटतं, हा तरुण क्रिकेट फक्त खेळत नाही, तर त्याच्यावर प्रेम करतो. वैभव सूर्यवंशीच्या खेळात केवळ ताकद नाही, तर जिद्द आणि निखळ आनंद आहे. त्याच्या प्रत्येक षटकारासोबत तो लाखो हृदयात आशा निर्माण करतो. भारतीय क्रिकेटला मिळालेला हा षटकारांचा सम्राट पुढील वर्षांत किती विक्रमांची फटाके फोडेल, याचीच आता असेल खरी उत्सुकता!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT