US China Russia Summit | त्रिपक्षीय परिषदेचे फलित काय? Mark Schiefelbein
बहार

US China Russia Summit | त्रिपक्षीय परिषदेचे फलित काय?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. योगेश प्र. जाधव

अमेरिका, चीन आणि रशिया यांसारखे देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासारख्या संस्थांना कमकुवत करण्याची भाषा करत असताना, भारत मात्र नियमाधारित जागतिक व्यवस्थेचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणांचा आग्रह धरत आहे. जगातील एक षष्ठांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारताला निर्णय प्रक्रियेत समान स्थान दिल्याशिवाय कोणत्याही जागतिक कराराला किंवा शांतता प्रक्रियेला वैधता प्राप्त होऊ शकत नाही.

अमेरिका, चीन आणि रशिया या तीन देशांच्या प्रमुखांची शिखर परिषद नुकतीच चीनमध्ये पार पडली. ऐतिहासिक मानल्या जाणार्‍या त्रिपक्षीय शिखर संमेलनात डोनाल्ड ट्रम्प, शी झिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन या तिन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व बहुपक्षीय संबंध सुधारणे, तेलाचा पुरवठा वाढवणे आणि अण्वस्त्रांचा साठा कमी करण्यासाठी संवाद सुरू करण्यावर सहमती दर्शवली. बैठकीचे यजमानपद भूषवणार्‍या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या भेटीला सकारात्मक, रचनात्मक आणि फलदायी संबोधले; तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिन्ही नेते खर्‍या अर्थाने इतिहास घडवत असल्याचा दावा केला. युक्रेन युद्धानंतर अमेरिका व युरोपियन देशांनी हजारांहून अधिक निर्बंध लादल्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था डबघाईला आल्याचा, रशियाचा जागतिक प्रभाव ओसरत चालल्याचा दावा पश्चिमी जग करत होते; पण या शिखर परिषदेने जागतिक राजकारणातील रशियाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले.

फेब्रुवारी १९४५ मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात क्रिमियातील याल्टा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट, ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि सोव्हिएत युनियनचे नेते जोसेफ स्टॅलिन यांनी एकत्र येऊन तत्कालीन जगाची पुढील राजकीय आणि भौगोलिक मांडणी निश्चित केली होती. या ऐतिहासिक परिषदेत लहान देशांचे भवितव्य आणि जगाचे प्रभाव क्षेत्र हे मूठभर बलाढ्य नेत्यांच्या बंद दाराआडच्या समझोत्यातून ठरवले गेले. यातूनच पुढे शीतयुद्धाचा पाया रचला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पार पडलेल्या परिषदेला याल्टा २.० असे संबोधण्यात आले असले तरी वर्तमानातील विश्वरचना पाहता ते सयुक्तिक ठरणारे नाही. कारण या तीन महाशक्तींच्या एकत्र येण्याने जागतिक प्रश्नांची उकल होऊ शकत नाही. विशेषतः एकविसाव्या शतकातील कोणतीही नवी जागतिक व्यवस्था ही भारताच्या सहभागाशिवाय आणि भारताला वगळून आकाराला येऊच शकत नाही, हे वास्तववादी सत्य आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणारा, सर्वाधिक लोकसंख्या असणारा आणि जगभरातील अर्थव्यवस्था आकुंचन पावत असतानाही वेगवान प्रगती करणारा भारत हा जागतिक सत्ता समीकरणांचा अजेंडा ठरवणारा देश आहे. किंबहुना, या तिन्ही महाशक्तींच्या अर्थव्यवस्थांची घोडदौड भारताशिवाय पुढे सुरू राहू शकणार नाही हे ढळढळीत सत्य आहे. त्यामुळे भारताला वगळून आयोजित केलेल्या चीनमधील या परिषदेला याल्टाची दुसरी आवृत्ती म्हणता येणार नाही हे निश्चित.

या त्रिपक्षीय संमेलनाचे वरवरचे स्वरूप अत्यंत आशादायी भासवण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांकडून करण्यात आला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला युक्रेन संघर्ष आणि इतर आंतरराष्ट्रीय विवाद सोडवण्याच्या बाबतीत तिन्ही देशांचे अनेक हितसंबंध समान असल्याचे प्रतिपादन केले. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा अबाधित राखण्याची जबाबदारी या तीन देशांचीच असल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, शी जिनपिंग यांनी अणुयुद्ध टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करत अण्वस्त्रांवर पूर्णपणे बंदी घालून ती नष्ट करण्याची भाषा केली. अणुयुद्ध कधीही जिंकता येत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये, असे तत्त्वज्ञान जिनपिंग यांनी मांडले. ट्रम्प यांनीही जगातील या तीन सर्वात मोठ्या अण्वस्त्रधारी शक्तींनी अण्वस्त्र कपातीवर चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु, या तिन्ही आवाहनांमागील विसंगती आणि स्वार्थ त्यांच्याच संयुक्त भूमिकेतूनच उघड झाला. या संमेलनात तिन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. सरकारी अधिकार्‍यांना या न्यायालयाच्या कायदेशीर कारवाईपासून पूर्णपणे सूट मिळाली पाहिजे आणि न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राचा दुरुपयोग करू नये, असा इशारा तिन्ही नेत्यांनी दिला. ट्रम्प यांनी तर या न्यायालयाला नियंत्रणाबाहेर गेलेली संस्था म्हणून हिणवले. २०२३ मध्ये याच न्यायालयाने युक्रेनमधील युद्धगुन्ह्यांच्या आरोपाखाली पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते, हे विसरता कामा नये. त्यामुळे जागतिक शांततेपेक्षाही आपापल्या नेत्यांना आणि धोरणांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कचाट्यातून वाचवणे, हाच या तीन महाशक्तींचा समान अजेंडा असल्याचे स्पष्ट होते.

या शिखर परिषदेनंतर तिन्ही देशांनी एक शांतिपत्रक जारी केले असले, तरी त्यातील मौन बोलके आहे. या घोषणापत्रात युक्रेन आणि इराणमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धांचा साधा उल्लेखही नाही. विशेष म्हणजे, या दोन्ही संघर्षांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हेच तिन्ही देश जबाबदार आहेत. परिषदेच्या पूर्वार्धात या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले असले, तरी अमेरिकेने यासंदर्भात कोणताही अधिकृत दस्तऐवज प्रसिद्ध केलेला नाही. प्रत्यक्षात या तिन्ही राष्ट्रप्रमुखांना आपल्या स्पर्धकांवर दबाव निर्माण करावयाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीतून पुतीन यांनी युक्रेनवरचा दबाव वाढवला आहे; तर जिनपिंग यांच्याशी मैत्रीबंध दाखवत ट्रम्प यांनी इराण आणि भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनही या परिषदेचा उपयोग भारत, जपान आणि तैवानला इशारा देण्यासाठी करणार आहे.

या बैठकीच्या आड दडलेले अमेरिका आणि चीनमधील तणावही लपून राहिलेले नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील वर्चस्वावरून दोन्ही देशांमधील स्पर्धा गेल्या काही आठवड्यांत कमालीची तीव्र झाली आहे. एनव्हिडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी वैयक्तिक कारणास्तव पदत्याग केल्यानंतर, त्यांच्याशी संबंधित एलिस हुआंग यांच्या पूर्वीच्या कंपनीने चिनी कंपन्यांना अत्याधुनिक चिप्स पुरवल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. चीनने एलिस हुआंग या आपल्या हस्तक असल्याचा आरोप नाकारला असला, तरी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा हा मुद्दा अमेरिकेसाठी कळीचा आहे. असे असूनही ट्रम्प यांनी चीनवर अधिक कठोर निर्बंध लादण्याचे टाळले. मागील वर्षी ट्रम्प आणि जिनपिंग यांच्या भेटीत चीनने अमेरिकेकडून अधिक कृषी उत्पादने खरेदी करण्याचे आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या दुर्मीळ खनिजांच्या विक्रीवरील निर्बंध शिथिल करण्याचे आश्वासन दिले होते. चीनने हे आश्वासन पूर्णपणे पाळलेले नसतानाही ट्रम्प यांनी घेतलेली नरमाईची भूमिका अमेरिकेची व्यापार तूट आणि आर्थिक हतबलता दर्शवणारी आहे. शिन्हुआ या चिनी सरकारी वृत्तसंस्थेनुसार, जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्याशी तैवानच्या मुद्द्यावरही चर्चा केली आणि आर्थिक व व्यापारिक संवाद सुधारण्याची गरज व्यक्त केली.

अण्वस्त्र कपातीबाबत बोलणे आणि प्रत्यक्ष अण्वस्त्र कपातीसाठी करार करणे यात मोठे अंतर आहे. या बैठकीत अण्वस्त्र नियंत्रणासाठी ठोस कालमर्यादा, पडताळणीची यंत्रणा किंवा परस्पर बंधनकारक निर्णय जाहीर झालेले नाहीत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, परस्पर विश्वास आणि स्वतःच्या लष्करी महत्त्वाकांक्षांवर मर्यादा घालण्याची तयारी लागते. या तिन्ही बाबींची कसोटी अजून बाकी आहे. दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना युद्धगुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहारासारख्या गंभीर अपराधांसाठी जबाबदार व्यक्तींना उत्तरदायी धरण्यासाठी झाली. राष्ट्रप्रमुख असो किंवा सामान्य नागरिक, गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत कायद्यापुढे उत्तरदायित्व असावे, ही या व्यवस्थेची मूलभूत भूमिका आहे. असे असताना धाकदपटशाही करून या न्यायालयालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात असेल तर जागतिक स्तरावरील गुन्ह्यांचा न्याय मागायचा कुणाकडे? दुसर्‍या महायुद्धानंतर जगाने युद्धाचा धोका कमी करण्यासाठी आणि देशांमधील संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय न्यायालये आणि विविध बहुपक्षीय संस्था उभ्या केल्या. या व्यवस्थेत त्रुटी आहेत. महासत्तांच्या राजकीय प्रभावामुळे अनेकदा निर्णयांची अंमलबजावणी होत नाही.

सुरक्षा परिषदेतील नकाराधिकारामुळेही अनेक गंभीर प्रश्न अनिर्णीत राहतात. तरीही आंतरराष्ट्रीय नियम आणि संस्थांची आवश्यकता संपलेली नाही. उलट, लष्करी सामर्थ्य आणि आर्थिक वर्चस्वाच्या जोरावर निर्णय लादण्याची प्रवृत्ती वाढत असताना या संस्थांचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा वेळी आंतरराष्ट्रीय कायदा हा दुर्बल देशांसाठी बंधनकारक आणि महासत्तांसाठी ऐच्छिक, अशी व्यवस्था निर्माण होणे धोकादायक आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या अधिकारांवरच मर्यादा आणण्याचा प्रयत्न झाला, तर त्याचा सर्वाधिक फायदा बलाढ्य देशांच्या नेतृत्वाला होईल. अमेरिका, चीन आणि रशिया या तिन्ही देशांनी जागतिक शांततेची जबाबदारी स्वीकारण्याची भाषा करणे स्वागतार्ह आहे; पण ही जबाबदारी स्वीकारायची असेल, तर स्वतःच्या कृतींचीही तपासणी होऊ देण्याची तयारी दाखवावी लागेल. दुसर्‍या देशाने आक्रमण करू नये, असे सांगताना स्वतःच्या लष्करी कारवायांचे समर्थन करण्यासाठी वेगळे निकष लावणे हा दुटप्पीपणा आहे. महासत्तांनी शांततेचे नेतृत्व करायचे असेल, तर सर्वप्रथम स्वतःला नियमांच्या चौकटीत बांधून घेण्याची तयारी दाखवावी लागेल. अन्यथा, ही ऐतिहासिक बैठक जागतिक शांततेचा प्रारंभ ठरण्याऐवजी महासत्तांनी एकत्र येऊन स्वतःच्या सत्तेला संरक्षण देण्याचा प्रयत्न म्हणूनच इतिहासात नोंदली जाईल.

वास्तविक जागतिक शांतता आणि स्थैर्याच्या प्रश्नावर भारताची भूमिका या तिन्ही देशांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अधिक नैतिक पायावर उभी आहे. अमेरिका, चीन आणि रशिया यांसारखे देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासारख्या संस्थांना कमकुवत करण्याची भाषा करत असताना, भारत मात्र नियमधारित जागतिक व्यवस्थेचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणांचा आग्रह धरत आहे. जगातील एक षष्ठांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारताला निर्णय प्रक्रियेत समान स्थान दिल्याशिवाय कोणत्याही जागतिक कराराला किंवा शांतता प्रक्रियेला वैधता प्राप्त होऊ शकत नाही. हवामान बदल, दहशतवादविरोधी लढा, सायबर सुरक्षा आणि अन्न व ऊर्जा सुरक्षा यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना भारताच्या सक्रिय सहभागाशिवाय अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही मंचावर ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन यांनी एकत्र येऊन कितीही ऐतिहासिक घोषणा केल्या, तरी त्यातून निर्माण होणारी व्यवस्था ही तात्पुरती तडजोडच ठरण्याची शक्यता अधिक आहे. कारण या तिन्ही देशांमध्ये परस्परांप्रती असलेला अविश्वास, न सुटलेले प्रश्न आणि आर्थिक वर्चस्वाची स्पर्धा ही कोणत्याही क्षणी उफाळून येऊ शकते. याउलट भारत हा लोकशाही मूल्ये, आर्थिक गतिमानता आणि वसुधैव कुटुंबकम् या तत्त्वांवर आधारित सर्वसमावेशक विकासाचा पुरस्कार करणारा देश आहे. भारताला वगळून आखलेला कोणताही जागतिक नकाशा हा अपूर्ण आणि अस्थिरच राहणार, यात तीळमात्र शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT