बहार

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कायापालट

Arun Patil

[author title="संजय पाठक" image="http://"][/author]

तीर्थक्षेत्र पंढरपूरचे विठ्ठल मंदिर मध्यंतरीच्या काही काळात केलेल्या विविध बदलांमुळे त्याचे प्राचीनत्त्व हरवून बसले होते. शासनाच्या मान्यतेनंतर पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली. विशिष्ट पद्धतीने गरम वाळू व अत्याधुनिक मशीनद्वारे मंदिराच्या मूळ बांधकामास अजिबात धोका न पोहोचता ऑईलपेंट काढल्यानंतर मंदिराचे मूळ, प्राचीन देखणेपण समोर आले आहे.

कुंकू-बुक्क्याचं पंढरपूर, अरुंद बोळांचं पंढरपूर, कायम गर्दीचं पंढरपूर, ?
भूवैकुंठ पंढरपूर, संतं-महंतांचं पंढरपूर… याबरोबरच सर्वात मोठी ओळख म्हणजे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचं पंढरपूर, अशी तीर्थक्षेत्र पंढरपूरची ख्याती आहे.

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा नव्हती गंगा, गोदा । तेव्हा होती चंद्रभागा ॥

असे पंढरपूर शहराचे वर्णन संत-महंतांच्या रचनेमध्ये आढळते. या शहरास एक प्राचीन वारसा आहे, आध्यात्मिक पाया आहे. अर्थातच, तो श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या अतिप्राचीन मंदिरामुळेच आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र पंढरपूरचे मंदिर मध्यंतरीच्या काही काळात केलेल्या विविध बदलांमुळे त्याचे प्राचीनत्त्व हरवून बसल्याची ओरड होत होती. या पार्श्वभूमीवर, दाक्षिणात्य मंदिरांनुसार तीर्थक्षेत्र पंढरपूरच्याही मंदिराचेही प्राचीनत्त्व, अस्सलपणा जपला जावा, त्याचे मूळ रूप पुन्हा द़ृष्टीस पडावे यासाठी काम करण्यात यावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मंदिर समिती, संबंधित शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींनी विचाराधीन घेतला अन् त्यातून पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून शासनाकडे मंदिर दुरुस्ती, मजबुतीकरण आणि मंदिरास प्राचीन रूप पुन्हा प्राप्त करून देण्यासाठीचे वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्यात आले.

या प्रस्तावांस हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुरातत्त्व खात्याच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली. यामध्ये सर्वात प्रथम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास बाहेरून दिलेला ऑईलपेंट काढण्याचे काम हाती घेण्यात आले. विशिष्ट पद्धतीने गरम वाळू व अत्याधुनिक मशीनरीद्वारे मंदिराच्या मूळ बांधकामास अजिबात धोका न होता, तो ऑईलपेंट काढल्यानंतर मंदिराचे मूळ, प्राचीन देखणेपण समोर आले. दक्षिण भारतातील मंदिरांशी साधर्म्य असणारी विठ्ठल मंदिराची बांधणी यानिमित्ताने समोर आली. त्यानंतर मंदिराच्या आतील बाजूस मजबुतीकरण, दुरुस्तीसह मंदिराचे मूळ रूप समोर यावे यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पहिल्या टप्प्यात 73 कोटींची तरदूत करून घेण्यात मंदिर समितीस यश आले. त्यातून सध्या मंदिरात सुरू असलेली कामे पुरातत्त्व खात्याच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. यासाठी मंदिराच्या बांधकामाचा भक्कमपणा, दगडासह विविध तपासण्या झाल्या. मगच 14 जानेवारी 2024 पासून किरकोळ कामांना प्रारंभ करण्यात आला. पुढे 17 मार्च 2024 पासून मंदिर दिवसातील अल्पकाळासाठी बंद ठेवत तसेच पद्स्पर्शाऐवजी मुखदर्शनास प्राधान्य देत, गाभार्‍यासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांच्या कामास आरंभ करण्यात आला. या कामाचा कालावधी 32 महिने ठरवण्यात आला आहे. तरी प्रत्यक्षात हे काम थोडेफार लांबू शकते, अशी सद्य:स्थिती आहे.

मंदिरात रात्रंदिवस काम सुरू

मंदिरातील बाजीराव पडसाळी, चारखांबी, सोळखांबी, सभा मंडप, हत्ती दरवाजा, महालक्ष्मी मंदिरासह समोरील भाग, श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिराचे गाभारे, परिवार देवतांच्या मंदिरांचा काही भाग याठिकाणी सध्या दुरुस्ती, मजबुतीकरण आणि मंदिरास प्राचीन रूप पुन्हा प्राप्त करून देण्यासाठीचे काम सुरू आहे. ग्राऊंड फ्लोअर बदलणे, मंदिराच्या छतावरील अलीकडच्या काळात केलेले बांधकाम उतरवणे, कौले बदलणे, मंदिराच्या भिंतीतून निसटलेले दगड बदलणे, दर्जा भरणे आदींसह मंदिरास प्राचीन रूप देण्यासाठी जे जे काही आहे ते करण्याची कामे सध्या सुरू आहेत. या कामासाठी सध्या सुमारे शंभर कारागीर कार्यरत आहेत. ते सकाळी आठपासून काम सुरू करत असून, रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत काम सुरू असते.

प्राचीन, सुबक मूर्तींचे रूप खुलले

मंदिरातील प्राचीन खांबांवरील शिल्पं अधिक उठावदारपणे दिसावीत यासाठी त्यावर सँड ब्लास्टिंग करण्यात आले. यामुळे त्या शिल्पांवरील विविध थर, रंगरंगोटी निघून गेली. अन्य नाजूक कामे पुरातत्त्व खात्याच्या लोकांनी हाताने पूर्ण केल्याने मंदिरातील विविध खांबांवर असणार्‍या गणेश, मारुती, नृसिंह, शेषशायी अवतारातील नारायण, नागराज, स्वस्तिक, शंख, चक्र, गदा, पद्म यांसारख्या मूर्ती, शिल्पं आता खूप सुंदरपणे, ठळकपणे समोर आली आहेत. कोणत्याही खांबाला, मूर्तीला, कमानीला किरकोळही इजा न होता काम सुरू आहे. यासाठी मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी व पुरातत्त्व खात्याचे लोक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

गाभार्‍यातील कट्टे काढले

दोन्ही गाभार्‍यांतील देवाजवळ बसणार्‍यांसाठी कट्टे, मूर्तिंभोवतीच्या मेघडंबरीसह गाभार्‍यातील ग्रेनाईट काढण्याचे काम अतिशय नाजूकपणे व काळजीपूर्वक करण्यात आले आहे. दोन्ही मुख्य मूर्तींच्या बाजूला बसण्यासाठी कट्टे नंतर बसवण्यात येणार आहेत. ते दगडी करण्यात येणार आहेत. यापुढे मंदिरात वीट हा प्रकार कुठेच दिसणार नाही. जे काही असेल ते सर्व दगडाचेच आणि प्युअर स्टीलचे असेल. या सर्व कामांसाठी मंदिरात वापरण्यात येणारे दगड नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून आणण्यात आले आहेत.

स्लॅब उतरवल्याने ओझे झाले कमी

बाजीराव पडसाळीवरील स्लॅब काढून त्यावर डोम करण्यात आला आहे. यामुळे मंदिराच्या छतावरील ओझे कमी झाले आहे. हत्ती दरवाजासमोरील भागावरीलही स्लॅब काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात खेळती हवा राहते, असे काहींचे मत आहे; तर काहींचे मत असे आहे की, त्या ठिकाणीही डोम बसवण्यात यावा. यामुळे पाऊस, ऊन यापासून मंदिराचे रक्षण होऊ शकेल तसेच भाविकांना काहीकाळ याठिकाणी विश्रांतीसाठी बसता येईल. परंतु हा निर्णय अद्याप मंदिर समितीच्या पातळीवर आहे.

नामदेव पायरी, गोपूर, शिखरांचे कामही विचाराधीन आहे. विष्णुपद, नदीपात्रातील नारद मंदिर, पद्मावती, लखुबाई या मंदिरांच्या दुरुस्ती, मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. दर्शन रांगेलाही भविष्यात पाण्याचा, वार्‍याचा काही त्रास होणार नाही, असे नियोजन करण्यात येत आहे. नामदेव पायरी, रुक्मिणी गोपूर, दोन्ही मुख्य मंदिरांवरील शिखरे आदींची कामेही विचाराधीन आहेत. त्यांनाही दगडी, प्राचीन रूप देण्यात येणार आहे.

चांदी निघाली सुमारे 700 किलो

श्री पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मूळ गाभार्‍यांकडे जाण्यापूर्वी असणार्‍या दोन कमानींसह दरवाजावरील चांदी अतिशय काळजीपूर्वकपणे काढण्यात आली आहे. ती सुमारे 700 किलो आहे. आता नव्या रचनेत फक्त दरवाजांना चांदीने मढवण्यात यावे, असा सूर आहे; पण याविषयी मंदिर समिती, पुरातत्त्व विभाग व तज्ज्ञ लोक निर्णय घेणार आहेत.

दर्शनबारीविषयी विचारविनिमय सुरू

मुख्य मंदिरासह श्री व्यंकटेश, महालक्ष्मी, खंडोबा, गुप्तलिंग, शनी, गणपती, राही, दीपमाळ आदी मंदिरांच्या दुरुस्ती, मजबुतीकरणाचेही काम पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मंदिर खुले करताना दर्शनबारी, दर्शन मंडपातून बाहेर पडल्यावर ती मंदिराच्या भिंतीवरून घ्यायची की खालून घ्यायची, याविषयी अजून विचारविनिमय सुरू आहे. समिती त्यावर निर्णय घेईल.

मंदिराच्या आवारात, त्यातही प्राधान्याने सभा मंडपात मंदिर अधिकारी, कर्मचार्‍यांची कार्यालये आहेत. ती हटवण्यासंदर्भातही विचार झाला आहे; परंतु वरिष्ठ अधिकारी, समितीचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची कार्यालये मंदिराच्या आवारातच असावीत, असाही सूर आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासकीय कार्यालये मंदिराच्या बाहेर जाऊ शकतील. भविष्यात वरिष्ठ अधिकार्‍यांसह अध्यक्षांचे कार्यालय मंदिराच्या आवारात असू शकेल.

मंदिराच्या प्राचीनत्त्वाविषयी…

पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्यदैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरामुळे पंढरपूरला 'दक्षिण काशी' म्हणतात. इसवी सन 516 मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणार्‍या काही गावांचा उल्लेख आढळतो. गाभारा, अंतराळ आणि सभा मंडप हे आताच्या मंदिराचे मुख्य घटक असून, सभा मंडपाच्या 16 खांबांपैकी एक 'गरुडस्तंभ' म्हणून ओळखला जातो. स्थापत्यशास्त्राच्याद़ृष्टीने विचार केला, तर जीर्णोद्धार करण्यात आलेले पांडुरंगाचे मंदिर हे 16, 17 आणि 18 व्या शतकातले बांधकाम असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या मंदिराच्या दक्षिणेला श्री महालक्ष्मी, खंडोबा, व्यंकटेश या देवतांची लहान लहान मंदिरे आहेत. हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून 1946 मध्ये साने गुरुजींनी उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले.

महाद्वारातील दर्शन मंडप उतरवणार

महाद्वारात सध्याचा संत श्री ज्ञानेश्वर मंडप उतरवून या ठिकाणीही नवीन काही करता येते का, हा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा मंडप उतरवल्यानंतर दर्शनबारी ही श्री रिद्धी-सिद्धी गणेश मंदिराच्या बाजूच्या जागेत नवीन भव्य, ऐसपैस, दुमजली दर्शन मंडप बांधून त्या ठिकाणी वर्ग करण्यात येईल. तेथून स्कायवॉकद्वारे थेट मंदिरात भाविकांना आणले जाईल. श्री तिरूपती बालाजीच्या धर्तीवर नवीन दर्शनव्यवस्था असेल. त्यामध्ये टोकन पद्धतीनेही दर्शन देण्याचा विचार समितीच्या विचाराधीन आहे. यामुळे भाविकांना अजिबात त्रास होणार नाही. यासाठी 25 कोटींचा प्रस्ताव आहे.
बालाजी पुदलवाड,
व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT