कॅप्टन नीलेश गायकवाड
प्राचीन काळापासूनच भारताची ओळख ही पर्यटनाचा देश अशी असून आपल्या विकासात पर्यटनाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. भारतात 1981 मध्ये परकीय पर्यटकांची संख्या 12.8 लाख असताना ती चार दशकांत 2024 मध्ये 97 लाखांवर पोहोचली आहे.
पर्यटन हे कोणत्याही देशासाठी आर्थिक सुव्यवस्थेचे एक शक्तिशाली माध्यम आहे. जगाच्या पाठीवर अनेक देशांनी केवळ पर्यटनाच्या आधारावर आपल्या अर्थव्यवस्थांचा भरीव विकास करून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. यासाठी रस्तेसेवा, विमान वाहतूक, जलवाहतूक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या देशांनी लक्षणीय गुंतवणूक व खर्च केला. घाना येथील नामवंत लेखिका लैला गिफ्टी अकिता यांनी म्हटल्यानुसार, ‘प्रत्येक प्रवास एक सार्थक धाडसी कार्य आहे.’ खरोखरच एकेकाळी भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये धड रस्तेदेखील नव्हते. मनुष्यप्राण्यापेक्षा हिंस्र प्राण्यांची संख्या अधिक होती. देशात भटकंती करणे सोपे नव्हते; पण आज बदलत्या काळात पर्यटन क्षेत्र हे विकास, अभ्यास, मनोरंजन आणि रोजगाराचे मोठे माध्यम बनले आहे. विकसित भारताच्या निर्मितीत पर्यटन व्यवसाय व्यापक योगदान देण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत प्राचीन काळापासूनच पर्यटनासाठी समृद्ध देश आहे. आपल्या आर्थिक विकासात पर्यटनाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कोणीही पर्यटक एखाद्या नव्या ठिकाणी जातो तेव्हा तो केवळ ठिकाणांपर्यंत पोहोचत नाही, तर स्वत:चाही शोधही घेत असतो. पर्यटनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्व, सद्भाव, विचारांची देवाणघेवाण होते. स्थानिक कला, परंपरा आणि प्रथेचे आकलन होते आणि पर्यटक त्याचे वाहक होतात. आजच्या घडीला जगभरातत पर्यटकांची वाढती संख्या ही या क्षेत्राच्या लोकप्रियतेची साक्ष आहे. प्रत्येक पर्यटनस्थळ इतिहासाला उजाळा देण्याबरोबरच अनेक विस्मयकारक गोष्टी आपल्यासमोर आणते.
जगाच्या तुलनेत भारतातील नागरिक याबाबतीत भाग्यवान म्हटले पाहिजे. कारण, भौगोलिक रचना, हवामान आणि वातावरण पाहिले, तर नागरिकांना, पर्यटकांना निसर्गाच्या वैविध्यपणाचा सहजपणे अनुभव येतो. एकीकडे अथांग समुद्र, तर दुसरीकडे हिमशिखरे, त्याचवेळी राजस्थानचे वाळवंट आणि आसाममधील घनदाट जंगल, असा वैविध्यपणा क्वचितच पाहावयास मिळतो. निसर्गाने भारतावर मुक्तहस्ताने उधळण केली आहे. शिवाय सण, उत्सवांमुळे पर्यटनस्थळांची रंगत आणखीच बहरत जाते. विविध संस्कृती, परंपरा, प्रथेने नटलेल्या भारताने वेळोवेळी जगाला आकर्षित केले आहे. म्हणूनच पर्यटन स्थळांचा आणि क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणखी काय पावले टाकता येतील, याचा विचार केला पाहिजे.
आपल्या देशाला समृद्ध प्राचीन, ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. त्याचे जतन आणि प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही करण्याची आवश्यकता आहे. देशातील असंख्य पर्यटनस्थळे आजही विकासापासून वंचित आहेत. उदाहरणार्थ, बिहारच्या रोहतास जिल्ह्यात कैमूरच्या पर्वतरांगांत 28 मैलाच्या क्षेत्रात व्यापलेला सातव्या शतकातील राजा रोहिताश्व यांनी साकारलेला रोहतास किल्ला हा सामारिकद़ृष्ट्या जगातील सर्वात सुरक्षित किल्ला म्हणून मानला जातो; मात्र या किल्ल्याची दुरवस्था झाली असून तो शेवटच्या घटका मोजत आहे. देशात अशा प्रकारची अनेक पर्यटनस्थळे असून त्यांना विकासाच्या अजेंड्यावर आणणे गरजेचे आहे. देशाचा, प्रदेशाचा इतिहास सांगणार्या वारसास्थळांची, ऐतिहासिक वास्तूंची डागडुजीदेखील त्यांच्या मूळ रूपांना धक्का न लावता करायला हवी. या क्षेत्रात व्यावसायिक कौशल्यांमध्ये निपुण लोकांचा सहभाग वाढविला पाहिजे.
आपल्या देशात पर्यटन स्थळांवरची सुरक्षा व्यवस्था हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पर्यटनस्थळी गैरवर्तनाच्या घटना घडल्यास त्याचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. म्हणून अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी केवळ पोलिसांनीच नाही, तर समाज, स्थानिकांनीदेखील जागरूक राहणे गरजेचे आहे. जेणेकरून पर्यटकांना मुक्तपणेे पर्यटनाचा आनंद लुटता येणे शक्य येईल. ‘अतिथी देवो भव’ आणि ‘इनक्रेडिबल इंडिया’सारख्या अभियानातूनच भारताचे ब्रॅडिंग आणखी चांगले होईल.
भारतात येणार्या परकी पर्यटकांच्या आदरभावात सातत्याने सुधारणा होत आहे. पर्यटन केंद्र अणि पर्यटनाच्या द़ृष्टीने प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पर्यटकांचे स्वागत करणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. एखादा नागरिक भारतात आला, तर त्याला दिली जाणारी वागणूक आणि आदरातिथ्य याबाबत त्याच्या मनात सकारात्मक चित्र राहील, या द़ृष्टीने प्रयत्न करायला हवेत. अलीकडच्या काळात चित्र बदलत असून पर्यटनस्थळाच्या ठिकाणी बदल दिसत आहे.
पर्यटनस्थळी संरक्षण, स्वच्छता, सुरक्षा आणि आदरातिथ्याकडे अधिक लक्ष दिले, तर भारतीय पर्यटन स्थळांची चर्चा आपोआपच वाढत जाईल. खासगी क्षेत्राने या प्रचार-प्रसारात सक्रिय भूमिका घ्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी मदत केंद्रे, विमानतळ, बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे पर्यटन माहिती केंद्राची संख्या वाढविणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, शहरातील कचरा कमी करणे यासारख्या गोष्टींवर अधिक भर द्यावा लागेल.
डिजिटायजेशनमुळे भारताने पर्यटनाच्या बाबतीत परकी लोकांकडून बर्याच गोष्टी आत्मसात केल्या आहेत. आपल्या पर्यटन स्थळांवर साफसफाई, माहिती फलक, डिजिटल तिकिटिंग आणि स्थानिक संस्कृतींचा मिलाफ पाहावयास मिळत आहे. इको टुरिझम आघाडीवरचे कामदेखील उल्लेखनीय आहे.
1981 मध्ये भारतात परकीय पर्यटकांची संख्या 12.8 लाख होती. आता 2024 मध्ये ती 97 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनापूर्व काळात 2019 मध्ये पर्यटकांची संख्या तब्बल 109 लाखांवर पोहोचलेली असताना 2023 मध्ये 95.2 लाखांवर आली. आता येत्या तीन वर्षांत 2028 मध्ये परकीय पर्यटकांची संख्या तीन कोटींवर जाण्याची शक्यता आहे. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकानुसार भारत 2024 मध्ये जगात 39 व्या स्थानावर राहिला आहे. याप्रमाणे भारताचा पर्यटन व्यवसाय 2030 मध्ये 10,73,785 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. परिणामी, रोजगाराला चालना मिळत आहे. 2025 मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाच कोटी नागरिकांना रोजगार मिळण्याची शक्यता असून हा आकडा दहा वर्षांत 6.4 कोटींवर जाऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्थेत या क्षेत्राने 22 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले असून 2035 मध्ये ते 42 लाख कोटी रुपयांवर पोहोचू शकते.
पर्यटन हे आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीचे सक्षम माध्यम मानले जाते. पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वोच्च सेवा उद्योगांपैकी एक आहे. आजच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत करणे ही प्रत्येक देशाची पहिली गरज आहे. पर्यटनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था याच उद्योगाभोवती फिरते. युरोपीय देश, किनारपट्टीवरील आफ्रिकन देश, पूर्व आशियाई देश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या पर्यटन उद्योगामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाल्या आहेत. पर्यटन क्षेत्राच्या विकासामुळे लोकांना रोजगार तर मिळतोच, शिवाय इतर प्रांतातून येणार्या लोकांचे राहणीमान, सभ्यता आणि संस्कृती यांची देवाणघेवाणही सुलभ होते.
केंद्र सरकारने 2030 पर्यंत पर्यटन उद्योगातून 56 अब्ज परकीय चलन मिळवण्याचे आणि पुढील सात वर्षांत 140 दशलक्ष नोकर्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक स्तरावर, पर्यटन हे जगातील सर्वात मोठे कमाईचे क्षेत्र बनले आहे. जागतिक स्तरावर सकल देशांतर्गत उत्पादनात 11 टक्क्यांपर्यंत योगदान पर्यटन क्षेत्राचे आहे; मात्र भारतातील या क्षेत्राचे योगदान अजूनही केवळ 6.7 टक्के इतकेच आहे. ‘विकसित भारता’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी सुनियोजित आणि नियोजनबद्ध प्रयत्न करून पर्यटनाच्या क्षेत्राला चालना दिल्यास त्यातून कायापालट घडून येईल.