भारताचे पाकिस्तानशी प्रत्यक्ष निर्णायक युद्धच सुरू झाल्याने कूटनीती आणि शस्त्रास्त्रे यांची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. याबाबतीत राष्ट्रीय पातळीवर विचार करण्याबरोबरच शत्रूशी दोन हात करण्यास आपल्या यंत्रणा सक्षम आहेत; मात्र राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीच्या द़ृढनिश्चयाबरोबरच आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याची निर्णायक वेळ एक कर्तव्यनिष्ठ भारतीय नागरिक म्हणून आपल्यावर आली आहे. तरच ‘आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे’ हे गीत पुढील हजारो पिढ्यांना आनंदाने म्हणता येईल.
राजशकट मूर्ख, उतावळ्या राज्यकर्त्यांच्या हातात असेल, तर काय होते, त्याचे पाकिस्तान हे नेहमीच नमुनेदार उदाहरण ठरले. तीच परंपरा आताही चालू आहे. अलीकडेच पहलगाममध्ये पर्यटकांची करण्यात आलेली अमानुष हत्या, देशाच्या सीमावर्ती भागात सुरू असलेले हल्ले अन् त्याला कडवे प्रत्युत्तर मिळाल्यानंतर पाकिस्तानने आता सुरू केलेले प्रत्यक्ष युद्ध... हे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अपरिपक्व, हडेलहप्पी आणि मत्सरी मानसिकतेचे अपत्य आहे. अशा निर्णायक प्रसंगी देशप्रेमी, राष्ट्रनिष्ठ नागरिक म्हणून आपलेही कर्तव्य महत्त्वाचे आहे. देशावर संकट कोसळलेले असताना जनतेकडून मिळालेला पाठिंबा हा राज्यकर्त्यांचे, लढाईच्या मैदानात उतरलेल्या नौजवानांचे मनोबल वाढविणाराच ठरतो, हे जगभरात अमेरिका, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत इतिहासाने अनुभवलेले आहे.
7 डिसेंबर 1941 रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नौदलतळावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अमेरिकेच्या अनेक युद्ध नौका, लढाऊ विमाने आणि हजारो सैनिक यांचे नुकसान झाले. हा हल्ला अमेरिकेच्या आत्मसन्मानावर आघात होता. या आक्रमणाने अमेरिकन जनतेच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला. राजकीय मतभेद, सामाजिक वर्गभेद, वंशभेद या सर्वांवर मात करत संपूर्ण देश युद्धात भाग घेण्याच्या आणि शत्रूला प्रत्युत्तर देण्याच्या ध्येयासाठी एकत्र आला. लाखो नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून लष्करात भरती होण्याची तयारी दाखवली. उद्योग-धंदे युद्धसज्ज झाले. महिलांनीही कारखान्यांमध्ये काम करत युद्ध उद्योगात मोलाची भूमिका बजावली. या काळात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी केलेलं भाषण इतिहासात अजरामर झालं. त्यांनी 7 डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्याचा उल्लेख ‘अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी’ असा केला. आम्ही, अमेरिकेचे लोक, जोपर्यंत शत्रूवर विजय प्राप्त करत नाही, त्यांना शरण येणे भाग पाडत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे सांगत त्यांनी अमेरिकन जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली देश एकजूट झाला आणि पर्ल हार्बरच्या हल्ल्याने अमेरिकेने दुसर्या महायुद्धात औपचारिकपणे प्रवेश केला. या घटनेमुळे अमेरिकन लोकांचा राष्ट्राभिमान अधिक द़ृढ झाला आणि एक सामर्थ्यशाली जागतिक महासत्ता बनण्यासाठी हा देश सज्ज झाला.
दुसर्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने सुमारे 60 लाख ज्यूंचे शिरकाण केले. हा भयावह नरसंहार ‘होलोकॉस्ट’ म्हणून ओळखला जातो. मानवतेच्या इतिहासातील तो एक काळा अध्याय ठरला. या घटनेनंतर हजारो वर्षांपासून इतर राष्ट्रांमध्ये पसरलेला ज्यू समुदाय प्रचंड दुःख, भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासला. त्यामुळेच युद्धानंतर त्यांच्यात स्वतःचा स्वतंत्र आणि सुरक्षित देश असण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली. 1945 नंतर युरोपमध्ये वांशिक छळातून वाचलेले अनेक ज्यू निर्वासित शिबिरांमध्ये राहत होते. तेथून ते मोठ्या संख्येने पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतर करू लागले. त्यावेळी ब्रिटनने हा भाग ताब्यात घेतलेला होता. ब्रिटिश मंडळाच्या नियंत्रणाखाली असलेला पॅलेस्टाईन ज्यू आणि अरब समुदायांमध्ये तणावाचे केंद्रबिंदू बनत गेला. होलोकॉस्टच्या पार्श्वभूमीवर जागतिक सहानुभूती ज्यू समुदायाकडे झुकली होती. अमेरिकेसह अनेक पश्चिमी राष्ट्रांनी ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीस पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रांनी 1947 मध्ये पॅलेस्टाईन प्रदेशाचे विभाजन करून एक ज्यू राष्ट्र आणि एक अरब राष्ट्र निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला. अरब देशांनी हा प्रस्ताव नाकारला; पण ज्यू समुदायाने तो स्वीकारला. 14 मे 1948 रोजी डेव्हिड बेन गुरियन यांनी इस्रायल या स्वतंत्र ज्यू राष्ट्राची औपचारिक घोषणा केली. नव्याने जन्मलेल्या या छोट्याशा राष्ट्राने आपल्या अस्तित्वासाठी जबरदस्त लढा दिला. यामध्ये होलोकॉस्टमधून वाचलेले, तसेच विविध देशांतून स्थलांतरित झालेले ज्यू लढवय्ये एकत्र आले आणि सैन्यबळ, शौर्य आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी इस्रायलचे संरक्षण केले. या संघर्षाने ज्यू समुदायाच्या एकजुटीचा, राष्ट्रनिर्मितीच्या निश्चयाचा आणि अस्तित्वासाठी लढण्याच्या ताकदीचे दर्शन जगाला घडले.
ही दोन उदाहरणे आज कथन करण्याचे कारण म्हणजे पाकिस्तानकडून लादल्या गेलेल्या युद्धाच्या काळात ‘आम्ही भारतीय’ म्हणवून घेणार्या प्रत्येक नागरिकाने अत्यंत निःस्पृहपणाने अशा प्रकारची देशभक्ती दाखवण्याची आणि प्रचंड एकजुटीने भारतीय सैन्याच्या व धोरणकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून प्रक्षोभाची लाट उसळली. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने कूटनीतीच्या पातळीवर अनेक परिणामकारक निर्णय घेतले; परंतु 26 भारतीय पर्यटकांना धर्माबाबत विचारणा करून कुटुंबीयांसमोर गोळ्या घालून मारणार्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याची मागणी जोर धरू लागली. भारतीय सैन्याने आणि सरकारने या लोकभावनांचा आदर करत 6 मेच्या मध्यरात्री 1 ते 1.30 च्या दरम्यान पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील सात प्रमुख शहरांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेंतर्गत जबरदस्त एअरस्ट्राईक केले आणि 100 हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करतानाच त्यांची बांधकामे, इमारती उद्ध्वस्त केल्या. हा हल्ला गेल्या 75 वर्षांतील सर्वांत मोठी दहशतवादविरोधी कारवाई म्हणून नोंदला गेला. कारण, आजवर पाकव्याप्त काश्मिरात भारताने कारवाया केल्या आहेत; पण यावेळी पाकिस्तानात भारतीय क्षेपणास्त्रे घुसली आणि आपली मोहीम फत्ते केली. या हल्ल्यानंतर पाकिस्तान पूर्णतः हादरून गेला आहे.
पाकच्या पाठीशी असणार्या आणि त्यांना शस्त्रास्त्र पुरवठा करणार्या चीनच्या रडारलाही भारतीय क्षेपणास्त्रांचा आणि लढाऊ विमानांचा सुगावा लागला नाही. त्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. तेथील शेअर बाजारात लोअर सर्किट लागले. यामुळे उद्विग्न होऊन पाकिस्तानने प्रथम सीमेवरील तोफांचा मारा अधिक तीव्र केला. दुसरीकडे भारतीय हद्दीमध्ये मोठी कारवाई करण्यासाठी क्षेपणास्त्रे डागण्याचा आतताई निर्णय घेऊन निर्णायक युद्धाला तोंड फोडले. पाकिस्तानची सध्याची आर्थिक स्थिती भिकेकंगाल या शब्दातही न सामावणारी आहे, तरीही पाकिस्तानने भारतावर आक्रमण करण्याचे धोरण अवलंबले आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्यक्ष दिसणार्या घडामोडींपेक्षा पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असतात. यासाठी शत्रूचे शत्रू ते आपले मित्र वगैरे संकल्पनाचा प्रत्ययही पदोपदी येतो.
भारतापासून वेगळा होऊन जन्मलेला हा देश तेथील शासकांमुळे आणि लष्करामुळे रसातळाला गेला आहे. दुसरीकडे जगातील सर्वाधिक विकास दर असणारा देश म्हणून भारताचा तिरंगा जगात दिमाखाने फडकत आहे. अलीकडेच भारत हा जगातील सर्वांत मोठी चौथ्या क्रमांकाची अर्थसत्ता बनल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 2047 पर्यंत विकसनशील भारताला विकसित भारत बनवण्याचे उद्दिष्ट विद्यमान सरकारने ठेवले आहे आणि त्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारताला आर्थिक क्रांतीची गरज आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आणि परकीय गुंतवणुकीची गरज लागणार आहे. भांडवल आणि गुंतवणूक यांचा प्रवाह कोणत्याही भागात जाण्यासाठी शांतता ही पूर्वअट असते. चीनने 1950 च्या दशकानंतर आर्थिक विकासात जी लायन लीप घेतली, ती घेत असताना त्यांनी विशिष्ट टप्प्यानंतर नियोजनपूर्वक आपल्या शेजारील राष्ट्रांसोबतचे संघर्ष चिघळू दिले नाहीत. सीमावादाबाबत शांतता कशी राहील याकडे लक्ष दिले. अन्यथा लष्करी संघर्ष निर्माण झाल्यास ते आर्थिक विकासाला खिळ घालणारे ठरू शकतात. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ अशी भूमिका घेऊन चालणार्या पाकिस्तानला ही बाब चांगलीच माहीत आहे. त्यामुळेच भारताच्या विकासयात्रेला खिळ बसवण्यासाठी अलीकडील काळात पाकिस्तान जाणीवपूर्वक भारतात कुरापती करण्याचा प्रयत्न करीत होता. आताचे युद्ध हे त्यांचे टोकाचे पाऊल आहे.
पाकिस्तानच्या या आगळीकीला प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर पूर्णतः सक्षम आहे यात शंकाच नाही. परंतु कोणतेही राष्ट्र, कोणतेही युद्ध हे केवळ सैनिकी बळावर किंवा शस्रास्रांच्या सामर्थ्यावर जिंकू शकत नाही. त्यासाठी आवश्यक असते त्या राष्ट्रातील नागरिकांचा सक्रिय पाठिंबा आणि दृढविश्वास. या दोन्ही गोष्टी सीमेवर लढणार्या जवानांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी गरजेच्या असतात. संपूर्ण राष्ट्राची एकजूट, एकात्मता आणि एकवाक्यता असल्यास कोणताही शत्रू आपल्याला पराभूत करू शकत नाही. सोने की चिडियाँ असणार्या भारताला लुटणार्या ब्रिटिशांना 150 वर्षांनंतर का होईना पण भारताने या देशातून हाकलून लावले आणि स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. गेल्या 1000-1200 वर्षांचा इतिहास पाहिला तर या भारतभूमीवर सतत आक्रमणे झाली. 1857 ते 1947 या काळातील सशस्त्र क्रांतीकारकांचा लढा असेल किंवा सनदशीर चळवळ असेल, महात्मा गांधीचा अहिंसेचा सत्याग्रह असेल किंवा आपल्या निधड्या छातीवर वार झेलूनही मैदानातून पळ न काढणारे असंख्य नागरीक असतील, त्या सर्वांंच्या प्रचंड त्यागातून आपण गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालो. आजच्या काळात याच एकजुटीची गरज आहे. या खंडप्राय देशातल्या सुमारे 25 कोटी लोकांवर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या काही हजार कर्मचार्यांनी आणि त्यांच्या अक्षरश: मुठभर अधिकार्यांनी राज्य केले आहे. एवढे कमी लोक या कोट्यवधी लोकांवर राज्य का करू शकले याचा विचार आपण करणे गरजेचे आहे. यामागे जे कारण आहे तेच पहलगामवरील दहशतवादी हल्ला यशस्वी होण्यामागे आहे आणि आता तर त्याच विजिगुषीवृत्तीची नितांत आवश्यकता आहे.
आजच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती ही संकल्पना केवळ घोषवाक्यांपुरती मर्यादित राहू नये; ती कृतीमध्ये, विचारांमध्ये आणि राष्ट्रीय उत्तरदायित्वात प्रतिबिंबित होणे काळाची गरज आहे. देशभक्ती म्हणजे आपल्या देशावर निष्ठा ठेवणे, त्याच्या मूल्यांबाबत अभिमान बाळगणे आणि गरज पडल्यास त्यासाठी बलिदान करण्याची तयारी ठेवणे. भारताला आज अशा देशभक्तांची गरज आहे जे युद्धालाही तोंड देण्यास सज्ज असतील. देशभक्ती केवळ सैनिकांच्या खांद्यावर ठेवणे ही स्वार्थलोलुपता ठरेल.
युद्धाच्या काळात केवळ सैन्यच नाही, तर संपूर्ण देश एकसंघपणे उभा राहिल्याने विजय निश्चित होतो. पाकिस्तानसारख्या देशांमध्ये धर्माच्या नावावर कट्टरतावाद वाढत असताना भारताने मात्र बहुसंस्कृती समाज टिकवून ठेवला आहे. येणार्या काळात हा एकसंधपणा अधिक जबाबदारीने पेलण्याची गरज आहे. आजची तरुणपिढी सोशल मीडियावर देशभक्तीचे स्टेटस टाकण्यात मश्गुल आहे. एखादी कारवाई सैन्याने केल्यानंतर स्टेटसला किंवा प्रोफाइल फोटो लावतात; पण प्रत्यक्ष कृतीत देशासाठी काय करतात? पहलगाममधील हल्ल्यानंतर काही जणांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ‘आम्हाला संशयास्पद काही तरी वाटले होते’ असे म्हटल्याचे दिसून आले. पण मग अशा प्रकारच्या हालचाली दिसतात तेव्हा सजग नागरीक म्हणून आपण राष्ट्राप्रती असणारे उत्तरदायित्व निभावण्यात मागे का पडतो?
स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडून आले. अगदी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधूनही दहशतवादी पकडले गेले. त्यांची संख्या मूठभर असेल; पण मग उर्वरीत हजारो लोकांच्या नजरांना त्यांच्या राष्ट्रविघातक हालचाली का टिपता आल्या नाहीत? उलटपक्षी आपल्याकडील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पुरवतात. याला देशभक्ती म्हणायची? आज अनेक संरक्षणतज्ज्ञ भारतात स्लीपर सेल्स अद्यापही कार्यरत असल्याचे सांगताहेत. ते कुठेही असू शकतात. अशा लपलेल्या राष्ट्रद्रोह्यांना शोधायचे असेल तर केवळ सैन्यावर, पोलिसांवर जबाबदारी ढकलून मोकळे होता येणार नाही. त्यासाठी गरज आहे ती नागरिकांच्या सतर्कतेची. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान सैनिकांची कमतरता भासू लागल्यानंतर तेथील नागरिक सैन्यात सहभागी झाले. आपले सैन्यबळ सक्षम आहेच; पण गरज भासल्यास भारतीय तरुणाला त्यासाठीही सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. शत्रूच्या कारवाईमध्ये शहीद झालेल्या जवानाचे पार्थिव त्याच्या गावी आणले जाते तेव्हा मनात उमटणारा संताप आणि घरी परतण्याची, जीवाची हमी नसलेल्या प्रत्यक्ष रणांगणात उतरून शत्रूशी दोन हात करण्याचे धैर्य यामध्ये महद्अंतर आहे. यापैकी आपण कोणत्या गटात आहोत, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशभक्तीपर चित्रपटांची लाट आली होती. त्यानंतरही अनेक असे चित्रपट आले ज्यांनी समाजमनात देशभक्तीची ज्वाला धगधगती ठेवली. पण आज मनोरंजनविश्वातून देशभक्ती गायब आहे. याला जबाबदार कोण?
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नामउद्घोषांने जाज्वल्य राष्ट्राभिमान अंगात संचारणारे असंख्य तरुण आपल्या मातीत आहेत. ते निधड्या छातीने शत्रूचा सामना करण्यास तयारही आहेत; पण उर्वरितांचे काय? जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या असणारा भारत 140 कोटी नागरिकांचा आहे. पाकिस्तानकडून झालेला हल्ला हा या 140 कोटी नागरिकांविरुद्ध आहे. त्यांच्या सार्वभौम राष्ट्रावर आहे. त्यांच्या अस्मितेवर आहे. मग त्याचा सामना सर्वशक्तीनिशी आणि एकजुटीने करणे हे आपले कर्तव्य नव्हे का?
शत्रूला धडा शिकवण्यासाठी प्रत्येक वेळी शस्रास्रांचीच गरज नसते. किंबहुना त्याहीपेक्षा वर्मी घाव आर्थिक कोंडी करून घालता येतो. भारताने ती पावलेही उचलली; परंतु प्रत्यक्ष दोन हात करण्याची वेळ आल्यानंतर त्याच भाषेत उत्तर देणे अपेक्षित असते. अन् भारतीय सैन्य आज तेच करीत आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच धर्तीवर स्वदेशी चळवळ उभी राहिली. हजारो महिलांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. आपल्याकडे गलवान संघर्षानंतर ‘बॉयकॉट चायना’ असे नारे दिले गेले; पण गेल्या 4-5 वर्षांमध्ये चीनकडून होणारी आयात पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढली आहे. ब्रँडच्या नावाखाली विदेशी वस्तूंना प्रतिष्ठा’ या श्रेणीत बसवून स्थानिक उत्पादनांना तुच्छ लेखण्याला देशभक्ती म्हणता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानबरोबरच्या सुरु असलेल्या युद्ध काळात राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्तीबाबत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याचा दृढनिश्चय प्रत्येकाने केलाच पाहिजे आणि अमलातही आणला पाहिजे. तरच ‘आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे’ हे गीत पुढील हजारो पिढ्यांना आनंदाने म्हणता येईल.