Shaktibaan regiment | ‘शक्तिबाण’ रेजिमेंटचा थरार 
बहार

Shaktibaan regiment | ‘शक्तिबाण’ रेजिमेंटचा थरार

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद पाटील

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संपादन परिषदेने नुकतीच ‘शक्तिबाण’ या रेजिमेंटसाठी लोइटरिंग एम्युनिशन आणि स्वॉर्म ड्रोन यंत्रणेच्या खरेदीला मंजुरी दिली असून हा भारतीय लष्कराच्या युद्ध संकल्पनेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा तांत्रिक बदल मानला जात आहे. लष्कराने यासाठी प्रशिक्षणाचे नवीन मॉडेल तयार केले असून आता सैनिकांना केवळ तोफा चालवण्याऐवजी डेटा विश्लेषण आणि ड्रोन मिशन प्लॅनिंगचे प्रगत शिक्षण दिले जात आहे.

भविष्यातील युद्धाची कल्पना करा जिथे रणांगणावर एकही सैनिक दिसत नाही; परंतु आकाशात डझनावारी ड्रोन उडत आहेत. हवेत घोंघावणारे गोळे स्वतःहून आपले लक्ष्य शोधत आहेत आणि एक संगणकीय प्रणाली हे ठरवत आहे की, पुढचा हल्ला कोणत्या दिशेने व्हायला हवा. हे द़ृश्य आता केवळ कल्पनेतले राहिलेले नाही, तर भारतीय संरक्षणाच्या वर्तमानाचा एक भाग बनले आहे. भारतीय लष्कर आपल्या पारंपरिक तोफखान्याला आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आणि ड्रोन तंत्रज्ञानाने सज्ज करून एका स्मार्ट स्ट्राईक फोर्समध्ये रूपांतरित करत आहे. या दिशेने पडलेले सर्वात मोठे पाऊल म्हणजे शक्तिबाण रेजिमेंटची स्थापना होय.

जागतिक भूराजकीय परिस्थिती, सामर्थ्यशाली राष्ट्रांची वाढती विस्तारवादी व हस्तक्षेपवादी भूमिका आणि सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेता भारताने आपल्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन समितीच्या (डीएसी) बैठकीत भारतीय भूदल, नौदल आणि वायुसेनेसाठी सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदी प्रस्तावांना एओएन प्रदान करण्यात आले. हा निर्णय भारतीय लष्कराला ‘नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर’ आणि ‘प्रिसिजन स्ट्राईक’ क्षमतेमध्ये स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक धोरणात्मक पाऊल आहे. दिव्यास्त्र बॅटरी ही लष्कराची एक स्मार्ट आर्टिलरी युनिट आहे, जी पारंपरिक तोफांपेक्षा अत्यंत प्रगत आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा, देखरेख करणारे ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणा यांना एआय फ्युजन सेंटरशी जोडले गेले आहे. हे सेंटर रणांगणातून येणार्‍या माहितीचे विश्लेषण करून तातडीने निर्णय घेते. याचे यशस्वी परीक्षण ऑगस्ट 2025 मध्ये सिक्कीममध्ये करण्यात आले होते.

भारतीय भूदलाच्या ताकदीमध्ये होणारी सर्वात मोठी वाढ म्हणजे ‘लॉइटर म्युनिशन’ आणि त्याच्याशी संबंधित प्रणालींची खरेदी. आधुनिक युद्धशास्त्रात अत्यंत प्रभावी ठरणार्‍या लॉइटर म्युनिशनला सामान्य भाषेत ‘सुसाईड ड्रोन’ किंवा ‘कामिकाझे ड्रोन’ म्हटले जाते. हे क्षेपणास्त्र जोपर्यंत एखादे लक्ष्य निश्वित होत नाही, तोपर्यंत हवेत राहून टेहळणी करते. एकदा का शत्रूचे रडार, टँक किंवा कमांड सेंटर दिसले की, हे ड्रोन थेट त्यावर जाऊन आदळतात. यामुळे ‘कोलेटरल डॅमेज’ (नियोजनाबाहेरील हानी) कमी होऊन शत्रूच्या महत्त्वाच्या मालमत्तेचा नाश करता येतो. भारतीय भूदलाने आपल्या काही आर्टिलरी रेजिमेंटला ‘शक्तिबाण रेजिमेंट’ आणि काही बॅटरींना ‘दिव्यास्त्र बॅटरी’ असे नाव दिले आहे. या तुकड्या प्रामुख्याने या अत्याधुनिक ड्रोन प्रणालींचा वापर करतील.

भारताची स्वदेशी बनावटीची ‘पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम’ही आता अधिक घातक होणार आहे. सध्या या प्रणालीची मारक क्षमता सुमारे 75 किलोमीटरपर्यंत मर्यादित आहे; मात्र नव्या मंजुरीनुसार आता यासाठी ‘लाँग रेंज गाईडेड रॉकेट’ खरेदी केले जाणार आहेत. यामुळे पिनाकाचा पल्ला 120 किलोमीटरपर्यंत वाढेल. यामध्ये असलेल्या ‘इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम’ आणि जीपीएसमुळे हे रॉकेट शत्रूच्या तळावर अत्यंत अचूकपणे मारा करतील. सध्याच्या काळात ड्रोन हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. याला उत्तर देण्यासाठी भूदलाला ‘इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्टशन अँड इंटरडिक्शन सिस्टीम’ मार्क-2 मिळणार आहे. ही यंत्रणा हाय पॉवर लेसर वेपन्सवर आधारित आहे. हे केवळ ड्रोनला शोधत नाही, तर लेसर बीमच्या सहाय्याने हवेतच त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स निकामी करून त्यांना नष्ट करते. तसेच लष्करासाठी ‘लो लेव्हल लाईट रडार’ मंजूर करण्यात आले असून ते पर्वतीय क्षेत्रातील कमी उंचीवरून येणार्‍या मानवरहित विमानांना शोधण्यास सक्षम आहेत.

हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींना लगाम घालण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या पाळत ठेवण्याच्या क्षमतेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार नौदलासाठी ‘हाय अल्टिट्यूड लाँग रेंज रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम’ भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे ड्रोन सलग 30 तासांपेक्षा जास्त वेळ हवेत राहून हजारो किलोमीटरच्या सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवू शकतात. भारताने यापूर्वीच अमेरिकेकडून 31 ‘एमक्यू-9बी स्काय गार्जियन/सी गार्जियन’ ड्रोन खरेदीचा करार केला आहे. जोपर्यंत हे ड्रोन ताफ्यात येत नाहीत, तोपर्यंत तात्पुरती गरज भागवण्यासाठी भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. नौदलाच्या ऑपरेशनल कार्यासाठी ‘बोलार्ड पूल टग्ज’ मंजूर करण्यात आले आहेत. हे टग्ज प्रामुख्याने मोठ्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना अरुंद बंदरांमध्ये किंवा धक्क्यावर लावण्याचे काम करतात. तांत्रिकद़ृष्ट्या जहाजांच्या सुरक्षित हालचालींसाठी हे अत्यंत आवश्यक असतात. याशिवाय, ‘हाय फ्रिक्वेंसी सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओ’मुळे समुद्रातील युद्धनौका आणि जमिनीवरील केंद्र यांच्यातील संवाद अधिक सुरक्षित आणि जामप्रूफ होईल.

भारतीय वायुसेनेसाठी घेतलेले निर्णय हे ‘बीयॉन्ड व्हिज्युअल रेंज’ क्षमता आणि जुन्या शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण यावर आधारित आहेत. वायुसेनेला आता ‘अस्त्र मार्क-2’ हे स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र मिळणार आहे. सध्याच्या अस्त्र मार्क-1 चा पल्ला 110 कि.मी.च्या आसपास आहे; मात्र मार्क-2 ची क्षमता 160 ते 200 किलोमीटरपर्यंत असेल. हे क्षेपणास्त्र ‘ड्युअल पल्स रॉकेट मोटर’ तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे ते शेवटच्या टप्प्यात आपली गती वाढवून शत्रूच्या विमानाचा पाठलाग करू शकते. हे क्षेपणास्त्र सुखोई-30 एमकेआय आणि तेजस सारख्या विमानांवर तैनात केले जाईल. वायुसेनेच्या ताफ्यातील ‘अनगाईडेड’ म्हणजेच साध्या बॉम्बना ‘स्मार्ट बॉम्ब’मध्ये रूपांतरित करण्यासाठी ‘स्पाईस-1000’ किट खरेदी केले जाणार आहेत. यामध्ये प्रगत जीपीएस आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल सेन्सर असतात, जे साध्या बॉम्बला अचूक मार्ग दाखवतात. बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी अशाच तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आला होता.

‘ऑटोमॅटिक टेक-ऑफ आणि लँडिंग रेकॉर्डिंग सिस्टीम’मुळे वैमानिकांच्या चुका आणि विमानांच्या तांत्रिक स्थितीचे अचूक विश्लेषण करणे शक्य होईल. यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यास मदत होईल. तसेच ‘फुल मिशन सिम्युलेटर’मुळे वैमानिकांना प्रत्यक्ष विमान न उडवता युद्धसद़ृश परिस्थितीचा सराव करता येईल. यामुळे इंधनाची बचत आणि विमानांची झीज कमी होईल. या 79,000 कोटी रुपयांच्या एकूण प्रस्तावांपैकी बहुतांश खरेदी ही ‘भारतीय कंपन्यांकडून केली जाणार आहे. हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेचे लक्षण आहे. लॉइटर म्युनिशन असो किंवा अस्त्र क्षेपणास्त्र, सर्व तंत्रज्ञान भारतातच विकसित केले गेले आहे. 120 कि.मी. पल्ल्याचे पिनाका आणि 200 कि.मी. पल्ल्याचे अस्त्र क्षेपणास्त्र यामुळे भारत सीमेपलीकडील लक्ष्यांवर स्वतःच्या हद्दीत राहूनच हल्ला करू शकेल. ड्रोन तंत्रज्ञान आणि लांब पल्ल्याची देखरेख यंत्रणा यामुळे दोन आघाड्यांवरील युद्धाची तयारी अधिक सक्षम झाली आहे. साध्या बॉम्बना स्मार्ट बनवण्याचे तंत्रज्ञान हे महागड्या क्षेपणास्त्रांना एक स्वस्त आणि तितकाच प्रभावी पर्याय आहे.

एकूणच, भारतीय लष्कराच्या युद्ध संकल्पनेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा तांत्रिक बदल आहे.भारतीय लष्कराचे उद्दिष्ट 25 शक्तिबाण रेजिमेंट तयार करण्याचे आहे, ज्या पाकिस्तान आणि चीनच्या सीमांवरील मोक्याच्या ठिकाणी तैनात केल्या जातील. या रेजिमेंटमध्ये आता पारंपरिक अवजड तोफांची जागा लोइटरिंग शस्त्रे, स्वॉर्म ड्रोन आणि एआय आधारित फ्युजन सेंटर घेतील. शत्रूच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवणे, अवघ्या काही सेकंदांत लक्ष्य निश्चित करणे आणि आपल्या सैनिकांना कोणत्याही धोक्यात न घालता अचूक प्रहार करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. ‘शक्तिबाण’ हे नावच या नवीन विचाराचे प्रतीक असून त्याचा अर्थ तीव्र, अचूक आणि निर्णायक प्रहार असा होतो. मे 2025 मध्ये पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय लष्कराला हे प्रकर्षाने जाणवले की, भविष्यातील युद्धे केवळ शस्त्रांनी नाही, तर डेटा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर लढली जातील. याच अनुभवातून दिव्यास्त्र बॅटरी आणि शक्तिबाण रेजिमेंट या दोन नवीन संकल्पनांचा जन्म झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT