Global Power Politics | महासत्तांच्या ‘गुप्त’खेळी 
बहार

Global Power Politics | महासत्तांच्या ‘गुप्त’खेळी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. ब्रह्मदीप आलुने, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक

जागतिक राजकारणाच्या पटावर जे दिसते, त्यापेक्षा पडद्यामागे घडणार्‍या हालचाली अनेकदा अधिक निर्णायक असतात. युक्रेनच्या रणभूमीवर अमेरिका आणि रशिया परस्परविरोधी बाजूंना उभे आहेत. इराणच्या प्रश्नावरही दोघांचे हितसंबंध वेगळे आहेत, तरीही ‘सीआयए’चे संचालक जॉन रॅटक्लिफ आणि रशियन गुप्तचर अधिकार्‍यांमधील संवादाने एका नव्या समीकरणाची चर्चा सुरू केली आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या जगात मैत्रीपेक्षा राष्ट्रीय हिताला अधिक प्राधान्य असते. देशाच्या दूरगामी हितासाठी प्रसंगी मित्रालाही बाजूला सारण्याची तयारी ठेवावी लागते. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यातील मैत्रीपूर्ण समीकरणाची चर्चा जगाला नवी नाही. आज मात्र दोघांसमोर असलेल्या राजकीय आणि सामरिक गरजा अशा वळणावर आल्या आहेत की, एका नेत्याचे यश दुसर्‍याच्या सहकार्यावर अवलंबून राहू शकते. ट्रम्प यांना इराणविरुद्धच्या संघर्षात निर्णायक सरशी मिळवून तिचा राजकीय लाभ घ्यायचा आहे, तर पुतीन यांचे युक्रेनविषयीचे गणितही यापेक्षा फारसे वेगळे नाही. इराणमध्ये सत्तांतर झाले, तर ट्रम्प यांच्यासाठी ती मोठी उपलब्धी ठरू शकते आणि युक्रेनमधून अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची गच्छंती झाली, तर पुतीन यांच्यासाठी तो मोठा विजय असेल. या दोन उद्दिष्टांसाठी ट्रम्प आणि पुतीन परस्परांना मदत करण्याचा काही मार्ग शोधत आहेत काय, हा प्रश्न म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. अमेरिकेच्या ‘सीआयए’चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांचा अलीकडचा मॉस्को दौरा आणि रशियन गुप्तचर अधिकार्‍यांशी झालेला संवाद संशयाला पुष्टी देणारा आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात, ही उक्ती जुनी असली, तरी गुप्तचर यंत्रणांच्या व्यवहाराला ती अधिक चपखल लागू होते. सार्वजनिक व्यासपीठांवर परस्परांविरुद्ध कठोर भूमिका घेणारे देशही पडद्यामागील संपर्काचे मार्ग सहसा पूर्णपणे बंद करीत नाहीत. रॅटक्लिफ यांनी रशियन गुप्तचर अधिकार्‍यांशी चर्चा केल्याला त्यामुळे महत्त्व आहे. रशियाच्या परदेशी गुप्तचर सेवेचे म्हणजे ‘एसव्हीआर’चे प्रमुख सर्गेई नारिश्किन यांनीही या संवादाला दुजोरा दिला आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत ‘सीआयए’च्या प्रमुखांचा रशियाशी झालेला संपर्क ही सहज दुर्लक्ष करता येण्यासारखी बाब नाही.

अमेरिका आणि रशियाच्या गुप्तचर संस्थांतील संपर्काचा इतिहासही बराच जुना आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत महासंघ यांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचे अंतर होते; पण नाझी जर्मनीविरुद्धच्या लढाईने त्यांना एकाच बाजूला आणले. त्या काळात अमेरिकेची ‘ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सर्व्हिसेस’ अर्थात ‘ओएसएस’ आणि सोव्हिएत गुप्तचर यंत्रणा यांच्यात संपर्क प्रस्थापित झाला. अमेरिकेच्या गुप्तचर इतिहासातील नोंदीनुसार ‘ओएसएस’चे प्रमुख विल्यम जे. डोनोव्हन यांनी १९४३ मध्ये सोव्हिएत अधिकार्‍यांशी गुप्तचर सहकार्य आणि माहितीच्या देवाणघेवाणीच्या शक्यतांवर चर्चा केली होती. पुढे काही वर्षांतच अमेरिका आणि सोव्हिएत महासंघ शीतयुद्धातील दोन प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून आमने-सामने आले. एका काळातील सहकार्य आणि लगेच त्यानंतरचे तीव्र शत्रुत्व यांत विसंगती नव्हती. दोन्ही निर्णयांमागे त्या त्या वेळचे राष्ट्रीय हित होते.

पुढील काळातही अमेरिका आणि रशिया यांच्यात मर्यादित स्वरूपात असे सहकार्य झाल्याची उदाहरणे आहेत. दहशतवादाचा धोका त्यापैकी एक. डिसेंबर २०१७ मध्ये सेंट पीटर्सबर्गमध्ये होऊ घातलेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती अमेरिकेने रशियाला दिली होती. त्या माहितीच्या आधारे रशियन सुरक्षा यंत्रणांनी कारवाई करून हल्ल्याचा कट उधळला. त्यानंतर पुतीन यांनी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनी करून अमेरिकी मदतीबद्दल आभार मानले होते. परस्परांविषयी कितीही संशय असला, तरी समान धोका समोर आला की, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण अशक्य राहत नाही, हे या घटनेने दाखवून दिले.

रॅटक्लिफ यांच्या आताच्या मॉस्को संपर्काला याच इतिहासाची पार्श्वभूमी आहे; पण वर्तमानातील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. युक्रेन युद्धाने अमेरिका आणि रशियाला परस्परविरोधी बाजूंवर उभे केले. तथापि, युद्ध लांबत गेल्याने ते संपविण्यासाठी संवादाची गरजही वाढत चालली आहे. युक्रेन युद्ध संपविता आले, तर ट्रम्प यांना ते आपल्या परराष्ट्र धोरणातील मोठे यश म्हणून मांडता येईल. पुतीन यांना मात्र युद्धाचा असा शेवट अपेक्षित असेल, ज्यात रशियाने मिळविलेली सामरिक किंवा प्रादेशिक स्थिती कमजोर होणार नाही. दोघांची उद्दिष्टे एकसारखी नाहीत. अनेक बाबतींत ती परस्परविरोधी आहेत, तरीही युद्धाच्या समाप्तीची गरज त्यांना एका व्यवहाराच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. अशावेळी औपचारिक मुत्सद्देगिरीपेक्षा गुप्तचर यंत्रणांचे मार्ग काही बाबतीत अधिक उपयोगी ठरतात. परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीतील प्रत्येक शब्दाला अधिकृत भूमिकेचे वजन असते. गुप्तचर अधिकार्‍यांच्या संवादात मात्र संभाव्य पर्यायांची चाचपणी करता येते. दुसर्‍या बाजूची मर्यादा समजून घेता येते आणि कोणतीही सार्वजनिक बांधिलकी न स्वीकारता संदेश पोहोचविता येतात. युद्धाच्या निर्णायक टप्प्यांवर अशा संपर्कांचे महत्त्व म्हणूनच वाढते.

या समीकरणातील दुसरा संवेदनशील दुवा म्हणजे इराण. अमेरिका आणि इराणमधील तणाव, रशिया-इराण सामरिक संबंध आणि पश्चिम आशियातील वेगाने बदलणारा सत्तासमतोल यांचा परिणाम रशिया आणि अमेरिका या दोघांच्याही गणितांवर होतो. अमेरिकेला इराणमध्ये निर्णायक सामरिक यश मिळवायचे असेल, तर तेहरानवरील रशियाचा प्रभाव आणि मॉस्कोचे हित दुर्लक्षित करता येणार नाही. रशियालाही युक्रेनच्या पलीकडे पश्चिम आशियातील आपले स्थान जपावे लागणार आहे. त्यामुळे इराणचा प्रश्न हा अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाबरोबरच तो अमेरिका-रशिया व्यवहाराचाही एक भाग बनण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रॅटक्लिफ यांच्या संवादात इराणमधील सत्तांतर किंवा युक्रेनमधून अध्यक्ष झेलेन्स्की यांची गच्छंती अशा शक्यतांवर चर्चा झाली असावी, असा तर्क मांडला जात आहे. त्यासंबंधी अधिकृत तपशील समोर आलेले नसले, तरी या शक्यता ट्रम्प आणि पुतीन यांच्या राजकीय गणितांशी थेट जोडलेल्या आहेत.

महासत्तांनी दुसर्‍या देशांतील राजकीय परिस्थिती आपल्या हिताला अनुकूल करण्याचे प्रयत्न केलेले नाहीत, असे इतिहास सांगत नाही. नेतृत्वबदल, सत्तांतर किंवा राजकीय दबाव हे अनेकदा व्यापक भूराजकीय संघर्षाचे साधन बनले आहेत. अशा हालचाली प्रत्येक वेळी विचारसरणीतूनच घडतात असेही नाही. सामरिक भूगोल, लष्करी गरज, ऊर्जा, प्रभाव क्षेत्र आणि दीर्घकालीन राष्ट्रीय हित यांचा त्यामागे मोठा वाटा असतो. रॅटक्लिफ यांच्या मॉस्को संपर्काला त्यामुळे केवळ दोन गुप्तचर प्रमुखांमधील नियमित संवाद समजून दुर्लक्ष करता येत नाही.

या घडामोडींचा अर्थ ट्रम्प आणि पुतीन यांच्या सार्वजनिक भूमिकेपलीकडेही संवादाचे एक स्वतंत्र क्षेत्र अस्तित्वात असल्याची शक्यता हा आहे. दोघेही राष्ट्रीय हिताला अग्रक्रम देणारे आणि त्यासाठी व्यवहाराची चौकट बदलण्यास मागे-पुढे न पाहणारे नेते आहेत. गुप्तचर यंत्रणाही याच सत्ताव्यवहाराचा अत्यंत संवेदनशील भाग असतात. मित्रत्व टिकविणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी नसते. राष्ट्राचे हित जपणे हे त्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे गरज पडल्यास प्रतिस्पर्ध्याशी बोलणे आणि हितसंबंध बदलल्यास मित्रापासून अंतर राखणे, हे त्यांच्या दृष्टीने अनपेक्षित नसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT