डॉ. सुकृत खांडेकर
दरवर्षी दिवाळीनंतर छठपूजा साजरी होते आणि गेली काही वर्षे मुंबईत छठपूजेच्या विरोधात नाराजीचे सूर उमटतात. ठाकरे बंधू आणि त्यांच्या राजकीय पक्षांकडून छठपूजेवरून केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनाला विरोध केला जातो. आव्हाने-प्रतिआव्हाने दिली जातात. मुंबईतील मराठी हाच अजेंडा असलेल्या ठाकरे बंधूंचे राजकीय पक्ष आणि बिहारी संघटना यांच्यात दरवर्षी संघर्ष होतो. यावर्षीही तेच घडले. छठपूजेच्या निमित्ताने मराठी विरुद्ध बिहारी असा वाद का निर्माण होतो?
राज्यात कोणाचेही सरकार असो, कोणताही पक्ष सत्तेवर असो. मुंबईत छठपूजेच्या वेळी मराठी विरुद्ध बिहारी हा वाद वर्षानुर्षे चालूच आहे. यावर्षी तर छठपूजेनिमित्त चौपाटीवर आलेल्या बिहारी जनतेचे स्वागत करायला भाजप व एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आघाडीवर दिसले. जुहू चौपाटीवर आणि घाटकोपर व ठाणे येथे छठपूजेसाठी मुंबई व ठाणे महापालिकेने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने राजकारणाला तोंड फुटले. महायुती सरकारने सर्व सरकारी यंत्रणा छठपूजेसाठी तैनात केल्या होत्या, असे दृश्य सर्वत्र बघायला मिळाले.
छठपूजा म्हणजे समुद्रात किंवा पाण्यात उतरून सूर्याला अर्घ्य देणारी पूजा. मुंबईतील कोकणी माणूस दरवर्षी गणपती, होळीला कोकणातील आपल्या गावी हमखास जातो. तसे मुंबई, पुणे, दिल्ली आदी मोठ्या शहरांत रोजगारानिमित्त आलेला बिहारी माणूस छठपूजेसाठी बिहारला त्याच्या गावी जातोच. यावर्षी तर पाटणा रेल्वे स्टेशनवर दिवाळीच्या पहिल्या दोन दिवसांत चाळीस लाख लोक वेगवेगळ्या राज्यांतून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, तरीही मुंबई, दिल्लीत राहत असलेले बिहारी त्या त्या शहरात छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी करतात. बिहारची राजधानी पाटणापेक्षा मुंबई व दिल्लीत वास्तव्याला असलेल्या बिहारी भाषिकांची संख्या मोठी आहे. यूपी, बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश अशा राज्यांत रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत; पण लोकसंख्या मोठी आहे. हिंदी भाषिक राज्यांत केंद्राने दिलेल्या हजारो कोटींच्या निधीतून पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प उभे राहिले; पण रोजगार मात्र वाढला नाही. मुंबईत राहायला घर मिळणार नाही, रस्त्यावर किंवा झोपडपट्टीत तेही शेअरिंगमध्ये राहावे लागेल; पण या महानगरात कोणी उपाशी राहत नाही. मुंबईसारखी रेल्वे, लोकल्स, मेट्रो, बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी अशी २४ तास सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा देशात कुठेही सहज उपलब्ध नाही. शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार अशा मुबलक संधी महामुंबईत आहेत. म्हणूनच वर्षानुवर्षे परप्रांतीयांचे लोंढे मुंबईवर आदळत आहेत व सरकार कोणाचेही आले, तरी ते थांबवता आलेले नाहीत.
मुंबईची लोकसंख्या दीड कोटीवर आहे. ठाणे, नवी मुंबई, विस्तारीत महामुंबईसह दोन कोटींपेक्षा जास्त लोक इथे आहेत. मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या साठ ते सत्तर लाख असावी. मुंबईच्या सार्वजनिक जीवनात हिंदी भाषिक लोकसंख्या ही राजकीय पक्षांसाठी मोठी व्होट बँक बनली आहे. महामुंबईतील मराठी मतदार उबाठा सेना, शिवसेना (शिंदे), भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्वच पक्षांत विभाजित आहेत. मुस्लिमांसाठी सपा व एमआयएम आहेत. ठाकरे बंधूंचे पक्ष हे केवळ मराठी मतदारांवर वाटचाल करीत आहेत. दुसरीकडे हिंदी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी भाजप सतत प्रयत्नशील असते. हिंदी भाषिक व्होट बँकेसाठी एकनाथ शिंदेही मैदानात उतरले आहेत. म्हणूनच छठपूजेच्या स्वागतासाठी मुंबईत सर्वत्र भाजप व शिवसेनेचे बॅनर्स झळकताना दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो सर्व बॅनर्सवर झळकत होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री छठपूजेसाठी येणाऱ्या हजारो हिंदी भाषिकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होते, मग छठपूजेला विरोध करून कोणाला काय साध्य होणार? छठपूजेसाठी महापालिका, पोलीस व प्रशासन सारी यंत्रणा चार दिवस राबत होती.
गणेशोत्सवाप्रमाणेच छठपूजेला सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे मुंबईच्या भाजपच्या महापौर रितू तावडे यांनीच जाहीर केले होते. यावर्षी घाटकोपर येथे छठपूजेसाठी एक कोटी रुपये खर्च करून महापालिकेने शंभर कृत्रिम तलाव उभारले होते. हिंदी भाषिकांच्या छठपूजेला राज्याचे सरकार व प्रशासन महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गणेशोत्सवाचा दर्जा देऊ पाहत आहे का, अशी खदखद मराठी मुंबईकरांत दिसून आली. छठपूजा हा काही महाराष्ट्राचा उत्सव नाही. तो केवळ बिहारी लोकांचा आहे; मात्र उत्तर भारतीय हिंदी भाषिक लोकही त्यात आता सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळेच आपल्या राज्यात आपल्याला गौण लेखले जात आहे, अशी भावना मराठी लोकांच्या मनात बळावत चालली आहे. महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या छठपूजेला महायुती विशेषत: भाजप एवढे का महत्त्व देत आहे? पुढील वर्षी मार्च-एप्रिलमधे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे व देशातील सर्वात मोठे राज्य भाजपच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचे आहे. म्हणूनच हिंदी भाषिकांबरोबर आम्ही (भाजप) आहोत, मुंबईतील हिंदी भाषिकाची काळजी आम्ही घेतो, हा संदेश भाजपला द्यायचा असावा.
यंदा मुंबईत छठपूजा उत्सवाचे २९ वे वर्ष आहे. भाजपचे वामनराव परब यांनी पुढाकार घेऊन या उत्सवाला उत्तेजन दिले. सुरुवातीला मोहनलाल मिश्रा लोक जमवत होते. नंतर संजय निरूपम यांनी बिहारी फ्रंट स्थापन केले. शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालीन मंत्री नारायण राणे हेसुद्धा छठपूजेला निरूपम यांच्या निमंत्रणावरून गेले होते. राज ठाकरे मात्र कधी गेले नाहीत. मनसेची स्थापना झाल्यावर त्यांनी छठपूजेला उघडपणे विरोध दर्शवायला सुरुवात केली. छठपूजेचा उत्सव यावर्षी तेरा ते सोळा नोव्हेंबरदरम्यान साजरा झाला. दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील उपनगरी रेल्वे स्थानकांवर अचानक भोजपुरी गाणी वाजू लागली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) ते कर्जत -कसारा, चर्चगेट ते वसई-विरार-पालघर, सीएसटी आणि ठाणे ते पनवेल अशा सर्व उपनगरी मार्गांवर रेल्वेकडून गाड्या कोणत्या येणार किंवा जाणार, किती उशिरा धावत आहेत, कोणत्या फलाटावर येत आहेत किंवा कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत याच्या उद्घोषणा सतत चालू असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी त्या आवश्यक असतात; पण या उद्घोषणा थांबवून भोजपुरी गाणी रेल्वे स्थानकांवर सुरू झाली, हे ऐकून मुंबईकरही एकदम हबकले. मग, कळाले की छठपूजेच्या वातावरणनिर्मितीसाठी भोजपुरी गाणी ऐकवली जात होती.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात १०७ जणांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईवर पहिला हक्क मराठी लोकांचा आहे. मुंबई ही मराठी भाषिक राज्याची राजधानी आहे. याच मुंबईत दिवाळी, गणपती, होळी, दसरा, गुढी पाडवा, दहिहंडी, महाराष्ट्र दिन किंवा मराठी दिनाला उपनगरी रेल्वे स्टेशनवर कधी मराठी गाणी ऐकायला मिळाली नाहीत. मग, रेल्वेला अचानक छठपूजेसाठी भोजपुरी गाण्यांचा पुळका कसा आला? जेव्हा मनसे व उबाठा सेनेचे पदाधिकारी रेल्वे कार्यालयात जाऊन धडकले तेव्हा भोजपुरी गाणी थांबवली गेली. हिंदी भाषिकांची सतत वाढती संख्या बघता यापुढे छठपूजा थांबणार नाही. पुढील वर्षी तर लाखो येतील. गर्दी वाढतच जाणार. छठपूजा हा हिंदू सण आहे. त्याला विरोध असायचे कारण नाही; पण मराठी भाषिक राज्यात त्यावरून राजकारण व शक्तिप्रदर्शन केले जात आहे, त्याला आक्षेप आहे. राजकारण रोखणे हे कुणाच्याच हातात नाही. ठाकरे बंधूंखेरीज अन्य राजकीय पक्षांचे नेते या विषयावर गप्प आहेत.