Online Gaming | ऑनलाईन गेमिंगचे वाढते जाळे  
बहार

Online Gaming | ऑनलाईन गेमिंगचे वाढते जाळे

पुढारी वृत्तसेवा

कावेरी गिरी

आजकाल घरात एखादा किशोरवयीन मुलगा किंवा तरुण दिसला आणि त्याच्या हातात मोबाईल नसेल, असे चित्र क्वचितच दिसते. सोशल मीडियाइतकेच ऑनलाईन गेमिंगही त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनले आहे. शाळा सुटली की गेम, कॉलेजमधून परतल्यावर गेम, रात्री मित्रांसोबत ऑनलाईन गेम... अनेकांसाठी हा निव्वळ विरंगुळा आहे; पण या मनोरंजनाच्या पडद्यामागे एक वेगळे वास्तवही आकार घेत आहे. काहीजण वेळ गमावत आहेत, काही जण पैसे, तर काही मानसिक शांतता!

ऑनलाईन गेमिंग हा शब्द ऐकला की, अनेकांच्या डोळ्यांसमोर लगेच मोबाईलवरील एखादा गेम येतो; पण आज या क्षेत्राचे स्वरूप खूप मोठे झाले आहे. साध्या गेमपासून ते पैशांची गुंतवणूक करून खेळल्या जाणाऱ्या गेम्सपर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. याच ठिकाणी मनोरंजन आणि आर्थिक धोका यांच्यातील सीमारेषा धूसर होत जाते. गेल्या काही वर्षांत भारतात ऑनलाईन गेमिंग उद्योग झपाट्याने वाढला. स्वस्त इंटरनेट, स्मार्ट फोनची सहज उपलब्धता आणि डिजिटल पेमेंटची सवय यामुळे लाखो लोक या विश्वात दाखल झाले. अनेक कंपन्यांनी आकर्षक जाहिराती, बोनस ऑफर्स, कॅशबॅक आणि बक्षिसांची आमिषे दाखवून ग्राहक जोडले. काही सेलिब्रिटींनीही या प्लॅटफॉर्मच्या जाहिराती केल्यामुळे लोकांचा विश्वास वाढला; पण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते, हे अनेकांना उशिरा समजले.

अनेक तरुण सुरुवातीला फक्त मजा म्हणून गेम डाऊनलोड करतात. काही गेममध्ये सुरुवातीला थोडे पैसे जिंकतातही. त्यातून आत्मविश्वास वाढतो. आता आणखी थोडे खेळू, यावेळी जास्त जिंकू असा विचार मनात येतो; पण हा खेळ नेहमी जिंकण्यापुरता मर्यादित राहत नाही. काही वेळा नुकसान सुरू होते आणि ते भरून काढण्याच्या प्रयत्नात आणखी पैसे खर्च होतात. नकळत हा छंद सवयीमध्ये आणि सवय व्यसनात बदलते. ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली होणारी फसवणूक ही आज सायबर गुन्ह्याची मोठी समस्या बनली आहे. गुन्हेगार नवनवीन मार्ग शोधत आहेत. काही जण सोशल मीडियावर आकर्षक जाहिराती देतात. काही जण मेसेजद्वारे गेम डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवतात. सुरुवातीला बोनस दिला जातो, काही वेळा जिंकूही दिले जाते; पण जेव्हा मोठी रक्कम गुंतवली जाते, तेव्हा पैसे अडकतात. पैसे काढण्यासाठी वेगवेगळ्या शुल्कांची मागणी केली जाते. अनेकांना तेव्हा आपण फसवणुकीचे बळी ठरलो आहोत, हे लक्षात येते.

फसवणुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे बनावट गेमिंग ॲप्स. ही ॲप्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सची वैयक्तिक माहिती, बँक खात्याशी संबंधित तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती चोरली जाऊ शकते. काही वेळा स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातूनही खात्यातील पैसे गायब होतात. लवकर श्रीमंत व्हा किंवा दररोज हजारो रुपये कमवा अशा जाहिरातींच्या मागे अनेकदा अशाच फसवणुकीचे जाळे लपलेले असते. या सगळ्यात सर्वाधिक चिंता वाटते ती तरुण पिढीची. गेम जिंकण्याचा आनंद आणि हरल्यानंतर पुन्हा जिंकण्याची इच्छा यामुळे अनेकजण तासन्‌ तास मोबाईलसमोर बसून राहतात. अभ्यास, नोकरी, कुटुंब, मित्र यांच्यापेक्षा गेम महत्त्वाचा वाटू लागतो. झोपेचे तास कमी होतात. चिडचिड वाढते. काही जण वास्तवापासून दूर जाऊ लागतात. मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, अशाप्रकारच्या सवयींचा मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. याचा आर्थिक फटकाही कमी नसतो. काही तरुण स्वतःची बचत खर्च करतात. काही क्रेडिट कार्ड वापरतात. काही वेळा घरच्यांच्या नकळत त्यांच्या खात्यातून पैसे वापरले जातात. सुरुवातीला छोटी रक्कम वाटणारे व्यवहार एकत्रितपणे मोठ्या नुकसानीत बदलतात. अनेक कुटुंबांना याचा फटका बसत असल्याच्या घटना वेळोवेळी समोर येतात.

ऑनलाईन गेमिंगकडे पाहताना दुसरी बाजूही लक्षात घ्यायला हवी. जगभरात ई-स्पोर्टस्‌ हे मोठे क्षेत्र बनत आहे. अनेक खेळाडू या माध्यमातून करिअर करत आहेत. काही गेम्समुळे निर्णय क्षमता, टीमवर्क आणि वेगवान विचार करण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या ऑनलाईन गेमिंगला एकाच तराजूत मोजणे योग्य ठरणार नाही. प्रश्न गेमचा नसून त्याच्या वापराचा आहे. अलीकडेच पोलिसांनी सायबर गुन्हेगारी टोळीचा भाग असलेल्या आणि लोकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय. गुन्हे शाखेने काही जणांना अटक केली. हे आरोपी सायबर फसवणूक आणि ऑनलाईन गेमिंग ॲप्ससाठी बँक खाती उपलब्ध करून देत असत. हे आरोपी बनावट कंपनी चालवत होते. शहरातील विविध बँकांमध्ये नवीन चालू खाती (current accounts) उघडली जात होती आणि नवीन सिम कार्ड ॲक्टिव्ह होती. त्यानंतर खात्याशी संबंधित कागदपत्रे (account kit) आणि सिम कार्ड दुबईला पाठवली जात होती, जिथे त्यांचा वापर गेमिंग आणि सायबर फसवणुकीसाठी केला जात असे.

ऑनलाईन जगात मोफत मिळणाऱ्या प्रत्येक ऑफरवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, कोणत्याही ॲपला परवानगी देणे, ओटीपी किंवा बँकिंग माहिती शेअर करणे, पटकन पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडणे या चुका टाळणे आवश्यक आहे. गेम हा विरंगुळा म्हणून खेळला, तर त्यात गैर काही नाही; पण तोच आयुष्याचा केंद्रबिंदू बनला, तर त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागू शकते. मुलांच्या बाबतीत पालकांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. मुलगा किंवा मुलगी सतत मोबाईलवर असणे, रात्री उशिरापर्यंत गेम खेळणे, अभ्यासात लक्ष न लागणे, अचानक पैशांची गरज भासणे किंवा खर्चाचा हिशेब न सांगणे, ही काही संकेत असू शकतात. प्रत्येक गेम वाईट असतो असे नाही; पण त्याचा वापर किती आणि कशासाठी होतो, हे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT