डॉ. सुकृत खांडेकर
'वंदे मातरम्' हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रेरणा व ऊर्जा देणारे प्रतीक होते. याच 'वंदे मातरम्' गीताला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून केंद्र सरकारने त्याला राष्ट्रीय गान म्हणून घटनात्मक दर्जा दिला. 'वंदे मातरम्' या गीतात देशभक्ती फुलविण्याची जबरदस्त ताकद आहे. मग, याच गीतावरून भाजप व काँग्रेस या दोन मोठ्या राजकीय पक्षांत राजकारण का शिगेला पोहोचले आहे?
जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणेच 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. यापुढे 'वंदे मातरम्' हे गीत पूर्ण सहा कडव्यांचे म्हणावे लागेल. या गीताचा अवमान झाला, तर तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देणारी कायद्यात सुधारणा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आली. 'वंदे मातरम्'विषयी (काँग्रेसपेक्षा) आम्हालाच जास्त आदर व प्रेम आहे, स्वातंत्र्य आंदोलनातील 'वंदे मातरम्' हा प्रेरणा देणारा मंत्र आहे, असे भाजप अभिमानाने सांगत आहे. आजवर काँग्रेसने 'वंदे मातरम्'ला कमी महत्त्व दिले. या गीताची सहा कडवी कधीच म्हटली नाहीत. आता मात्र काँग्रेस पक्ष 'वंदे मातरम्'चा कसा आदर करते, यावर भाजप बारीक लक्ष ठेवून आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी भाग घेतला नाही, त्यांनी आम्हाला 'वंदे मातरम्' गीताचे महत्त्व सांगू नये, असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे. 'वंदे मातरम्'वरून भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षात एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण केले जात आहे. केंद्रात आणि देशातील बावीस राज्यांत सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावर आक्रमक आहे, तर काँग्रेस बचावात्मक दिसते आहे.
'वंदे मातरम्' हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी प्रेरणा व ऊर्जा देणारे प्रतीक होते. भारतीय चेतना व सांस्कृतिक अस्मिता म्हणून 'वंदे मातरम्' या शब्दांत जबरदस्त सामर्थ्य आहे. 'वंदे मातरम्' या एका शब्दात १४० कोटी भारतीय जनतेच्या स्वाभिमानाचा हुंकार आहे. याच 'वंदे मातरम्' गीताला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून केंद्र सरकारने त्याला राष्ट्रीय गान म्हणून घटनात्मक दर्जा दिला. 'वंदे मातरम्'ला विरोध करण्याची हिम्मत कुणाकडेही नाही. नीट पेपरफुटीवरून झालेले जेन झीचे आंदोलन व त्यांच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेला निर्घृण लाठीमार यावरून विरोधी पक्षाने संसदेचे पावसाळी अधिवेशन वेठीला धरले होते. विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिले, या प्रश्नावरून काँग्रेस पक्षाने सरकारची कोंडी केली होती. याच गदारोळात संसदेचे अधिवेशन वाहून गेले; पण 'वंदे मातरम्'ला राष्ट्रीय गानाचा दर्जा देणारे सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केले. संपूर्ण अधिवेशन काळात पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात फिरकले नाहीत; पण शेवटच्या दिवशी 'वंदे मातरम्' गीताने अधिवेशानाचे सूप वाजले असताना ते दोघेही सदनात हजर राहिले. 'वंदे मातरम्' या गीतात देशभक्ती फुलविण्याची जबरदस्त ताकद आहे. मग, याच गीतावरून भाजप व काँग्रेस या दोन मोठ्या राजकीय पक्षांत राजकारण का शिगेला पोहोचले आहे? सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गेे आणि राहुल गांधींनी 'वंदे मातरम्' गीताचा स्वातंत्र्यदिनाला अपमान केला म्हणून भाजप आरोप करीत आहे, तर काँग्रेसचे नेते तुम्ही आम्हाला देशभक्तीचे धडे शिकवू नका, असे भाजपला बजावत आहेत.
'वंदे मातरम्' व काँग्रेस पक्षाचे नाते खूप जुने आहे. १८९६ च्या कोलकता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी स्वत: 'वंदे मातरम्' गीत गायले होते. पुढे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात व स्वातंत्र्य आंदोलनात ते गायले गेले. 'वंदे मातरम्' अशा घोषणा देऊनच स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश पोलिसांच्या लाठ्या- काठ्या अंगावर झेलल्या आहेत. 'वंदे मातरम्' म्हणजे भारतमातेची वंदना करणारा मंत्र अशी भावना स्वातंत्र्यपूर्व काळात होती व आजही आहे. 'वंदे मातरम्' या गीताला मुस्लिमांचा विरोध होता. या गीतात दुर्गा व लक्ष्मी रूपाचा उल्लेख आहे, हे मुस्लिमांना खटकायचे. त्यामुळेच काँग्रेसने 'वंदे मातरम्' हे गीत दोन कडव्यांपुरते मर्यादित स्वीकारले. मुस्लीम समाजाचा अनुनय करण्यासाठीच काँग्रेसने 'वंदे मातरम्' गीताच्या सहा कडव्यांऐवजी दोनच कडवी स्वीकारली, असे भाजप उघडपणे बोलत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 'वंदे मातरम्' गीताला 'जनगणमन' राष्ट्रगीताप्रमाणेच समान दर्जा प्राप्त होईल, असे म्हटले होते; पण काँग्रेस सत्तेवर असताना 'वंदे मातरम्'ला तसे समान महत्त्व मिळाले नाही. तसे झाले, तर अल्पसंख्य समाज नाराज होईल, अशी भीती काँग्रेसला वाटत असावी. राजकारण व अल्पसंख्यकांचा अनुनय यामुळे काँग्रेसने 'वंदे मातरम्' गीताला नेहमीच मर्यादेत ठेवले. या आरोपांना उत्तर देताना काँग्रेसला बचावात्मक भूमिका घ्यावी लागत आहे. भाजपने निर्माण केलेल्या 'वंदे मातरम्' मुद्द्यामागे काँग्रेसची आज फरफट होताना दिसत आहे. स्वातंत्र्यदिनाला काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गीत चालू असताना सोनिया गांधी कशा पुढे आल्या व हात उंचावून इशारा करू लागल्या, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून सोनिया गांधी यांनी 'वंदे मातरम्' गीताची दोन कडवी झाल्यानंतर ते थांबविण्याचा इशारा केला, असा प्रचार भाजपने सर्व देशभर केला. एवढेच नव्हे, तर नवीन कायद्यानुसार 'वंदे मातरम्'चा अवमान केला म्हणून दिल्ली, बंगळुरू, मंगलोर आदी ठिकाणी पोलीस ठाण्यांत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
'वंदे मातरम्' गीताला घटनात्मक व कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. सर्व सरकारी कार्यक्रमात 'वंदे मातरम्' गीत संपूर्ण सहा कडवी गायली पाहिजेत, असा आता दंडक आहे. काँग्रेसने नंतर खुलासा केला आहे की, स्वातंत्र्य दिनाच्या काँग्रेस मुख्यालयातील (इंदिरा भवन) कार्यक्रमात 'वंदे मातरम्' हे गीत संपूर्ण म्हटले गेले. काँग्रेसचे वयोवृद्ध अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मंचावर बराच वेळ उभे होते म्हणून सोनिया गांधी यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणावी, असे सुचवले. 'वंदे मातरम्' थांबविण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. भाजपने हा खोडसाळ प्रचार केला आहे. सोनिया गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी खुर्ची मागवली असती, तर ती मंचावर यायला हवी होती. प्रत्यक्षात कोणत्याच व्हिडीओत खर्गेंंसाठी मंचावर खुर्ची आणली गेली असे दिसले नाही.
भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात, सभा-समारंभात 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या जातात. विशेषत: देशात मोदी पर्व सुरू झाल्यापासून 'वंदे मातरम्' या घोषणांचा आवाज व जोर वाढला आहे. देशवासियांची बदलेली मानसिकता काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे. देशाच्या सरहद्दीवरील जवानही गस्त घालताना व शत्रूशी लढताना वंदेमातरम घोषणा देऊन देशप्रेम व्यक्त करीत असतात. वंदेमातरम मधून देशभक्तिची उर्जा निर्माण होते. सव्वाशे वर्षापूर्वी काँग्रेसच्या मंचावर वंदेमातरम गीत प्रथम गायले गेले, पण त्या संपूर्ण गीताला राष्ट्रीय सन्मान आणि प्रतिष्ठा कायद्यात सुधारणा करून भाजपने दिली आहे, हे कसे नाकारता येईल ? काँग्रेस पक्ष हा भाजपचा देशात राजकीय शत्रू नंबर १ आहे. वंदेमातरम बाबत काँग्रेसने किंचित जरी चूक केली किंवा वंदेमातरचा काँग्रेसकडून थोडा जरी अपमान झाला तरी भाजप त्या विरोधात देशभर ढोल बडवून काँग्रेसवर झोड उठवणार हे लहान मुलांनाही कळते. मग वंदेमातरम बाबत काँग्रेसने गाफील का राहावे ?
वंदेमातरमचा अपमान केला म्हणून अमित शहा जाहीर सभांतून सोनिया गांधींना दोष देत आहेत. सोनिया गांधी देशाची माफी मागा, असे सांगत आहेत. संसदेत काँग्रेसचे खासदार विद्यार्थांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार – गोळीबार प्रकरणी अमित शहा माफी मागा अशा घोषणा देत होते, आता वंदेमातरमच्या मुद्यावर शहा स्वत: सोनिया गांधी यांना माफी मागा असे सांगत आहेत. पणजी येथील कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगे म्हणाले- पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी जे वंदेमातरम गीत म्हणत होते, तेच मी म्हटले. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना व नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे वंदेमातरम म्हणत होते, ते मी म्हटले. मग नेहरू, गांधींवरही गुन्हे दाखल करणार का ? जेव्हा मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो, तेव्हा अमित शहा हे छोटा मुलगा होता, त्यांनी मला देशभक्तिचे धडे शिकवू नयेत, असेही खरगे यांनी बजावले आहे.
राम मंदिरातील दान पेटीवर पडलेला दरोडा, नीट पेपर फुटी, जेन झी आंदोलन व विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा झालेला अमानुष वापर, यामुळे भाजपची देशभर बेअब्रु झाली, त्यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी भाजपने वंदेमातरमवरून काँग्रेसची बदनामी सुरू केली आहे, असे काँग्रेस पक्ष सांगत आहे. भाजपच्या किती खासदारांना संपूर्ण वंदेमातरम गीत म्हणता येते ? असा खोचक प्रश्न कीर्ति आजाद यांनी विचारला आहे. वंदेमातरमवरून देशभर गदारोळ चालूआहे. दि. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर साजरा झालेल्या देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला स्वत: मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी का हजर राहिले नाहीत, याचा खुलासा काँग्रेसने केलेला नाही. गांधी हे लोकसभेत व खरगे हे राज्यसभेत विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांच्या गैरहजेरीने कुणाचा अपमान झाला असा मुद्दा अजून कोणी उपस्थित केलेला नाही. वंदे मातरम का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान… अशी प्रबळ भावना देशात आहे.