Thanale- Nadsur Caves | वनौषधीच्या परिसरात ठाणाळे- नाडसूर लेणी 
बहार

Thanale- Nadsur Caves | वनौषधीच्या परिसरात ठाणाळे- नाडसूर लेणी

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

ठाणाळे हा २३ लेण्यांचा समूह असून ही सर्व पश्चिमाभिमुख लेणी आहेत. त्यात एकच चैत्य व एक स्मारक स्तूप समूह आहे. तो पाहताना भाज्याच्या स्तूप समूहाची आठवण येते. उरलेली लेणी म्हणजे भिक्षू निवास आहेत. यातील काही स्तुपावर पिरॅमिड आकाराचे अलंकरण आहे व चार कोपर्‍यांत छिद्रे आहेत.

रायगड जिल्ह्यात घारापुरी येथील हिंदू देव-देवतांची भव्य स्वरूपातील सुबक व कोरीव लेणी हीसुद्धा पर्यटकांचे आकर्षण बनलेली आहेत. रायगड जिल्ह्याला एका बाजूला समुद्र, तर दुसर्‍या बाजूला सह्याद्रीची डोंगररांग अगदी चिकटून आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात माणगाव, महाड, सुधागड या तालुक्यात बौद्ध व पांडवकालीन लेणीसुद्धा भरपूर आहेत. या दृष्टीने माणगाव तालुक्यातील कुडे-मांदाड येथील लेणी व सुधागड तालुक्यातील ठाणाळे येथील लेणी प्रसिद्ध आहेत. समुद्राजवळ चौल, श्रीवर्धनसारखी व्यापारी बंदरं आहेत, तर सवाष्णी घाट, नाणदांड घाट, वाघजाई घाट अशा अप्रसिद्ध घाटांमार्फत तयार झालेले व्यापारी मार्गदेखील आहेत. या वाघजाई घाटाच्या व्यापारी मार्गावरचा हा एक लेणीसमूह आहे. ठाणाळे येथील लेणी मात्र सह्याद्री डोंगर मालिकेत घनदाट अशा जंगलामध्ये सुधागड तालुका व पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेत खोदण्यात आली आहेत. त्या भागाला चिवरदांड असे म्हणतात. २००० वर्षांपूर्वी कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना डोंगरातील एकाच सलग दगडामध्ये प्रचंड पाषाण फोडून ही लेणी तयार केली आहेत. अजूनही रस्ता नसलेल्या अशा निर्मनुष्य भागामध्ये हिंस्त्र श्वापदांचा धोका पत्करून तत्कालीन मानवाने खोदलेली ही लेणी पाहिली म्हणजे या माणसांच्या कलेबरोबर त्यांचे धैर्य, बळ व सूत्रबद्धता यांचे कौतुक वाटते.

रायगड जिल्ह्यात पाली गाठून पुढे पेडली - ठाणाळे अशी मार्गक्रणा करत आपण पायवाटेने डोंगरात घनदाट जंगलात या लेण्यांपाशी पोहोचतो. नाडसूर गावही ठाणाळे गावाप्रमाणे जवळच असल्याने लेण्यांना नाडसूर लेणीही म्हटले जात असे. इ.स.१८९० मध्ये जेम्स ॲबॉटने प्रथम ही लेणी शोधली. हेन्री कझिन्सनी आपल्या लेण्यांवरच्या ग्रंथात ठाणाळे लेणी समाविष्ट करून घेतली. हेन्री कौसेन्स यांनी ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, नाडसूरपासून गुहांपर्यंत एक अवघड चढण आणि लांबचा प्रवास आहे, ज्या गावापासून पूर्वेला दोन मैल अंतरावर घाटाच्या एका फाट्याच्या बाजूला खोदलेल्या आहेत. या गुहा जवळजवळ पश्चिमेकडे तोंड असलेल्या ट्रॅप कड्यांच्या एका लांब रांगेत कोरलेल्या आहेत आणि त्या अठरा आहेत. त्यापैकी दक्षिण टोकापासून तिसरी, सातवी, आठवी आणि पंधरावी गुहा सर्वात महत्त्वाची आहे. अनेक गुहांच्या आतील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळजवळ प्रत्येक गुहेचा दर्शनी भाग नाहीसा झाला आहे.

म. न. देशपांडे या ज्येष्ठ इतिहास संशोधकांनी नाशिकच्या पांडव लेण्यांमधील एका शिलालेखात सिरीटीन ठाणाळे लेण्यांचा पर्वत असल्याचा तर्क लावला आहे. त्यासाठी त्यांनी लेण्यांमध्ये असलेल्या श्री म्हणजे लक्ष्मीच्या ४ शिल्पांचा दाखला दिला आहे. याच परिसरात खडसांबळे आणि गोमाशी लेणी आहेत. ठाणाळे लेण्याचा काळ इ.स. पूर्व दुसर्‍या शतकापासून इ.स. ५ व्या शतकापर्यंतचा आहे. ठाणाळे हा २३ लेण्यांचा समूह असून ही सर्व पश्चिमाभिमुख लेणी आहेत. त्यात एकच चैत्य व एक स्मारक स्तूप समूह आहे. तो पाहताना भाज्याच्या स्तूप समूहाची आठवण येते. उरलेली लेणी म्हणजे भिक्षू निवास आहेत. यातील काही स्तुपांवर पिरॅमिड आकाराचे अलंकरण आहे व चार कोपर्‍यांत छिद्रे आहेत. त्याचा उपयोग फुलांच्या माळा खुंटीने अडकविण्यासाठी असावा. याच सभागृहात कोरीव काम केलेल्या कोनाड्यात (देवळी) पूर्णाकृती २ स्तूप आहेत. भिक्षूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्तूप उभारण्याची प्रथा होती.

लेणी क्रमांक ३ हे एक वैशिष्ट्यपूर्ण लेणे आहे. त्यात एकापुढे एक कोरलेले सहा एकाश्म स्तूप, कोनाड्यात २ व ५ दगड-मातीचे असे एकूण १३ बांधीव स्तूप नोंदवले गेले आहेत. या लेण्यात संशोधकांना मातीचे भांडे, काही चांदीची आहत नाणी व एक प्रतीकात्मक स्तूपही सापडला होता. या लेण्यातील स्तुपाचा बदलत गेलेला आकार, शैली, अलंकरण यातून इथे पाच-सहा वेळा फेरबदल झाले असावेत असा देशपांडे यांचा अभ्यास होता. असे स्मृती स्तूप खोदण्याची परंपरा कान्हेरी, भाजे इथे दिसून येते.

लेणे क्रमांक ७ म्हणजे या लेणीसमूहाचा मध्यभाग. हे चैत्याला जोडून असलेले लेणे आहे. ठाणाळे लेण्यांमधला हा सर्वात प्रशस्त भाग असून हा एक विहार आहे. उत्तेरकडील भिंतीत चैत्यकमान असून त्याच्या वरच्या बाजूस एक ब्राह्मीमध्ये शिलालेख आहे. तो इ.स.पू. पहिल्या शतकातला आहे. जवळच भिक्षूंच्या खोलीच्या दरवाजाबाहेर एक शिल्पपट असून त्यात एक वेदिकापट, हर्मिका असलेला अर्धा उत्कीर्ण स्तूप, त्याच्या एका बाजूस पुरुष व दुसर्‍या बाजूस स्त्री हात पुष्प घेऊन पूजा करताना कोरलेले आहे. आत एक शयानासाठी दगडात बाक कोरलेला असून त्या दरवाज्याच्या वर जालवातायन आहे. या खोल्यांमधून प्रवेश करण्यासाठी तीन छोटे सोपान कोरलेले आहेत. खोल्यांना लागून ओटे आहेत व प्रत्येक खोलीन शयन ओट्यांवर बसून समोरील सृष्टीशोभा न्याहाळता येते. या लेण्यात अनेक प्रकारची शिल्पं असून त्यात नागाची दोन शिल्पे, समोरासमोर उभे दोन बैल, सोंडेत कमळ धरलेला हत्ती, गजलक्ष्मीची २ शिल्पे, दंपतीचे पट, सिंहीण व तिचा छावा अशी विविध शिल्पे दिसतात. विहारातील छतावर एक रंगीत छत्र आहे. या छतावर सुंदर नक्षी आहे. सभागृहाचे दोन्ही बाजूस पाणी साठविण्यासाठी ३ मी. खोलीचे भव्य हौद खोदले असून हौदाचा तोंडाचा भाग निमुळत्या स्वरूपात झाकणासाठी उघडा ठेवला आहे. या पाण्याच्या टाक्यांना पूर्वी पोढी म्हणत असत. उत्तरेकडील भाग कोसळला असल्याने पोढी नष्ट झाली आहे.

लेणी क्रमांक ८ हे स्तंभविरहित व गजपृष्ठाकृती छत असलेले चैत्यगृह आहे. त्याचा दर्शनी भाग पूर्वी खुला असावा आणि त्याला प्रवेशद्वारही असावे असे उरलेल्या खुणांवरून समजते. चैत्यगृहाच्या दक्षिणेकडील भिंतीच्या वरच्या भागात एक दानलेख कोरला आहे. हादेखील इ. स.पू. पहिल्या शतकातला आहे. ठाणाळे लेणी समूहातील इतर सर्व भिक्षूंसाठी बांधली गेलेली विश्रामगृहे द्विगर्भ किंवा त्रिगर्भ म्हणजेच दोन किंवा तीन भिक्षूंसाठी खोदली होती. महायान पंथाच्या भिक्षूंनी पाचव्या शतकात या विहारांमध्ये बुद्ध व बोधिसत्व यांची शिल्पे न कोरता चित्रे रंगविली. अशा प्रकारची चित्रे अजिंठा, भाजे, पितळखोरे येथील चैत्य गुहांमध्ये बघावयास मिळतात. लेण्यांच्या दक्षिणेकडील भागात एका विशिष्ट दगडावर थाप मारल्यास मृदंगातील स्वराप्रमाणे विविध स्वर ऐकू येतात. याच भागात लांबवर गेलेला भुयारी मार्ग आहे. लेण्यातील बहुतांश खडबडीत पृष्ठभागावर विशिष्ट मिश्रणाच्या लगद्याला घोट्याने गुळगुळीत करून त्याच्या सहाय्याने चित्रे काढण्याची कल्पना होती; परंतु ती अपूर्ण राहिली.

गुंफा क्रमांक १५ हे काहीसे उंचीवर खोदलेले लेणे असून अपूर्ण असले, तरी दखल घेण्याजोगे आहे. त्यात पाठीमागच्या भिंतीमागे २ भिक्षूंसाठी खोल्या असून दर्शनी भागात भागात दोन खोल्यांच्या द्वारांच्या मधोमध एक उत्कीर्ण स्तूप कोरला आहे. तसेच लेण्यात प्रवेश केल्यावर समोर गजलक्ष्मी कोरलेली दिसते. विहारात असलेले स्तुपाचे शिल्प पहिल्या दुसर्‍या शतकात निर्मिलेले असावे, असा जाणकारांचा अंदाज आहे. इथे माशावर आरूढ दंपती कोरलेले दिसतात. १६ व १७ क्रमांकाच्या लेण्याबाहेर पाण्याच्या टाक्यावर एक ब्राह्मीमध्ये दानलेख कोरलेला दिसतो. इतिहासकार म. न. देशपांडे यांच्या मते ठाणाळे लेणी भाजे लेण्यांच्याही आधी खोदलेली असावीत. चौल बंदराचं महत्त्व कमी झाल्यावर व्यापारी मार्गही बदलत केले आणि ही लेणी स्मृतिआड गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात अशा या निर्जन परिसरातील लेण्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही आश्रय घेतला होता. वासुदेवरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने मोठे बक्षीस जाहीर केले होते. यावेळी इंग्रजांना चुकवित कोकणातून घाटावर येताना फडके येथे राहिले होते असा संदर्भ सापडतो.

ठाणाळे लेण्यांच्या जंगलामध्ये विविध प्रकारच्या वृक्षवेली आहेत. विस्तीर्ण वृक्षांबरोबर दाट झुडपेसुद्धा आहेत. वृक्षामध्ये प्रामुख्याने ऐन, धावडा, सालढोल, पेय ही झाडे जास्त प्रमाणात आढळतात. याखेरीज साग, नाण्या पांढरी ऐन, हेद, आंबा, काजळ, भेंड, वावळा, कोशीम, पळस, कुडुक, शेमट, सावर, पारंगा, पिंपळ, अंबर, चांभेल, मोहा, अळू, चांद, धामण, आवळी, निवारा, पायरकुड्या इ. एक ना अनेक प्रकारची वनौषधी झाडे येथे आहेत. काही झाडांपासून खाण्याचा डिंक मिळतो, तर काही झाडांवरील पोळ्यातून मध मिळते. किंबहुना येथील प्रत्येक झाड व त्याची मुळी व फुले- पाने औषधी आहेत. बौद्धकालीन लेण्यांचा सांस्कृतिक ठेवा लाभलेल्या या वनक्षेत्राचा आज विकास होणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने शासनाने ठाणाळे भागातील जंगल हे संरक्षित वनक्षेत्र म्हणून राखून ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT