मारुती वि. पाटील
स्वच्छता मोहिमांमध्ये नेहमीच्या कचरावेचकांपासून ते विद्यार्थी, लोकप्रतिनिधींच्या सहभागापासून ते यंत्रमानव, स्मार्ट मशिन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे आपण नेहमी पाहतो. जगात औद्योगिकीकरणानंतर सर्वात मोठी कचऱ्याची समस्या निर्माण झाली, जी आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे जगभरात या रोजच्या कचरा उठावासाठी विविध मार्ग वापरले जातात. स्वीडन या देशात २०२२ मध्ये एक असा प्रयोग करण्यात आला, ज्याने त्यावेळी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या प्रयोगात यंत्रांऐवजी जंगली कावळ्यांची बुद्धिमत्ता वापरून रस्त्यांवरील सिगारेटची थोटके गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी तिथल्या न्यू कॅलेडोनियन कावळ्यांची निवड करण्यात आली.
स्टॉकहोमजवळील सोडरटॅल्जे या शहरात कॉर्व्हिड क्लीनिंग (Corvid Cleaning) नावाच्या स्टार्टअपने हा प्रायोगिक उपक्रम सुरू केला होता. या प्रयोगामागील उद्दिष्ट होते की, रस्त्यांवरील कचरा कमी करणे, स्वच्छतेवरील खर्च घटवणे आणि पक्ष्यांच्या विलक्षण संज्ञानात्मक क्षमतेचा उपयोग करून पाहणे. या प्रकल्पासाठी जंगली कावळ्यांना एका विशेष फीडिंग सिस्टीमद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. कावळ्यांना रस्त्यावर पडलेली सिगारेटची थोटके आणि इतर योग्य कचरा उचलून एका खास मशिनमध्ये टाकण्याचे शिकवले जात होते.
या प्रशिक्षणाची पद्धत अतिशय सोपी होती. कावळ्याने कचरा मशिनमध्ये टाकताच मशिनमधील कॅमेरे आणि सेन्सर्स त्या वस्तूची तपासणी करत. वस्तू योग्य असल्याचे निश्चित झाल्यावर मशिनमधून कावळ्यासाठी बक्षीस म्हणून विविध बिया, शेंगदाणे किंवा इतर खाद्यपदार्थ खाली पडत. अशाप्रकारे ‘कामाच्या बदल्यात अन्न’ या तत्त्वावर कावळ्यांना प्रोत्साहन दिले जात होते. मशिनमध्ये कॅमेरे आणि सेन्सर्स बसवण्यात आले होते. मशिन सिगारेटची थोटके, प्लास्टिक किंवा इतर कचरा आणि पाने, लाकडाचे तुकडे यांसारख्या नैसर्गिक वस्तूंमध्ये फरक ओळखू शकत होते. योग्य कचरा मशिनमध्ये टाकल्यासच कावळ्याला खाद्यपदार्थाचे बक्षीस मिळत असे. चुकीची वस्तू टाकल्यास मशिन कोणतेही बक्षीस देत नसे. यामुळे पक्ष्यांना योग्य वस्तूच आणण्याची सवय लागावी, अशी या प्रणालीची रचना करण्यात आली होती.
कावळेच का निवडले?
कावळे हे जगातील सर्वाधिक बुद्धिमान पक्ष्यांपैकी एक मानले जातात. संशोधनानुसार न्यू कॅलेडोनियन कावळ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता सुमारे सात वर्षांच्या मुलांइतकी विकसित असल्याचे आढळले आहे. ते साधने वापरू शकतात, अनुभवातून शिकू शकतात आणि इतर कावळ्यांकडूनही नवीन कौशल्य आत्मसात करू शकतात. त्यामुळे या प्रयोगासाठी त्यांचीच निवड करण्यात आली.
किती होऊ शकली असती बचत?
या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे ख्रिश्चन गुंथर हॅन्सेन यांच्या मते, सोडरटॅल्जे शहरातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी सुमारे १.६ दशलक्ष पाऊंड (अंदाजे १७ ते १८ कोटी रुपये) खर्च केला जातो. त्यांच्या अंदाजानुसार, कावळ्यांमार्फत कचरा गोळा केल्यास स्वच्छतेचा हा खर्च सुमारे ७५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. कारण, तिथे सिगारेटच्या थोटकांचाच कचरा सुमारे ६० टक्क्यांहून अधिक आहे. एका कावळ्याने सिगारेटची थोटके उचलण्यासाठी सुमारे ‘एक पेन्स’ खर्च येणार होता. तोच पारंपरिक पद्धतीत त्याच कामासाठी सुमारे सहा पेन्स खर्च होत होता.
प्रत्यक्षात ही बचत कावळे किती प्रमाणात कचरा गोळा करतात, यावर अवलंबून राहणार होती; पण नंतर यावर नैतिक प्रश्नही उपस्थित झाले. या प्रयोगाला जगभरातून मोठी प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले; मात्र अनेक पर्यावरणतज्ज्ञ आणि प्राणी संवर्धन संस्थांनी या उपक्रमावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, सिगारेटच्या थोटक्यांमध्ये निकोटीन आणि इतर विषारी रसायने असतात. अशा कचऱ्याच्या सतत संपर्कात आल्याने कावळ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वन्यपक्ष्यांकडून अशाप्रकारचे काम करून घेणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का, यावरही चर्चा झाली. या सर्व बाबींचा विचार करून वरच्या पातळीवर पक्ष्यांच्या आरोग्याचे मूल्यमापन करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
प्रकल्पाचे पुढे काय झाले?
सुरुवातीला या उपक्रमाला मोठे आंतरराष्ट्रीय आकर्षण मिळाले असले, तरी पुढे ‘कॉर्व्हिड क्लीनिंग’ या स्टार्टअपने आर्थिक अडचणींमुळे आपले काम बंद केले आणि सरकारकडे आपला दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे हा प्रायोगिक उपक्रम पुढे मोठ्या प्रमाणावर राबवला जाऊ शकला नाही.
तरीही या प्रयोगाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला गेला. वन्यजीवांची बुद्धिमत्ता समाजाच्या उपयोगासाठी जबाबदारीने आणि नैतिकतेने वापरता येऊ शकते का? कारण, या ना त्या प्रकारे मानव अशा पशू-पक्षांना विविध प्रयोगांच्या नावाखाली, स्वत:च्या उपयोगासाठी वापरतच आला आहे.
स्वीडनमधील हा प्रयोग अखेरीस यशस्वी व्यावसायिक मॉडेल ठरला नसला, तरी त्याने कावळ्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेची जगाला पुन्हा एकदा जाणीव करून दिली. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वन्यजीव यांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनासाठी नवीन कल्पना विकसित होऊ शकतात, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले.
मात्र, अशा कोणत्याही उपक्रमात प्राण्यांचे आरोग्य, नैतिकता आणि पर्यावरणीय परिणाम यांना सर्वोच्च प्राधान्य देणे तितकेच आवश्यक आहे. भविष्यात अशा कल्पना अधिक सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने राबवल्या गेल्यास त्या शाश्वत स्वच्छता व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकतात, हे मात्र अधोरेखित झाले.
यापूर्वीही झाला होता असाच प्रयोग
अशाप्रकारचा प्रयोग काही प्रथमच झाला नव्हता. २०१८ मध्ये फ्रान्समधील 'पुई दु फू' (Puy du Fou) या थीम पार्कमध्ये कावळ्यांना कचरा उचलून योग्य ठिकाणी टाकण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यावेळी पार्कचे अध्यक्ष निकोलस डी व्हिलियर्स यांनी सांगितले होते की, या उपक्रमाचा उद्देश केवळ परिसर स्वच्छ ठेवणे एवढाच नसून, निसर्ग आणि प्राणीही पर्यावरण संरक्षणाचा संदेश देऊ शकतात, हे लोकांना दाखवून देणे हा होता.