Live-in relationship | आधुनिकतेच्या नावानं... Pudhari File Photo
बहार

Live-in relationship | आधुनिकतेच्या नावानं...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. ऋतू सारस्वत

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह-इन संबंधांवर केलेल्या सूचक आणि सखोल टिप्पणीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. एखादे नाते तुटले की, त्याला दुष्कर्माचा रंग देणे योग्य नाही, असा स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिला. न्यायालयाने सांगितले की, विवाहाचे आश्वासन खोटे ठरले म्हणून दुष्कर्माचा गुन्हा लावायचा असेल, तर त्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत.

अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह-इन संबंधांवर केलेल्या सूचक आणि सखोल टिप्पणीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. एखादे नाते तुटले की, त्याला दुष्कर्माचा रंग देणे योग्य नाही, असा स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिला. न्यायालयाने सांगितले की, विवाहाचे आश्वासन खोटे ठरले म्हणून दुष्कर्माचा गुन्हा लावायचा असेल, तर त्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत. दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने तयार झालेले नाते पुढे मनःस्वास्थ्य, मतभेद किंवा भावनिक ताणामुळे संपल्यास त्याला दुष्कर्म म्हणता येणार नाही. ही भूमिका मांडताना न्यायालयाने ‘आधुनिकतेच्या नावाखाली सामाजिक वास्तवाचे भान हरवत नाहीये ना’ असा सवालही उपस्थित केला आहे. न्यायालयाने असेही म्हटले की, प्रत्येक बिघडलेल्या नात्याला दुष्कर्मासारख्या गंभीर गुन्ह्यात परिवर्तित करण्याने खर्‍या गुन्ह्याची तीव्रताच कमी होते. त्याचबरोबर अशा प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीवर कधीही न पुसला जाणारा कलंक लादला जातो. न्यायव्यवस्थेचा हा गैरवापर समाजासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. अर्थातच, ही प्रवृत्ती नवीन नाही. याआधीही अदनान विरुद्द उत्तर प्रदेश राज्य आणि अन्य या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, लिव्ह-इन संबंध भारतीय समाजाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात आहेत आणि बहुतांश वेळा ते कायदेशीर संघर्षांचे कारण बनतात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे यातून अनेक वेळा महिलांनाच सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

आज भारतीय समाज एका विचित्र संक्रमणातून जात आहे. काही कथित प्रगत किंवा स्त्रीवादी गट विवाहाला बंधन मानून त्यातून मुक्त होणे म्हणजे स्त्रीचे खरे स्वातंत्र्य असे ठामपणे सांगत आहेत. अशा विचारांचा परिणाम म्हणजे आज अनेक तरुणी विवाह टाळून लिव्ह-इन रिलेशनशिपचा पर्याय स्वीकारताना दिसताहेत. आधुनिकतेचा आव आणत त्या दीर्घकालीन परिणामांची जाणीव न ठेवता अशा नात्यांकडे आकर्षित होताहेत; पण काही काळानंतर याच नात्याची पोकळी जाणवू लागते. सामाजिक स्वीकृती नसणे, नाते दीर्घकाळ टिकविण्यासाठी आवश्यक असणारी जबाबदारी न पेलणे, भावनिक सुरक्षिततेचा अभाव अशा अनेक प्रश्नांचा सामना त्यांना करावा लागतो. सुरुवातीला स्वातंत्र्य, मोकळेपणा वाटणारे हे नाते काही महिन्यांतच असमंजसपणाचे आणि अस्थिरतेचे जाळे बनून जाते.

न्यायालयानेही एका प्रकरणात म्हटले होते की, लिव्ह-इनचे नाते पहिल्या नजरेत आकर्षक वाटते; परंतु कालांतराने त्याची अस्थिरता उघड होते. कारण, अशा नात्यांना विवाहांप्रमाणे सामाजिक मान्यता आणि स्थैर्य नसते. त्यामुळे भावनिक, सामाजिक आणि मानसिक या तिन्ही पातळ्यांवर लिव्ह-इन जोडपी एका शून्यात हरवू लागतात. अनेक वेळा विवाहाला ‘प्राचीन बंधन’ म्हणून लिव्ह-इनचा पर्याय निवडणारी व्यक्ती काही वर्षांनी साथीदाराकडून विवाहाची अपेक्षा करू लागते. हा विरोधाभासच या नात्यातील प्रश्नजंजाळ दर्शवणारा आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली विवाह संस्थेला बुरसटलेली आणि बंधनकारक म्हणणार्‍या तरुणींना अखेरीस स्थैर्य, सुरक्षा आणि सामाजिक मान्यता यांचीच गरज भासते. लिव्ह-इनचे तत्कालिक आकर्षण क्षणिक ठरते आणि नात्याच्या खोलवर जाणार्‍या स्तरावर स्थैर्याची आवश्यकता अधोरेखित होते.

विवाह संस्था विरुद्ध लिव्ह-इन

आधुनिकतेच्या समर्थकांकडून नेहमीच लिव्ह-इन नात्यांना ‘स्वातंत्र्याचे प्रतीक’ म्हणून मांडले जाते; पण हे नाते तुटल्यानंतर भावनिक संताप, गुन्हेगारी आरोप, एकमेकांवरचे दोषारोप, कायदेशीर लढाया हे सर्व का उद्भवते? लिव्ह-इन नातेसंबंध इतके सुरक्षित आणि आधुनिक असते, तर न्यायालयात अशा प्रकरणांची गर्दी का वाढत आहे?

विवाह संस्था हजारो वर्षांच्या सामाजिक अनुभवाचा परिणाम आहे. ती फक्त दोन व्यक्तींचे नाते नाही, ती सामाजिक मान्यता, जबाबदारी, कुटुंब, संतुलन आणि दीर्घकालीन सुरक्षिततेचा आधार आहे. विवाहामुळे नात्याला समाजातील स्वीकृती मिळते. लिव्ह-इनच्या वाट्याला यातील काहीच येत नसल्याने अस्थिरता, संशय, ताण हे प्रश्न सहजपणे उफाळून येतात. अनेक न्यायालयांनीही स्पष्ट केले आहे की, विवाहातून मिळणारे स्थैर्य आणि संरक्षण लिव्ह-इन नात्यांमध्ये शक्य नाही. विकसित देशांतही विवाह संस्था ढासळल्याने समाजात निर्माण झालेले ताण आणि अस्थिरता हे अभ्यासाचे विषय आहेत. प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ जे. डी. अनविन यांनी त्यांच्या संशोधनात दाखवून दिले होते की, समाजातील सांस्कृतिक र्‍हासाचे मुख्य कारण म्हणजे, लैंगिक आचारसंहितेतील हलगर्जीपणा हे आहे. त्यांच्या मते पूर्ण एकपत्नीत्व आणि विवाहशुचिता राखणारा समाजच खर्‍याअर्थाने प्रगती करतो. हे संयोजन जे समाज तीन पिढ्यांपर्यंत टिकवतात, तेच विज्ञान, कृषी, कला, साहित्य आणि संस्कृतीत सर्वोच्च स्थानी राहतात. जे समाज या क्षेत्रात भटकतात, त्यांची संस्कृती हळूहळू लयाला जाते.

आज अनेक तरुण-तरुणी ‘वैयक्तिक स्वातंत्र्य’ या कल्पनेला इतके महत्त्व देतात की, समाज, संस्कृती, कुटुंब यांची एकत्रित जबाबदारी त्यांना बंधनासारखी वाटू लागते; पण या ‘स्वातंत्र्याच्या’ मोहाने पुढे किती खोल जखमा निर्माण होऊ शकतात, याचा विचार क्वचितच केला जातो. लिव्ह-इन नात्यातून वाढणारी कायदेशीर प्रकरणे, भावनिक ताण, गुन्ह्यांचे प्रमाण पाहता खरंच हे नाते ‘आधुनिकतेचे’ लक्षण आहे का, की हे फक्त भावनिक अनिश्चिततेचे आणि सामजिक पोकळीचे द्योतक आहे, असा प्रश्न निर्माण होतो. लिव्ह-इन नात्यांतून जन्मलेल्या मुलांना ओळख, कौटुंबिक स्थैर्य, सामाजिक स्वीकृती यांसारख्या अनेक समस्या भोगाव्या लागतात. कारण, अशा नात्यांमध्ये जबाबदारीची कमतरता असते. त्यामुळे मुलांच्या मानसिक विकासावरही प्रतिकूल परिणाम होतो. विवाह हा फक्त दोन व्यक्तींचा निर्णय नसतो. तो दोन कुटुंबांना, दोन संस्कृतींना जोडणारा दुवा असतो. त्यात सुरक्षितता, संरक्षण, सहजीवनातील स्थैर्य आणि सामाजिक मान्यता या सर्व गोष्टींचे मिश्रण असते. लिव्ह-इन या सर्व पैलूंना पूर्ण करण्यात अपयशी ठरते. म्हणूनच न्यायालयानेही म्हटले आहे की, विवाह संस्था कोलमडली, तर सामाजिक ढाचाच कमकुवत होऊन समाजात अस्थिरता वाढेल आणि प्रगतीचा मार्गच बदलून जाईल.

दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात विवाह संस्था नष्ट करण्यासाठी काही सांस्कृतिक प्रवाह, माध्यमे, सिनेमे, मालिका हे सर्व एक अप्रत्यक्ष दबाव निर्माण करत आहेत. प्रतारणा, क्षणिक नातेसंबंध, संबंधांची वारंवार अदलाबदल या गोष्टी ‘आधुनिकता’ म्हणून दाखवल्या जाताहेत; परंतु समाजाचा पाया घट्ट ठेवणार्‍या मूलभूत गोष्टींचा हा क्रमिक नाश आहे. न्यायालयाची अलीकडची टिप्पणी हेच सांगते की, आधुनिकतेच्या नावाखाली आपण नात्यांच्या खर्‍या स्वरूपाकडे दुर्लक्ष करतो आहोत. हे दुर्लक्ष पुढे गंभीर सामाजिक आणि वैयक्तिक संकटे निर्माण करणारे ठरू शकते. लिव्ह-इन नात्यांची चमक तात्पुरती असली, तरी त्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागू शकतात. आधुनिकता म्हणजे मूल्यांचा त्याग नव्हे, तर त्यांचा योग्य अर्थाने विस्तार. युवा पिढीने हा भ्रम ओळखला नाही, तर भविष्यात परत येण्यासाठी कुठलाही मार्ग शिल्लक राहणार नाही.

(लेखिका समाजशास्त्रज्ञ आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT