Sunetra Pawar Oath Ceremony | दादांच्या नंतर... 
बहार

Sunetra Pawar Oath Ceremony | दादांच्या नंतर...

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

दादा गेल्यानंतर सुनेत्राताई पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ही जबाबदारी त्या कितपत पेलतील, हा पुढचा प्रश्न! भारतीय जनता पक्षाची त्या वारशाला मान्यता आहेच. तथापि, अर्थ खाते कोणाकडे, हा प्रश्न पुढे येईल. विलीनीकरण झालेच आणि शरद पवार यांचा गट भारतीय जनता पक्षाचा सहप्रवासी व्हायला तयार झाला, तर जयंत पाटील नावाचा एक दमदार अर्थमंत्री फडणवीस यांच्या मदतीला पुढे येऊ शकेल; मात्र तसे झाले नाही, तर सव्वा महिन्याने सादर होणारा राज्याचा अर्थसंकल्प कदाचित देवेंद्र फडणवीस स्वतःच सादर करतील. अजितदादा यांनी कायम जपलेली आणि विकासाचा मंत्र मानलेली ग्रामीण अर्थव्यवस्था या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी असेल का, हादेखील पाठोपाठ येणारा प्रश्न आहे.

जाणारा जातो चटका लावून आणि अनेक प्रश्न मागे ठेवून! उपमुख्यमंत्री अजितदादांचे निधन अकाली, दुर्दैवी. अवघा महाराष्ट्र तोंडपाठ असलेल्या चुलते शरदराव पवारांच्या छत्रछायेतून अजितदादा बाहेर पडू बघत होते. यश-अपयश पुढचे मुद्दे होते; पण दादा स्वतंत्र राजकारण करू लागले होते. कराल काळाला, क्रूर नियतीला ते मान्य नव्हते. नव्या इनिंगला सुरुवात केल्यानंतर ते अवघ्या काही वर्षांत गेलेच. अनंताच्या यात्रेला. अजित पवार तर निघून गेले; पण आता पुढे काय? प्रश्न मोठे आहेत आणि महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाची दिशा ठरवणारे आहेत. दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आता त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्या हाती सोपविण्यात आले आहे. पुढील काळात त्यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसमधले अन्य मंत्री मान्य करणार काय? त्या राजकारणात आहेत; पण तशा नवागत आहेत. अर्थात, पतीच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश करून पक्षाला दिशा देण्याचे काम सोनिया गांधी यांनी केले. इथे तर पक्ष प्रादेशिक आहे. तसे पाहिले, तर भारतातले प्रादेशिक पक्ष एकेका कुटुंबाभोवती बांधलेले असतात. तेलगू देसम एनटी रामाराव यांच्या भोवती, आधुनिक काळातील द्रमुक करुणानिधी यांच्या भोवती, अण्णाद्रमुक एमजी रामचंद्रन आणि जय ललिता यांच्या भोवती, समाजवादी पक्ष मुलायमसिंग यादव यांच्या परिवाराभोवती आणि बिहारमधले राष्ट्रीय जनता दल लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबाभोवती. हे नेते यांच्या कुटुंबातील राजकारण ज्या पद्धतीने हाकू शकतात, त्यावर या पक्षांचे भवितव्य अवलंबून असते.

शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर पाच दशके अधिराज्य गाजवले. काही दशके पक्ष बांधून ठेवला. अजितदादा बंडाचा झेंडा घेऊन बाहेर निघाले. त्यानंतर यश पवारसाहेबांना हुलकवणी देईल, असे वाटत राहिले. ते यश लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळाले; पण विधानसभा निवडणुकीत पुन्हा हुलकावणी देत दूर गेले. मतदान पवार साहेबांना जास्त झाले; पण अजितदादांचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले. दादा जनसमर्थन असलेले नेते झाले. सत्तेत मानाने गेले. आता याच प्रमुख झाल्याच्या आधारावर ते शरद पवार साहेबांना विलीनीकरणाच्या हाका घालत होते. राष्ट्रीय राजकारणात बलशाली झालेला, महासत्ता नावाने ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष दादांना स्वतःकडे घेऊन गेला. या खेचण्यामागे काही आरोप होते, काही चौकशा होत होत्या असेही म्हणतात; पण झाले ते समोर आहे. दादांना पवारसाहेब साद देत होते अन् ते प्रतिसाद देत होते असे म्हणतात. पुणे आणि पिंपरी -चिंचवड या महानगरपालिकांत दोन गटांची नुसतीच युती झाली. तेव्हा भारतीय जनता पक्षाशी दोन हात करण्यासाठी अजितदादा पवारांनी पुन्हा चुलते शरद पवार आणि चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्याशी हात मिळवणी केली. या हात मिळवण्यानंतरही फारसं यश मिळालं नसताना दादा खिलाडूपणे भविष्यातील लढाईच्या योजना आखत होते.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळेल असा भारतीय जनता पक्षाचाही अंदाज होता, असे म्हणतात; पण हा सगळाच आता इतिहास झाला आहे. विमानात बसून बारामतीला निघालेले अजित दादा पवार दुर्दैवाने त्याच मातीत विलीन झाले आणि आता संबंधित राजकीय लोक पुढचे प्रश्न सोडवण्याच्या तयारीला लागले आहेत. सुनेत्राताई पवार यांची उपमुख्यमत्रिपदी निवड करून मुख्यमंत्र्यांनी आणि इतर संबंधित घटकांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. सुनेत्राताई या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी अत्यंत बलवान असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. त्यामुळेच त्यांच्या रक्तात नेतृत्वही आहे आणि राजकारणही. अजितदादा यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांच्या समवेत पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील सातत्याने होते. आता नवा रस्ता चोखाळताना सुनेत्राताईंच्या खांद्यावर अजितदादांची धुरा दिलेली आहे. पुढची वाटचाल त्यांना यशस्वी करून दाखवायची आहे.

भारतीय जनता पक्षात काही वर्षे घालवलेले राणा या कुटुंबाचे महत्त्वाचे कारभारी ठरतील. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताईंच्या नेतृत्वाच्या राज्याभिषेकाला प्रफुल्ल पटेल यांनी मान्यता दिली. सुनील तटकरे जे पक्षाचे राज्यातला क्रमांक एकचा चेहरा आहेत, त्यांनाही हा प्रस्ताव मान्य आहे. सुनेत्राताई कर्णधाराचे राजकारण यशस्वीपणे करतील काय, हे भविष्यात ठरेल. त्यांच्यावर पक्षाचे भवितव्य अवलंबून राहील. आता प्रश्न उरतो तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यावं, अशी भाषा गेले काही दिवस बोलली जात होती. अजितदादा आणि चुलते शरद पवार एकत्र येण्यास तयार आहेत अशी भूमिका अजितदादांनी दिल्ली दरबारी कळवली होती. या भूमिकेचे सूतोवाच करताच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पवार साहेब खरोखरच येणार आहेत का, हे तपासून पाहावे लागेल. आतापर्यंतचे दोन अनुभव वेगळे आहेत, असेही दादांना सांगितले होते, असे म्हणतात. दादा काही विषयांबाबत विचार करत होते आणि काही बाबत ठाम होते, असेही म्हणतात. वाद झाल्यानंतर एकदा दादा 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार संख्या जास्त असतानाही नाकारल्या गेलेल्या मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर बांद्य्रात झालेला तो पहिलाच मेळावा होता; मात्र लगेचच दुसर्‍या दिवशी टीकेचा सूर नरम करत दादा त्यांचे काका शरद पवार यांचा आशीर्वाद घ्यायला आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांच्या भेटीलाही गेले होते. हा सगळा इतिहास दादांच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा जागा झाला आहे. पवार साहेबांनी पायउतार होत दादा आणि ताईंकडे नेतृत्व सोपवण्याच्या चर्चा अंतिम झाल्या होत्या; मात्र त्यात अचानक बदल झाले आणि दादा अंतिमतः वेगळे झाले, असे म्हणतात. वेगळ्या झालेल्या या पक्षाला भारतीय जनता पक्षाने आपले म्हटले होते. अर्थात, भाजपशी मैत्री केली, तरी अजितदादा त्यांची वैचारिक भूमिका राखून होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात नागपूरला हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी युती जायची तेव्हा दादा तिथे आमदारांबरोबर जाणे टाळत असत. धर्मनिरपेक्ष मतांसाठी ते आवश्यक आहे आणि तीच आमची भूमिका असल्याचे दादा सांगत; मात्र आता तोही इतिहास झाला आहे. नव्या भूमिकेत अजितदादा पवार यांच्यावर श्रद्धा असलेले आमदार या भूमिकेवर कायम राहत स्वतंत्र अस्तित्व ठेवतील की भारतीय जनता पक्ष नावाच्या एका महान मोठ्या मशिनरीचा एक भाग होणे पसंत करतील? लगेच हा प्रश्न समोर येणार नसला तरी पुढच्या दोन-तीन वर्षात महाराष्ट्राचे राजकारण आणखी एका वेगळ्या वळणावर जाऊ शकेल. अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने दमदार पावले टाकायला सुरुवात केली होती. आता दादांच्या निधनानंतर भाजप त्यांची पत्नी त्यांची मुले त्यांचा गट यांच्या मागे उभे राहून हा वारसा त्यांनाच बहाल करणार आणि या पक्षाला आपला सहकारी गट म्हणून समोर आणणार का? याबरोबरच दादांच्या जाण्याने उपस्थित झालेले प्रश्नांचे मोहोळ काहीसे वेगळेही आहे 2004 स*** मुख्यमंत्री पदाची संधी असूनही ती नाकारली का गेली येथ पासून या प्रश्नांना सुरुवात होते.हाही इतिहास झाला असे म्हटले तर दादांना मान णार्‍या वर्गाला तो मान्य आहे काय? ते झाले गेले विसरून पुढे जाण्याच्या तयारीत आहेत काय? हा आजचा मुख्य प्रश्न आहे. दादांनी पवार साहेबांबद्दल कायम कृतज्ञ उद्गार काढले आणि दुर्दैवी निधनच्या काही महिने अगोदर ते त्यांच्याशी अत्यंत सलगीचे व्यवहारही करू लागले.

राजकारणातून नव्हे तर जीवनातून एक्झिट कराव्या लागणार्‍या दादांना आयुष्याच्या शेवटी अचानक निर्माण झालेले कौटुंबिक वैर संपवता आले ही दोघांसाठीही अत्यंत जमेची बाजू असेल. मरणान्तानि वैराणी असे म्हणतात. पण त्यापूर्वीच दादा आणि काका एकत्र येऊन विलीनीकरणाच्या चर्चा करत होते हे सत्य कुटुंबाला दिलासा देणारे आहे.अजित दादा यांचा राजकीय वारसा, त्यांचे उपमुख्यमंत्री पद, अर्थ खात्यावर त्यांनी घेतलेली पकड याचे पुढे काय हे काही प्रश्न नजीकच्या काळातच सोडवावे लागणार आहेत.सुनेत्रा पवार राजकारणात आल्या तर त्या उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील काय? ते त्यांना दिले जाईल काय?हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.त्याचे उत्तर होकारार्थी आले,भारतीय जनता पक्षाची त्या वारशाला मान्यता असली तर अर्थ खाते कोणाकडे हा प्रश्न पुढे येईल. विलीनीकरण झालेच आणि शरद पवार यांचा गट भारतीय जनता पक्षाचा सहप्रवासी व्हायला तयार झाला तर जयंत पाटील नावाचा एक दमदार अर्थमंत्री फडणवीस यांच्या मदतीला पुढे येऊ शकेल. मात्र तसे झाले नाही तर सव्वा महिन्याने सादर होणारा राज्याचा अर्थसंकल्प कदाचित देवेंद्र फडणवीस स्वतःच सादर करतील.अजितदादा यांनी कायम जपलेली आणि विकासाचा मंत्र मानलेली ग्रामीण अर्थव्यवस्था या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी असेल का हा देखील पाठोपाठ येणारा प्रश्न. अजितदादा यांनी प्रशासनावर उत्तम पकड निर्माण करत महाराष्ट्राच्या विकासाची काही स्वप्ने पाहिली होती. त्यांच्या काही निर्णयामुळे ते कमालीचे अडचणीतही आले होते. त्या निर्णयांची चौकशी आजही सुरू आहे असे भारतीय जनता पक्ष सांगत असतो मात्र अजित दादा यांना त्यांनी भारतीय जनता पक्षाशी संगनमत केल्यामुळे माफ केले गेले असेही मानले जाते.

या भूमिकेवर सुप्रियाताई सुळे यांची काहीशी वेगळी मते आहेत. ईडीचा वापर करून भारतीय जनता पक्ष नेत्यांना स्वतःकडे वश करतो असे त्या कायम म्हणतात.भारतीय जनता पक्ष हे एक वॉशिंग मशीन आहे.तिथे गेले की आरोप सं प तात असेही त्या वारंवार म्हणतात.सातत्याने केलेले हे आक्रमक आरोप विसरून त्या एनडीए चा भाग व्हायला तयार आहेत का? हा दादा नंतर कोण या पाठोपाठ उपस्थित होणारा महत्त्वाचा प्रश्न.पवार साहेब लवचिक धोरण स्वीकारत महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःची छाप पाडत आले.नुकताच मनसेच्या राज ठाकरे यांनीही लवचिकतेचा नारा दिला आहे.ही लवचिकता सुप्रियाताई यांना मान्य आहे का यावर विलीनीकरणाची चर्चा अवलंबून राहील. पवार साहेब याबद्दल नेमकी काय भूमिका घेतात हाही एक महत्त्वाचा प्रश्न असेल. आजवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय पवार साहेब घेणार आणि ते अजित दादा राबवणार अशी व्यवस्था होती.ती व्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये बदलली.आता तर दादाच काळाचा एक भाग होऊन बसले आहेत अशा परिस्थितीत त्यांचा वारसा त्यांचे योगदान आणि त्यांची कर्तृत्ववान शैली कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. पार्थ पवार या त्यांच्या ज्येष्ठ पुत्राने राजकारणात प्रवेश केला होता मात्र त्या प्रवेशात त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अजितदादा काहीसे उदास झाले होते. हा जिव्हारी लागलेला पराभव त्यांनी कसा स्वीकारला याबद्दल त्यांचे निकटवर्तीय कायम चर्चा करत असत.बारामती लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा यांचा झालेला पराभव देखील त्यांना असेच दुःख देऊन गेला होता म्हणतात.दादा कमालीचे काटेकोर होते.कोणत्याही कार्यकर्त्यांची कामे करणारे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजितदादा यांच्या मैत्रीचा, सरकार चालवताना काहीसा आधार होता असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही.एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी निभावत स्वतःचे वेगळे राजकारण केले.ते फडणवीस यांच्या राजकारणाला काहीसे समांतर होते.अजित दादा यांचे विचार आणि वैचारिक भूमिका वेगळी असली तरी त्यांचे राजकारण हे फडणवीस सांना पूरक होते. खरे तर अजित दादा यांनी राज्यात वारंवार उपमुख्यमंत्री पद सांभाळताना कधीही मुख्यमंत्री पदा वरील व्यक्तीला आव्हान दिले नाही. त्यामुळेच ते यशस्वी उपमुख्यमंत्री आणि यशस्वी सहकारी होते असे प्रत्येक मुख्यमंत्र्याला वाटत असे.

दादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा नियतीने केलेल्या या क्रूर प्रकारामुळे अधुरी तर राहिलीच परंतु भारतीय जनता पक्षाला अनुकूल होत असलेल्या सध्याच्या महाराष्ट्रात ते खरोखरच राज्याचे प्रमुख होऊ शकणार होते काय हा एक मुख्य मुद्दा होता. सिंचन घोटाळ्यातील आरोपांमुळे भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी केली तरी ती या काळात आवश्यक आहे,सध्या मोठी लाट आली असताना ठाम उभे राहिले पाहिजे नंतर टिकलो की राजकारण करता येईल असेही ते काही सहकार्‍यांना सांगत असे नमूद केले जाते. दादांना नियतीने तीही संधी दिली नाहीच. मात्र दादांनी निर्माण केलेला उत्तम प्रशासनाचा पक्ष विस्ताराचा प्रमुख नेत्याला पूरक म्हणून सातत्याने काम करण्याचा वारसा पुढे कसा सुरू राहील यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची ही पुढची दिशा अवलंबून असते अकाली निधन झालेल्या काहीशा अस्थिर,काहीशा अती आक्रमक परंतु दमदार आणि दिलदार राजकारण्याला पुढारी परिवाराची श्रद्धांजली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT