Indian Vampire Movies | गोष्ट भारतीय ‘व्हॅम्पायर’पटांची 
बहार

Indian Vampire Movies | गोष्ट भारतीय ‘व्हॅम्पायर’पटांची

पुढारी वृत्तसेवा

प्रथमेश हळंदे

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘थामा’ नुकताच रीलिज झालाय. यानिमित्ताने, भारतीय भयपटांमध्ये एका नव्या व्हॅम्पायरपटाची भर पडलीय. बॉलीवूडमध्ये व्हॅम्पायर्स अर्थात रक्तपिपासू भुतांची थीम तशी दुर्मीळच आहे; पण सध्या काही निवडक सिनेमांमुळे या जॉनरला एक वेगळी आणि रोमांचक ओळख मिळालीय. ‘थामा’च्या निमित्ताने, भारतीय व्हॅम्पायर सिनेमांचा प्रवास जाणून घेऊ पाहणारा हा लेख.

व्हॅम्पायर म्हटलं की, हॉलीवूडने रंगवलेले गॉथिक किल्ले, पांढरे पडलेले अमर लोक आणि रक्त पिणार्‍या शैतानांच्या सिनेमांची लांबलचक यादीच समोर येते. हॉलीवूडच्या भयपटांमध्ये एक वेगळा सबजॉनर हा व्हॅम्पायर या भुताभोवती विकसित झालाय. गेल्या पाच दशकांत भारतीय भयपटांनीही या सबजॉनरला आपलंसं केलं असून, नुकताच प्रदर्शित झालेला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘थामा’ ही या यादीतली नवी भर आहे. अतिशय रक्तहीन भासावा असा पांढरट, निस्तेज चेहरा, रक्तवर्णी बुब्बुळं आणि सुळ्यांसारखे दात हे एखाद्या व्हॅम्पायरचं साधारण वर्णन. हे व्हॅम्पायर साधारणतः निशाचर असतात, आपली भूक भागवण्यासोबतच आपलं आयुष्य वाढवण्यासाठी रक्त पितात आणि सूर्यप्रकाशात आल्यावर त्यांचा विनाश होतो, ही काही ढोबळ निरीक्षणं गेल्या शे-दीडशे वर्षांत अनेक कथाकादंबर्‍यांनी आणि सिनेमांनी जनमानसात रूढ केली.

ब्राम स्टोकरच्या ‘ड्रॅक्युला’ या जगप्रसिद्ध कादंबरीने व्हॅम्पायर प्रजातीला आणि पर्यायाने व्हॅम्पायरपटांना एक देखणा, उमदा नायक मिळवून दिला. आजवर हे पात्र 700 हून अधिक वेळा वेगवेगळ्या माध्यमांवर अवतरलंय. एखाद्या साहित्यकृतीतलं पात्र इतक्या वेळा साकारलं जाण्याचा अनोखा विश्वविक्रम या पात्राच्या नावावर गिनीज बुकमध्ये नोंदवला गेलाय. व्हॅम्पायरपटांची अफाट लोकप्रियता पटवून देण्यासाठी हा विश्वविक्रम पुरेसा बोलका आहे. या लोकप्रियतेच्या लाटेवर भारतासारखा सिनेवेडा देश स्वार झाला नसता, तर नवलंच! भारतीय उपखंडातला पहिला व्हॅम्पायरपट हा ‘जिंदा लाश’ नावाचा 1967 मध्ये रीलिज झालेला एक पाकिस्तानी सिनेमा होता, हे विशेष! त्याहून विशेष गोष्ट म्हणजे, याच सिनेमाला पहिल्या पाकिस्तानी भयपटाचाही बहुमान दिला जातो. या सिनेमावर हॉलीवूडच्या ‘ड्रॅक्युला’ या पात्राचा विशेष प्रभाव होता, असं म्हणलं जातं. भारताला मात्र आपला पहिला व्हॅम्पायरपट मिळवण्यासाठी 1979 ची वाट बघावी लागली.

1979 च्या जूनमध्ये ‘शैतान मुजरिम’ आणि सप्टेंबरमध्ये ‘भयानक’ रीलिज झाला. या दोन्ही सिनेमांच्या कथानकांचा केंद्रबिंदू हा व्हॅम्पायर असल्याने या सिनेमांपासून भारतात व्हॅम्पायरपटांची सुरुवात झाली, असे निश्चितच म्हणता येतं. यातला ‘भयानक’ हा सिनेमा लोकप्रिय अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या सुरुवातीच्या सिनेमांपैकी एक असून, यात व्हॅम्पायरची भूमिका निळू फुले या मराठीतल्या दिग्गज अभिनेत्याने साकारली होती. या दोन्ही सिनेमांची मांडणी आजच्या व्हॅम्पायरपटांसारखी निश्चितच नव्हती; पण त्यातल्या रक्तपिपासू वृत्तीच्या पात्रांमुळे त्यांच्यावर व्हॅम्पायरपटांचा शिक्का लावता येतो. ‘भयानक’मध्ये निळू फुलेंनी साकारलेलं बडे ठाकूर हे जमीनदाराचं पात्र त्याकाळच्या दंडेल, रगेल आणि एकप्रकारच्या रक्तपिपासू मनोवृत्तीच्या जुलमी सामंतशाहीचं प्रतीक म्हणूनही समोर येतं. भयकथांच्या जगात वारंवार चर्चिल्या जाणार्‍या इल्लुमिनाटीसारख्या गूढ संस्थेशी मिळतीजुळती संकल्पना ‘भयानक’मध्ये पाहायला मिळते.

भारतात भयपटांचं अनोखं जग उभारणार्‍या रामसे बंधूंचा ‘बंद दरवाजा’ हा सिनेमाही व्हॅम्पायर या संकल्पनेवर आधारित आहे. रामसे बंधूंनी आपल्या भयपटांमधून कामुक द़ृश्यांचा भडिमार केल्याचे त्यांच्यावर आरोप होतात. खरं तर, त्या काळात अशाप्रकारच्या सिनेनिर्मितीचं पेवच फुटलं होतं, असं म्हणायला हरकत नाही. ‘खुनी ड्रॅक्युला’ किंवा ‘सन ऑफ ड्रॅक्युला’सारख्या भारतातल्या पहिल्या काही ‘ड्रॅक्युला’पटांची गणतीही यातच होते. या अशा सिनेमांमुळेच ड्रॅक्युला किंवा व्हॅम्पायर ही संकल्पना भारतीय भयपटांमध्ये हाताळण्याचं धाडस मोठ्या प्रमाणावर झालं नाही. असं असलं, तरी रामसे बंधूंच्या एका अतिशय लोकप्रिय, बहुचर्चित सिनेमाचा म्हणजेच ‘वीराना’चा उल्लेख इथं आवर्जून करावासा वाटतो. ‘वीराना’मध्ये जास्मिनने साकारलेली भूमिका ही खरी व्हॅम्पायर होती, हे विशेष! मुळात, व्हॅम्पायर हे नाव पहिल्यांदा ‘द व्हॅम्पायर’ या 1913 मध्ये रिलिज झालेल्या सिनेमात वापरलं गेलं. या सिनेमात व्हॅम्पायर हा शब्द ‘व्हॅम्प’ या अर्थाने वापरण्यात आला होता. आपल्या मादक सौंदर्याचा वापर करून पुरुषांना मृत्यूच्या जाळ्यात अडकवणारी स्त्री म्हणजे व्हॅम्प. त्यामुळे ‘वीराना’तली जास्मिनही अशीच एक व्हॅम्प होती, हे विसरून चालणार नाही!

रामसेपटांचा प्रभाव ओसरल्यानंतरही भारतात भयपट बनत राहिले, बॉक्स ऑफिस गाजवत राहिले; पण त्यात व्हॅम्पायरपटांचा प्रभाव अगदीच नगण्य राहिलाय. प्रादेशिकस्तरावर भारतीय दंतकथांमधल्या रक्तपिपासू पिशाच्चांवरआधारित व्हॅम्पायरपटांचा प्रयोग झाला; पण त्याचं यश फारच मर्यादित स्वरूपाचं होतं. अपवाद कमल हासन अभिनित ‘वायनाडन तंबान’ या मल्याळम सुपर हिट सिनेमाचा. खरं तर, भारतीय दंतकथांमधल्या या पिशाच्चांना केंद्रस्थानी ठेवून अधिक प्रभावी व्हॅम्पायरपटांची निर्मिती झाली असती; पण तत्कालीन लेखक-दिग्दर्शक या दंतकथांचा प्रभाव जाणून घेण्यात अपयशी ठरले, असं खेदाने नमूद करावं लागतं. भारतीय दंतकथांमध्ये रक्तपिपासू भूत म्हणून पिशाच्च, वेताळ, यक्ष-यक्षिणी यांच्या गोष्टी आजही मोठ्या चवीने सांगितल्या जातात. विशेष गोष्ट म्हणजे, वेताळ हा मानवी रक्तावर पोसला जाणारा भुताचा प्रकार आहे, अशी मान्यता भारताच्या उत्तरेकडे आहे, तर महाराष्ट्र, तळकोकण आणि गोव्यात याच वेताळाचा समावेश प्रमुख लोकदैवतांमध्ये केला जातो. केरळमध्ये यक्षी हे भूत स्थानिक दंतकथांमध्ये रक्त पिणारं भूत म्हणून ओळखलं जातं.

यातल्या, वेताळ आणि यक्षी या संकल्पनांवर आधारित ‘लोका चॅप्टर 1 : चंद्रा’, ‘थामा’ या सिनेमांचा आणि ‘बेताल’ या हिंदी वेबसीरिजचा उल्लेख इथं आवर्जून करावासा वाटतो. ‘थामा’ हा ‘मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’ अर्थात ‘एमएचसीयू’मधला पाचवा सिनेमा. या सिनेमॅटिक युनिव्हर्समधून मॅडॉक ही निर्मितीसंस्था भारताच्या कानाकोपर्‍यातल्या दंतकथांना हॉरर कॉमेडी सिनेमाच्या स्वरूपात पडद्यावर आणतेय. स्त्री, सरकटा, भेडिया, मुंजा अशा भुतांमध्ये आता ‘थामा’च्या निमित्ताने वेताळाची वर्णी लागलीय. आलोक नावाचा एक पत्रकार ताडका या व्हॅम्पायरसद़ृश वेताळाच्या प्रेमात पडतो. एका अपघातात ताडका आलोकलाही वेताळ बनवते. त्यानंतर ते दोघे मिळून यक्षासन या क्रूर वेताळ नेत्यासोबत लढतात, ही ‘थामा’ची कहाणी. ‘थामा’ या शब्दाचा अर्थ होतो वेताळसेनेचा प्रमुख. रक्तबीज असुराशी लढताना चामुंडीदेवीने आपल्या मदतीसाठी वेताळ या यक्षगणाची निर्मिती केली. त्या सैन्याने चामुंडीदेवीला रक्तबीज वधासाठी मदत केली. याच वेताळसेनेवर आधारलेला हा सिनेमा. तर, एका आदिवासीबहुल जंगलात बोगद्याचं काम करताना झॉम्बींची एक जुनी ब्रिटिश फौज जागृत होते आणि ती सर्वांवर हल्ला करते, ही ‘बेताल’ची कथा होती. यात ‘बेताल’ हा त्या फौजेचा जुलमी सेनानायक होता, ज्याला मृत्युपश्चात आदिवासींनी त्याच्या भीतीपायी वेताळ या देवतेचा दर्जा दिला होता. दुर्दैवाने, ‘बेताल’ आणि ‘थामा’मधला एक समान दुवा म्हणजे या दोन्ही चित्रकृतींचा जॉनर हा व्हॅम्पायरपटांऐवजी झॉम्बीपटांकडे झुकण्याइतपत मोठा बदल यांच्या कथानकांमध्ये दिसून येतो. ‘बेताल’ आधीच त्या वळणावर जाऊन पोहोचलाय, तर ‘थामा’ची ती वाटचाल ‘एमएचसीयू’च्या आगामी सिनेमांमधून अधिक स्पष्ट होत जाते.

या यादीतलं तिसरं नाव अर्थात ‘लोका चॅप्टर 1 : चंद्रा’ हा सिनेमा मात्र भारतीय व्हॅम्पायरपटांच्या यादीत आपली निराळी छाप पाडतो. मल्याळम दंतकथांमध्ये येणार्‍या ‘कल्लीयनकट्टू नीली’ या यक्षीच्या व्हॅम्पायरसद़ृश पात्राला या सिनेमात एका सुपरवूमनच्या आधुनिक रुपड्यात दाखवलं गेलंय. यासोबतच मल्याळम लोककथा आणि दंतकथांमध्ये आढळणार्‍या इतर भुतांनाही यात स्थान दिलं गेलंय. विशेष म्हणजे, हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणार्‍या मल्याळम सिनेमांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हे यश फक्त बॉक्स ऑफिसची कमाई दाखवणारं आहे, असं म्हणणं संकुचितपणा ठरेल. कारण, भारतीय दंतकथांमध्येही विदेशी भयपटांच्या आणि विशेषतः व्हॅम्पायरपटांच्या तोडीचा आशय दडलाय, याचं हे प्रतीक आहे. ‘थामा’ आणि ‘लोका’च्या यशामुळे भारतात कधीही व्यवस्थितपणे न फुलू शकलेल्या व्हॅम्पायरपटांच्या जॉनरला नवसंजीवनी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, हे नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT