डॉ. मंगेश कश्यप
पाणी आपणास शून्य कॅलरी आणि पोषक तत्त्व प्रदान करते. तसेच सूक्ष्म जीवाणूंपासून ते अवाढव्य प्राण्यांपर्यंत सर्व जीवसृष्टीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. आता पाण्याच्या वापराचे काही मापदंड आपण पाहिले, तर भूजल किंवा पृष्ठभागाच्या (सरफेस वॉटर- भूपृष्ठजल) स्रोतांमधून पाणी घेणे आणि ते वापरण्याच्या ठिकाणी नेणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पाणी वाहून नेणे. जिथून पाणी घेतलेले आहे उदाहरणार्थ एक्स गावातून पाणी घेतले आहे आणि झेड गावापर्यंत ते वाहून नेले आहे, तर ते वाहून नेलेले पाणी पुन्हा एक्स गावासाठी वापरण्यासाठी किंवा रिसायकल करण्यासाठी उपलब्ध होत नाही. नुसत्या अमेरिकेत दरवर्षी जे फ्रेश वॉटर आहे किंवा ताजे पाणी आहे, त्यांची जी एकूण गरज आहे, त्यापैकी तीन चतुर्थांश पाणी हे नद्या, गोड पाण्याची जलाशये, तलाव, भूजल आणि भूपृष्ठजलामधून भागवण्यात येते आणि त्यापैकी 80 टक्के पाणी इलेक्ट्रिक पॉवर प्लांट थंड करण्यासाठी व इरिगेशनसाठी वापरले जाते.
पाणी समजून घेणे हा एक मोठा म्हटलं, तर इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्याचप्रमाणे तो समजायला जटिल अथवा गुंतागुंतीचाही आहे. कारण, पाणी हा जगातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीशी जोडलेला घटक आहे; परंतु पाणी समजून घेताना पाण्याच्या संदर्भातली असलेली जटिलता ही अडथळा ठरू नये. मानवी अस्तित्वासाठी आणि ग्रहतार्यांच्या शाश्वत अस्तित्वासाठीसुद्धा पाणी हाच एक मूलभूत घटक आहे. पृथ्वी आणि पृथ्वीच्या बाहेर असलेल्या अनेक ग्रहांवर त्यांच्या पृष्ठभागांवर पाण्याच्या अस्तित्वाचे शोध, प्रयोग, संशोधन चालू आहेत.
पृथ्वीच्या बाबतीत आपण मानव प्राणी खरोखरच भाग्यवान आहोत; परंतु हे भाग्य फार काही काळ टिकणारे नाही. आपण वेळीच संकुचित विचार न करता वैश्विक विचार पाण्यासंदर्भात करू शकलो, तर आपण सर्वांचंच जीवनमान उत्तम गुणवत्ता पूर्ण करू शकतो. वर म्हटल्याप्रमाणे पाणी हे जगातील जवळजवळ सर्व घटकांशी संबंधित आहे. त्यात प्रामुख्याने हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, जैवविविधता, फायनान्स, लिंग समानता, मानवाधिकार, दुष्काळ, अंतरप्रांतीय, आंतरदेशीय जल परिसीमा, पाणी आणि शहरीकरण, सांडपाणी आणि आरोग्य इत्यादी अनेक घटक येतात. यातील प्रत्येक घटक हा आपल्यासाठी मानवी अस्तित्वासाठी फार महत्त्वाचा आहे.
जागतिक पातळीवर जेव्हा आपण गांभीर्याने विचार करतो, निरीक्षण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की, पाणी हेच शाश्वत विकासाच्या मुळाशी आहे आणि पाण्याचा सामाजिक आर्थिक विकासाशी, निरोगी पर्यावरणाशी आणि मानवी अस्तित्वाशी महत्त्वपूर्ण संबंध आहे. कोरोनासारख्या रोगांचे जागतिक ओझे कमी करण्यासाठी आणि लोकसंख्येचे आरोग्य, त्यांचा विकास आणि उत्पादकता सुधारण्यासाठी पाण्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. हवामान बदल, मानवी समाज आणि पर्यावरण यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारा घटक म्हणजेदेखील पाणीच आहे. योग्य जल प्रशासनाशिवाय विविध क्षेत्रांमधील पाण्याची स्पर्धा वाढण्याची आणि विविध प्रकारच्या तीव्र स्वरूपाच्या जलसंकटांना सामोरे जाण्याच्या परिस्थितीत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. ज्यामुळे पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते.
पाण्याचे भौतिक जग हे सामाजिक-राजकीय जगाशी जवळून जोडले गेलेले आहे. दुष्काळ, साथीचे रोग, आर्थिक विषमता, असमान विकास, पाण्याचे समन्यायी वाटप, राजकीय अस्थिरता यासारख्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी पाणी हाच मुख्य घटक आहे. सध्या आपण जगभरामध्ये हवामान बदल या विषयावर विविध बातम्या वाचत असतो, पाहत असतो, ऐकत असतो. हवामान बदल याच्या मुळाशी आपण गेलो, तर आपल्या असे लक्षात येईल की, याच्या मुळाशी पाणी हाच एकमेव घटक आहे आणि पाण्यामुळेच आपल्याला हवामान बदलाचे जागतिक परिणाम जाणवतात. जगामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची अपेक्षित असलेली वाढ झालेली नाही. उपलब्धता कमी झाली आहे आणि पुराच्या वाढत्या घटनांमुळे सर्व जलाशय अथवा जलस्रोत प्रदूषित होऊन तेथे निर्माण केलेल्या स्वच्छता सुविधा नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित होतातच आणि त्यामुळे रोगराईसुद्धा वाढते. काही प्रदेशांमध्ये दुष्काळ आहे, तर काही ठिकाणी प्रचंड ओला दुष्काळ आहे. काही ठिकाणी पाण्याची अत्यंत कमतरता आहे, तर काही ठिकाणी पाणी प्रचंड आहे; परंतु पिण्यास पाणी नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर विशेष करून विकसित आणि विकसनशील देशांच्या नजरेतून पाहिल्यास अविकसित आणि विकसनशील देशांमधील लोकसंख्येला या हवामान बदलाचा परिणाम जाणवत आहे. विकसित देशांनी या समस्येवर मोठ्या प्रमाणात उपाय योजना सुरू केल्या आहेत. विकसनशील आणि गरीब देशांच्या उत्पादकतेवर त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या आरोग्यावर हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम आपल्याला जगभरात पाहायला मिळतो.