Shravan Month | थेंबांच्या चालीचा श्रावण... Pudhari File Photo
बहार

Shravan Month | थेंबांच्या चालीचा श्रावण...

श्रावण हा ऊन-पावसाच्या रमणीय खेळाचा महिना

पुढारी वृत्तसेवा

श्रीराम ग. पचिंद्रे

भारतीय संस्कृती ही सणांचे उत्सव साजरे करणारी आहे. त्यातच श्रावण हा ऊन-पावसाच्या रमणीय खेळाचा महिना आहे. ज्या महिन्यात पाऊस आणि ऊन यांचा मजेशीर खेळ अनुभवायला मिळतो, असा हा रंगबावरा श्रावण आपल्या मनामनातून रिमझिमत जातो.

एक विलक्षण सुंदर, कोवळा, ऊन-पावसाच्या खेळाने मजेत हसणारा मास म्हणजे श्रावण... बाहेर धारा कोसळत असते आणि कोमल मनाचं कुणीसं आतून भिजत असतो, म्हणून कवी अनिल म्हणतात -

श्रावणसर बाहेरी मी अंतरि भिजलेला

पंखी खुपसून चोच एक पक्षि निजलेला...

हा पक्षी म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून कवितेचा नायकच आहे. स्वतःत रममाण झालेला आहे तो. श्रावणात आपल्या ‘पंखात चोच खुपसून’ बाहेरचा आनंद मनातल्या मनात घेणारा मनुष्यपक्षी काही विलक्षणच होय.

पावसात वेडे मनमोर नाचले

श्रावणात भिजले घनघोर नाचले

पायी मी थेंबांची चाल बांधली

झाडांवर वार्‍याची थाप वाजली...

ही एका नव्या कवीची श्रेया घोषालनं गायिलेली कविता काही वेगळ्याच प्रतिमा घेऊन येते. श्रावणातल्या रिमझिम पावसाच्या थेंबांची चाल बांधण्याची कल्पनाच काही आगळी आहे.

साहित्याला श्रावणाने कितीतरी कविता दिलेल्या आहेत. श्रावणातल्या सरींइतक्याच त्या कविताही आनंद देतात.

केवळ मानवी मनालाच नव्हे, तर जीवसृष्टीच्या मानसात हर्ष फुलतो, तो या महिन्यात. सक्तीने श्रावण पाळायला लागणारे तळीराम सोडले, तर बहुतेकांना श्रावण मास आनंद देतो. हे तळीराम असोत की, ‘गणपती विसर्जनाशिवाय मांसाहार करणार नाही’ अशी घनघोर भीष्मप्रतिज्ञा करणारे अट्टल मांसप्रेमी असोत, श्रावणातील क्षणात येणार्‍या शिरव्यांचा आणि क्षणात पडणार्‍या सोनेरी सूर्यकिरणांचा आनंद लुटत असतात. ‘हवं तर वाघ पाळायला सांगा; पण श्रावण पाळायला सांगू नका,’ असं म्हणणार्‍या वाचाळवीरांना हे पक्कं माहीत असतं की, कुणीही पाळण्यासाठी आपल्या दारात किंवा परड्यात वाघ आणून बांधणार नाही म्हणून त्यांच्या डरकाळ्या सुरू असतात. आई-वडील-पत्नी यांच्या दबावाखाली वाघ नाही, श्रावणच पाळावा लागणार आहे, हे त्यांना कळत असतं. असो.

श्रावण म्हटल्यावर बालकवींच्या अजरामर कवितेचा विसर पडणं कसं शक्य आहे?

उठती वरती जलदावरती अनंत संध्याराग पहा

पूर्ण नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

जलद म्हणजे पाण्यांनी भरलेले ढग. हे ढग असतात सावळे; पण ते जे काही पाणी सृष्टीवर सिंचित करतात, त्यातून मानवी मनामध्ये जे काही राग निर्माण होतात, जे काही संगीत निर्माण होते, ते स्वर्गीय असते. त्या पूर्ण नभोमंडलावर जे काही चित्र रेखलेले आहे, ते सौंदर्याचे एक महारूप आहे. कारण, त्यातून जीवसृष्टी जगणार असते.

जलद हा शब्द डोळ्यांसमोर आला की, थोर गोमंतकीय कवी बा. भ. बोरकर यांच्या प्रसिद्ध ओळी मनामध्ये विहरायला लागतात...

गडद निळे गडद निळे जलद भरून आले

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले....

हे पाण्याने भरलेले मेघ वास्तविक जड असायला हवेत; पण ते आहेत चपल चरण म्हणजे चपल पायांनी वेगानं जाणारे. असे हे पाण्याने भरलेले मेघ जीवसृष्टी जगवण्यासाठी जात असतात म्हणूनच त्यांचे पाय चपळ असतात.

याच श्रावणाशी कुणाचे कोवळे भावबंधही जोडलेले असतात, गुंतलेले असतात. मंगेश पाडगावकर म्हणतात...

ओल्या श्रावण उन्हाचे, पुन्हा पुन्हा अन् पुन्हाचे

जपलेल्या नवसाचे ओथंबल्या पावसाचे

माझे मला दिवस ते परत दे...

पाऊस पडून गेलेला असतो आणि पुन्हा पडतही असतो... माझी एक दोनच ओळींची कविता आहे. ती दोनच ओळीत संपते...

लख्ख लख्ख ऊन्ह त्याची पावसाळी धून

चिंब चिंब थरथरणारी झाडे उभी निथळून...

पावसात भिजलेल्या लख्ख उन्हाची धून पावसाळी असते. चिंब चिंब भिजलेल्या पाना-पानातून, फांद्या-फांद्यांतून झाडे निथळत असतात. तीच जणू पावसाची गाणी गात असतात.

श्रावण हा सणासुदींचा महिना. बायका नटून-थटून सण साजरे करत असतात.... म्हणूनच बालकवी म्हणतात...

देवदर्शना निघती ललना हर्ष माईना गगनात

वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत...

श्रावण महिन्यात ललनांच्या मनातील हर्ष गगनात मावत नाही. त्यांच्या चेहर्‍यावरच श्रावण मोहरलेला असतो, ते गीत कोणी वाचावे इतके प्रासादिक आणि मधूर असते.

नव्या पिढीतील कवयित्री महानंदा मोहिते हिच्या कवितेतील श्रावण कसा दिसतो?

पाऊस निथळे मंद मंद की रंग विखुरते कुणी;

आसक्तीच्या हाती पडली पुन्हा बासरी जुनी...

गवतफुलावर जणू उतरले जलबिंदूंचे थवे

गजबजलेल्या आभाळाला सुख मातीचे हवे...

अशा स्वतःच स्वतःचा अर्थ उलगडून सांगणार्‍या ओळींचा अर्थ वेगळा सांगण्याची आवश्यकताच नाही.

मंगेश पाडगावकर म्हणतात...

श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशिमधारा

उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा...

श्रावण हा सणासुदीचा महिना. नुकतीच नागपंचमी झाली. वस्तुत: नागपंचमी हा सरपटणारे नाग-सर्प यांच्याबरोबरच नागवंशीय राजांशी संबंधित सण आहे. नाग हा भारतातील एक प्रसिद्ध वंश होता. नागवंशाचे भारतातील वेगवेगळ्या भागांवर राज्य होते. नागवंशीय हे क्षत्रिय राजे होते. ते सूर्यवंशी, चंद्रवंशी आणि अग्निवंशी यांच्यासोबतच देशातील एक वर्ण होते. छोटा नागपूरचे पठार, विदिशा, मथुरा, कांतीपुरी, पद्मावती अशा विविध राज्यांचे नाग हे अधिपती होते, असे पुराणांमध्ये उल्लेख आहेत. सम्राट समुद्रगुप्ताने नागवंशीयांशी नातेसंबंध जोडले होते. नागवंशीय राजे पराक्रमी होते. नागपूरमध्ये असलेल्या त्यांच्या राज्यात खूप समृद्धी होती, असे उल्लेख आहेत. नागांच्या सन्मानार्थ नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाते. अर्थात, नागपंचमी ही कृषी संस्कृतीशी संबंधित आहे. नाग हा शेतीला पूरक असणारा प्राणी आहे. गोकुळाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी हाही सण नागर संस्कृतीबरोबरच कृषी संस्कृतीशीही जोडलेला आहे. कारण, श्रीकृष्ण हा बाळकृष्ण असताना नंदाच्या घरी वाढला. त्याचे पालनपोषण गवळ्यांनी केले. नंतर तो हस्तिनापूरला गेला. नारळी पौर्णिमा हा कोळ्यांशी संबंधित सण आहे. याच दिवशी कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करून मासे पकडण्यासाठी नौका घेऊन जातात. याच महिन्यात रक्षाबंधन हाही सण येतो. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा धागा बांधणारा हा सण आहे. श्रावणातील किंवा भारतातल्या सर्व ऋतूंमधील सणांचा संबंध हा कृषी संस्कृतीशी आहे. बैलपोळा हा सणही कृषी संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.

भारतीय संस्कृती ही सणांचे उत्सव साजरे करणारी आहे. त्यातच श्रावण हा ऊन-पावसाच्या रमणीय खेळाचा महिना आहे. ज्या महिन्यात पाऊस आणि ऊन यांचा मजेशीर खेळ अनुभवायला मिळतो, असा हा रंगबावरा श्रावण आपल्या मनामनातून रिमझिमत जातो, अंगोपांगी बरसतो, कोवळ्या उन्हाचे उबदार मोरपीस अंगावर फिरवतो. मनात कोवळे अंकुर फुटतात, जगण्याची नवी ऊर्मी निर्माण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT