Water Saving Tips | जल बचतीचे जंतर मंतर... 
बहार

Water Saving Tips | जल बचतीचे जंतर मंतर...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मंगेश कश्यप

सलग ८ महिने... म्हणजेच तब्बल २४० दिवस! विचार करा, हे पुढील आठ महिने आपण कसे काढणार आहोत? आठ महिने म्हणजे काही लहान सहान काळ नाही. या वस्तुस्थितीचे भान ठेवून आपणाला उपाययोजना अमलात आणता येतील .

दुष्काळाची दाहकता आता अधिकच जाणवायला लागली आहे. त्यातल्यात्यात महानगरांमधील नागरिकांना अजूनही त्याची म्हणावी तेवढी झळ जाणवत नाही असे दिसून येते. एक सर्वात मोठा समज या नागरिकांत दिसून येतो तो म्हणजे, 'दुष्काळ हा फक्त शेतकऱ्यांचा विषय आहे, आपला काय संबंध?'

महाराष्ट्र सिंचन परिषदेचे डॉ. दि. मा. मोरे यांनी महाराष्ट्रातील शेतीच्या पाणीवापराच्या संदर्भात केलेले निरीक्षण आणि आग्रह इथे महत्त्वाचा ठरतो. त्यांनी मांडलेला जलन्यायाच्या कार्याशी संबंधित मोजून आणि कार्यक्षमतेने पाणी वापरण्याचा विचार महत्त्वाचा ठरतो. शेती असो किंवा शहर, पाण्याचा वापर किती होतो याचे मोजमाप नसेल, तर कार्यक्षमता सुधारण्याच्या संधीही स्पष्ट होत नाहीत. शहरांसाठी याच विचाराचा विस्तार करून प्रत्येक स्रोतापासून प्रत्येक वापरापर्यंत पाण्याचा हिशेब ठेवणे आवश्यक आहे. आता ऑक्टोबरअखेर आणि दिवाळीच्या प्रारंभाला आपल्या महाराष्ट्राच्या छाताडावर ७५ टक्के पाणीटंचाईचे भूत येऊन बसले आहे. सरसकट १० टक्के पाणी कपात मागील पंधरा ऑक्टोबरपासून लागू झाली आहे आणि ही पाणी कपात डिसेंबरअखेर अजून वाढू शकते, याचाही विचार करायला हवा. अजून उन्हाळा यायचा बाकी आहे. जरा शांतपणे बोटांवर मोजा आणि कॅलेंडरचा हा हिशेब बघा:

१) ऑक्टोबर (पावसाळा संपतानाच कोरड!), २) नोव्हेंबर (थंडीची सुरुवात; पण धरणात पाणी नाही), ३) डिसेंबर (गुलाबी थंडी; पण चिंतेचे ढग), ४) जानेवारी २०२७ (नवीन वर्षाची सुरुवात टंचाईने), ५) फेब्रुवारी (विहिरींची पातळी खाली), ६) मार्च (उन्हाचा चटका आणि पाण्याचा टंचाईचा झटका), ७) एप्रिल (रखरखते उन्हाळे आणि टँकरची वाट), ८) मे (पाण्याच्या एका-एका थेंबासाठी जीवन-मरणाचा संघर्ष)

सलग ८ महिने... म्हणजेच तब्बल २४० दिवस! विचार करा, हे पुढील आठ महिने आपण कसे काढणार आहोत? आठ महिने म्हणजे काही लहानसहान काळ नाही.

या वस्तुस्थितीचे भान ठेवून आज, आता या क्षणापासून पाणी वाचविण्याच्या उपाययोजना ज्या सर्वसामान्य शहरांतील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अंमलात आणता येतील त्या राबविणे आवश्यक आहे, तर मग आजपासूनच या कार्याला आपण सुरुवात करू या!

पाणी वाचवण्याचे छोटे छोटे उपाय, जे आपल्या आवाक्यात आहेत. त्यावर थोडा दृष्टिक्षेप टाकूयात. या व्यतिरिक्त जिथे जिथे पाणी वाचविता येईल तिथे तिथे आपण हे जल बचत व्रत सुफळ करूया!

'अर्धा ग्लास' पाहुणचार

आपल्याकडे घरी पाहुणा आला की, आपण आदरातिथ्य म्हणून तांब्या भरून किंवा मोठा फूल ग्लास पाणी देतो. पाहुणा त्यातले दोन घोट पितो आणि उरलेले पाऊण ग्लास पाणी सरळ बेसिनमध्ये ओतून दिले जाते. इथून पुढे घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीला अर्धाच ग्लास पाणी देऊयात. नम्रपणे सांगूया, 'पाणी मौल्यवान आहे, तुम्हाला अजून हवे असेल, तर नक्की सांगा.' पाहुणाही खूश आणि उरलेले हजारो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचेल.

हा प्रयोग सिरम एन्व्हायरमेंटल सस्टनाबिलिटी रिसर्च फाऊंडेशनने पुण्यात व्यावसायिक आस्थापनांमध्ये राबवला आणि एक कोटी लिटरपेक्षा अधिक पाण्याची बचत केली.

दुसरा उपाय म्हणजे, 'एक बादली' पाण्यात अंघोळ. नो शॉवर. शॉवरखाली उभे राहून मस्त गाणी गात आंघोळ करताना किती शेकडो लिटर पाणी वाहून जाते, याचा आपल्याला अंदाजच येत नाही. त्यामुळे पुढील आठ महिने शॉवर पूर्णपणे बंद! फक्त एक बादली आणि एक तांब्या. एका माणसाच्या आंघोळीमागे रोज किमान ३० ते ४० लिटर पाणी वाचते. घरात ४ माणसे असतील, तर रोज १५० लिटर पाण्याची बचत. नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित झाले आणि काही केले गेले. त्यामुळे आजकाल सर्वांच्या घरात, कार्यालयात वॉटर प्युरिफायर/ वॉटर फिल्टर अथवा RO मशिन बसविण्यात येतात. आपल्या घरातील अथवा कार्यालयातील वॉटर प्युरिफायर एक लिटर पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी तब्बल ३ लिटर वेस्ट पाणी बाहेर टाकून देतो. आपण ते पाणी पाईपद्वारे थेट बेसिनमध्ये सोडून देतो. तो वेस्ट पाण्याचा पाईप एका मोठ्या कॅनमध्ये किंवा बादलीत सोडूया. ते पाणी अजिबात घाण नसते. ते पाणी फरशी (पोछा) पुसण्यासाठी, भांडी धुण्यास/घासण्यासाठी , कपडे धुण्यासाठी किंवा संडासच्या फ्लशसाठी वापरता येईल. त्यामुळे शेकडो लिटर पाण्याची बचत होईल.

मित्रांनो, निसर्गाने आपल्याला यंदा वेळेच्या आधीच कडक इशारा दिला आहे. अजूनही आपल्याकडे वेळ आहे. हे उरलेले पावसाचे दिवस आणि येणारे आठ महिने आपण संयमाने आणि युक्तीने पाणी वापरले, तरच आपण या संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकू.

'आज जर पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला नाही, तर उद्या पश्चात्तापाचे अश्रू ढाळायलाही डोळ्यात पाणी उरणार नाही!' पाणी वाचवा..! काय मग, करूया का जल बचतीचं जंतर मंतर आपल्याच घरापासून!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT