Sriranjan Awate Sanvidhan Bhan Book Review Pudhari
बहार

Sanvidhan Bhan: संविधान-भान: भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा शोध घेणारा ग्रंथ

Sanvidhan-Bhan Book Review: संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणारा, तरुण आणि सर्वसामान्य वाचकांसाठी मार्गदर्शक ठरणारा 'संविधान-भान' हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे.

Rahul Shelke

Sanvidhan-Bhan Book Review: आजच्या राजकीय आणि सामाजिक चर्चांमध्ये 'संविधान' हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. निवडणुका असोत, आंदोलने असोत किंवा संसदेतले वादविवाद असोत, संविधानाचा उल्लेख सातत्याने होत असतो. मात्र संविधान म्हणजे नेमकं काय, त्याची रचना कशी आहे, त्यातील तत्त्वांचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी काय संबंध आहे, याबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेकदा पुरेशी स्पष्टता दिसून येत नाही. अशा वेळी श्रीरंजन आवटे लिखित 'संविधान-भान' हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

संविधानासारखा गंभीर आणि व्यापक विषय सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवणे हे सोपं काम नाही. कारण या विषयावर लिहिताना कायद्याची भाषा, ऐतिहासिक संदर्भ आणि राजकीय प्रक्रिया यांची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र श्रीरंजन आवटे यांनी ही कठीण जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आहे. त्यांनी संविधानातील तरतुदींचा अभ्यासपूर्ण ऊहापोह करताना भाषा साधी, सरळ आणि प्रवाही ठेवली आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ अभ्यासकांसाठी नाही, तर सर्वसामान्य वाचकांनाही सहज समजण्यासारखा आहे.

या ग्रंथाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची रचना. संविधानातील विविध भाग, अनुच्छेद आणि त्यामागील विचार क्रमवार पद्धतीने मांडण्यात आले आहेत. संविधानाच्या उद्देशिकेपासून ते मूलभूत हक्क, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, संसदीय व्यवस्था, न्यायपालिका, निवडणूक आयोग, सामाजिक न्याय, भाषिक प्रश्न आणि आणीबाणीपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांचा विस्तृत आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.

पुस्तकातील प्रकरणांची शीर्षकेच वाचकांचे लक्ष वेधून घेतात. 'समतेचे गाणे', 'हक्क स्वातंत्र्याचे', 'कर्तव्यांचे काव्य', 'लोकशाहीचे मंदिर', 'देशाचा प्राणवायू', 'आभाळाची आम्ही लेकरे' अशा शीर्षकांमुळे वाचकाची उत्सुकता वाढत जाते. संविधानातील तत्त्वांचा संबंध लेखकाने थेट समाजजीवनाशी जोडला आहे. त्यामुळे संविधान हे केवळ कायद्याचे जाडजूड पुस्तकं नसून आपल्या जगण्याचा आधार आहे, ही जाणीव वाचकाला होत राहते.

या ग्रंथातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ऐतिहासिक संदर्भ आणि समकालीन वास्तव यांचा सुंदर मेळ. संविधानातील तरतुदी कशा निर्माण झाल्या, त्यामागील विचार काय होता आणि आजच्या काळात त्यांचे महत्त्व काय आहे, याची स्पष्ट मांडणी लेखकाने केली आहे. आरक्षण, धर्मनिरपेक्षता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकत्व, सामाजिक न्याय, संघराज्यवाद, निवडणूक प्रक्रिया अशा अनेक विषयांवरील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.

श्रीरंजन आवटे यांची लेखनशैली हा या ग्रंथाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. संविधानाविषयी लिहिताना ते केवळ कायदेशीर संदर्भ देत नाहीत, तर साहित्य, इतिहास, समाजकारण आणि मानवी मूल्ये यांची सांगड घालतात. त्यामुळे पुस्तकात माहितीबरोबरच नवा विचारही मिळतो. बुद्ध, ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, जयपालसिंग मुंडा, दाक्षायणी वेलायुधन यांसारख्या विविध व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी संविधानाचा मानवी चेहरा समोर आणला आहे.

विशेष म्हणजे संविधान हे केवळ राज्यकारभार चालवण्याचे साधन नसून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचे स्वप्न आहे, ही जाणीव पुस्तक वाचताना ठळकपणे जाणवते. लेखकाने संविधानकर्त्यांच्या स्वप्नांचा मागोवा घेताना भारताच्या बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि बहुधार्मिक स्वरूपालाही अधोरेखित केले आहे.

पाचशे वीस पानांचा हा ग्रंथ आकाराने मोठा असला तरी वाचनात कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. अभ्यासपूर्ण माहिती आणि ओघवती भाषा यामुळे पुस्तक वाचकाला सतत गुंतवून ठेवतं. संविधानाविषयी गंभीरपणे जाणून घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी, पत्रकारांसाठी आणि जागरूक नागरिकांसाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरतो.

एकूणच, 'संविधान-भान' हा केवळ संविधानाचा परिचय करून देणारा ग्रंथ नाही, तर भारतीय लोकशाहीच्या मूल्यांची जाणीव करून देणारा आणि नागरिकत्वाचा अर्थ समजावून सांगणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. संविधान समजून घेण्यासाठी आणि त्यामागील मानवी मूल्यांचा वेध घेण्यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचावा. संविधानाबद्दल केवळ माहिती नव्हे, तर 'भान' निर्माण करणारा हा ग्रंथ मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालणारा आहे.

• पुस्तक : संविधान-भान

• लेखक : श्रीरंजन आवटे

• प्रकाशक : रोहन प्रकाशन

• पाने: 520, किंमत : 925 रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT