पंढरीचा विठुराया आणि महाराष्ट्रातील संतांचे भावबंध अनोखे आहेत. राज्यात संत परंपरा फुलली ती बहुतांश विठोबारायाच्या पायाशीच अन् हीच परंपरा वारी वा अन्य माध्यमांतून वारकरी सांभाळत आहेत. महाराष्ट्रमनावर गारूड घालणारी ही संत परंपरा चित्रपट क्षेत्रापासूनही कशी अलिप्त राहील! याच संत परंपरेवर माणसाच्या काळजात उतरणारे अनेक नितांत सुंदर चित्रपट या मातीत तयार झाले. आषाढी वारीनिमित्त अशा काही चित्रपटांचा घेतलेला हा धांडोळा...
आपल्याकडे वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माची खूप जुनी संपन्न अशी परंपरा आहे. अनेक संतांनी या धर्माची पताका दिमाखाने फडकत ठेवली. या संतांच्या शिकवणुकीचा, त्यांच्या आचरणाचा आणि समतेच्या संदेशाचा मोठा प्रभाव इथल्या जनमानसात खोलवर असलेला आजही दिसतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा आदी संतांनी भक्तीचा मार्ग दाखवत समाज प्रबोधन केले. या महात्म्यांचा प्रभाव इथल्या सांस्कृतिक माध्यमांवर पूर्वीपासून पडत आला आहे. चित्रपट या प्रभावी द़ृकश्राव्य माध्यमातून या संतांवर अनेक (मूकपटाच्या काळापासून) चित्रपट आले. मराठीशिवाय अन्य भाषांतील टीव्ही मालिका, नाटकेदेखील या विषयावर आली. या कलाकृती पौराणिक/धार्मिक चित्रपटांपासून अगदी भिन्न अशा होत्या. यात मोठे राजवाडे, महाल, त्यांचा डामडौल, डोळे दीपवून टाकणारे नेत्रदीपक सेटस्, चमत्कार, कर्मकांड याचा संपूर्णपणे अभाव असायचा. चित्रपटातील साधेपणातून समतेचा आशय समाजापर्यंत पोहोचवला जायचा. अलीकडच्या काळात पंढरपूर आणि वारी यावर थेट चित्रपट येत नसले, तरी चित्रपटाच्या कथानकात याचा वापर केला जातो. ‘लई भारी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वारी’ या चित्रपटातून नवीन पिढीलादेखील या समृद्ध वारशाचेच दर्शन घडते. आज आषाढी एकादशी. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरीला पोहोचला आहे. अशा या सात्विक, मंगलमय प्रसंगी आपण मराठी संतपटांचा आढावा घेऊया!
संतपट म्हटलं की, पहिल्यांदा नजरेपुढे येतो तो प्रभातचा ‘संत तुकाराम’. 7 नोव्हेंबर 1936 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळविले आहेच. शिवाय व्हेनिस येथे 1937 मध्ये झालेल्या जागतिक चित्रपट महोत्सवात ‘संत तुकाराम’ ला जगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांमध्ये निवड करून गौरविण्यात आले होते. विष्णुपंत पागनीस यांनी यातील तुकाराम महाराजांची भूमिका केली होती. दामले आणि फत्तेलाल यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. संत तुकारामांची विठ्ठल भक्ती, समाजातून त्यांना होणारा विरोध, त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवणे, त्यांचे वैकुंठ गमन, छ. शिवाजी महाराजांसोबत झालेली त्यांची भेट, वरून भांडखोर; पण मनाने प्रेमळ असलेली त्यांची पत्नी आवली हे सर्व इतक्या साध्या आणि समर्पक रीतीने पडद्यावर चितारले होते की, आजही हा चित्रपट अभ्यासकांकरिता आदर्श वस्तुपाठ आहे. यातील पागनीस यांच्या भूमिकेचे गारुड अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनातून दूर झाले नाही. इतके की, बर्याच ठिकाणी संत तुकाराम म्हणून विष्णुपंत पागनीस यांचेच छायाचित्र लावले जाऊ लागले. यातील सुंदर प्रासादिक संवाद शिवरामपंत वाशीकर यांचे होते. यातील बहुतेक सर्व गाणी संत तुकाराम यांनीच लिहिली होती. फक्त ‘आधी बीज एकले’ हे शांताराम आठवले यांनी लिहिलं होतं. संगीत केशवराव भोळे यांचे होते. यात तब्बल 29 गाणी होती.
हाच ‘संत तुकाराम’ प्रभातने 1948 मध्ये हिंदीत डब करून पडद्यावर आणला. यातली गाणी डब केली होती संगीतकार स्नेहल भाटकर यांच्या स्वरात. याच भाटकरबुवांनी तुकाराम महाराजांवरील आणखी एका चित्रपटाला संगीत दिले होते. 1964 मध्ये (उदय चित्र या संस्थेचा) राजा नेने यांनी ‘तुका झालासे कळस’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. यात कुमार दिघे आणि सुलोचना यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. कथा-पटकथा-संवाद आणि काही गाणी गदिमांची होती. यातील अखेरचा वैकुंठ गमनाचा प्रसंग सप्तरंगात चित्रित केला होता. राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 1965 मध्ये या सिनेमाला मिळाला होता. 8 जून 2012 रोजी चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ हा चित्रपट आला. यात जितेंद्र जोशी यांनी ‘तुकाराम’ साकारला होता. नव्या तंत्रातील हा तुकाराम रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यातील काही पारंपरिक रचनांसोबत काही गाणी दासू वैद्य यांनी लिहिली होती. याला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. मराठीशिवाय कन्नड भाषेतही तुकाराम महाराजांवर चित्रपट निर्मिती झाली.
संत ज्ञानेश्वरांचा कालखंड तुकारामाच्या आधीचा बाराव्या शतकातील. प्रभातने 1940 मध्ये ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट निर्माण केला. दामले-फत्तेलाल यांनीच याचे दिग्दर्शन केले होते. शाहू मोडक या गुणी कलावंताने प्रमुख भूमिका केली होती. यात ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून मिळालेली अमानुष वागणूक, ज्ञानार्जनासाठी करावा लागलेला संघर्ष आणि ज्ञानेश्वरीची रचना करण्याचा त्यांचा कालखंड अतिशय कलात्मक रीतीने दाखविण्यात आला होता. भगवान श्रीकृष्णाने भगवत गीतेत सांगितलेला मानव धर्म रूढ दांभिक धर्माखाली दबून गेला असल्याने खर्या धर्माची महती सोप्या प्राकृत भाषेत करण्याचा माऊलींचा ध्यास फार फार सुंदर प्रकारे चित्रित केला गेला. 18 मे 1940 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. पुण्यात तर या सिनेमाची प्रिंट टाळ- मृदंग यांच्या गजरात प्रभात थिएटरवर आणण्यात आली. माऊलींच्या जयजयकाराने अवघा परिसर भक्तिमय बनला. मुंबई दूरदर्शनवरील मराठी चित्रपटांच्या प्रक्षेपणाचा शुभारंभ दि. 7 ऑक्टोबर 1972 रोजी याच चित्रपटाने झाला होता. 1964 मध्ये हिंदीत ‘संत ज्ञानेश्वर’ हा चित्रपट बनला. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ या गीताने मोठी लोकप्रियता मिळविली. यात सुधीरकुमारने (‘दोस्ती’फेम) ज्ञानेश्वर साकारला होता. मणिभाई व्यास यांचं दिग्दर्शन होतं, तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल याचं संगीत होतं. महेश कोठारे यांनी 1964 च्या ‘संत निवृत्ती ज्ञानदेव’मध्ये बाल ज्ञानोबांची भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुकर पाठक यांचे, तर संगीत सी. रामचंद्र यांचे होते. यात पद्माकर गोवईकर यांनी ज्ञानदेव साकारला होता. यातील गाणी खूपच गोड होती. गदिमा यांनी यात कमालच केलेली. ज्ञानेश्वरांच्या लेखन शैलीशी जुळणारे एक गीत यात होते जे गदिमांनी लिहिले होते. ‘नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु, मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु’ हेच ते गीत जे आशाने गायिले होते. ‘मुंगी उडाली आकाशी’, ‘रूप पाहता लोचनी सुख जाले हो साजनी’, ‘चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ हे अभंग देखील यात होते. या सिनेमाला चांगले यश मिळाले.
संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत म्हणजे संत नामदेव. प्रभात चित्र संस्थेने 1949 मध्ये ‘संत जनाबाई’ हा चित्रपट बनविला. यात नामदेवांची भूमिका अभिनेता विवेक याने, तर जनाबाईच्या भूमिकेत हंसा वाडकर होत्या. गदिमा-सुधीर फडके ही जोडी गीत संगीताकरिता होती. ‘प्रभात समयो पातला’ ही भूपाळी यात होती. 1995 मध्ये यशवंत पेठकर यांनी ‘संत नामदेव’ हा रंगीत चित्रपट निर्मिला, ज्यात पद्माकर गोवईकर ‘नामदेव’ बनले होते. नामदेव आणि ज्ञानेश्वर समकालीन असल्याने या चित्रपटात यात त्यांचाही समावेश होता. सुधीर फडके यांची निर्मिती असलेला 1951 च्या ‘विठ्ठल रखुमाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पेठकर यांनीच केले होते. यात संतांची गर्दी होती. यात तुकारामांची भूमिका बालगंधर्व यांनी केली होती. ही त्यांची अखेरची रूपेरी भूमिका ठरली. दत्ता धर्माधिकारी यांचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा चित्रपट 1962 मध्ये पडद्यावर आला. यात अरुण सरनाईक यांनी नामदेवाची भूमिका केली होती. यातील जनाबाईची भूमिका सुलोचना यांनी केली होती.
संत एकनाथ महाराज त्यांच्या अस्पृश्यताविरोधी लढा आणि समाजातील दांभिकतेवर त्यांनी रचलेल्या भारुडामुळे आजही जनमानसात लोकप्रिय आहेत. 1935 मध्ये प्रभात फिल्म कंपनीने ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांचा जीवनपट दाखविला होता. यात मुख्य भूमिकेत बालगंधर्व होते आणि त्यांचा तो पहिलाच चित्रपट होता. आपल्या स्त्री पार्टने अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर बालगंधर्व यांनी यात पहिल्यांदाच पुरुष पात्र रंगवले होते. या सिनेमाचे मूळ नाव ‘महात्मा’ होते. म. गांधींचे हरिजन उद्धाराचे काम त्यावेळी जोरात सुरू होते. संत एकनाथांच्या कार्याला गांधींचा चेहरा लावून कुठेतरी गांधींचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे, याची कुणकुण ब्रिटिशांच्या कानी गेली आणि त्यांनी सिनेमाचे नाव बदलायला लावले. 1941 मध्ये याच संस्थेचा ‘संत सखू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात प्रमुख भूमिकेत हंसा वाडकर होत्या. सखूचा अतोनात छळ तिच्या सासूने केला. या सासूच्या भूमिकेत गौरी होती. सखूची ही कहाणी महिलावर्गात अफाट लोकप्रिय असल्याने त्यांनी सिनेमाचे उदंड स्वागत केले. याच कथानकावर आचार्य अत्रे यांनीदेखील त्याचवर्षी ‘पायाची दासी’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता; पण यातली ‘सखू’ ही अलीकडच्या काळातील होती. थोडक्यात, संतपटाचा सामाजिक पट त्यांनी केला. यात सखूची भूमिका वनमाला यांनी, तर दुष्ट सासूच्या भूमिकेत दुर्गा खोटे होत्या. हा चित्रपट अफाट गाजला.
यातील ‘अंगणात फुलल्या जाईजुई’ (सं. अण्णासाहेब माईणकर) खूप लोकप्रिय झाले होते. याशिवाय संत चोखामेळा, कान्होपात्रा, संत गोरा कुंभार, संत रामदास यांच्यावरही चित्रपट तयार झाले. 1950 मध्ये मंगल चित्र संस्थेकडून ‘जोहार मायबाप’ राम गबाले यांच्या दिग्दर्शनात या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांनी संत चोखामेळाची भूमिका केली होती. ‘पुलं’ची लोकप्रियता कॅश करण्यासाठी साठच्या दशकात रणजित बुधकर यांनी हा सिनेमा ‘ही वाट पंढरीची’ या नव्या नावाने प्रदर्शित केला आणि या सिनेमाने तुफान धंदा केला. याच नावाने 1984 मध्ये एका चित्रपटाची निर्मिती सुरू झाली होती. या चित्रपटाच्या शूटिंगकरिता 22 जून 1984 रोजी अभिनेते अरुण सरनाईक कोल्हापूरहून आपल्या कुटुंबीयासोबत कारने निघाले होते; पण दुर्दैवाने इस्लामपूर जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पुढची चार वर्षे हा सिनेमा डब्यात गेला. नंतर अरुण सरनाईक यांच्या जागी बाळ धुरी सिनेमात आले आणि ‘पंढरीची वारी’ या नावाने चित्रपट प्रदर्शित झाला. रमाकांत कवठेकर यांचे दिग्दर्शन होते. ‘धरिला पंढरीचा चोर’ हे सुंदर गाणे यात होते. रुढार्थाने हा संतपट नव्हता. तो सामाजिक चित्रपट होता. वारकर्यांचे भावविश्व यात चितारले होते. या सिनेमाची कथा शरद तळवलकर यांची होती. विसाव्या शतकातील संत साईबाबा, संत गजानन महाराज, बाळू महाराज, श्री स्वामी समर्थ आणि संत गाडगेबाबा यांच्यावर, त्यांच्या कार्यकर्तृत्वावर अनेक सिनेमे तयार झाले. त्यांच्या भक्तगणांनी ते आवडीने बघितले. ‘देऊळ बंद’ हा सिनेमा तर अलीकडचा रिलेव्हन्स घेऊन बनला होता. 1977 मध्ये राजदत्त यांनी ‘देवकी नंदन गोपाला’ या चित्रपटातून गाडगे महाराजांचा जीवनालेख उघडून दाखविला. यात ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ (मन्नाडे) आणि ‘विठ्ठलाच्या पायी थरारली वीट’ (पं. भीमसेन जोशी) ही दिग्गजांनी गायिलेली गाणी होती. संगीत राम कदम यांचे होते. एकूणच मराठी संतपट हे आपल्या मराठी संस्कृतीचे वैभव आहे.